Wednesday, August 22, 2007

ती आई होती म्हणुनी.

आता.. जायाचंच की कवातरी..पट्‌दिशी. बोक्यानं बापटांच्या कवितेला आवाज दिलेला. अर्धविराम, टिंबांसकट. पण जगात जन्माला येऊन सव्वा वर्ष झालं होतं. इथं किती लढायचंय ते रांगता-रांगता पुरतं लक्षात आलंच होतं. जायच्या दिवसाची पर्वा होती कुणाला?आणि व्यक्तींपेक्षा भावना, जागांपेक्षा आठवणी महत्त्वाच्या वाटत असल्यावर "आता इथून जायचं" असं वाटून व्याकूळ तरी कुठून होणार?अजुनी बाष्पगद्गदित वगैरे व्हायला होत नाहीये. तसं होणार नाही हे माहिती होतंच - पण व्हावं असं वाटत होतं हेही खरं.

मातृसंस्थाय ही, कितीही झालं तरी. 'कितीही' म्हणजे कितीही. पिया म्हणायची तसं "fastest rate of growth." जन्मदात्यांनी अठरा वर्षांत पाहिलं नाही तितकं हिनं पाच वर्षांत वाढताना पाहिलं.
आता 'पाहिलं' फक्त म्हणायला. वर्षाला हजारभरांना आत घेऊन तितक्यांना बाहेर सोडून देणारी माय. आदिम काळापासून ’मातृका’प्रतिमेचं आकर्षण असलेले आपण. विठूही माउली, रखुमाईही. देश माता, भाषा माता, शाळाही, संस्थाही. तिनं काय पाहिलं?
का बाबा हजारभर एकरांतला एखादा तुकडा, पाचपन्नास इमारतींतली एखादी पोक्तीपुरवती देवळातल्या त्या महापुरुषासारखे आपले डोळे टक्क उघडून पाहात होते - नजर ठेवत होते सगळ्यांवर?

जिथंतिथं प्रतिमा, प्रतीकं आणि रूपकांचा हव्यास बाळगणारं मनसुद्धा असं ’येते गे मायेऽऽऽ’ म्हणत हंबरडा फोडायला नाखूश असतं - आणि तरीही - ’कल्पना करायचीच झाली तर...’ म्हणत तिचं एक रूप ध्यानीमनी लहरतं. उदबत्तीच्या धुरासारखं. काही ज्ञानेंद्रियांना तीव्रपणे जाणवणारं. काहींना धूसर आकृतिबंध दाखवणारं. काहींच्या पकडीत न येताही त्यांना खरपूस गंधाळून सोडणारं.

त्याचं काय आहे ना, कविकल्पना या कल्पना म्हणून ठाऊक असतात तेव्हा त्यांचा भार होत नाही. पण एखादी कल्पना इतकी जवळची, हवीहवीशी वाटते की मग तिच्या त्या कल्पना असण्याचंच दु:ख होतं. मग कल्पनेतलाच स्यमंतक मणी, कामधेनू नाहीतर कल्पवृक्ष, पाईक मासा, पर्‍या, देवता, जादूगार, विझर्डस्‌, ’जादू चा/ची/चे शंख/अंगठी/मडके’ छाप सार्‍या सार्‍या गोष्टी - यांपैकी कुणीतरी आपल्याला प्रसन्न होऊन ती कल्पना प्रत्यक्षात उतरावी असं वाटायला लागतं.

...जुन्या बडबडगीतांच्या पुस्तकात असायची तशी अंबाडा घातलेली आईची प्रतिमा. पदवीप्रदान झाल्यानंतर आपल्याला जवळ घेऊन तोंडावरून हात फिरवून काहीतरी पुटपुटत दृष्ट काढणारी. जवळ घेऊन एक एक आठवण सांगू लागते.

"बहाव्यावर तुझा भलताच जीव. आठवतंय ना गो पोरी? आपल्या परसात तर हारींनी झाडं त्याची! ’अमलताश, अमलताश’ म्हणून भान हरपून पाहात बसायचीस आपली. मावळतीकडच्या प्रयोगशाळेच्या जिन्यावरून हात उंचावून एक झुबा तोडला होतास की नाही कुणाचं लक्ष नाहीसं पाहून? खोलीत पोचेतो गळून गेली सगळी सोनपदकं. किती हिरमुसलीस मग. पण झालं ते बर्‍यासाठीच बाई...सौंदर्यावर लगेच आपला मालकीहक्क गाजवायला जाऊ नये, हे कळायलाच हवं होतं तुला जरा अजून खोलवर!

