Sunday, March 12, 2006

घन लवला रे!

आठ तारखेपासून दोन-तीन दिवस हवा इतकी सुरेख झाली होती!
फेब्रुवारीच्या मध्यावर उन्हाळ्यानं थोडी धार लावायला घेतली होती आपल्या आयुधांना. (दारव्हेकरांच्या 'तेजोनिधी लोहगोल' गाण्यात सूर्यकिरणांना ते 'अनलशर' म्हणतात. अनलाचे शर..अग्नीचे बाण! ) सकाळी गपचूप आपले फुला-पानांवर शहाण्या मुलासारखे बसून राहणारे, वेलींच्या जाळ्यांतून कवडसे पाडणारे सूर्यकिरण दुपारी अतिशय व्रात्य बनून डोक्याला ताप द्यायला लागले होते. Sunscreen lotions, उन्हाळी टोप्या आणि (पुण्यातून इथे आयात झालेले?) अतिरेकी-रुमाल या साऱ्यांचा खप अचानक वाढला होता. मी आपली 'छत्रीछप्पर झिंदाबाद!' म्हणून दुमडून एवढुश्शी होणारी छत्री बरोबर बाळगायला सुरुवात केली होती. [प्रयोगशाळेत ती छत्री चुकून wash-basinशेजारी ठेवून दिल्यामुळे तिच्यावर कुठल्यातरी 'संपृक्त आम्ला'चे थेंब उडवून, चार-पाच भोकं पाडून पावसाळ्याच्या दृष्टीने तिला निकामी करण्याचा बावळटपणाही करून झाला होता.] तशात दुसरी सत्रमध्य परीक्षा तोंडावर आलेली. - आमच्याकडे काही काही शब्दांचे अर्थ जऽरा रूळ सोडून इकडे-तिकडे जातात बरं का. आता सव्वाचार महिन्यांच्या एका सत्रात first mid-semester परीक्षा एका महिन्याने आणि second mid-semester अडीच महिन्यांनी का घ्यावी बरं? मिडसेमिस्टर वगैरे काही नाही - नुसती कडमडसेमिस्टर एक्झाम असते. तर अशा तोंडावर आलेल्या परीक्षेचा डोळ्यांवर आलेल्या झोपेला दूर सारत अभ्यास करत असताना अचानक खोलीच्या खिडक्या वाजू लागल्या..आणि अहो तो चिरस्मरणीय मृत्तिकागंध नाकी आला!

लगेच उड्या मारत आम्ही बाहेर.
पाहते तो 'नभ मेघांनी आक्रमिले'ले! फारशी वाट पहायला न लावता पाऊस पाठोपाठ 'टपक'ला. थालिपिठावर खोबरं शिवरावं तशी नाजूक भुरभूर सुरू झाली. आतल्या lawn वरच्या सरंजामी गवताला sprinkler मधून रोज तुषारसिंचन घडायचं. पण बाहेरच्या बाजूचं 'जनता' गवत मात्र तान्हेलं होतं बिचारं इतके दिवस. शिवाय ती उंच उंच झाडं. त्यांना कुठली ती रोजच्या showerbath ची कौतुकं? पु.लं.च्या 'ती फुलराणी'तली मंजुळा म्हणते तसं "कवा कवा मुन्शिपाल्टीचा पाईप फोडत्यात तेवा होती की आंघोळ."


त्या दिवशी पावसानं त्या सगळ्या झाडांना अगदी तृप्त केलं असणार. कोवळ्या तांबूस-हिरव्या पानांवरची त्याची ती झुरमुर पहायला भारी मजा येत होती. आला तसा पट्कन निघूनही गेला तो, पण सगळीकडे आपल्या पाउलखुणा सोडून गेला. आणि वर एक मंद वाऱ्याचा, पोपटी रंगाचा सुंदर दिवस बहाल करून गेला. Hostelच्या बाहेर माळीदादांनी फुलझाडांवर केलेली करामत आवर्जून डोळे भरून पहावीशी वाटावी, कॅमेऱ्यातून टिपून जवळ ठेवावीशी वाटावी, परीक्षेला जाताना गाणी गुणगुणत जावं..(आणि म्हणूनच येतानाही गाणी गुणगुणावीशी वाटण्याइतकी ती परीक्षा सोपी जावी) असा साजिरा दिवस! तरी बरं, ते काळे ढग होते म्हणून - नाहीतर त्या नितांतसुंदर दिवसाला आणि हवेला उगीच दृष्ट लागली असती माझी.

या दिवसाला सलाम म्हणून बा. भ. बोरकरांची ही कविता:

घन लवला रे घन लवला रे
क्षणभर श्रावण स्रवला रे!
जरतारांचा फुलून मांडव
अनल जिवींचा निवला रे!

चारा हिरवा हिरवा रे
वर उदकाचा शिरवा रे
मनातले सल रुजून त्याचा
आता झाला मरवा रे!

हरखुन जल हे निवळे रे
गगन उन्हाने उजळे रे
अहा! शहारुन पुनश्च मीही
पवन-पिसोळे पिवळे रे!

