Wednesday, February 17, 2010

विद्यापती आणि रसिक माणूस

विद्यापती ठाकूर (विकिपीडिया दुवा) हा इसवी सनाच्या चौदाव्या-पंधराव्या शतकात ’मैथिल कविकोकिल’ म्हणून प्रसिद्ध झालेला कवी/लेखक.

आज ओल्डपोएट्री वर त्याची ही एक कविता मिळाली.

He promised he'd return tomorrow.
And I wrote everywhere on my floor:
"Tomorrow."

The morning broke, when they all asked:
Now tell us, when will your "Tomorrow" come?
Tomorrow, Tomorrow, where are you?
I cried and cried, but my Tomorrow never returned!

Vidyapati says: O listen, dear!
Your Tomorrow became a today
with other women.

त्या काळच्या मैथिलीत कशी दिसली असती ही? शेवटच्या कडव्यातली पहिली ओळ ’भनह विद्यापति सुनहु सखि री’ अशी काहीतरी असेल का?
मैथिली भाषेतली मूळ कविता सापडली नाही, पण या कवितेला देशी भाषेच्या रूपात बघायची खूप इच्छा झाली. म्हटलं बघू मराठी अनुवाद करता येतोय का.

ताल, घाट कुठला वापरायचा? देशी पाहिजे, ओवीसारखा, पण तितका शांत नव्हे. विराणीसारखा, पण तितका सहज दु:ख उघडं करणारा नव्हे.
डोक्यात अचानक सौमित्रची (अकरावी-बारावीत ऐकून ऐकून शेवटी अजीर्ण झालेल्या) ’गारवा’ मधली ’पाणी झरत चालले आज आभाळ फाटले’ - ही ओळ आली. त्या ठेक्याशी मिळता-जुळता ठेका चालेल?
मागे एका प्रतिक्रियेत नानिवडेकर काकांनी अक्षरसंख्येची गंमत दाखवून दिली होती. त्यामुळे जाणीवपूर्वक ८-८-८-७ असं लिहिताना खूप मजा आली. पहिले तीन चरण टकाटक-टकाटक द्रुत लयीत, आणि मग शेवटच्या चरणात एकच अक्षर कमी असलं तरी वाचताना लय एकदम ठाय करायची. त्या चरणाचा वेगळा भाव एकदम छाप पाडून जाईल , तो impact जाणवेल अशी.

"येतो उद्या परतून",गेला साजण सांगून
’उद्या’ कोरून लिहून मी गं भिंत भरली.

झुंजूमुंजू वेळ झाली, सारीं विचारू लागली,
"अगं वेड्यापिश्या मुली, कधी येणार ’उद्या’?"

उदईका, उद्या माझ्या, कुठे आहेस रे राजा?
रडतो रे जीव माझा, तरी येईनास तू!

विद्यापती म्हणे, "खुळे! सोड आता स्वप्न भोळे
तुझा ’उद्या’ झाला बाळे, ’आज’ सवतीचा गं."

छ्या. स्व-भ्यास म्हणून मराठी ठीकेय, पण ही कविता कुठल्यातरी उत्तर भारतीय भाषेतच साजरी दिसणार.

***

हा विद्यापती माणूस बाप होता! पूनम मिश्रांनी इथे संकलित केलेला इतिहास आणि त्याच्या काही रचना वाचून आणि बंगाली, उडिया, मैथिली यांच्यासह अनेक ईशान्य-भारतीय भाषांच्या विकासावर त्याच्या रचनांचा प्रभाव होता हे कळल्यावर याच्याबद्दल आपण शाळेत इतिहासात कधीच कसं ऐकलं नव्हतं असं वाटलं.

