Tuesday, March 28, 2006

हिंदीची चिंधी

एका भाषेच्या पानाला दुसरीचा 'चुना' लावला की जी विनोदरसनिष्पत्ती होते, तिच्यावर अनेक आघाडीचे e-mail forwarders भिस्त ठेवून असतात. "जिने के उपर से धाडकन पड्या" या वाक्याने सुरुवात होणारी ती email दर साल दर शेकडा वीस इतक्या दराने तरी आली असेल माझ्याकडे.

बंगाली( ओरिसा ते अरुणाचलासकट) ,'south Indian'या एकाच नावाने ओळखले जाणारे सर्व द्राविडी बंधुभगिनी, मराठी, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषिकांसोबत राहताना आम्हांला हे असे विनोद याचि देही याचि कानां अनुभवायला मिळतात. त्यातून राष्ट्रभाषा आणि महाराष्ट्रभाषा यांच्या संकरातून निर्माण होणाऱ्या विनोदांना तोड नाही. "मुझको ठंड बज रही है", "खाली बैठ के काम कर", "दरवाजे को कडी डालो", "हमारे यहां शादी के टाईम लडका-लडकी एक दूसरे को घास खिलाते हैं"..ही सगळी अशा संकराची मुक्ताफळं!

असाच इथे ऐकलेला एक किस्सा:

एका नवीन प्राध्यापकांनी आपल्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळीला फराळाला बोलावलं. बाहेर इंग्रजी ही ज्ञानभाषाच सतत वापरात, त्यामुळे हिंदीचं अज्ञान खपून जायचं. पण informal वातावरण यावं, म्हणून घरात आलेल्या पाहुण्यांशी हिंदी बोलावं लागायचं. सरांनी सुरुवात केली: "कहो शेषाद्री, क्या हाल है?" त्या तेलुगु मुलाचं निरागस उत्तर: "हाल ८, सर."
(आमच्याकडे विद्यार्थी-वसतिगृहांना Hall 1, Hall 2.. अशी नावं आहेत..त्या बिचाऱ्याला वाटलं सर त्याचं हॉस्टेल कुठलं, ते विचारतायत!) त्यानंतर पिकलेल्या हशानं सरांचा confidence वाढलाच एकदम. आपल्यापेक्षासुद्धा हिंदी कमी येणारे लोक इथे आहेत, हे बघून मग त्यांनी हिंदीचा दांडपट्टा चौफेर फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या पत्नीनं फराळाचे पदार्थ बाहेर आणून ठेवले होते, पण 'प्राध्यापकासमोर धारण करावयाच्या' खोट्या विनयामुळे पोरं जास्त खायला कचरत होती.
सरांच्या ते लक्षात आलं. सगळ्यांकडे बघत ते 'यजमान'पणाच्या लटक्या रागाने गरजले: "अरे खाओ खाओ. सब खत्म कर डालो. शरम तो है नहीं! "

'शरमाओ मत' साठी सरांनी शोधलेला तो पर्याय ऐकून त्या 'पाहुण्यांचे' चेहरे कसे झाले असतील या कल्पनेनेच मला अजूनही हसू येतं :)

एका उत्तर भारतीय दूधवाल्याने पुण्यातल्या एका भागात नव्याने व्यवसाय सुरू केला होता. ठराविक घरी दूध पोचवल्यानंतर, शेवटच्या घरातल्या कनवाळू गृहिणीशी त्याचा थोडा संवाद चालायचा. त्याचं गाव कोणतं, लग्न झालंय का, पत्नी कशी आहे, मुलंबाळं किती, घर स्वत:चं की भाड्याचं अशी इत्थंभूत माहिती काकूंनी आठवड्याभरातच गोळा केली होती. त्याच्याबद्दल 'कष्टाळू आहे बापडा' असं अनुकूल मतदिखील बनवून झालं होतं.(नवीन असल्यामुळे इतक्यात नीरक्षीरमिलाप न साधण्याचा विवेक त्याच्यापाशी होता!)आठ-पंधरा दिवसांनंतर त्याचं इथलं बस्तान नीट बसलंय की नाही, याची चौकशी करायला काकूंनी सुरुवात केली.
"हं भय्या,कैसा लगता है तुमको हमारा पुणे अब?"
"जी, बहुत बढिया लगता है जी.बस ये धंदा थोडा और अच्छे से चले तो.."
"हां,हां, बिल्कुल काळजी मत करना. तुम्हारा धंदा 'बैठ जायेगा' यहा अच्छे से!"

