Sunday, February 26, 2006

कैवल्याचा पुतळा

'अंतर्नाद' च्या दिवाळी २००५ मध्ये अनिल अवचटांचा संतवाङ्मयाकडे 'जीवनविषयक, सुबोध तत्त्वज्ञान' अशा दृष्टीने पाहणारा "ज्ञानेश्वर, कबीर, सॉक्रेटिस वगैरे" हा लेख प्रसिद्ध झालाय. त्या लेखातला ज्ञानेश्वरांबद्दलचा हा भाग.
**

'मुक्तांगण' मध्ये 'अंतर्दीप' या कार्यक्रमात सुनंदा यशोला 'पसायदान' म्हणायला सांगायची. यशोला ते चालीवर म्हणायला शिकवलेलं. यशो मनापासून गायची. त्याचा अर्थ साधारण माहीत होता. मी एकदा सार्थ ज्ञानेश्वरी काढून पाहिलाही होता. तो समजला होता, पण उमगला मात्र अशाच एका बुधवारच्या अंतर्दीपमध्ये.
माझ्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वर नावाचा वीसपंचवीस वर्षांचा तरुण मुलगाच आला. सिनेमापासून पागोटं घालून कंबरेवर हात ठेवून उघडे बसलेले ज्ञानेश्वर मला अजिबात पसंत पडलेले नाहीत. मग हा ज्ञानोबा कसा होता? पंचा नेसलेला आणि उघड्या अंगावर तसाच पंचा पांघरलेला? हां, हे बरोबर जमतंय. हा मुलगा गोरापान असेल का? तसंही नको वाटतं. तो सावळाच असणार. नाकी, डोळी चारचौघांसारखा. बघता बघता मनानं तयार केलेले ज्ञानेश्वर दिसलेच.त्यंचे डोळे खूप बोलके होते. त्यात त्यांच्या अंतर्यामीची शांतता दिसत होती. एवढी मोठी ग्रंथरचना करून तो गुरूकडे, देवाकडे काहीतरी मागत होता. मोक्ष? नाही. ' विश्व स्वधर्मसूर्ये पाहो'. एका पैठण, आळंदीच्या पोराच्या तोंडी हे विश्व कोठून आलं? त्याला मागायला मिळालंच आहे, तर मागतोय काय? तर 'जो जे वांछील तो ते लाहो' आणि फक्त माणसांनाच नव्हे, तर 'प्राणिजात'. दुष्टांचं निर्दालन करणारे तर अनेक योद्धे होऊन गेले, पण दुष्टांमधली दुष्टता निघून जावो, असं मागणारा हा तेव्हाचा एकमेव वीर असेल. एक वीस-पंचवीस वर्षांचा, निर्धन मुलगा, अशा सहृदयतेनं वागणाऱ्या माणसांना तो 'कल्पतरू' म्हणतो आणि त्याचे आरव किंवा राई बनू दे असं मागतो. किती छान.

मलाही अलीकडं तसंच वाटू लागलं होतं. समाजातले मोठ्ठे मोठ्ठे प्रश्न कसे सोडवणार, याचा विचार जन्माचाच मागं लागलाय.ते प्रश्न सोडवायला जे करायचे ते करूच, पण आपल्या हातात असलेली गोष्ट आपण आधी करू, की आपण चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करू. ते पाहून इतरांनाही तसं राहायचा हुरूप येईल. आणि हळूहळू चांगल्या माणसांचा समूह तयार होईल. समस्यांच्यापुढं डोकं आपटून निराश होण्यापेक्षा, हे आपण करू, असं अलीकडं प्रकर्षानं वाटू लागलं होतं. ज्ञानेश्वर अकराशे की बाराशे कितीतरी सालात तेच सांगून गेलेत की. किती कोवळा मुलगा! किती नेमकं सांगितलं! आणि काम झाल्यावर झटकन निघून गेलाही! त्यांनी भिंत चालवली का नाही? त्यांनी जिवंत समाधी घेतली की नाही? यावर ज्यांना करायच्यायत चर्चा, त्यांना करू द्या. आज माझ्यासमोर उभा होता, पंचा नेसलेला आणि पांघरलेला, एक तेजस्वी डोळ्यांचा, खूप खूप पुढचं पाहणारा आणी मोठ्ठ्या मनाचा तरुण मुलगा. त्यानं असा मोठा ग्रंथ लिहिला, की या भाषेचा पायाच घातला गेला. आणि आज ज्या भाषेत मी लिहितोय, ती भाषा त्यानं समृद्ध करून हातात ठेवली. कितीतरी त्यांची उदाहरणं आपण आजही वापरतो. मान्य आहे, राजहंस डौलात चालतो, पण म्हणून आम्ही चालायचंच नाही की काय, हे वाक्य किती उभारी देणारं.

