Friday, May 28, 2010

जिवाज़वळच्या गोष्टीची वाटणी

भेटशील तेव्हा दिसतील तुझे़ किलकिले डोळे
पापणीवरून धावणारं,
डोळ्यांत न मावणारं
लुटूलुटू स्वप्न : त्याच्या खोड्या, त्याचे़ चा़ळे.

बघतील आणि हसतील माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या
स्वप्नाचा़ ठाव सुटेल,
धुबुक्‌ पडून परत उठेल
बाहुल्यांवर झेप घेईल मुठी नाच़वत इवल्या.

अस्सं तुझ़ं स्वप्न ज़र कधी आपलं झालं
मोठ्ठं / खरं / खोटं होत एके दिवशी उडून गेलं
तर तुला चा़लेल?
तरच़, भेटूच़.

11 Comments:

प्रचंड गोड! 'धुबुक्‌' :)

'तरच भेटूच' -- स्वप्नाळू ओळींचा असा रोखठोक शेवट आवडला :) पण, 'वाटणी' कसली ते नाही कळलं...

इतिBlogger Priya
Saturday, May 29, 2010 2:21:00 AM  

प्रिया: >:)< , आणि प्रश्न विचारल्याबद्दल खूप धन्यवाद!
’वाटणी’ ध्येयाची, स्वप्नाची; उराशी बाळगलेल्या कोणत्याही कल्पनेची.

’शेअरिंग’ या शब्दावर विचार करता करता, समांतर मराठी शब्द शोधत होते.
वाटप : धान्य किंवा मार्क वाटल्यासारखं सरसकट सगळ्यांना देणं. त्यात पुन्हा देणारा हा घेणार्‍यापेक्षा वरचढ असा भाव कुठेतरी.
वाटा : मालमत्तेतल्या पैशासारखा. यात घेणार्‍या व्यक्तीचा हक्क स्पष्ट असतो. आपला वाटा मिळाल्यावर त्याने त्याचं काहीही करावं.
वाटणी: हीसुद्धा मालमत्तेची - पण घर/ बाग अशी - ज्या गोष्टीची एकत्र मिळून काळजी घेतली तर जास्त छान होईल अशी. वाटणी करताना हक्काबरोबरच थोडासा कर्तव्याचा भाग येतो असं मला जाणवलं.

आता भावनेचं ’शेअरिंग’ याला मराठीतला सगळ्यात जवळचा वाक्प्रचार म्हणजे (सुख/ दु:ख ) वाटून घेणं. वाटल्याने सुख वाढतं, दु:ख कमी होतं वगैरे. ध्येयाचं, स्वप्नांचं काय होतं वाटल्यानंतर? माझ्या मते, वाटल्याने ध्येय बदलतं. (Not in essence or in particulars of the achievement, but maybe in size and scope and in your own understanding of its shades.)

समजा मला अशी एक व्यक्ती भेटली, जिनं एक कृतिशील स्वप्न पाहिलंय (उदा. स्वत:च्या लहान गावात प्राथमिक शाळेत शिकवणं.) ते स्वप्न ती मला ऐकवत असताना मला त्यात ’माझी जागा’ दिसायला लागते, आणि माझ्या त्या वेळच्या प्रतिसादावरून त्या व्यक्तीला त्या स्वप्नासाठी माझी ओढ लागते (स्वप्न माझ्याकडे झेप घेतं). त्या व्यक्तीचं ते स्वप्न आता आमचं दोघांचं होतं - दोघांनी वेगवेगळे विचार केलेले असतात, (समजा मी काहीच केलेला नसतो आधी विचार, पण तिनं कल्पना मांडल्यावर मला त्यात बदल सुचायला लागतात, त्यावर तिलाही नवे बदल सुचतात वगैरे..)
आता त्या स्वप्नाची परिणती तीन प्रकारे होऊ शकते: १) कदाचित ते स्वप्न जसंच्या तसं सत्यात उतरतं , आणि आम्ही तसेच त्या शाळेत शिकवत राहतो कायमच. ते मूळ स्वप्न पुरं झाल्यामुळे आता ते उडून जाऊन नवी स्वप्नं तिथं आलेली असतात. २) कदाचित ते स्वप्न आणखी मोठं होतं, त्या मूळच्या लहान गावात शिक्षकांची ’नवी फळी’ तयार करून आम्हीच नामानिराळे होतो त्यापासून, आणि दुसरं काही करू लागतो. ३) कदाचित खूप अडचणी येऊन ते स्वप्न प्रत्यक्षात येतच नाही, मरून जातं जन्मायच्या आधीच, किंवा खूप लहानपणीच. (इथे सुनीताबाईंच्या ’आहे मनोहर तरी..’ मधला मालेगाव अध्याय आठवल्याशिवाय राहात नाहीये!)