विकिपीडियावरून त्याच्या कवितांच्या इंग्रजी भाषांतराचं हे परीक्षण / संकलनही मिळालं. हे वाचताना (राधेच्या वक्षस्थळांचं वर्णन ’राधा, व्हूज दॅट पार्ट ऑफ द फिजीक बिलो द नेक ऍन्ड अबव द ऍब्डोमेन’ असं करणार्‍या) पुलगुरू (अण्णा वडगावकरांची?) खूप पंचाईत झाली असती, असं राहून राहून वाटत होतं!

***

<\\आयायटी कानपूरचं स्मरणरमण > या सगळ्यातून घडलेली एकदम भारी गोष्ट म्हणजे डॉ. अमिताभ मुखर्जींच्या लिखाणाचा नव्यानं शोध लागला. पहिल्या वर्षात आम्हांला ESC101 मध्ये JAVA शिकवली होती सरांनी. अडीचशे मुलांना एकत्रच शिकवत असल्यामुळे सरांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फारच कमी आले - पण विद्यापतीच्या पुस्तकावरचं त्यांनी लिहिलेलं ते परीक्षण वाचून सरांबद्दलच्या उगाच डोक्यात राहिलेल्या गोष्टी परत आठवल्या.
१. ’सर अत्यंत करिझ्मॅटिक आहेत’ असं आमच्या विंगमधल्या ’ट्रिपल एम’ गटाचं ठाम मत होतं. करिश्मा, रहन-सहन, कॅरीइंग युअरसेल्फ वेल, सेक्सीनेस या विषयांतलं त्या तिघींना फारच जास्त कळत असल्यामुळे मी ते मत स्वीकारून ’करिझ्मॅटिक’ या शब्दाची व्याख्या ’चेहरा सुंदर नसला तरी वर्तणुकीतून अत्यंत दिलखेचक वाटणारी, ’हिच्यासाठी आपण काहीही करू’ असं वाटायला लावणारी व्यक्ती’ अशी ठरवून घेतली. पियाच्या मते ती शाहरुख खानलाही बरोब्बर लागू पडते.
२. हाफपॅन्ट, कॉलरवाला टी शर्ट आणि टेनिस शूज अशा पेहरावात वर्गात येणारे ते एकमेव प्राध्यापक होते, आणि तशा वेशातही ते कधीच गबाळे वाटले नाहीत. अर्थात याचं कारण त्यांच्या ’हाफप्यान्टी’ चट्टेरी-पट्टेरी , नाडीच्या वगैरे नसून रेमन्ड्स किंवा एच ऍन्ड एमच्या फॉर्मल ट्राउझर्स सारख्या कडक फिटिंगच्या, प्लीटेड असायच्या. हिवाळ्यात शून्याच्या खाली तापमान गेलं होतं तेव्हा एकदाच ते फुलपॅन्ट घालून वर्गात आले. मुलांनी लगेच टाळ्यांचा कडकडाट केला. किंचित झुकून नाटकीपणे सगळ्यांना अभिवादन करत ते म्हणाले, ’आज अमिताभला बरं नाही. मी अजिताभ, त्याचा जुळा भाऊ आलोय त्याच्या ऐवजी तुम्हांला शिकवायला.’
३. पहिल्या वर्षीच्या ”म्यूझिकल एक्स्ट्रव्हगॅन्झा’मध्ये पियाचं गाणं ऐकून दुसर्‍या दिवशी अख्ख्या वर्गासमोर ’I saw the birth of a star yesterday' म्हणत त्यांनी तिचं कौतुक केलं होतं. तिची जागच्या जागी प्रचंड चुळबूळ.
४.ते त्यांच्या बायकोला झाग्रेबच्या विमानतळावर पहिल्यांदा भेटले म्हणून त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव झाग्रेब आहे (!?)
५.मिऍन्डर या अनियतकालिकासाठी त्यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या कुण्या विद्यार्थ्यानं त्यांना "What is a good age to start dating?" असं मोघमात विचारल्यावर "For you, right now! Make hay while the Sun shines!" असं त्यांनी बजावलं होतं. ’बुरसटलेल्या विचारांच्या काही वॉर्डन्सच्या’ तुलनेत सरांचे हे विचार सगळ्या पोरापोरींना फारच सुधारकी थाटाचे वाटले होते.
६. ’मूरखजी’ अशा टोपणनावानं कानपुरातल्या, कलकत्त्यातल्या जीवनाबद्दलचे त्यांचे दोन-तीन सुरेख लेख मी तेव्हा वाचले होते. कलकत्त्याच्या कॉफी हाउस संस्कृतीबद्दल मला फारच ओढ वाटायला लागली होती, त्यांची काही वर्णनं वाचून.

