Thursday, March 23, 2006

स्मित

परवा कुणाचंसं हसू पाहिलं. 'हसू' हा तसा गोड पण मजेदार शब्द. बोलीभाषेत फारसा वापरला जात नाही. हे ज्ञान देखील मला हायस्कुलात गेल्यावर झालं. मैत्रिणींना कुठल्यातरी भयंकर विनोदी वगैरे प्रसंगाचं वर्णन सांगत असताना मी समारोप केला: "आणि मला एकदम हसू फुटलं." त्यावर त्या विनोदापेक्षाही भयंकर मोठा विनोद मी केलाय अशा आविर्भावात 'ही किती पुस्तकी बोलते' असं म्हणत त्यांचं हशा-टाळ्यांचं आदान-प्रदान झालं: "अगं हसू फुटत नाही, हसायला येतं."... आता अशा संगनमताने झालेल्या थट्टेवर एक बावळटसे हसू चेहऱ्यावर आणणे आणि आपणही एक-दोन टाळ्या देणे यालाच खिलाडूपणा म्हणतात हे जाणकारांना माहिती आहेच!
[एक फाटा: काही भाषाप्रेमिकांना 'भयंकर' हे विशेषण 'प्रचंड/ खूप मोठा' या अर्थाने वापरलेलं आवडत नाही म्हणे. 'भय उत्पन्न करणारे ते भयंकर' असा अर्थ असल्यामुळे 'भयंकर विनोद' असं म्हणणं हे 'अक्राळविक्राळ भात' म्हणण्याइतकं अस्थानी आहे म्हणतात. या लोकांनी आमच्या दोस्तमंडळाचे पी. जे. ऐकलेले नाहियेत म्हणून.. नाहीतर एक एक 'जोक' म्हणजे हसून/रडून जीव जातो की काय अशी भीती उत्पन्न करणारा असतो!]
हां, तर मुद्दा काय, की परवा दुपारी, जेवून खाऊन 'जरा लवंडायची' वेळ असते त्या रामजन्मोत्तरप्रहरी सायकल हाणत वर्गाकडे चालले होते. (काय सांगावं..पेशवाई गेली आणि आम्ही वामकुक्षीला अंतरलो!) रस्त्यावरची तुरळक जनता, झाडंझुडपं, इमारती..सगळेच पेंगल्यासारखे किंवा पेंगताना मास्तरांनी खडू मारून उठवल्यासारखे दिसत होते. तेवढ्यात कुणाचंसं ओळखीचं हसू दिसलं. बडिशेपेच्या बशीत शेवटी राहिलेल्या कंटाळवाण्या दाण्यांमध्ये अचानक खडीसाखरेचा इवला तुकडा चमकून जावा तस्सं वाटलं. एका स्मितहास्यात काय जादू असते सगळा माहौल बदलवून टाकण्याची! 'मूड' अगदीच विस्कटलेला नसेल, तर समोरच्याचं हसणं आपल्याही चेहऱ्यात उमटतं पाहतापाहता. त्यातसुद्धा, बघितलेलं हसणं प्रीती झिंटासारखं खळीदार असेल तर संदीप खरेच्या शब्दांत " असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा!"
मग मनाला भावलेली स्मितहास्यं आठवली ओळीने. पहिलं 'आमच्या सचिन'चं! शहाण्णवचा विश्वचषक सामना. सचिन म्हणजे आपला देवाधिदेव तेव्हाचा. पेप्सीची जाहिरात: लहान लहान गावांतून, गल्लीबोळांतून 'सचिन आया रे भैया...' ची धूम बोलवा चाललीय. ती सगळी jingle संपल्यावर पेप्सीच्या चिन्हाशेजारी सचिन अवतरतो. एक पाय गुडघ्यात मुडपून वर ठेवत, बॅट हलकेच जमिनीवर सोडतो, तिच्या टोकावर relax झाल्यासारखा हात ठेवतो. एवढं होईपर्यंत चेहरा गंभीर...आणि मग एकदम पुस्तकातून अचानक हातात आलेल्या मोरपिसासारखं अनपेक्षितपणे ते प्रसिद्ध स्मित उमटतं.. काळीज खलास हो!
'सुरभि' मध्ये रेणुका शहाणेचं 'चार इंची' हसणं तजेलदार वाटायचं, आणि 'Turning Point'च्या गिरीश कर्नाडांचं हलकेच येणारं स्मित अगदी रुबाबदार. 'वीर सावरकर' मध्ये शीर्षकभूमिका साकारलेल्या शैलेन्द्र गौडचं हसणं तर खासच लक्षात राहिलेलं. किती संयत, किती प्रभावशाली! 'ही व्यक्तिरेखा एका अतिबुद्धिमान, समोरच्याचं पाणी क्षणात जोखणाऱ्या माणसाची आहे' हे सहज सूचित करणारं.
अर्थात केवळ नट-नट्यांनाच ही सुंदर स्मितहास्याची देणगी लाभलीय असं थोडंच आहे? पु.ल., वसंतराव, लता, अगदी मेधा पाटकर आणि मदर तेरेसा पण..किती सुंदर वाटतं सर्वांचं हसणं. वलयांकित व्यक्ती सोडा..आपल्या घरातल्या कामवाल्या मावशी पण (एक तारखेला?) तोंडभर हसताना काय साजऱ्या दिसतात. मला वाटतं मनातून ओठांवर आलेलं..आणि तिथे न मावल्यामुळे डोळ्यांत चमकणारं प्रत्येक स्मित इतकं सुंदर दिसत असणार!