धंद्याचं माहिती नाही, पण तो दूधवाला मट्कन खाली बसला असणार हा प्रेमळ आशीर्वाद ऐकून!

Sunday, March 26, 2006

आजोबा

"अहो..ते बघा तिकडं..आपले गोटखिंडीकरच ना ते?"
"अगं हो. त्यांच्यात काय बघायचंय पण आता या वयात?"
"अहो तसं नाही! खांद्यावर बघा की त्यांच्या. नात झालीय ना पाच-सहा म्हयन्यांपूर्वी? तिला घेऊन फिरायला निघालेत बहुतेक. तुमचा जुना फ्यॅमिली फोटो आहे बघा - त्यात तुमच्या वडिलांनी उपरणं गळ्यात घालून त्याचा उजवीकडचा शेव डाव्या खांद्यावरून मागे टाकलाय किनै - तश्शी धरलीय तिला त्यांनी डाव्या खांद्यावर. ही कसली बाई नवीन स्टाईल? लेकराची मान-बीन मुरगळेल की. थांबा सांगतेच त्यांना.."
"अगं अगं पण.."
**

"काय हो हे भाऊसाहेब? "
"नमस्कार वहिनी. काय झालं हो?"
"अहो पोरीला जरा नीट घ्या की कडेवर. हे काय धोतराच्या पिळ्यासारखं खांद्यावर टाकून चाललाय?"
"अहो मी लाख घेईन हो नीट. पण या भवानीला असंच निवांत पडून राहायला आवडतं त्याचं काय? जरा हातांवर घ्यायचा अवकाश, की निषेधात्मक आवाज सुरू करते. आणि इकडे लोकांच्या 'काय चमत्कारिक म्हातारा आहे' अशा नजरा टाळताना मला नको जीव होतो!"
"अहो त्या सहा पौंडी जिवाला काय कळतंय स्वत:चं बरं वाईट? जरा रडू दे रडली तर. मान सावरता येत नसेल अजून..लचकली म्हणजे केवढ्याला पडायचं!"

भाऊंनी दचकून सायलीला मोठ्या निर्धारानं नीट कडेवर घेतलं. ती बया पण आता मूठ चोखत शांतपणे इकडे-तिकडे बघत, वहिनींकडे बघून निवांत हसली. भाऊंना अस्सा राग आला... 'नेहमी लोकासमोर हसं करते माझं कारटी.'
वहिनींनी आपला जय झाल्याच्या आनंदात सायलीशी चुटक्या-बिटक्या वाजवून, तिला 'हुश्शाल आहे हो आमची शायली' (स्वगत: आजोबांसारखी नाही..) वगैरे सर्टफिकेट देऊन सलगी प्रस्थापित केली.
भाऊंनी वरवर हसत मनातल्या मनात आणेकर वहिनींना शत्रुपक्षाच्या सेनानीचं पद बहाल करून टाकलं. त्यांच्यावर 'म्हणे रडली तर रडू दे..काही दयामाया आहे की नाही? स्वत:च्या खंडीभर नातवंडांना असंच वाढवलं असणार!' असं तीव्र शरसंधान मनातल्या मनात करताना घर कधी आलं त्यांना कळलंसुद्धा नाही.
**