विद्यापतीच्या रसभरीत कविता आणि अमिताभ मुखर्जी ही रसिक वल्ली. साक़िया, आज रात हमें नींद नहीं आएगी!

कानपूरची जुनी देणी हल्ली सारखी परत भेटायला लागली आहेत

Labels: ,

19 Comments:

सुरेख.

इतिBlogger HAREKRISHNAJI
Wednesday, February 17, 2010 7:54:00 AM  

गायत्रीबाई : नवीन प्रयोग केल्याबद्‌दल पुन्हा एकदा अभिनंदन.

मी मागे उल्लेख केलेला ६-५ अक्षरसंख्या असलेला छन्द परिलीना नावानी ओळखला ज़ातो.
विषण्ण द्‌ऋष्टीने - देखत नभा
विराट वड हा - राहिला उभा (कुसुमाग्रज)
त्यात ज्ञानेश्वरांनी रचना केली आहे.

तुमचा ८-८-८-४ हा (मला अत्यंत आवडलेला) छन्द म्हणजे पुष्पगुच्छ छन्द. कुसुमाग्रजांची 'उठा उठा चिऊताई' कविता त्यात आहे.


"येतो उद्या परतून", गेला साजण सांगून
’उद्या’ कोरून लिहून मी गं भिंत भरली.
ही तुमची ८-८-८-७ रचना श्यामाराणी छन्दात आहे, आणि या रचनेला दिव्यप्रभा छन्दही ज़वळचा आहे. पण त्यात प्रत्येक ओळ ८-७ असते.
पुन्हा उठण्याच्या काळी - देह आत्मा ज़डणार्‌
...
शीणलेल्या शरीराला तै विसावा मिळूनी
अशी एक ख्रिस्ती उपासनासंगीतातली दिव्यप्रभेतली रचना आहे. (या रचना मला पाठ आहेत, असा समज़ करून न घेणे.)
तो ज़डणार्‌ शब्द हलन्त का आहे याची कल्पना नाही. तसा तो नसता (आणि नसावा) तर ही रचना ८-७, ८-७ न राहता तुमच्या ८-८-८-७ रचनेसारखी होऊन या रचनेची आद्‌य कवयित्री असल्याचा तुमचा मान हिरावल्या ज़ाणार. तेव्हा आपण तो शब्द हलन्तच हवा, असं मानण्याचं नाटक करू. मात्र दिव्यप्रभा छन्दात बाकी भानगडी आहेत ज्यांच्यामुळे त्याची गेयता कमी होत असावी. किंवा ती गेयता वाढवणारी एखादी चालही अस्तित्वात असेल.

आता ८-८-८-७ वाला श्यामाराणी.
राम आकाशी पाताळी - राम नान्दे भूमंडळी
रामयोगीयांचे मेळी - सर्व काळ तिष्ठत (रामदास)
पण या छन्दातल्या आद्‌य रचनेचा मान गायत्री नातूंचा नाही, तसाच समर्थांचाही नाही. कारण त्यात ज्ञनेश्वरांचीही रचना आहे.
आम्ही ज़ाणावे ते काई - तुझे वर्म कोण्या ठायीं
अन्तपार नाही नाही - ऐसे श्रुति बोलती (ज्ञानदेव)