...आणिक एकदा संध्याकाळी रमतगमत कुठेशी निघाली होतीस बघ - आणि एका कवळ्या बहाव्याच्या फांदीनं हळूच डोक्यावर टप्पल मारली तुझ्या. काश्यासारखं तांबूस ऊन, आणि त्यात न्हात हसणारा, पानोपानी हळद माखलेला देखणा परण्या अमलताश! कुठेतरी वाचलेली एकच ओळ - "या गो बांधावरी, नवुरा फुलला!" हरखून त्याला म्हणालीस, "पहिल्या नजरेत प्रेमात पडले रे तुझ्या! I love you!" तर नेमकी वार्‍याची झुळूक आली न्‌ त्याचा शेंडा लवला जरासा. सस्मित "Thank you!" म्हणावं तसा. तुला खुळीला काय, तीच धुंदी मग! त्या तीन शब्दांना साजिरं गोजिरं करणारं दोन शब्दी उत्तर सापडल्याची. परतभेटीची पात्रता नसेल अंगी, तरी दिल्या भेटीचा स्वीकार करावाच नं असा त्या बहाव्यासारखा...

आणि कोकणभेटीत ज्याच्यासाठी आसुसून जायचीस ते बकुळीचं झाड असं हातभर अंतरावर पहिल्यांदा पाहिलंस, तेव्हाचा तुझा आनंद मीदेखील विसरू नाही शकत! दोन जिन्यांना जोडणार्‍या सोप्यात उभं राहून बकुळ हातानं खुडता येते याची केवढी अपूर्वाई तुला. मग ओंजळभर फुलं सखीच्या वाढदिवशी तिच्या हातात ठेवून तिला
’तुला पाहिलं की मला बकुळीचं फूल आठवतं
कळत नाही तेही आपला सुगंध कुठं साठवतं’
असलं कवडीकवन लिहून देणं. येडी पोर!
"

किती किती आणि काय काय. वाट्टेल तेव्हा आठवते ती.
ती म्हणजे फक्त तिची हजारभर एकर जागा आणि पाचपन्नास इमारती, तिच्यातले झाडमाड, मोर, खारोट्या, फुलं , फुलपाखरंच नव्हेत. -- डोळ्याच्या तळातून दु:ख वाचणारी माझी लुटुपुटूची आई, वाचा-वर्तन-कृतींनी शहाणं करून सोडणार्‍या कृष्णसख्या, माझ्या लाडाकोडाच्या लेकी आणि खसखशीच्या मळ्यातले दोस्त. आणखीही कुणीबुणी. शिकवणारे, शिकणारे. - त्यांनीच वाढवलं, वाढताना पाहिलं. कान पिरगाळला,तसे धपाटे खाऊनही घेतले.
तिच्या विश्वातलं जगणं, म्हटलं तर कठीण - म्हटलं तर अगदीच सोपं. कठिणाईचा कणा मोडायला शिकवलंही तिनंच. It's only glass that breaks under a blow - be the steel that gets strengthened with each blow it receives. कुणी सांगितलेलं हे वाक्य किती उभारी देऊन गेलं होतं कधीकाळी. आणि स्वत:च लिहिल्या-बोललेल्या प्रत्येक शब्दाला पारखून-निरखून घेण्याची सवय कशी कोण जाणे, तिनं लावली. उत्तुंग व्यक्तिमत्त्वं दाखवली - त्यांना असाध्य आदर्शाच्या उंच पातळीवर नाही ठेवलं, ’तुम्हांसी ते जमेल’ असं स्वत:लाच म्हणावं इतपत जवळून दाखवली ती माणसं. कधी काही काजळलेले भाग दाखवले - स्वत:तले, इतरांतले...क्षमेचा पूर्वी कधीच कळला नव्हता असा अर्थ शिकवला. गरजेसाठी रागवायला शिकवलं. स्वभावातल्या कमकुवतपणाला जोखायला शिकवलं - कदाचित त्यावर मात करायलाही शिकवलं असेल. कळलंय कुठं मला तिचं सारं देणं अजून?

तिचं बोट सोडताना घनव्याकुळ रडायला हवं होतं का गं मी? पण हसून हात हलवला, तोही ती आई होती म्हणूनच ना. ’भेटेन नऊ महिन्यांनी’ चा भाबडा आशावाद ठेवू देत मला सखे - स्मरणकातरता तिनं नाही शिकवली मला, स्मरणरमणच शिकवलंय फक्त!

Tuesday, August 21, 2007

ओंजळधारेतल्या उष्ण पार्‍याचा
चहूंकडून छर्‍यांगत मारा...
तग धरणं खरंच कठीणंय
आणि तगमगणं बरंच सोपं!


**

कर्दळीच्या गाभ्यातला कापूर
असा न्‌ तसा...
शेवटी उडूनच जायचा!
पण पेटत्या कापराची काजळी
कधी पाहिली असतीन्‌ तिनं
तर तिची प्रसवधन्यता
तशीच अबाधित राहिली असती?


**

आज सूर्याला फितूर आहेत सारे
पण दीर्घिकेच्या केंद्राशी पोचू पाहणारं
माझं इमान
कधीतरी तिच्या पलीकडे जाईल
अंतिम सत्यातली मिथ्यता
आणि मिथकांतलं ऋत
भरल्या डोळ्यांनी
डोळे भरूऽऽन पाहील!