फाटकाची कडी उघडायला जाणार तेवढ्यात सायलीबाई खांद्यावर गाढ झोपून गेल्याचं भाऊंच्या लक्षात आलं. कुठेही आणि कधीही असं निर्धास्तपणे झोपता येण्याच्या तिच्या क्षमतेचा त्यांना भारी हेवा वाटायचा.पण आता एक नवीच अडचण त्यांच्या ध्यानात आली. एका हातात हे गाठोडं, दुसऱ्या हातात छडी, मग बंगल्याचं ते प्रचंड फाटक उघडायला तिसरा हात कुठला आणायचा?
बरं छडी बाजूला ठेवून एका हाताने फाटक उघडलं तरी त्या हालचालींनी, आवाजाने बाईसाहेब उठून भोकाड कशावरून पसरणार नाहीत? 'अगतिक' का काय म्हणतात तशा पद्धतीने त्यांनी कुजबुजत्या आवाजात माईंना, क्षिप्राला हाका मारण्याचे निष्फळ प्रयत्न केले. अर्थातच ते कुकरच्या शिट्ट्या, भांड्यांची पडापड या सकाळच्या नित्यपाठातून त्या दोघींनाही ऐकू आले नाहीत. मग छडी, सायली आणि कामवाल्या मावशी येईपर्यंत दारासमोर फेऱ्या मारणं, या तीन गोष्टींखेरीज भाऊंच्या हातात काहीच उरलं नाही.
**

एवढं झालं तरी सायलीवर आपल्याला चिडता का येत नाहिये, हे भाऊंच्या ध्यानात येईना. खरं म्हणजे खडकवासल्यातल्या कारखान्यात पर्यवेक्षकाचं काम करताना त्यांचं म्हणजे 'गोटखिंडीकर साहेबांचं' काम म्ह्टलं की अट्ट्ल कामचुकार सावजी सुद्धा श्रमपूजकाच्या भूमिकेत शिरायचा.हो! उगीच वाघाच्या जबड्यात कशाला मान द्या?
घरात सुद्धा माई आणि प्रकाश, विकास, मेधा त्यांना घाबरूनच असायचे. लग्न होऊन क्षिप्रा घरात यायला आणि ते सेवानिवृत्त व्हायला एकच गाठ पडली. आता ते जरा मवाळले, पण पूर्वीची जरब बऱ्याच अंशी कायम होती. 'या सगळ्याला सुरुंग लावला त्या कार्टीनं..' भाऊंना वाटलं. कारण सायली आल्यापासून तीच घराची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली होती.'सायली उठली का? तिची आंघोळ आधी होऊ दे. जरा हळू बोला, ती उठेल. अग्गं बाई, भिजवलान वाटतं शर्ट? व्हायचंच हो असं..जा पटकन बदलून या. आता मी कुठून देऊ आणखीन? घाला हो तुम्हीच कुठलातरी शोधून. मला सायलीकडे नको का पहायला? आणि हो, उद्यापासून सकाळ-संध्याकाळ फिरायला जाताना तिला सोबत घेऊन जा हं...'
"भाऊ म्हणे आता । उरलो फेरफटक्यापुरता ॥" अशी 'अभंग-रिमिक्स' ओळदेखील त्यांच्या मनात तरळून गेली.

"या सगळ्याचा तिला जाब विचारलाच पाहिजे. जरा डोळे मोठे केले तर लागेल घाबरायला आपल्याला हीसुद्धा.." लगबगीनं उठून भाऊ सायलीच्या पाळण्याकडे गेले. सारखं सारखं पाळण्यावरच्या त्या कापडी चिमण्यांकडे बघून ती कंटाळली असावी. पाळण्यावर हळूच झुकलेल्या भाऊंच्या चेहऱ्याकडे पाहिलं मात्र, आणि ती एकदम खिदळली.आनंदाचे चीत्कार काढत तिनं आपले हात त्यांच्या दिशेला झेपावले. आपल्याला पाहून कुणाला एवढा आनंद होऊ शकतो, ही गोष्ट भाऊ नाही म्हटलं तरी इतक्या वर्षांत विसरलेच होते. सायलीला उचलून भूऽर घेऊन जाताना, मघाच्या 'तिच्यावर आपल्याला चिडता का येत नाही' या प्रश्नाचं उत्तर त्यांना आपोआप मिळालं होतं!