याला उलट करून ७-७-७-८ पहावं, तर ७-७-८-७ ही (मला पाठ असलेली) एक रचना आहे. तिला विलक्षण नाद आहे.
छन्दाचं नाव रामरसायन.
क्षीरसिन्धुवासी रे - लक्ष्मी त्याची दासी रे
अर्जुनाची घोडी धूतां - लाज़ नाही त्यासी रे (श्रीधरस्वामी)
पण मधूनच तिसर्‍या चरणात आठ अक्षरं आल्यामुळे लय बिघडू पाहते, ती 'लाऽऽज़' असा तीन अक्षरांज़वळ ज़ाणारा उच्चार करून ठीक करावी लागते.

आता पुष्पगुच्छ, दिव्यप्रभा, श्यामाराणी ही काय नावं आहेत? आणि ही भयानक सावरकरी नावं या गोड छंदांना? आणि असल्या विचित्र नावांच्या छन्दांतच रचना करायला तुम्हाला का सुचते, कळायला मार्ग नाही.

सरतेशेवटी : विद्‌यापति नावाचा १९६३-६४ कडे (बहुतेक मैथिली भाषेत) चित्रपट निघाला होता. संगीतकार व्ही बलसारा. फार मोठा संगीतकार, पण माझा एक मित्र त्यांना कलकोत्यात १०-१२ वर्षांपूर्वी भेटला तेव्हा ते म्हातारबाबा फार रटाळ बोलू लागले होते. बलसारा आता हयात नाहीत. 'विद्‌यापति'मधलं 'मोरे नैना सावन भादों' लता पैसे न घेता गायली म्हणतात. पुढे किशोरकुमारही ते गाणं गायला. ते लताचं गाणं मिळाल्यास बघा, किंवा मी २-३ आठवड्यात तुम्हाला पाठवतो.

- डी एन

इतिBlogger Naniwadekar
Wednesday, February 17, 2010 8:53:00 AM  

वा! अमिताभ मुखर्जी फक्त बघून माहीत आहेत. बाकी त्यांची ही ओळख फारच आवडली.

हा ही Herringbone Stitch सारखाच प्रकार आहे का? नाही म्हणजे असे दोन विषय वेगळे पण तरीही एकमेकाला कुठेतरी स्पर्शून जाणारे...

कविता आणि भाषांतराबद्दल प्रत्यक्ष... तेव्हा.

इतिBlogger prasad bokil
Wednesday, February 17, 2010 10:11:00 AM  

. . अर्जुना, तू ज़ाण रे
. . होशी बा सुज़ाण रे
विश्व नाही मीच आहे सख्या, तुझी आण रे

रामरसायन छन्दातली ही वामनाची आणि अज़ून १-२ रचना वाचल्यावर मी 'लाऽऽज़ नाही त्यासी रे' असा उच्चार करावा लागतो हा माझा दावा मागे घेतो. तिथे आपण नेहमी करतो तसा लाज़्‌ हा हलन्त उच्चार चालणार नाही, त्या शब्दाचा व्यवस्थित अकारान्त उच्चारच हवा. पण छान्दस रचनेत (अक्षरसंख्येवर आधारित वृत्तात) प्रत्येक वर्णाचा उच्चारच गुरुकडे झुकणारा होतो. तेव्हा कुठलाच अकारान्त शब्द या लयीत हलन्त उच्चारता येणार नाही. आता लाऽऽज़्‌ असा उच्चार करून हलन्तामुळे कमी झालेलं लयीचं वज़न अवग्रहानी भरून काढता येईल. पण त्यापेक्षा 'लाज़' हा अकारान्त उच्चारच मला ठीक वाटतो.

विद्‌यापतिविषयी माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. काही हाती लागलं तर ते इथे लिहीन.

