Sunday, May 24, 2009

ख्वाब था या खयाल था,...क्या था?

आज फारा दिवसांनी येणं केलंत कवी.
बरोबर आहे, मीच तुमची आठवण..म्हणजे अगदी खरीखुरी, कचकचीत आठवण आज काढली.
त्याचं काय आहे कवी, तुमची बहुतांश कविता कॉलेजातल्या एखाद्या माजोर्ड्या दोस्तासारखी 'लागते'. एकदा लागली की पिच्छा सोडत नाही मग. माझं डोकं एकाच वेळेला थरारतं, उठतं, पिकतं, स्तब्ध होतं वगैरे वगैरे. (५१२ मेगाबाइट्स वर विन्डोज व्हिस्टा चालवल्यासारखी गत.) आणि सध्या तरी एवढी रॅम तुमच्या कवितेपाठी घालवायची अगदीच गरज नाहीये मला!

पण हा कडकडीत उपासदेखील सहन होण्यातला नव्हता. त्यामुळे आजोळी गडग्यातून जाता जाता वाटेत जसं एखाद्या झाडावरून मस्त टप्पोरं भिरंड नाहीतर बिंबल तोडायचो आणि मग वाटभर तोंडात घोळवत, मिटक्या आणि शिरशिरी भोगत चालत रहायचो - तसाच आज तुमच्या कवितेचा एकच चरण भोगते आहे. 'सखीच्या मुलीला कसे काय द्यावे....'

तुम्हांला ठाऊकाय कवी? तुमची कविता म्हणजे निमित्त. बडबड करायची असते मलाच. उगाच कुठेतरी काहीतरी घडतं, कसलंसं पहाटस्वप्न पडतं. वेटोळं घातलेल्या नागयुगुलासारखा तुमचा एखादा शब्द, एखादी ओळ त्या घटनेसोबत रमलेली. बाकीची कविता काय आहे, संदर्भ काय असावा, कश्शाकश्शाचा विचार न करता मी बिनदिक्कतपणे ती ओळ भोज्जा म्हणून पकडून माझं पुराण सुरू करते.

सखीची मुलगी आज पहाटे आली. सगळं घर अवतारात. मी पण त्याच्याशी स्पर्धा करत असल्यासारखी अस्ताव्यस्त. ती आली तीच ताज्या दुधाच्या पत्ती चहासारखी घमघमत. हातानी पसारा आवरत वटवट सुरू.

"चल चल चल ..तय्यार हो पटकन्‌..लॅबर्नम फुललाय! काल पळायला गेले होते तर त्याच्यापाशी मला मोराचं पीस मिळालं एक..आद्या फाद्या लगेच ’माला पायजे’ म्हणत रडत बसला..म्हणलं देत नाय जा..मग म्हणे मावशीला सांगणार..म्हणलं तुझ्झ्याआध्धी उठून मीच सांगणार..पण ते र्‍हाऊंदेत..तू चल आधी बाहेर..चऽऽल ना गंऽऽऽऽऽऽऽ"


किती तपं लोटली? असेच शब्द.

"
चल ना गं आज माझ्यासोबत!

...


ए, माहितीये मला, तुझ्या खांद्यावर खूप मोठ्ठी स्वप्नं आहेत. पण तुला खरं सांगू, ओझं होतंय त्यांचं तुला.
बघ, फुगलं नाक लगेच - 'तू कोण मला सांगणारा?' म्हणत.
अगं मी काही कायमची खाली ठेवायला सांगत नाहीय ती. आजच्यापुरती..थोडाच वेळ फक्त!
येतेस माझ्याबरोबर थोडा वेळ?
अगदी आहेस अश्शीच चल -
आज माझी स्वप्नं आहेत बरोबर.
हां हां, असे डोळे विस्फारायची गरज नाही. आम्हांलाही पडतात म्हटलं स्वप्नं.
..
सांगू माझी स्वप्नं?
छोटीशीच आहेत गं.