**

बकुळीचं फूल जसं अलगद पानावर विसावतं,
तशा विश्वासानं आपलं इवलं बोट माझ्या तळहातावर ठेवलंस...
त्या क्षणापासून माझा निबर हात
मखमालीहून कोमल झाला
थकल्या-भागल्या, सुरकुतल्या त्याच्या त्वचेवर
दुधावरल्या सायीचा तजेला आला
तुझी नवथर जुई
आणि माझा विरक्ती प्राजक्त -
गळून पडताना तुला नवी प्रकाशज्योत देऊन गेला!

Thursday, March 23, 2006

स्मित

परवा कुणाचंसं हसू पाहिलं. 'हसू' हा तसा गोड पण मजेदार शब्द. बोलीभाषेत फारसा वापरला जात नाही. हे ज्ञान देखील मला हायस्कुलात गेल्यावर झालं. मैत्रिणींना कुठल्यातरी भयंकर विनोदी वगैरे प्रसंगाचं वर्णन सांगत असताना मी समारोप केला: "आणि मला एकदम हसू फुटलं." त्यावर त्या विनोदापेक्षाही भयंकर मोठा विनोद मी केलाय अशा आविर्भावात 'ही किती पुस्तकी बोलते' असं म्हणत त्यांचं हशा-टाळ्यांचं आदान-प्रदान झालं: "अगं हसू फुटत नाही, हसायला येतं."... आता अशा संगनमताने झालेल्या थट्टेवर एक बावळटसे हसू चेहऱ्यावर आणणे आणि आपणही एक-दोन टाळ्या देणे यालाच खिलाडूपणा म्हणतात हे जाणकारांना माहिती आहेच!
[एक फाटा: काही भाषाप्रेमिकांना 'भयंकर' हे विशेषण 'प्रचंड/ खूप मोठा' या अर्थाने वापरलेलं आवडत नाही म्हणे. 'भय उत्पन्न करणारे ते भयंकर' असा अर्थ असल्यामुळे 'भयंकर विनोद' असं म्हणणं हे 'अक्राळविक्राळ भात' म्हणण्याइतकं अस्थानी आहे म्हणतात. या लोकांनी आमच्या दोस्तमंडळाचे पी. जे. ऐकलेले नाहियेत म्हणून.. नाहीतर एक एक 'जोक' म्हणजे हसून/रडून जीव जातो की काय अशी भीती उत्पन्न करणारा असतो!]
हां, तर मुद्दा काय, की परवा दुपारी, जेवून खाऊन 'जरा लवंडायची' वेळ असते त्या रामजन्मोत्तरप्रहरी सायकल हाणत वर्गाकडे चालले होते. (काय सांगावं..पेशवाई गेली आणि आम्ही वामकुक्षीला अंतरलो!) रस्त्यावरची तुरळक जनता, झाडंझुडपं, इमारती..सगळेच पेंगल्यासारखे किंवा पेंगताना मास्तरांनी खडू मारून उठवल्यासारखे दिसत होते. तेवढ्यात कुणाचंसं ओळखीचं हसू दिसलं. बडिशेपेच्या बशीत शेवटी राहिलेल्या कंटाळवाण्या दाण्यांमध्ये अचानक खडीसाखरेचा इवला तुकडा चमकून जावा तस्सं वाटलं. एका स्मितहास्यात काय जादू असते सगळा माहौल बदलवून टाकण्याची! 'मूड' अगदीच विस्कटलेला नसेल, तर समोरच्याचं हसणं आपल्याही चेहऱ्यात उमटतं पाहतापाहता. त्यातसुद्धा, बघितलेलं हसणं प्रीती झिंटासारखं खळीदार असेल तर संदीप खरेच्या शब्दांत " असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा!"
मग मनाला भावलेली स्मितहास्यं आठवली ओळीने. पहिलं 'आमच्या सचिन'चं! शहाण्णवचा विश्वचषक सामना. सचिन म्हणजे आपला देवाधिदेव तेव्हाचा. पेप्सीची जाहिरात: लहान लहान गावांतून, गल्लीबोळांतून 'सचिन आया रे भैया...' ची धूम बोलवा चाललीय. ती सगळी jingle संपल्यावर पेप्सीच्या चिन्हाशेजारी सचिन अवतरतो. एक पाय गुडघ्यात मुडपून वर ठेवत, बॅट हलकेच जमिनीवर सोडतो, तिच्या टोकावर relax झाल्यासारखा हात ठेवतो. एवढं होईपर्यंत चेहरा गंभीर...आणि मग एकदम पुस्तकातून अचानक हातात आलेल्या मोरपिसासारखं अनपेक्षितपणे ते प्रसिद्ध स्मित उमटतं.. काळीज खलास हो!
'सुरभि' मध्ये रेणुका शहाणेचं 'चार इंची' हसणं तजेलदार वाटायचं, आणि 'Turning Point'च्या गिरीश कर्नाडांचं हलकेच येणारं स्मित अगदी रुबाबदार. 'वीर सावरकर' मध्ये शीर्षकभूमिका साकारलेल्या शैलेन्द्र गौडचं हसणं तर खासच लक्षात राहिलेलं. किती संयत, किती प्रभावशाली! 'ही व्यक्तिरेखा एका अतिबुद्धिमान, समोरच्याचं पाणी क्षणात जोखणाऱ्या माणसाची आहे' हे सहज सूचित करणारं.
अर्थात केवळ नट-नट्यांनाच ही सुंदर स्मितहास्याची देणगी लाभलीय असं थोडंच आहे? पु.ल., वसंतराव, लता, अगदी मेधा पाटकर आणि मदर तेरेसा पण..किती सुंदर वाटतं सर्वांचं हसणं. वलयांकित व्यक्ती सोडा..आपल्या घरातल्या कामवाल्या मावशी पण (एक तारखेला?) तोंडभर हसताना काय साजऱ्या दिसतात. मला वाटतं मनातून ओठांवर आलेलं..आणि तिथे न मावल्यामुळे डोळ्यांत चमकणारं प्रत्येक स्मित इतकं सुंदर दिसत असणार!