...'मुक्तांगण' मध्ये पसायदान ऐकताना मन भरून येतं. इतक्या वेळा ऐकूनही. ते त्या पंचविशीतल्या पोरानं आपल्याला दिलेलं स्वप्न आहे. सद्भावाच्या बीजापासून वाढलेल्या झाडांचं, 'कल्पतरूंचं आरव' होईल आणि ते इतरांना सावली देईल, ते वाढत, विस्तारत राहील. त्यात ओरबाडणं असणार नाही, उलट, देणं हा स्वभावधर्म असेल. त्या झाडांच्या आधारानं वेली वर चढतील. किडे, मुंग्या, सूक्ष्म जीव, पक्षी, प्राणी जगतील. वार्धक्यामुळं त्यातलं एखादं झाड पडलं, तरी ते तिथंच कुजेल, त्यावर नवी रोपं उगवतील...कोणी म्हणेल, " हा स्वप्नाळूपणा आहे." मान्यच आहे. पण हे स्वप्न कोणी दिलंय, माहीत आहे का?
त्या पंचाधारी, मायाळू डोळ्यांच्या, पंचविशीतल्या अनासक्त मुलानं!

***


गोड आहे किनई? एक लहानसा मुद्दा अजून सांगायचा होता, 'जे खळांची..' या ओवीबद्दल. प्रा. राम शेवाळकरांच्या भाषणांच्या ध्वनिफिती आहेत - बहुधा 'अलूरकर' च्या. त्यांपैकी 'योगेश्वर कृष्ण' आणि 'ज्ञानेश्वर' यांच्यावरची व्याख्यानं विशेष जमून आली आहेत. आणि लताबाईंनी 'मोगरा फुलला' नावानी आलेल्या ध्वनिफितीमध्ये ज्ञानियांच्या राजाचे अभंग, गायले आहेत. त्यातही डॉ. शेवाळकरांचं निवेदन आहे. तर या दोन्हींपैकी एका ध्वनिफितीत (मला वाटतं दुसऱ्या) पसायदानातल्या

जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडों, मैत्र जीवांचे।

या ओवीवर निरूपण आहे. त्यात या 'सत्कर्मी रतिं वाढो' चा सूक्ष्म अर्थ ( 'subtle meaning' ला हेच प्रतिशब्द योग्य आहेत ना?) फार छान सांगितलाय त्यांनी. "ज्ञानेश्वर किती उदार हृदयाचे होते पहा. खलप्रवृत्तीच्या लोकांची सत्कर्मामध्ये रती 'वाढो' असं म्हणतात ते; 'तयां सत्कर्मी रति लाभो' असं नाही! म्हणजे दुर्जनांनाही सत्कर्म करणे मूलत: आवडतेच..ज्ञानोबा मागतात की त्यांना ते अधिक आवडायला लागो."

किती साजरा दृष्टिकोन!

5 Comments:

गायत्री, तुझा ब्लॉग खूप आवडला! अनिल अवचट, अभय अवचट आणि सुरेश भट या सर्वांचे लेख खूपच आवडले. ते आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद! तुझी गझल सुद्धा मस्त जमली आहे, लिहीत रहा!

इतिBlogger Sumedha
Monday, February 27, 2006 12:54:00 AM  

:)

इतिBlogger Gayatri
Monday, February 27, 2006 5:02:00 PM  

छानच:)

इतिBlogger P
Tuesday, February 28, 2006 1:59:00 AM  

Khup diwasanni Dnyaniyanchya raja chya bhashetla sundar blog wachayla milala.
Aata zopayla khupach late zalay,mhanun kewal nantar lawkarach urlele likhan wachte.

Sajira Gojira,kadhi khatyal,kadhi bhardast,kadhi tanhulya sarkha nishpap,tar kadhi ammal bahushrut praudh,kadhi bhasmay tar kadhi sarech khare watayla lawnara Blog baddalach boltye mi !!

इतिBlogger Medha P
Monday, September 04, 2006 2:40:00 AM  

khup chhan

इतिAnonymous Arun Zinjurde
Tuesday, December 13, 2011 8:54:00 PM  

Post a Comment

<< Home