जाऊ असंच स्कूटीवर बसून.
त्या चौकात थांबू सिग्नलला.
तिथला गजरे विकणारा छोटू पुढे येईल दोघांना बघून.
तू कसनुशी तोंड फिरवशील..
तुला काहीतरी करायचंय ना या मुलांचं शोषण टाळायला..त्यांना त्यांचं बालपण परत मिळवून द्यायला..
विचार, अधिकाराच्या जागेसाठी अभ्यास आणि एका संस्थेत काम करतेच आहेस तू..
पण आत्ता, समोरच्या त्या छोटूकडे आणि त्या गजर्‍यांकडेही बघवत नाही तुला.
एक तर फुलं अशी वेलीवरून तोडलेली तुला आवडत नाहीत..गजरे तू माळत नाहीस.
आणि तू-मी एकत्र असताना असे गजरा घेण्यातले सामाजिक संदर्भ आणि अर्थ!
तू तर स्कूटीवरसुद्धा तुझा माझा ’तसा’ संबंध नाही हे दाखवायला सीटच्या जितक्या मागल्या भागात बसता येईल तितकी बसलेली.
(कचकन्‌ ब्रेक दाबून तू मला आदळू नयेस म्हणून मी स्पीडब्रेकरच्या पंधरा फूट आधीपासनंच स्पीड कमी करत येतो हे तुझ्या लक्षात आलंय?)
पण आज आपण थांबूचयात गाडी थोडी बाजूला घेऊन.
घाईत पुढे जाणार्‍यांना जाऊ देत पुढे.
मला ना, सकाळी सकाळी त्याच्याकडचे ते सगळेच्या सगळे गजरे विकत घ्यायचेत.
त्या मोगर्‍याच्या गजर्‍याहून जास्त टवटवीत त्याचं हसणं मला एकच क्षण पहायचंय.


मग शाळेत जाऊयात आपल्या?
किती वर्षांत भेटली नसशील सगळ्यांना..
आठवण काढतात गं तुझी कौतुकानं.
एकदा कसल्याशा चुकीची ’आता आपल्याला खूप मोठ्ठी शिक्षा मिळणार’ म्हणून धास्तावलेल्या तुला, किती हळुवारपणे चूक समजावून दिली होती आपल्या सासणेबाईंनी.
रोवलं गेलं असेल का गं तुझ्या आत्ताच्या समजूतदारपणाचं बी तिथे कुठे?
बाई आता मुख्याध्यापिका झाल्यात.
त्यांना दोन गजरे देऊयात. एक त्या आधी सरस्वतीच्या मूर्तीला घालतील बघ!
भेटू मग स्टाफरूममध्ये जाऊन बाकी सगळ्यांना.
’स्वकर्तृत्वावर मोठ्ठी होईन, मगच शाळेत भेटायला जाईन’ असं वेडगळ काही डोक्यात नाही धरलंयस ना?
अगं कितीही मोठी झालीस तरी त्यांच्यासाठी लहानच!
आता जाऊ तेव्हा बघ, नुसता नमस्कार करशील तेव्हा भरून येईल सगळ्यांना...
मोठ्ठी होशील तेव्हा जाशीलच गं सगळ्यांना ’त्यांच्या रोपट्याचा वृक्ष कसा झालाय’ इ. इ. दाखवायला
पण सध्या त्यांना ’ओळख ठेवल्येयस’ याचंच कौतुक असणारेय.
मला ते कौतुक बघायचंय.


बाई आपल्याला कदाचित सातवीच्या वर्गात घेऊन जातील..’माझे विद्यार्थी’ म्हणून कौतुकानं सांगायला..तुझ्या एकेका यशाबद्दल सांगतील तेव्हा विस्फारत जाणारे पोरापोरींचे डोळे..
मग एखादी धिटुकली तुला विचारेल, ’ताई..अभ्यास कसा करायचा?’
मग तू नेहमीसारखी आजीबाई मोडमधून सांगायला लागशील पुलंच्या ’अभ्यास: एक आनंद’ मधले विचार, मध्येच त्या पोरीशी ’कनेक्ट’ व्हायला कार्टून नेटवर्क आणि आयपीएल आणि नव्या (नुसतीच नावं ऐकलेल्या) सिनेमांबद्दल एखादं वाक्य टाकशील.
तू जे बोलत असशील ते तुला खरोखरच खरं वाटत असेल.
मला तशी आदर्श कळकळ पाहायचीय तुझ्या चेहर्‍यावरली.