Wednesday, March 15, 2006

विजेस

Sunday, March 12, 2006

घन लवला रे!

आठ तारखेपासून दोन-तीन दिवस हवा इतकी सुरेख झाली होती!
फेब्रुवारीच्या मध्यावर उन्हाळ्यानं थोडी धार लावायला घेतली होती आपल्या आयुधांना. (दारव्हेकरांच्या 'तेजोनिधी लोहगोल' गाण्यात सूर्यकिरणांना ते 'अनलशर' म्हणतात. अनलाचे शर..अग्नीचे बाण! ) सकाळी गपचूप आपले फुला-पानांवर शहाण्या मुलासारखे बसून राहणारे, वेलींच्या जाळ्यांतून कवडसे पाडणारे सूर्यकिरण दुपारी अतिशय व्रात्य बनून डोक्याला ताप द्यायला लागले होते. Sunscreen lotions, उन्हाळी टोप्या आणि (पुण्यातून इथे आयात झालेले?) अतिरेकी-रुमाल या साऱ्यांचा खप अचानक वाढला होता. मी आपली 'छत्रीछप्पर झिंदाबाद!' म्हणून दुमडून एवढुश्शी होणारी छत्री बरोबर बाळगायला सुरुवात केली होती. [प्रयोगशाळेत ती छत्री चुकून wash-basinशेजारी ठेवून दिल्यामुळे तिच्यावर कुठल्यातरी 'संपृक्त आम्ला'चे थेंब उडवून, चार-पाच भोकं पाडून पावसाळ्याच्या दृष्टीने तिला निकामी करण्याचा बावळटपणाही करून झाला होता.] तशात दुसरी सत्रमध्य परीक्षा तोंडावर आलेली. - आमच्याकडे काही काही शब्दांचे अर्थ जऽरा रूळ सोडून इकडे-तिकडे जातात बरं का. आता सव्वाचार महिन्यांच्या एका सत्रात first mid-semester परीक्षा एका महिन्याने आणि second mid-semester अडीच महिन्यांनी का घ्यावी बरं? मिडसेमिस्टर वगैरे काही नाही - नुसती कडमडसेमिस्टर एक्झाम असते. तर अशा तोंडावर आलेल्या परीक्षेचा डोळ्यांवर आलेल्या झोपेला दूर सारत अभ्यास करत असताना अचानक खोलीच्या खिडक्या वाजू लागल्या..आणि अहो तो चिरस्मरणीय मृत्तिकागंध नाकी आला!

