Thursday, September 10, 2009

Herringbone Stitch (1)

A-B.

नको काढू चित्र माझं.
काळ्या शाईत कुंचला बुडवून तू पहिला फराटा कागदावर ओढशील -
तिथेच माझ्यापासून वेगळा होशील.
*
नकोच करू कौतुक माझ्या शब्दांचं.
मी तर त्यांच्यापासून वेगळी झालीये कधीचीच.
तुझ्या ’वाहवा!’ सरशी त्यांचा दु:स्वासही करू लागेन कदाचित.
*

अस्वस्थ आहे. उत्तर दे.


--

C-D.

नकोच करू स्तुती माझ्या पावभाजीची.
एकदा माझी ’स्पेशालिटी’ झाली
की दर वेळी मलाच बनवावी लागेल ती.

- फक्त हेच तुला लिहून पाठवलं असतं उत्तर म्हणून, पण तुझ्या शेवटच्या चार शब्दांनी भानावर आलो.
तुझ्या कवितेला तुझी अनुदिनी मानणं कधीच सोडून दिलं होतं, तुझ्याच आग्रहावरून.
आजच्या या ओळींमधला अस्वस्थपणा तुझा स्वत:चा आहे? भीतीने तुला असं कवळून टाकावं आणि ते तू माझ्यापुढे कबूलही करावं...अजबच आहे.

’मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो’ - किरणला त्या गाण्याचा अर्थ समजावून देताना आवडायला लागलं होतं तुला ते. हरखून मला म्हणाली होतीस, "असं आसपासच्या सगळ्यांच्या मनातलं माझं चित्र मला दिसलं तर कित्ती मज्जा येईल!" मग आपण वाद घातला होता, व्यक्तींच्या मनाच्या नितळपणाबद्दल. मला अजूनही वाटतं, हा नितळपणा सापेक्ष असतो. बघणार्‍याच्या संवेदना किती तीक्ष्ण आहेत त्यानुसार बदलतो तो. एखाद्या वाक्याचा पोत, एखादा कटाक्ष, एक हुंकार किंवा श्वासाची लय तुला ते चित्र लख्खपणे दाखवू शकते. पण तू या ’फसव्या पुराव्यां’ना धुडकावूनच लावलं होतंस. तुला शब्दांचं सघन माध्यमच हवं होतं. ’म्हणजे गैरसमजाला जागा नको’ - सावध सज्जनगिरीने तू म्हणाली होतीस.
मग आज अशी दूर का पळते आहेस शब्दचित्रांपासून?

’वेगळं न करता येण्याजोगं मिसळलेपण’ - ते तर तुला-मला दोघांनाही कधीच मान्य नव्हतं. त्या मुद्यावरच तर आपली गट्टी जमलेली. अचानक गट बदलू नकोस हां बयो!

चित्रकारानं एखाद्या वस्तूचं चित्र काढताना तिच्याबद्दल आपुलकी बाळगली, तर तिचे दोष त्याच्याही नकळत झाकले जाणार किंवा त्यांचं उदात्तीकरण होणार. घाटदार घड्याला गेलेला उभा तडाही ’किती सुंदर!’ वाटणार. व्हॅन गॉगच्या ’सेल्फ पोर्ट्रेट्स’ना नावाजायचं का? त्याच्या चित्रांतला तो गॉग खरा-खुरा माणूस वाटतो. त्यानं ते चित्र काढताना स्वत:ला स्वत:पासूनच अलिप्त केलं असणार - निदान तसा प्रयत्न केला असणार हे स्पष्ट दिसतं. किंवा हे केवळ दोष झाकण्याबद्दलही नसेल. फक्त ’दिसतं त्याच्याशी प्रामाणिक’ राहण्याच्या प्रयत्नाबद्दल असेल.
हे सगळं तुला कळलेलं नाही असं नाही - उलट नीटच कळलं आहे, आणि कदाचित तेच तुझ्या अस्वस्थतेचं मूळ आहे. मी फक्त तुझ्या सात ओळींतून ते शोधायचा प्रयत्न करतो आहे.