- नानिवडेकर

इतिAnonymous Anonymous
Wednesday, February 17, 2010 10:44:00 AM  

योगायोग म्हणजे कालच Poetry Chaikhana नं विद्यापतींची एक कविता धाडून दिली होती. इथे उद्धृत करतो:
As the mirror to my hand,
the flowers to my hair,
kohl to my eyes,
tambul to my mouth,
musk to my breast,
necklace to my throat,
ecstasy to my flesh,
heart to my home --
as wing to bird,
water to fish,
life to the living --
so you to me.
But tell me,
Madhava, beloved,
who are you?
Who are you really?
Vidyapati says, they are one another!

मस्त, ताजंतवानं लिहिलंयंस :)
तुमच्या त्या वल्ली मुखर्जी सरांना कधीतरी भेटायला फार आवडेल!

इतिBlogger Mandar Gadre
Wednesday, February 17, 2010 11:23:00 AM  

बापरे
केव्हढा हा व्यासंग! नानिवडेकर, तुम्ही नक्की कशा कशाचा अभ्यास केला आहे? भाषाशास्त्र? कविता? हिंदी (आणि इतर) चित्रपट? संत काव्ये? संगीत.....?

अश्विनी

इतिAnonymous Anonymous
Wednesday, February 17, 2010 3:52:00 PM  

Khup sundar..tu nehmi nehmi lihit nahis amchyasarkhi tech bara ahe. :)
-Thakee

इतिBlogger Saee
Wednesday, February 17, 2010 4:15:00 PM  

अश्विनी,

श्री. नानिवडेकरांबद्दल मला नेहमीच हेच वाटत आले आहे. त्यांचा व्यासंग, ज्ञान पाहुन मी प्रत्येकवेळी थक्क झालेलो आहे.

इतिBlogger HAREKRISHNAJI
Wednesday, February 17, 2010 8:48:00 PM  

धन्यवाद सगळ्यांना!

अश्विनी, ती यादी अभिजात संगीत, राजकारण, पत्रकारिता, ..अशी खूप वाढवता येईल. हरेकृष्णजींचं म्हणणं अगदीच खरं आहे!

डी. एन्‌. काका, या छांदस रचनांबद्दल इतकी माहिती पुरवल्याबद्दल खूप खूप आभार. रामरसायन छंद फार फार आवडला! खरोखरच विलक्षण नाद आहे त्याला! आणि उगाचच स्फुरण चढतं वाचताना. वामन म्हणजे वामन पंडित? त्या रचना पण पाठवाल?
आणि अहो, मी आहे कोल्हापूरकर. आम्हांला पुष्पगुच्छ आणि श्यामाराणी असली भारदस्त नावंच गोड वाटणार. (उच्चारताना भले ’पुच्छगुच्छ’:D आणि ’श्येमारानी’ होईनात का!) सूर्य डोईवर आल्यावर पाकळ्या गाळणारी सुमलता आमच्या काय कामाची? विनोदाचा भाग जाऊ द्यात, पण आपण खरडतो आहेत ते अमुक-तमुक छंदात बसतं हे ठाऊकच कुठं होतं आधी? आद्यकर्त्याचा मान वगैरे तर दूरची बात!

ईस्निप्स आणि यूट्यूबवर लताबाईंचं ’मेरे नैना..’ मिळालं!

१९३४-३५ मध्ये कलकत्त्याच्या न्यू थीएटर्सने सुद्धा ’विद्यापति’ नावाचा चित्रपट काढला होता म्हणे. पहाडी संन्यालांनी विद्यापतीचं काम केलं होतं आणि काननबालेने अनुराधेचं. यूट्यूबवर काही गाणी आहेत त्यातली. (नाकात गायलेली!)
तुम्हांला जी माहिती मिळेल ती जरूर कळवा, वाट पाहीन.