लगेच उड्या मारत आम्ही बाहेर.
पाहते तो 'नभ मेघांनी आक्रमिले'ले! फारशी वाट पहायला न लावता पाऊस पाठोपाठ 'टपक'ला. थालिपिठावर खोबरं शिवरावं तशी नाजूक भुरभूर सुरू झाली. आतल्या lawn वरच्या सरंजामी गवताला sprinkler मधून रोज तुषारसिंचन घडायचं. पण बाहेरच्या बाजूचं 'जनता' गवत मात्र तान्हेलं होतं बिचारं इतके दिवस. शिवाय ती उंच उंच झाडं. त्यांना कुठली ती रोजच्या showerbath ची कौतुकं? पु.लं.च्या 'ती फुलराणी'तली मंजुळा म्हणते तसं "कवा कवा मुन्शिपाल्टीचा पाईप फोडत्यात तेवा होती की आंघोळ."


त्या दिवशी पावसानं त्या सगळ्या झाडांना अगदी तृप्त केलं असणार. कोवळ्या तांबूस-हिरव्या पानांवरची त्याची ती झुरमुर पहायला भारी मजा येत होती. आला तसा पट्कन निघूनही गेला तो, पण सगळीकडे आपल्या पाउलखुणा सोडून गेला. आणि वर एक मंद वाऱ्याचा, पोपटी रंगाचा सुंदर दिवस बहाल करून गेला. Hostelच्या बाहेर माळीदादांनी फुलझाडांवर केलेली करामत आवर्जून डोळे भरून पहावीशी वाटावी, कॅमेऱ्यातून टिपून जवळ ठेवावीशी वाटावी, परीक्षेला जाताना गाणी गुणगुणत जावं..(आणि म्हणूनच येतानाही गाणी गुणगुणावीशी वाटण्याइतकी ती परीक्षा सोपी जावी) असा साजिरा दिवस! तरी बरं, ते काळे ढग होते म्हणून - नाहीतर त्या नितांतसुंदर दिवसाला आणि हवेला उगीच दृष्ट लागली असती माझी.

या दिवसाला सलाम म्हणून बा. भ. बोरकरांची ही कविता:

घन लवला रे घन लवला रे
क्षणभर श्रावण स्रवला रे!
जरतारांचा फुलून मांडव
अनल जिवींचा निवला रे!

चारा हिरवा हिरवा रे
वर उदकाचा शिरवा रे
मनातले सल रुजून त्याचा
आता झाला मरवा रे!

हरखुन जल हे निवळे रे
गगन उन्हाने उजळे रे
अहा! शहारुन पुनश्च मीही
पवन-पिसोळे पिवळे रे!

