Tuesday, February 19, 2008

फार मऊशार आहे हा हिमवर्षाव.

वार्‍यासरशी भिरीभिरी फुगड्या घालत येणारे हिमकण अल्लाद गालांवर उतरतायत.

"तुला बट्टलफ्लाय किश्‌ कलू?" असं म्हणत आपल्या पापण्यांची पिटपिट उघडमीट
माझ्या गालावरती करणारं ते चिमणं पिल्लूच आठवलं मला चट्‌कन!

आणिक एकदा ते रंगीत-रंगीत फुलपाखरू नाकावर बसलं होतं तेव्हा कशा इवल्या गुदगुल्या झाल्या होत्या - तशाच आत्ता पण, कण कण!

मी जीभ बाहेर काढली हळूच. कापूसहलके कण जिभेवर पडून क्षणात वितळून गेले. वर्गात खूप्पच म्हणजे खूप्पच कंटाळा आलेला असला की बाईंचे शब्द असेच डोक्यात टप्पल टाकून उडून जातात.

होता होता चष्म्यावर बर्फानं बस्तान बसवलं. ते झटकायला चष्मा हातात घेतला आणि सहज जाकिटाकडे लक्ष गेलं.. अख्ख्या जाकीटभर बिलगूनच बसले होते बेटे पांढुरके कण! मी म्हणजे स्नोमॅन दिसत असणार..बर्फाचा लडदोबा! मला पिनोकियोच्या नाकाइतकं लांबलचक गाजरनाक उगवलेलं दिसायला लागलं आणि खदखदून हसू आलं. समोरून येणारा मुलगा माझ्या तशा हसण्याकडे बघून मोठ्ठ्या माणसासारखं समंजस खोडकर हसला.


आता पायाखाली बर्फाचा गालिचा पसरतोय. त्याच्यावर पाय ठेवताना बुटाआडून पण रवाळपण जाणवतं बर्फाचं. अगदी पायाशी कान नेला तर कुचूकुचू आवाज येत असणार. चवडे जपून टेकवायचे खाली, नाहीतर सटकायचा पाय सर्रकिनी! खरं म्हणजे आत्ता स्केटिंग करून बघायला पाहिजे इथे. घरी नाही का, फरशीवर पावडर सांडून त्यात घसराघसरी करायचो...

शाळेत पोचेतो पुढची पंधरा पावलं माझी घसरगुंडी मस्त सरकली मग!

"हू हू हू हू..केवढी थंडी आहे.." कुणीतरी म्हणालं.

काहीतरीच काय...केवढी ऊब होती त्या बर्फात!