आता असं समज की चित्रकार झालाय तुझ्यापासून वेगळा. पण कितपत वेगळा? किमान दोन गोष्टींवर अवलंबून आहे ते. तुझ्याकडे बघायला तो कोणतं भिंग वापरतोय आणि कोणत्या प्रकाशात तुला बघतोय. स्वच्छ सपाट काच? अंतर्वक्र? बहिर्वक्र? परत त्यांच्या वेगवेगळ्या फोकल लेंथ्स. तू बुटुकबैंगण दिसशील, उंचकाडी दिसशील, किंवा एकदम तुझ्या चेहर्‍यावरचा मऊसूतपणा जाऊन पेशींचं खडबडीत पटल दिसेल त्याला. पणतीच्या स्निग्ध प्रकाशात मवाळ दिसतील तुझ्या शरीराचे उंचवटे, आणि भगभगीत हॅलोजन दिव्याच्या प्रकाशात ताशीव कठपुतळी दिसू शकशील तू.
त्याला तू कशी दिसतेस हे जाणून घेताना गंमत नाही वाटणार तुला? आणि त्यानं काढलेलं तुझं चित्र बघून त्याच्या भिंगाची आणि दिव्याची जात आणि प्रत ठरवण्याचा हक्कही तुझ्याकडेच! मला तर बुवा मजा आली असती माझं चित्र पाहायला. आं आं..ती जात आणि प्रत तुझ्या स्वत:च्या भिंग-प्रकाशाच्या सापेक्षच असणार हे मान्य! पण लेकी, निरपेक्ष परिमाण अस्तित्वातच नसतं हे मान्य आहे नं?

बाप रे! या कुण्या चित्रकाराची सगळी भिंगं सदासर्वदा तुझ्याच भिंगांसारखी असावीत आणि दोघांनी मिळून एकच दिवा वापरावा असलं अकटश्च विकट काही वाटतंय का तुला? आणि तुझ्यापासून ’वेगळ्या’ झालेल्या तुझ्या शब्दांना त्यानं वाखाणलं तर दु:स्वास करशील त्यांचा? हा वस्त्रगाळ मूर्खपणा आहे.
बरं, असं म्हणावं की ’माझं चित्र काढू नको, मी लिहिलेल्याची स्तुती करू नको’ असं म्हणणारी ही पोर खरंच ’वेगळी’ आहे इतरांपेक्षा, तर तेही नाही. या गोष्टींचा उल्लेख केलास यातच तुझ्या लेखी त्यांना महत्त्व आहे हेही आलंच.

तू एवढी गुंतागुंतीची का आहेस? सरळ दणादणा लिहावं स्पष्ट काय वाटतं ते. उगाच काहीतरी तुकड्यातुकड्यांत प्रतिमा आणि उपमा वापरून ’मला ते कळतंय का’ याची परीक्षा घेत राहायचं. मला काय कळलं ते मी तुला सांगितलं की खास ठेवणीतलं हसायचं. "मला आवडलं तू काढलेलं माझं चित्र ...पण ती मी नव्हेच!" म्हणायचं. रागच येतो मला तुझा.

पूर्वी एक गोष्ट बरी होती: मी काढलेलं तुझं चित्र पाहायची तुला उत्सुकता तरी असायची. आणि तुझ्या सेल्फ-पोर्ट्रेटशी ते ताडून त्यातले फरकही सांगायचीस तू लहर असेल तर.
आता तू तुझं चित्र काढायलाच मनाई करते आहेस? कसली भीती वाटतेय एवढी? "समोरच्याला तू जशी दिसलीस तशी तू नाहीच आहेस" हा निष्कर्ष आहे वेडे, गृहीतक नव्हे. चित्रं काढू देत राहिलीस, ती पूर्वीसारखी उत्सुकतेनं पाहातही राहिलीस - तर सापडेल एखादं त्या क्षणी मिळतंजुळतं. तो चित्रकाराचा विजय असला तरी तुझा पराभव नसेल.

पटतं तर बोल ... नायतर जा उडत.

Labels:

1 Comments:

तुझं पोस्ट वाचल्यावर "रंगुनी रंगात सा-या" मधल्या त्या "हिरव्या कच्ची"सारखी अवस्था होते. एकदा पुन्हा सावकाश वाचेन आज दुपारनंतर आणि प्रतिक्रिया देईन.
बाकी मस्त जमलंय ..

इतिBlogger प्रशांत
Friday, September 11, 2009 6:30:00 AM  

Post a Comment

<< Home