प्रसाद, herringbone.. सारखी ’लेखमाला’ तयार करायची कल्पना डोक्यात नसली तरी तू लिहिलंयस ते अगदी बरोबर आहे. ’परवाना इक पतंगा, जुगनू भी इक पतंगा - ये रोशनी का तालिब , वो रोशनी सरापा’ हा शेर आहे ना, (दिव्यावर झेप घेणारा पतंग आणि काजवा हे दोन्हीही कीटकच, मग दोघांत फरक काय? तर एक प्रकाशाचा भक्त आणि दुसरा प्रकाश निर्माण करणारा.) तसं विद्यापती काव्यरस निर्माण करणारा आणि आमचे सर त्याचा आस्वाद घेणारे. पण गंमत म्हणजे रससिद्ध कवी हा आधी रसिक असावा लागतो, आणि रसिकामध्येही त्याची दाद व्यवस्थित पोचवण्यासाठी थोडेसे कविगुण असावे लागतात. So it's like a Venn diagram - two intersecting circles.

मंदार, ही मस्त आहे कविता..मी पण चायखान्याला subscribe करेन आता!

इतिBlogger Gayatri
Wednesday, February 17, 2010 9:52:00 PM  

तर मग एक शेर रोशनी आणि पतंगावर.

शमाने जल कर कहा ये परवानेसे
रात भर मै भी जली हूं तेरे जल जाने से ॥

- करामत फ़ातमा बेगम.

या आपल्या कवितेतला "उद्या" हा नेहमीच "उद्या" येणारा असतो. इंतजारी, बेकरारी, दरबदर सारे सारे काही व्यर्थ गेलेले असते. आणि ती वंचना. खुप तरल भावना व्यक्त केलेल्या गेल्या आहेत या कवितेतुन .

न तुम आये, न नींद आई, न मौत आई शबे वादा
दिले मुज़्तर था, मै था,और थी तनहाइया मेरी ।

- फ़ैयाज.

इतिBlogger HAREKRISHNAJI
Wednesday, February 17, 2010 10:00:00 PM  

क्या बात है, हरेकृष्णजी!

और एक शेर शमअ-परवाने पर, क़ैसरुल जाफ़री साहब का:

दोनों की रोशनी से रौनक है अंजुमन की
जब शम्मा झिलमिलाई, परवाना याद आया!

आणि वाट बघण्याबद्दलच बोलायचं तर फ़िराक़ गोरखपुरी म्हणतात तसं "कोई आया न आएगा लेकिन, क्या करे गर न इंतेज़ार करें?"

इतिBlogger Gayatri
Wednesday, February 17, 2010 10:15:00 PM  

शम्मा भी कुछ कमी नही इश्क मे परवानेसे
जान देता है अगर वो , तो ये सर देती है - जौक

इतिBlogger HAREKRISHNAJI
Wednesday, February 17, 2010 10:40:00 PM  

न्यू थिएटर्स-चा 'विद्‌यापति' चित्रपट १९३४-३५ मधला नाही, ते वर्ष १९३७ आहे. १९३४ मधे उमा शशी त्यांची मुख्य नायिका होती. कानन बाला नन्तर आली. तिची न्यू थिएटर्ससाठी गायलेली गाणी खास नाहीत. कदाचित पुरेशी नाकात गायली नसतील. ती लवकरच प्रमथेश बारुआच्या कळपात दाखल झाली, आणि त्या सिनेमांत कमल दासगुप्ताच्या चाली ती खूप छान गायली. जवाब, हॉस्पिटल, मनमौजी हे चित्रपट काही प्रमाणात काननमुळे आठवतात. एकूण ती माझी आवडती गायिका नाही. कमल-दा हा माणूस फारच थोर संगीतकार होता. जूथिका रॉय, तलत, हेमंत कुमार, जगमोहन यांच्यासाठी कमलदांनी अनेक उत्तम गैर-फ़िल्मी गाणी रचली.

१९३४ मधला न्यू थिएटर्सचा भक्तीसंप्रदायातल्या कवीवरचा सिनेमा म्हणजे 'चंडीदास'. हा विद्‌यापतीचाच समकालीन बंगाली कवी होता. तो एका धोबिणीच्या प्रेमात पडल्याच्या आख्यायिकेवर आधारित सिनेमात सैगल आणि उमा शशी यांची खूप छान गाणी आहेत.

