मनाच्या मैत्रिणीचं गाणं!
मोनोमिता रॉय म्हणजे आय. आय. टी. मधल्या पहिल्या वर्षातली माझी सहनिवासिनी. (room-partner ला जरा अजून 'रुचकर' प्रतिशब्द सुचवा रे कुणी!) ragging च्या वेळेला तिला हटकून तिच्या नावाचा अर्थ विचारला जायचा. सुरुवातीला तिनं मोठ्या तोऱ्यात 'मोनोमिता मतलब मन का मीत' असं सांगितलं. त्यानंतर मग अस्मादिकांना 'मीत ना मिला रे मन का ..' हे गाणं म्हणायला (हो हो, हावभावांसकट!) आणि तिला 'तुमने पुकारा और हम चले आये..' हे उत्तर द्यायला लावणं ही seniors नामक कैदाशिणींची मोठीच करमणूक होऊन बसली.
तर ते असो. पण या बंगाली लोकांची नावं अगदी सुंदर असतात हं.. चंद्राणी, संघमित्रा, पियाली, अरुणिमा, संचारी, स्वस्ति - अगदी तक्षशिला विद्यापीठाच्या हजेरीपटातून उचलून आणावी तशी वाटतात. ( उच्चारताना त्या नावांचा बट्ट्याबोळ कसा करावा तेही त्यांना पक्कं ठाऊक आहे. चोंद्रानी, शोंघोमित्रा, ओरुनिमा - छे! अर्थात मूळ शब्द संस्कृत आहे हे विसरलं, तर गोड वाटतात ऐकताना ती पण. आमच्या एका 'सात्यकी' नावाच्या प्राध्यापकांच्या पत्नीनं त्यांना 'शॉत्तोऽकीऽऽ' अशी इतकी गोऽड हाक मारली होती, काय सांगू! )
साडेतीन-चार वर्षांत मोनोमिता तिच्या नावासारखीच मनाची..जिवाभावाची मैत्रीण होऊन गेली. पहिल्या वर्षी एका खोलीत दोन मुली असायचो. दुसऱ्या वर्षी स्वतंत्र खोल्यांमध्ये जाताना मग आम्ही एका wing मधल्या सहा जणींनी सहा जवळ-जवळच्या खोल्या निवडल्या. मोनो माझी सखी-शेजारिणी झाली. तिचा आवाज जात्याच गोड - आणि स्वभावही तसाच सुरेल. सुरुवातीला तिच्या 'रागां'ची नीटशी माहिती नव्हती तेव्हा एखाद्या तार स्वरामुळे खट्टू व्हायचे मी. कधी अनवट धून यायची तेव्हा बावचळायचे, 'ही असं का करते?' म्हणत. तिलाही तसंच वाटत असणार माझ्याबद्दल. पण मग सवयीने तारा नीट ओळखता येऊ लागल्या आणि सूर कायमस्वरूपी जुळले! तिची आई लखनौच्या एका शाळेत संगीतशिक्षिका आहे. त्यामुळे गाण्याबद्दलची आवड आणि कितीतरी सुरेल गाण्यांचं बाळकडूच मिळालेलं तिला. साईबाबांवर मोनोची खूप श्रद्धा. दर गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यावर त्यांची आरती करणार साग्रसंगीत. एकदा सकाळी कुठल्याश्या कारणावरून माझी मन:स्थिती बिघडली होती. उगाचच सगळ्या जगाचा राग राग येण्याची आणि स्वत:च्या मनाचा भरपूर कोडवैताग करून घेण्याची वेळ असते ना कधीकधी, तशी. त्यात हिने घंटा-बिंटा वाजवायला सुरू केल्यावर माझा पारा चढलाच. जरा म्हणून शांतता कुणी मिळू देईल तर शपथ, असं पुटपुटायला सुरुवात करणार तोवर तिने कोणतं तरी नवं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. इतकी सुंदर चाल होती त्याची! आणि ती ते म्हणतही तितक्याच उत्कटतेनं होती. सगळ्या जगातला कारुण्यभाव, प्रेमभाव जणू तिच्या आवाजात एकवटला होता. 'शरणागती' या शब्दाचा खरं तर तिटकारा आहे मला. पण ही भक्तीतली शरणागती काळजाचा ठाव घेऊन गेली. स्वत:ला अप्राप्य असल्यामुळे असेल कदाचित!
8 Comments:
स्वरांची जादू, कानांची अपेक्षा,
सागराचे सान्निध, काही नको यापेक्षा!