15 Comments:

खरं आहे. बाकी, पेशवाई-वामकुक्षी, बडीशेप-खडीसाखर आणि खडू मारून उठवलेल्या पेंगत्या इमारती छानच.

इतिBlogger Nandan
Friday, March 24, 2006 2:18:00 AM  

:)

इतिBlogger Kaustubh
Friday, March 24, 2006 10:52:00 AM  

आवडलं!
आणि चार इंची हसण्याला रेणुका शहाणेची आठवण काढलीस हे बरे. सॊंदर्य स्पर्धेतल्या झाडून सगळ्या उंदऱ्या सॉरी सुंदऱ्या सगळी कवळी दाखवत हसतात (काही अपवाद वगळता) पण त्यात तशी सहजता नही. आणि हो तू लिहीलं नसले तरी मी माधुरीचे नाव वाचले. माझ्या मनावर उमटलेली अजून दोन हास्य - सीमा विश्वास, तिच्या अभिनयातील एक प्रभावी अस्त्र. हासणंही एखद्याला सुंदर बनवू शकतं! तुला ती जाहिरात आठवतीय 'पूरब से सूर्य उगा फॆला उजीयारा' त्यातील त्या मुलाचे निरागस हसू.
मध्यप्रदेशातील एका गावात काढलेल्या छायाचित्राची आठवण झाली. तुझ्या परवानगीची वाट न बघता या लेखातील काही ओळींसकट माझ्या ब्लॉग वर टाकत आहे.

इतिBlogger prasad bokil
Friday, March 24, 2006 3:36:00 PM  

प्रसाद, गॉडगिरी! ते प्रकाशचित्र फार फार गोड आहे.आणि माधुरीबद्दल "कसलं ओळखलंयस!" मनातल्या मनात रेणुकाच्या अगोदर तिचं नाव लिहून टाकलंच होतं.त्या हसण्याला विशेषणबद्ध करून टाकणं मानवलं नसतं एवढंच!
'पूरब से..' हो आठवलं! तो 'गाय' लिहिणारा मुलगा ना?खरंच 'नितळ' हसू होतं त्याचं.

इतिBlogger Gayatri
Friday, March 24, 2006 5:33:00 PM  

कसलं भयंकर लिहिलय.(हा तुझ्या लेखातला भयंकर आहे हे सांगणे न लगे!)

इतिBlogger Amit Awekar
Friday, March 24, 2006 8:47:00 PM  

वा! फारच सुरेख. वाचून हसू फुटलं बरं का ;-)

इतिBlogger Sumedha
Saturday, March 25, 2006 3:37:00 AM  

chinu, wachla tujha blog aaj. bara lihites. 'olakhicha smit' denari wyakti 'to' ki 'tee'? :D
ani kkay ga, "living on the edge" che karnad kuthle kadhles? karnad hosted 'turning point', bawlat.
neway, keep writing. tai was asking after you..mail her sometime.take care!
--prashant

इतिAnonymous Anonymous
Monday, March 27, 2006 11:47:00 PM  

परश्यादादा, तुला आणि ताईला आत्ताच केल्येय मेल.[silly smile] thanx boss, for the correction.

इतिBlogger Gayatri
Tuesday, March 28, 2006 1:43:00 PM  

वाह! क्या बात है! तू केलेल्या 'कसे सरतील सये' चं हिन्दी रुपांतर वाचल्यापासून ओळखतो मी तुला!(म्हणजे महीनाभरच:))
प्रियाने पाठवलेले मला ते. तुझा blog आहे म्हटल्यावर उत्तमच!
लिखते रहो!

इतिBlogger गिरिराज
Friday, March 31, 2006 11:00:00 AM  

वाह!प्रियाने दिलेली तुझी 'कसे सरतिल सये'ची हिंदी आवृत्ति वाचल्यापासून मी तुझा पंखा झालोय.
लिव्हत रहा!:)

इतिBlogger गिरिराज
Friday, March 31, 2006 11:10:00 AM  

गायत्री, गायत्री...माझ्या मते तू तर प्रस्थापित लेखिका आहेस. तुझे सगळे लेख वाचून काढतो आता. अशक्य लिहिलंयस.

- वाचक

इतिAnonymous Anonymous
Sunday, April 02, 2006 4:44:00 PM  

Hi there,
sahi blog aahe. apratim!!
vishesh karun tu lihilela te header tar agadich sahi aahe.

keep up the good work. Book marking you blog now :)

yeto..
Abhinav

इतिBlogger tmww
Tuesday, April 04, 2006 10:02:00 AM  

Tu dev hai bhai
ekdum dev !!
sab aavadya apune ko..manapsun aavdya ..aata yet rahin ithe.

lihit raha.
Saksham

इतिAnonymous Anonymous
Tuesday, April 11, 2006 6:14:00 PM  

आव्या, सुमेधा, गिरीराज, वाचक, अभिनव आणि सक्षम, तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! खूप बरं वाटलं इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून. :)

इतिBlogger Gayatri
Friday, April 14, 2006 4:50:00 PM  

:)

इतिBlogger Gayatri
Saturday, April 15, 2006 12:55:00 PM  

Post a Comment

<< Home