पापणी लवते, तसा बोरकरांच्या कवितेतला हा ढग अलगद खाली झुकलाय. पिकल्या आंब्यातून रस गळतो, तसा त्या ढगातून आपसूक पाऊस स्रवलाय. क्षणभरासाठी का होईना, पण श्रावण बरसून गेलाय! त्या धारा म्हणजे चांदीच्या जरींनी सजलेला मांडवच जणू. स्वप्नांचा , उत्साही मांडव. जिवाची आग त्याने शमवलीय. हिरव्या गवतावर पाण्याचा हलका शिडकावा झालाय. मनातले बारीकसारीक सल, अढ्या, दु:खं कुठे नाहीसेच झालेत. पावसामुळे जिरून, रुजून गेलेत वाटतं - आणि सुगंधी मरव्याचं पान बनून बाहेर आलेत! ही करामत करून पाऊस निघून गेल्यावर आकाश पुन्हा उन्हानं उजळून निघालंय.. कवीचं मन त्याच क्षणी शहारून उठलंय आणि पिवळ्या फुलपाखरासारखं वाऱ्यावर तरंगत सुटलंय!

Thursday, March 02, 2006

मनाच्या मैत्रिणीचं गाणं!


मोनोमिता रॉय म्हणजे आय. आय. टी. मधल्या पहिल्या वर्षातली माझी सहनिवासिनी. (room-partner ला जरा अजून 'रुचकर' प्रतिशब्द सुचवा रे कुणी!) ragging च्या वेळेला तिला हटकून तिच्या नावाचा अर्थ विचारला जायचा. सुरुवातीला तिनं मोठ्या तोऱ्यात 'मोनोमिता मतलब मन का मीत' असं सांगितलं. त्यानंतर मग अस्मादिकांना 'मीत ना मिला रे मन का ..' हे गाणं म्हणायला (हो हो, हावभावांसकट!) आणि तिला 'तुमने पुकारा और हम चले आये..' हे उत्तर द्यायला लावणं ही seniors नामक कैदाशिणींची मोठीच करमणूक होऊन बसली.
तर ते असो. पण या बंगाली लोकांची नावं अगदी सुंदर असतात हं.. चंद्राणी, संघमित्रा, पियाली, अरुणिमा, संचारी, स्वस्ति - अगदी तक्षशिला विद्यापीठाच्या हजेरीपटातून उचलून आणावी तशी वाटतात. ( उच्चारताना त्या नावांचा बट्ट्याबोळ कसा करावा तेही त्यांना पक्कं ठाऊक आहे. चोंद्रानी, शोंघोमित्रा, ओरुनिमा - छे! अर्थात मूळ शब्द संस्कृत आहे हे विसरलं, तर गोड वाटतात ऐकताना ती पण. आमच्या एका 'सात्यकी' नावाच्या प्राध्यापकांच्या पत्नीनं त्यांना 'शॉत्तोऽकीऽऽ' अशी इतकी गोऽड हाक मारली होती, काय सांगू! )

साडेतीन-चार वर्षांत मोनोमिता तिच्या नावासारखीच मनाची..जिवाभावाची मैत्रीण होऊन गेली. पहिल्या वर्षी एका खोलीत दोन मुली असायचो. दुसऱ्या वर्षी स्वतंत्र खोल्यांमध्ये जाताना मग आम्ही एका wing मधल्या सहा जणींनी सहा जवळ-जवळच्या खोल्या निवडल्या. मोनो माझी सखी-शेजारिणी झाली. तिचा आवाज जात्याच गोड - आणि स्वभावही तसाच सुरेल. सुरुवातीला तिच्या 'रागां'ची नीटशी माहिती नव्हती तेव्हा एखाद्या तार स्वरामुळे खट्टू व्हायचे मी. कधी अनवट धून यायची तेव्हा बावचळायचे, 'ही असं का करते?' म्हणत. तिलाही तसंच वाटत असणार माझ्याबद्दल. पण मग सवयीने तारा नीट ओळखता येऊ लागल्या आणि सूर कायमस्वरूपी जुळले! तिची आई लखनौच्या एका शाळेत संगीतशिक्षिका आहे. त्यामुळे गाण्याबद्दलची आवड आणि कितीतरी सुरेल गाण्यांचं बाळकडूच मिळालेलं तिला. साईबाबांवर मोनोची खूप श्रद्धा. दर गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यावर त्यांची आरती करणार साग्रसंगीत. एकदा सकाळी कुठल्याश्या कारणावरून माझी मन:स्थिती बिघडली होती. उगाचच सगळ्या जगाचा राग राग येण्याची आणि स्वत:च्या मनाचा भरपूर कोडवैताग करून घेण्याची वेळ असते ना कधीकधी, तशी. त्यात हिने घंटा-बिंटा वाजवायला सुरू केल्यावर माझा पारा चढलाच. जरा म्हणून शांतता कुणी मिळू देईल तर शपथ, असं पुटपुटायला सुरुवात करणार तोवर तिने कोणतं तरी नवं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. इतकी सुंदर चाल होती त्याची! आणि ती ते म्हणतही तितक्याच उत्कटतेनं होती. सगळ्या जगातला कारुण्यभाव, प्रेमभाव जणू तिच्या आवाजात एकवटला होता. 'शरणागती' या शब्दाचा खरं तर तिटकारा आहे मला. पण ही भक्तीतली शरणागती काळजाचा ठाव घेऊन गेली. स्वत:ला अप्राप्य असल्यामुळे असेल कदाचित!