किशोर कुमारच्या गाण्याचे शब्द आहेत 'मेरे नैना' तर लताच्या गाण्याचे 'मोरे नैना सावन भादों'.

- नानिवडेकर

इतिBlogger Naniwadekar
Wednesday, February 24, 2010 1:13:00 PM  

माधवराव पटवर्धनांच्या शब्दात सांगायचे झाल्यास छन्दोज्ञान काव्यशोधक असते, काव्यप्रेरक नाही. काव्यनिर्मितामागे कवीची छन्दबद्‌ध रचनेची उपज़त समज़ असते. जेव्हा त्यामागचे सूत्र कवीला कळून येते, तेव्हाही तो छन्द अर्थातच प्रस्थापित झाला नसतो कारण त्यात आधी रचनाच झाली नसते. हे सूत्र जेव्हा टिकाव धरते तेव्हा त्या छन्दाला नाव देण्याचा प्रश्न उद्‌भवत असावा. तेव्हा गोदीच्या पदराचा आणि लॅण्ड-विण्ड्‌सचा ज़सा संबंध नाही तसा 'आपण खरडतो आहेत ते अमुक-तमुक छंदात बसतं हे ठाऊकच कुठं होतं' याचा आणि आद्‌य रचनाकार असण्या-नसण्याचा संबंध नाही. बाकी गायत्रीबाईंविषयी आम्ही काय बोलणार? ज़े न देखे रवी, ते देखे गायत्रीकवी. मला राजकारणाचा व्यासंग असल्याची मलाच माहिती नव्हती. ज्या विषयाची मला अजिबात माहिती नाही त्याचा व्यासंग माझ्यावर लादल्याबद्‌दल कवयित्रीचे आभार मानायचे की निषेध करायचा, हा निर्णय कठीण आहे. अश्विनीबाई, संतकाव्य आणि कविता हे एकाच पिशवीचे कप्पे मानायला हरकत नाही. 'हिंदी चित्रपट' आणि संगीत हे सुद्‌धा एकाच छपराखाली राहतात. तेव्हा आमच्या व्यासंगांची संख्या पन्नास टक्क्यांनी तिथेच कमी झाली. पैकी छन्दशास्त्राचाही माझा व्यासंग वगैरे नाही. व्यासंग केला माधवराव पटवर्धनांनी, मी फक्त त्यांच्या ग्रंथातली उदाहरणे दिली. लताआधीच्या चित्रपट संगीतात मला रस आहे, हे नक्की म्हणता येईल. त्यातही हज़ारो गाण्यांच्या तपशीलांपैकी १०-२० गाण्यांसंबंधी मला मराठी येत असल्यामुळे मी अमराठी लोकांच्या काही चुका, त्यांना नसलेली काही माहिती ही काढू शकलो. अनेकदा एक पुस्तक पाहिल्यावर त्यातला अमुक चित्रपट १९३४ चा नसावा, असे अंदाज़ हळूहळू बांधता येतात. माझ्याबद्‌दल दोन चांगले शब्द बोलल्यानिमित्त अश्वीनीबाई आणि हरेकृष्णजींचे आभार, आणि (आता निर्णय झालेला आहे) त्यासंबंधात अपप्रचार केल्याबद्‌दल गायत्रीबाईंचा निषेध.

श्यामाराणी या ८-८-८-७ वर्णांच्या छन्दातले पहिले तीन चरण टकाटक-टकाटक द्रुत लयीत म्हणता यतीत, हा गायत्रीबाईंचा दावा मला साफ नामंज़ूर आहे. अष्टाक्षरीची प्रकृतीच ठाय लयीची आहे. 'नको गं, नको गं - आक्रंदे ज़मीन' ही सहा अक्षरी रचना ठाय किंवा द्रुत अशा दोन्ही लयीत ज़मते. ओढूनताणून द्रुत लय अष्टाक्षरीला बसवता येईलही. पण तिची खरी प्रकृती ठाय आहे. मी अष्टाक्षरीची ८-१० उदाहरणं पाहिली; सगळी भारदस्त लयीची आहेत.