पापणी लवते, तसा बोरकरांच्या कवितेतला हा ढग अलगद खाली झुकलाय. पिकल्या आंब्यातून रस गळतो, तसा त्या ढगातून आपसूक पाऊस स्रवलाय. क्षणभरासाठी का होईना, पण श्रावण बरसून गेलाय! त्या धारा म्हणजे चांदीच्या जरींनी सजलेला मांडवच जणू. स्वप्नांचा , उत्साही मांडव. जिवाची आग त्याने शमवलीय. हिरव्या गवतावर पाण्याचा हलका शिडकावा झालाय. मनातले बारीकसारीक सल, अढ्या, दु:खं कुठे नाहीसेच झालेत. पावसामुळे जिरून, रुजून गेलेत वाटतं - आणि सुगंधी मरव्याचं पान बनून बाहेर आलेत! ही करामत करून पाऊस निघून गेल्यावर आकाश पुन्हा उन्हानं उजळून निघालंय.. कवीचं मन त्याच क्षणी शहारून उठलंय आणि पिवळ्या फुलपाखरासारखं वाऱ्यावर तरंगत सुटलंय!

12 Comments:

तुमची 'कढी' स्वादिष्ट झालीये बरंका.

इतिAnonymous Anonymous
Monday, March 13, 2006 2:37:00 AM  

धन्यवाद!

इतिBlogger Gayatri
Monday, March 13, 2006 3:05:00 AM  

वा! सुंदरच लिहीलं आहेस. पावसाच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास! आणि घन लवला नी तर अजूनच हुरहूर लावली!!

इतिBlogger Sumedha
Monday, March 13, 2006 8:32:00 AM  

गायत्री, खूप छान लिहितेस तू. खरंच.

आणि हो, मी चारुचा मामे भाऊ. मीच तो. :)

इतिBlogger Kaustubh
Monday, March 13, 2006 10:08:00 AM  

छान वाटलं दोस्तलोक. बाकी आत्ता आणखी काही ब्लॉग्ज चाळले तेव्हा या अवेळीच केव्हा आलेल्या पावसाने खूप जणांना लिहितं केल्याचं जाणवलं. काय मस्त लिहितात लोक! 'Desktop publishing' चा महामार्ग अर्थात blogs ही एक grand संकल्पना आहे. खूप मजा येते वाचताना, आणि त्यातून जर मराठी जालनिशी असेल तर कोल्ड कॉफीत आईसक्रीम!'

बाकी काय चाललंय कौस्तुभ?

इतिBlogger Gayatri
Monday, March 13, 2006 12:44:00 PM  

बोरकरांची कविता आवडली. शिवाय लेखातले कडमिड-सेमिस्टर खासच.

-(समदु:खी) नंदन

इतिBlogger Nandan
Monday, March 13, 2006 1:47:00 PM  

kadmad-semester concept is very fine. For we professors too it is a kadmad exam as our flow is diturbed. I too appreciate your feelings alongwith "mruttikagandh"

इतिBlogger hemant_surat
Monday, March 13, 2006 7:44:00 PM  

मी बोरकर-भक्‍त म्हणवणार नाही स्वत:ला, कारण मी त्यांचं सगळं काही वाचलं आहे असं नाही. पण "बोरकर-पंखा" म्हणायला हरकत नाही :-) कुठलीही कविता जी आतमधे भिडते आणि आपल्या अनुभवांशी जुळते (थोडक्यात खूप तीव्र "आहा" moment देते), मी त्याची भक्‍त आहे!! "कळत जाते तसे" बद्दल सांगायचे तर, माझ्या आवडत्या कवितांच्या वहीत ती खूप पूर्वी लिहून ठेवली होती, आठवत ही नाही कधी, कुठे वाचली होती ते. "एक आनंदयात्रा कवितेची" ऐकली आहे मी. खूप सुंदर आहे... तुझ्याकडे अजून छान कविता संग्रही असतील तर वेळ मिळेल तशा जरुर post कर.

आणि हो, परीक्षेसाठी शुभेच्छा!

इतिBlogger Sumedha
Monday, March 13, 2006 10:51:00 PM  

या पावसाने बऱ्याच जनांच्या कविमनाल जागृत केलं हे खर आहेच. छान आहे post.

इतिBlogger abhijit
Tuesday, March 14, 2006 3:00:00 PM  

thanks दोस्तलोक!

इतिBlogger Gayatri
Tuesday, March 21, 2006 8:44:00 AM  

फारच सुंदर! बोरकराच्या कविता फारच तरल असतात, आणि त्यांचा अर्थ कळणारे भाग्यवान.
पहिल्या कडव्यात जो 'स्रवला' हा शब्द आहे, तो स्रवला आहे का स्त्रवला आहे? जर 'स्रवला' असेल तर बोरकरांच्या प्रतिभेची कमाल आहे! स्रवणे हा कदाचित संस्कृत सृ (पाठोपाठ जाणे, अनुकरण करणे या अर्थी) पासून आला असावा. तसे असल्यास, श्रावणाने मेघाचे लवणे अनुसरले असा त्याचा अर्थ होतो. (फारच सुंदर!)
केतकीच्या बनी, मध्ये असाच 'मेघ गहिवरतो' आणि सर्रकन काटा आणतो!

इतिBlogger Ashutosh Bapat (आशुतोष बापट)
Tuesday, May 16, 2006 5:45:00 PM  

आशुतोष, माझ्या माहितीप्रमाणे तो शब्द 'स्रवला' असाच आहे. 'स्रवणे' हे क्रियापद 'वाहणे, पाझरणे' या अर्थी वापरलंय. उदा. रक्तस्राव. (खूपदा चुकीने हा शब्द 'रक्तस्त्राव' असा लिहितात/म्हणतात.) 'स्त्रवणे' हे क्रियापद मला तरी माहिती नाही. मी या शब्दाबाबत नक्की माहीतगार लोकांकडे चौकशी करेन.

पण तुम्ही लावलेला अर्थ फार फार छान वाटला.
'केतकीच्या बनी..' :-- खरंय :)

इतिBlogger Gayatri
Sunday, May 21, 2006 3:53:00 PM  

Post a Comment

<< Home