यांतलं काहीही झालं तरी जर त्या व्यक्तीला चालेल, ’मूळ स्वप्न मी पाहतेय त्याच स्वरूपात जसंच्या तसं , मला पाहिजे त्या गतीनं, मी प्रत्यक्षात आणणार’ असा तिचा अट्टाहास नसेल; थोडक्यात : त्या स्वप्नाची माझ्याबरोबर ’वाटणी’ करून घ्यायला ती तयार असेल, तर आणि तरच भेटलं पाहिजे आम्ही. (And because it is such a rare phenomenon, असं असेल तर भेटलंच पाहिजे आम्ही!)

एकत्र स्वप्नं बघणार्‍या कुठल्याही ’team' ला कळलेलं team spirit च्या तत्त्वज्ञानाचं घरगुती रूप म्हण हवं तर.

याची अजून एक छटा : ’व्यक्तिगत ध्येय’. समजा मलाच एखाद्या परीक्षेत यश मिळवायचंय, आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न करतेय. मी कुणाबरोबर ही गोष्ट ’शेअर’ केली, आणि ती व्यक्ती ’मी हे यश मिळवणं’ हे तिचंच स्वप्न असल्यासारखं वागायला लागली. माझी "सदसद्विवेकबुद्धी’, माझा ’जिमिनी क्रिकेट’ बनून मला टाइमपास करू न देणं, पेप टॉक्स देणं आणि यथाशक्ती सगळी मदत करणं. Mind you, this help is invaluable, but sometimes it might feel too taxing. Especially if I end up not succeeding, and the thought of breaking this person's heart hurtles me into depression instead of wanting to try harder next time (this would be the case if there's no chance of 'next time'.) [I'm thinking of a suicide case I know of :( - though undoubtedly the reasons for that suicide must've been much more complex than what I choose to select here. ] हे असं जाचक होणार असेल स्वप्नं वाटून घेणं, तर काय उपयोग आहे नं त्या भागीदारीचा?

याच्या उलट, स्वप्नांच्या परिणतीची पर्वा न करता, केवळ त्या व्यक्तीबरोबर , तिच्या सहभागानं, तिला विश्वासात घेऊन हे काम करायचं एवढा एकच विचार उभारी देत असेल तर - आणि तरच ’शेअर’ करण्यात खरी मजा आहे, भेटण्यात मजा आहे :)

***

विचार कच्चे आहेत अजून, पण I hope तुला कळतंय मला काय अभिप्रेत होतं ते. The analysis spoils the cuteness of the poem though, hun? :D

इतिBlogger Gayatri
Saturday, May 29, 2010 6:41:00 AM  

गायत्री,
तुझ्या या कवितेला मला तीट लावावीशी वाटली. मला स्वत:ला स्वप्न बघायची भारी भीती वाटते. कोण जाणे, नसेलच खरं होणार तर कशाला बघा? त्यामुळे स्वप्न एकीकडे तयार होतं, आणि ते खरं झालं नाही तर आपल्या इवल्याशा मनाला कसं बरं समजवावं, याची तयारी दुसरीकडे सुरु होते. मग कधी कधी ह्या द्वंदाचा भारी कंटाळा येतो आणि 'नकोच चायला ते स्वप्न' अशी गत होते. पण तरीही त्या पालीसारख्या चुकचुकणा-या मनाचं लक्ष नसताना येतातच स्वप्न. आणि आलीच पाहिजेत. कारण कधी कधी स्वप्नपूर्तीच्या वाटेवर चालता चालता खूप सारी अनुस्वप्न भेटतात. आणि योग्य वेळ साधून सगळी स्वप्न जिथल्या तिथे बरोब्बर बसतात. :)

इतिBlogger Saee
Saturday, May 29, 2010 3:38:00 PM  

लाख बोललीस, सई! लावच तीट - त्या हळूच डोळ्यात शिरणार्‍या स्वप्नांना दृष्ट लागायला नकोचेय वाढत्या वयाची , सावधगिरीची, ’तुला त्रास होईल’ , ’याचा काय उपयोग’ म्हणणार्‍यांची.

’अनुस्वप्नं’ हा शब्द खूप आवडला.