Wednesday, March 01, 2006

प्रतिक्रिया


काही नवीन वाचलं, पाहिलं, ऐकलं की आपल्याही नकळत मनात त्यावर प्रतिक्रिया उमटत असते. ही प्रतिक्रिया कधी सुमेधा म्हणते तशी 'आहा!' असते, कधी 'महाऽऽन' तर कधी 'छ्या! जमं ना', 'उगाच काहीही!' किंवा 'बळंच बरं का.." अशीही.
काही गोष्टी मात्र मनाला अशा स्पर्शून जातात, की प्रतिक्रिया म्हणून आपणही नवीन काहीतरी लिहून जातो. अर्थात या स्पर्शण्याची तीव्रता त्या कलाकृतीच्या गुणवत्तेबरोबरच आपल्या त्या वेळच्या मन:स्थितीवर बहुतांशी अवलंबून असते, हेही खरंच.
अरुंधती रॉय चं 'God of Small Things' वाचत असताना असं अस्वस्थ करून गेलं खरं. तसं पाहिलं तर वसाहत्योत्तर काळातल्या (Postcolonial Era) भारताबद्दल लिहिणाऱ्या लेखकांबद्दल मी जरा पूर्वग्रहदूषित होते आधी.. सलमान रश्दी, झुम्पा लाहिरी, अरुंधती रॉय प्रभृति "वाट्टेल ते लिहितात. विधिनिषेध नाही." हा त्यामानाने मवाळ आरोप. पण 'भारतातील दारिद्य्र, ओंगळपणा, गलिच्छ्पणा यांचे भांडवल करून जगाच्या बाजारात आपली पुस्तकं खपवणारे' अशी उघड उघड टीका होत असताना 'यांची संगत नको रे बाप्पा' असं वाटणं साहजिक होतं.
पण मग मागच्या उन्हाळ्यात हे पुस्तक हातात आलं आणि उत्सुकतेने पूर्वग्रहावर मात केली.पुस्तक आवडलं की नाही हा वेगळा मुद्दा; पण मला अरुंधतीची लेखनशैली खरंच आवडली. विशेषत: चपखल उपमा देण्याचं तिचं कसब. उदाहरणार्थ, मनाविरुद्ध लग्न होत असलेल्या एका मुलीचं वर्णन ती करतेय. लग्नाच्या दिवशी मुलीला छान लाल साडी, अंगभर दागिने वगैरे घालून सजवलंय. पण काय उपयोग त्या साजशृंगाराचा? अरुंधती म्हणते, "It was like polishing firewood. " चितेसाठीचं लाकूड रंधा मारून गुळगुळीत करावं, त्यातला तो प्रकार होता.
:)


एकूणात, पूर्वग्रह बाळगणं फारसं लाभदायक नसतं!