विद्‌यापतीच्या कवितेचा अनुवाद 'छ्या' नसून्न 'छॅन' झाला आहे. 'ज़मीन' ऐवजी 'भिंत' शब्द ग्रॅफ़िटीसाठी वापरला हे छान झालं. आणि ज्ञानेश्वरांनी आणि रामदासांनी श्यामाराणीतले पहिले तीन चरण सयमक (क-क-क-ख) केले, तसेच गायत्रीबाईंनीही केले याचीही विशेष दाद द्‌यावीशी वाटते. एरवी क-ख-ख-ग या देवद्‌वाराच्या प्रभावाखाली दुसरा आणि तिसरा चरण यमकांत बांधण्याकडे कल होऊ शकतो. तशी रचनाही म्हणायला चांगलीच वाटेल असा माझा अंदाज़ आहे.

इतिBlogger Naniwadekar
Wednesday, February 24, 2010 1:17:00 PM  

नानीवडेकरजी,

आपल्याला " चंद्रसखी "बद्दल माहिती आहे का ?

इतिBlogger HAREKRISHNAJI
Wednesday, February 24, 2010 9:23:00 PM  

१) 'चन्द्रसखी' छन्दाबद्‌दल माधवराव पटवर्धनांनी माहिती दिलेली नाही. असा काही रचनाप्रकार असल्यास तो दुसर्‍या नांवाखाली दिला असण्याची शक्यता आहे.
२) 'उठा उठा चिऊताई' ही अष्टाक्षरी द्रुत लयीत म्हणावी लागते, आणि तशीच चांगली वाटते. पण 'विद्‌यापती म्हणे बाळे - सोड तुझे स्वप्न भोळे' ठाय लयीत(च) मला आवडतं. खरं म्हणजे श्यामाराणी ८-८-८-७ असूनही तिला लय ८-८-८-८ या अष्टाक्षरीचीच आहे. विशेष लक्ष दिलं नाही तर शेवटच्या चरणात सातच वर्ण आहेत हे मला ज़ाणवतही नाही, पण इतर कोणाला ज़ाणवू शकेलही. लयीत मात्र एक वर्ण कमी झाल्याचा फारसा फरक पडत नाही. अष्टाक्षरीत दुसर्‍या किंवा तिसर्‍या चरणात दोन वर्ण तुकारामानी गाळल्याची उदाहरणे आहेत; त्यामुळेही लय बिघडत नाही.
३) 'लाऽऽज नाही त्यासी रे' हा चरण अवग्रहासकट म्हणावा या माझ्या पहिल्या मताकडे मी परत गेलो आहे. पण रामरसायनाचे चार चरण अवग्रह न वापरताही म्हणता येतात.

इतिBlogger Naniwadekar
Thursday, February 25, 2010 2:49:00 AM  

हा आपला विनय आहे, नानिवडेकर काका.
ठाय म्हणजे काय पण?

अश्विनी

इतिAnonymous Anonymous
Friday, February 26, 2010 2:48:00 PM  

aayla kon kuthla ha vidyapati kasa kay shodhun kadhlat...

dhany tumhi ani vidyapati suddha...

:)

इतिAnonymous Anonymous
Thursday, April 01, 2010 5:13:00 PM  

रोचक लेख, फारच रोचक आणि ज्ञानवर्धन चर्चा अभिप्रायांमधे आहे. बरेच दिवसांनी मी या पार्टीत आलेलो असलो तरीही आनंदलो.

तुषार

इतिBlogger Tushar Joshi
Friday, September 20, 2013 9:23:00 AM  

Post a Comment

<< Home