फार वेळ नाही जायचा या सगळ्यात.
मग परत येताना..एकच स्वप्न उरतं माझं..
शाळेच्या पायर्‍या उतरताना मी सायमन-गार्फंकलचं ’लाइक अ ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर्स..’ गुणगुणत असेन..
तू म्हणशील - ’आता जाताना मी चालवते स्कूटी..तू हे गाणं पूर्ण गाशील?’
शेवटच्या कडव्यापर्यंत पोचेतो घर येईल..
Sail on, silvergirl ..sail on by..

बस. एवढंच.
चल, येतेस?

"




सखीच्या मुलीला कसे काय द्यावे?

सखीच्या मुलीला इतर काहीही द्यावे..

पण अधेड स्वप्नांच्या आठवणी कधीही देऊ नयेत.

9 Comments:

वेटोळं घातलेल्या नागयुगुलासारखा तुमचा एखादा शब्द!
भारी :)

इतिAnonymous Ustya
Sunday, May 24, 2009 9:51:00 PM  

क्या बात है, बहुत पसंद आया ये ख्वाब ये खयाल ।

इतिBlogger Asha Joglekar
Monday, May 25, 2009 3:59:00 AM  

Khupppach god.
Grace chi hee kavita malahi far far awadte. :)
Ani kharach kadhi kadhi kantala alyawar me pun mazi ani Snehachi ashi soppi swapna athawte.
Chan watta. :)
Keep writing Gaya. It really cheers me up!

इतिBlogger Saee
Monday, May 25, 2009 9:43:00 AM  

तुमच्या ब्लॉगवर प्रथमच आलो. एका स्नेह्याने विशेष रेकमेंड केले म्हणून.

तुमचा हा लेख आवडला. "ग्रेस हा घुटक्याघुटक्याने प्यायचा कवी होय , हे अतिसंपृक्त रसायन लिटरलिटरने रिचवायचे आपले काम नोहे", हे माझ्यापुरते समजावून घेतलेले सूत्र येथे अमलात आलेले पाहिल्यामुळे लेख मला काकणभर जास्त आवडला असे वाटते आहे. एकेका ओळीतून शक्तीशाली प्रतिमांची मंत्रपुष्पांजली चाललेली असते. या कवीची कवितेतली एखादी ओळ आपल्याला कुठल्या कुठे सफर घडवून आणेल काय भरंवसा देववत नाही. तर अशी , एका विलक्षण ओळीचे बोट धरून केलेली ही सफर आवडली.

आजकालच्या भयानक वेगाच्या जमान्यात हा असा, एकेक थेंबाला घोळवून, भिनवून , रिचवून पिण्याचा स्वच्छंदीपणाचे एकूण डिस्पोस्झिशन विशेष वाटते.

इतिBlogger MuktaSunit
Monday, May 25, 2009 10:39:00 AM  

क्या बात है!

बाकी मुक्तसुनितनी नेमकं माडलंय, त्यांच्याशी सहमत!

इतिBlogger a Sane man
Monday, May 25, 2009 12:37:00 PM  

गायत्री,

क्या बात है ऐसे ख्वाब बहुत ही बढिया बडे सुंदर लगते है
चला आजचा दिवस चांगला जाणार तर एकंदर :) :)

इतिBlogger Dk
Wednesday, May 27, 2009 8:56:00 AM  

Sunder. short n sweet

इतिBlogger Samved
Sunday, May 31, 2009 2:41:00 PM  

S U R E K H ! ! !

इतिBlogger shatdhanva
Friday, June 12, 2009 12:55:00 PM  

This comment has been removed by the author.

इतिBlogger shatdhanva
Friday, June 12, 2009 12:56:00 PM  

Post a Comment

<< Home