मला स्वप्नं बघायची भीती नाही वाटली कधी, पण ती कुणाला सांगायची भीती नक्कीच वाटते. ते आणखी वाईट, कारण नुसतीच स्वप्नं रंगवणार्‍या , आणि ती डीटेलवार रंगवली की झालं, एवढंच म्हणणार्‍या कृतिशून्य व्यक्तीसारखी गत व्हायचा मोठा संभव असतो - विशेषत: माझ्यासारख्या आळशी व्यक्तीच्या बाबतीत. ’लिटिल प्रिन्स’ मधल्या त्या आपापल्या ग्रहावर एकट्याच राहणार्‍या माणसांसारखं. रंगवलेली स्वप्नं कुणाला सांगितली, की ’जबाबदारी’ आणखी वाढते, आणि स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताही - किमान आपल्या हातात असतील तितके कष्ट तरी आपण करू, procrastinate करणार नाही याची शक्यता तरी वाढते. आणि त्याच वेळी, आपलंच स्वप्न पूर्ण करायला आपल्याला अशा दुसर्‍या माणसांच्या कुबड्या लागताहेत असंही वाटतं बावळटसारखं. त्यामुळे, मला पाहिजे तितकीच आणि तेव्हाच ’मदत’ करतील , मला सहन होईल इतकाच हक्क गाजवतील असं वाटतं त्यांनाच स्वप्नं बोलून दाखवण्याचं धाडस करायला लागलेय मी हल्ली :) जशी जशी मी कमी आळशी होत जाईन तशी तशी माझी भीतीपण कमी होत जाईल असा अंदाज आहे!

आणखी गमतीची गोष्ट म्हणजे कधी कधी ’ह्या! तुला जमणार नाही’ किंवा ’कशाला करत्येस हे उपद्व्याप’ असं म्हणणारे लोक जास्त चेव आणायला मदत करतात :D - मला नीट न ओळखता नुसतंच ’तुला जमेल’ म्हणणार्‍या लोकांपेक्षा.

इतिBlogger Gayatri
Saturday, May 29, 2010 8:35:00 PM  

_/\_

thanks :)

इतिBlogger Dk
Saturday, May 29, 2010 9:03:00 PM  

पोकळ अशावादापेक्षा जळजळीत टीका परवडली. तुझ्या कवितेतली 'तरच' ची आडकाठी जरुरी आहे, स्वप्नं बघावं आणि ते प्रत्यक्षात उतरवताना त्यात सोबत असलेल्यांची स्वप्नही सामावून जावीत. असं असेल 'तरच' आणि हे असं झालं कि 'भेटूच'. भेटूच कारण त्या स्वप्नांना डोळ्यात नाही ठेवायचं आता डोळ्यांसमोर घडताना पहायचं म्हणून 'भेटूच'.
'तरच भेटूच' वाह! क्या बात है.

इतिAnonymous Anonymous
Saturday, May 29, 2010 10:12:00 PM  

Gayatri >:)<
No, analysis didn't take away the cuteness of the poem, at least for me. Just made it more beautiful :)

इतिBlogger Priya
Sunday, May 30, 2010 7:45:00 PM  

मस्त! मजा आली

इतिBlogger Samved
Sunday, June 06, 2010 12:54:00 PM  

कवितेला ’लडिवाळ’ हे विशेषण द्यावसं वाटतं आहे. फार गोड. शेवटच्या कडव्याला मात्र एकदम प्रौढ होते आणि त्यातच वेगळेपण आहे म्हणजे तिथे ती शोकेस मधुन बाहेरे पडून वास्तवात येते रोखठोक.

मोठ्ठं / खरं / खोटं इथे स्वल्पविराम नाही वापरलास ते बरं केलंस. एकाच ठिकाणी अनेक अर्थ निर्माण होतात तिथे.

तरच़, भेटूच़..... हे फार गमतीशीर वाटलं. म्हणजे ’तर’ ला ही च़ लावला आहे आणि ’भेटू’ ला ही. तरच़ मधे अट आहे आणि त्याच वेळी भेटूच़ मधे आग्रहही आहे. तिथे अट अमान्य करायला काही वाव नाही तर! :)

इतिBlogger prasad bokil
Monday, June 07, 2010 8:42:00 PM  

badibi, apune ko sabse aacha kya lga pata hai ?

"The analysis spoils the cuteness of the poem though"

sala kisko batao ? our agar batao to bhi kis liye ?


khaair....
Saksham

इतिAnonymous Anonymous
Friday, July 02, 2010 3:49:00 PM  

खो दिला आहे तुला.... :)

इतिBlogger Meghana Bhuskute
Thursday, July 22, 2010 8:57:00 PM  

Post a Comment

<< Home