भावनांच्या लहरी, मनाचे मनोगत,
येतो उलगडून समोर क्षणात जीवनपट!
आपल्या ओळींच्या प्रभावामुळे!
हेमंत पाटील - सूरत
बाप रे! जबरी प्रतिक्रिया आहे. मनापासून धन्यवाद, हेमंत!
फ़ार सुरेख लिहिता हं तुम्ही. लिहित रहा.
यावरुन सांगायच म्हणजे, माझी आई आणि तीच्या भावंडाची नाव बेंगाली आहेत.आणि ती सगळीच सुरेख आहेत.:)
शब्दांच्या कुरळ्या जावळाचा ओझरता मुका...........
व्वा!
अस वाटतयं की इंदीराबाई आणि पद्माबाई दोघींनी एका वेळी तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय
धन्यवाद रजनीगंधा. [तुमचं स्वत:चं नाव/टोपणनाव पण सुरेखच आहे :) ]
अयाई गं, प्रसाद! dumbstruck by your comment. पण खूप खूप छान वाटलं नुसत्या त्या डोक्यावर हात ठेवून घेण्याच्या कल्पनेनंही.
btw, 'NDTV Profit'..is it a different channel altogether from the usual NDTV? No documentary was shown on the latter yesterday. I even tried searching for the correct channel by surfing thr' frequency settings, bt it didn't appear. मे मध्ये पुणे-मुंबई दौरा असेल तेव्हा तुझ्याकडेच पाहीन मग.
majha naavhi bengali aahe..
aani tu mhanalis tasa bengali muli faar god boltat.
Bengali aikaych tar mulinchya tondun aikave.
Kharagpur la asatana ha baryachda anubhav aala.
Baryach marathi lekhakanni kolkata aani bengali lokanbaddal apulakine lihilela aahe.
Bengalis worth it.
हो अभिजित. एखादा प्रांत किंवा समूह याच्याबद्दल सरसकट विधानं केली तर स्तुतीपरच करावीत, म्हणून तुझ्या मताशी मी सहमत आहे :D
आपुलकीच म्हणायची झाली तर व्यक्तिगत पातळीवर जवळजवळ प्रत्येकजणच "worth it" असतो/ते. ती व्यक्ती जेव्हा एखाद्या समूहाचा भाग बनते, तेव्हा येणाऱ्या अनुभवांमध्ये मात्र परिस्थितीगणिक खूप तफावत असू शकते. शिवाय मला तर वाटतं, आपण इतरांबद्दल जे मत बनवतो त्यामध्ये आपल्या स्वभावाचा बराच मोठा भाग अंतर्भूत असतो. उदा. काही ठिकाणी बंगाली मुलींच्या याच गोड बोलण्याला 'तारस्वरातील कलकलाट' म्हटलं जाऊ शकतं - काही वेळा तो तसा असतोही! फरक असतो ऐकणाऱ्याच्या कानांमध्ये. Like Mr. Bingley in 'Pride and Prejudice', some people are always disposed towards approving most of the people they meet.Some others may want to make minute observations before judging anyone, and some are bent upon mistrusting everyone! उदा. एखाद्या ठिकाणी काही विशिष्ट प्रांतीयांची संख्या थोडी जास्त असेल, आणि त्यांनी एकत्र असताना आपल्या भाषेत बोलायला सुरुवात केली, तर त्यांना 'कंपूशाही करणारे' म्हणायचं, की 'मातृभाषेचे अभिमानी' म्हणायचं, ते पाहणाऱ्यावर अवलंबून आहे!
Anyway, in general I find it nice to follow Wodehouse's "I don't hate in plurals" attitude..or, with a modification: "I don't judge in plurals."
[बाप रे..अभिप्रायावरचं उत्तर हे बऱ्यापैकी मोठं मुक्तचिंतन झालंय. anyway, i wasn't referring to your comment when I wrote the last two paragraphs, abhijit..just wrote whatever thoughts that came when triggered off by your statement.]
yeah, Thats egg-jaktly true.
I think I fall in "some people are always disposed towards approving most of the people they meet" this category. I have been to chennai, and unlike most of others I am loving chennai. अजून हैदराबादशी सूर जुळले नाहीयेत म्हणा.
'कंपूशाही' चे अनुभव येतात बऱ्याच वेळा. student life मध्ये आले होते तेव्हा फ़ार फ़रक नाही पडला. हा problem तुम्ही स्वत: एकटे असाल तेव्हा जास्त येतो. किंवा feel होतो.
Post a Comment
<< Home