Sunday, January 06, 2008

कॅटाटोनिया

छकड्याच्या चाकाच्या नाकात घुंगरनथ. मागे अर्ध्या-ओल्या पिवळ्या गवताच्या भार्‍यावर मी अवघडून बसलो आहे. खुळ्ळुक खुळ्ळुक लय कळतेय कानाला. तशी खुळखुळ आणखी कितीदा ऐकलेली. एक. ’ऊस पिळून रस काढतेलं’ बाळूमामाचं यंत्र. "बरप टाका की ओ मामा आन्खी. आल्लं टाकलाइसा न्हवे चिक्कार?" "त्या तितं दोण फुल्ल." "दोन सुट्टं न्हाईत काय?" कुठल्याच आवाजाशी काऽयपण देणंघेणं नसलेले त्या दांड्याच्या टोकाचे घुंगरू एका जागी कदम ताल केल्यागत खुळूखुळू चाललेले.


दोन. खंजिरी...पण नाही. आधी तीन. आधी घुंगरू. तांबड्याभक्क पट्टीवर ओळींत लावलेले घुंगरू. माझ्या खंजिरीतून थरथर बाहेर पडायच्या आधीच मंजिरीच्या पायांतले दहा विसे दोनशे घुंगरू खळाळ् खळ् करीत घुमायला लागायचे. आ थै कत् तक वगैरे अर्थहीन असंबद्ध बुदबुदाट करत तिचं नाचणं सुरू. खंजिरी मुकाट. पोवाड्याच्या तालमीची वाट बघऽत.


मी त्या घुंगरपट्टीची नाडी तोडणाराय. मांजरी फांजरी कुठली.

एऽऽऽ मी नाई मांजरी. तूच मांजर. नाई नाई, तू माकड.


अभ्या ढब्या डम डम डब्या
डब्यात होती लाकडं
अभ्याला झाली शंभर माकडं.


कशी हसतेय दातपडकी. आमचा दादा असता तर त्यानं पण शिकवली असती असली कुचकट गाणी आमाला. नसला तर नसूंदे जा. आमी आमची आमी करणार गाणी.


मंजी फंजी गवताची गंजी
गंजीत होती कारली
मंजीची पोरं मरली.अव्वा..मरली म्हणे! एऽ हा बघ की... मेली म्हणायचं कनी, तितं मरली म्हणायलाय!
श्या! कुठूनही काहीही आठवतं. पण माझे तळहात एवढे का दुखतायत काही कळत नाही. नखं कापायला झाली आहेत. वेळ घालवायला एक कविता करूया. मित्र म्हणतो मी कविता पाडतो. माझा आक्षेप नाही. त्याला तेदेखील जमत नाही तर उगाच समीक्षकाचा आव का आणावा? सगळे समीक्षक दारू पिऊन लिहायला बसतात का? किंवा तसे नसेल. त्यांना कुठली परवडायला? मला समीक्षकांचा एवढा राग का कोण जाणे.
मित्राला वाटते खूप प्यावी पण त्याला आईच्या शपथेचा काच पडतो. मग मित्र मला पैसे देतो आणि सागरमध्ये नेतो. त्याच्या डोळ्याला कॅक्टसमधलं पब्लिक झेपत नाही. तो ’स्मोक’ करतो आणि किक बसते असे खोटेच सांगतो. धूरतोंड्या डुक्कर. तू माझा मित्र नाहीस असे मी त्याला तोंडावर सांगितले आहे. असे सांगितले की तो हसतो आणि मला कविता लिहिण्याची फर्माईश करतो. अकबर बादशहा आहेस काय रेड्या**** ??? मी फक्त तोंडावर अपशब्द वापरतो. विचार करताना मनात अपशब्द आणले की मन गढूळ होते. त्यापेक्षा आता कविता पाडूया. चाकाची लय घेऊ.

संबळ चिपळी टाळ गं
पायी बांधून चाळ गं
वेगात नाच
आवेग हाच
की तुटो जगाशी नाळ गं.

खरे तर नाचताना तिला तसे काही होत नसावे असे मला वाटते. कसे होत असावे ते कसे कळावे बरे?
सरकडोक्या मित्र इथे जवळपास नाही ते बरे. लोकांच्या मनात त्याला घुसता येते असे तो सांगतो. मानसशास्त्राची पदवी जवळ असली म्हणजे लोकांचे स्वत:विषयी असे गैरसमज होतात. जर त्याचे म्हणणे खरे असते तर मी स्वत:च्या मनात लोकहितवादींचे रूप घेऊन वावरतो आणि त्यांच्या काळानुरूप (माझ्या कल्पनेनुसार..इथे कुणाला माहिती आहे त्यांच्या काळाबद्दल खरेखुरे?) बोलतो हे त्याला कळले नसते? मी कधी कधी पांडुरंग सांगवीकर असतो आणि कधी कधी.."इश्श्य...कुणी ऐकेल नाऽ..." छाप ताईसाहेब/ बाईसाहेब सुद्धा असतो जुन्या संगीत नाटकातल्या. सांगवीकरावरून आठवले. मित्राने एकदा मी भालचंद्र नेमाड्यांची भेसळयुक्त नक्कल करतो असा शेरा मारला. (मित्राचे मराठी तितकेसे उच्चभ्रू नाही. तो मला "अरे हे त्या कोसलावाल्या स्टायलीतलं वाटतंय. " असे म्हणाला.) high-brow चे उच्चभ्रू हे सुघड भाषांतर करणार्‍याला सलाम.
तर मित्राने शेरा मारला. मी त्याला भसाड्या आवाजात "हम हैं राही प्यार के, हमसे कुछ न बोलिये, जो भी प्यार से मिला, हम उसीके हो लिये" हे गाणे (संपूर्ण) म्हणून दाखवले. तो उणेअधिक झाला. nonplussed.
डोक्यावरचे केस उपटायची गरज नाही. मंजीचे भोकरडोळे अजून वटारवायला लावायचे असायचे तेव्हा मी मुद्दाम असा शेरा मारायचो.

तिचे नाव काढताच हातांवर चर पडतात हे आता माझ्या ध्यानी आले आहे. गाणे आठवू कोणते तरी. अवेळीच केव्हा दाटला अंधार. तिला गळाजड झाले...लय!

अवेळ उठले मूल गं
कुणास देते हूल गं
दिलास त्याला
घुंगरवाळा
तुला कुणाची भूल गं?

तिनं खरंच तसं केलं? मला खरं नाही वाटत. कृष्ण भुलवत असेल, तरी अनयाची आठवण ठेवायला नको तिनं? नादावलीस गं बये, नादावलीस... तरी सांगत होतो, वाढत्या सांजवेळीं नयें गं पाण्या जाऊ...
ते सारे केले एकवेळ कानाआड, डोळ्यापार. पण पिल्लांचे मी घेता नाव, चिऊताई जागी झाली होती ना? हीच काहून झोपली राहिली?

आता माझ्या डोळ्यांतल्या धमन्या भस‌कन फुटतील की काय इतका ताण आला आहे बुबुळावर..ब्लेड आणू? पण नको. ग्रेस नको इतक्यात आत्ता. लई झाले.

संपवायचे म्हटले तर शब्द गोळा होतातच.

जोत्याखालून जाय गं
अजून चटके खाय गं
वळल्या नखानं
गिळल्या इखानं
जीव जळला माय गं....

तर कहाणीही चारचौघांसारखीच आणि शेवटही. पण त्यातल्या त्यात मंजीचे पोर मरले नाही इतकेच काय ते समाधान.


Labels: