Sunday, December 17, 2006

कापूसकोंड्याची गोष्ट

परवां काय झालां...
असांच सोप्यार बसून होतंय
भाचरांका गोष्ट सांगी होतंय
गोष्ट कापूसकोंड्याची!

बाबगो, बेबलं, पकल्या सगळी
तोंडां वासून फुड्यात होती
माजां इचारणां आयकत होतीं
"कापूसकोंड्याची गोष्ट सांगूं?"

तेंणी 'होय' म्हटल्यार म्हणत होतंय
'होय कित्या म्हणतां, कापूसकोंड्याची गोष्ट सांगूं?'
'नाका' म्हटल्यार म्हणत होतंय
'नाय कित्या म्हणतां, कापूसकोंड्याची गोष्ट सांगूं?''
पोरां खिदळाक लागल्यार म्हणत होतंय
'दात कित्या काड्‌तां, कापूसकोंड्याची गोष्ट सांगूं?''
आयडीया काडान्‌ गप रवल्यार म्हणत होतंय
'उगी कित्या रंवतां, कापूसकोंड्याची गोष्ट सांगूं?''

मगे दादग्यान्‌ माजघरात टीवी लावलंनीत
आमी भक्तिभावान्‌ बुडां नि तोंडां त्या दिशेक केली
('टीवीचो आवाज सुरू झाल्यापरान्‌ माणसाचो आवाज बन्द्‌' असो आमच्या घराचो होमरूल आसा.)

'आज तका'र इलेले होते आपले पंत्‌प्रदान
'आदरणीय' आणि 'जी' पाटी-फुडां लाव्‌न
देशाच्ये प्रश्न आयकान्‌ म्हणत होते 'अल्पसंख्याकांची गोष्ट सांगू?'
देशाची प्रगती आयकान्‌ - 'अल्पसंख्याक'...
सर्कारार टीका आयकान्‌ - 'अल्पसंख्याक'...
...

मगे साडेनवार काटो इलो.
रिमोटान् 'ष्टार' झळकावलों.

लाजाहोमांतली कापडां घरात घातलीहंत
(म्हणज्यें येक तर लगीनघरांतली कापडां
- नांयतर लाजेचो होम करान घातलंली कापडां)
अशी बायलमाणसां ज्यांत असतंत,
अशीं खंयचीशी मालिका सुरूं झालीं.
तेतुर्ले सगळें बाई-बाप्यें थोड्या थोड्या येळान्‌ म्हणंत:
'खानदान की शान' ची गोष्ट सांगू?
चेडवान्‌ शेण खाल्ल्यान्‌ - 'खानदान की शान'...
धंद्याचो दिवाळो निगलां - 'खानदान की शान'...
घरच्या सुनेन्‌ भायल्ल्या पुरुशाकडां बगून हात हलवल्यान्‌ -
खानदान की शान!

...
मालिकेच्या मदे मदेंय खूप गोष्टीं आयकाक गांवल्या:

प्रेमपात्र हो म्हणनां नाय -
नोकरी लवकर मिळनां नाय -
व्यायाम करुक झेपनां नाय -
सब के लिए अक्सीर इलाज...
'अमक्या टुथपेश्टाची गोष्ट सांगू?'

दिवे ओवाळून घेंउशे वाटतंत?
दुदांत बसून न्हाउंसा वाटतां?
चेडवाहून तरणो दिसूचो आसा?
'तमक्या साबणाची गोष्ट सांगू?'

...
मगे पाहीन थंयसर तांच आयकाक येई:

'सीमेर जवान मरण पांवलो' 'युद्धकैद्यांक पाकान्‌ सोडूक ना'
... संजय दत्ताची गोष्ट सांगूं?
'हंपीन्‌ पदक जिंकल्यान्‌' 'भारतात खेळांका प्रोत्साहन ना'
...च्यापेलाची गोष्ट सांगूं?
'शेतकऱ्याचो गळफास' 'ल्हान पोरान्‌ मोठो शास्त्रीय शोध लावल्यान्‌'
...अभिशेक-आय्शर्याची गोष्ट सांगूं?

आंमचीं "कापूसकोंड्याची गोष्ट" येक राष्ट्रीय धोरण बनलंली आसा, ह्या पायलां.
माका मोठो अभिमान वाटलो.
मियां शांतपणान्‌ झोपी गेलंय.

Saturday, December 09, 2006

नको राजस पाखरा सुरांसवे नादवू
खिडकीत घोटाळून नको मला सादवू

तुझी शीळ वेडीपिशी तिचा स्वर कापरा
माझ्या काळजाचं पाणी आणि डोळ्याला झरा!

प्राणतळातून हाक तुझी जाणवे मला
तिचे बेभान आव्हान जरी खुणवे मला

तरी परीकथेपरी आहे चेटूक - जंतर
माझ्या प्राणपाखराला मिळे मानवी शरीर!

समईच्या शुभ्र कळ्या!

उतरत्या मार्गशीर्षातली संध्याकाळ गाभण गायीच्या जड पावलांनी येते. चौखूर धावणं विसरलेली, काळ्याभोर चमकदार डोळ्यांमध्ये एक कष्टभरली झाक आल्यामुळे अजूनच पोक्त दिसणारी गाय. दावणसुद्धा बांधावी लागत नाही, इतकी निश्चल उभी. तिच्या गळ्याखाली खाजवून, पाठीवर हात फिरवून तिला भाकरतुकडा द्यावा असं वाटायला लावणारी. गळ्यातल्या घंटेचादिखील आवाज होत नाही, इतकी शांत. ही असली नकळत आलेली संध्याकाळ काळजाला चहूबाजूंनी कसलासा अदृश्य वेढा घालते. "मला भीती वाटत्येय गं, तू थांब ना माझ्यापाशी..." असं म्हणत असल्यासारखी. मनात हुरहूर आहे, बाहेर रातकिडे हलक्या आवाजात कुजबुजताहेत, शांतता अबोल सोबत करत्येय - अशात एकदम लहानपण आठवतं.

पितळेची लखलखीत समई. जवळ-जवळ माझ्याच उंचीची. संध्याकाळ अशी दाटत असताना बाहेर गप्पांना बसलेली माई लगबगीनं उठायची. शिवलीलामृत वाचता-वाचता वळलेल्या लांबलचक वाती समईच्या पाच पाकळ्यांत रचायची. मग तेलाच्या झारीतून एक सरळ धार बरोब्बर त्या समईच्या मध्यात पडायची. वाती सुरुवातीला थोड्या डगमगायच्या, पण एकदा तेलात भिजल्यावर आपल्या जागी गुपचूप बसून राहायच्या. एका काडीत सगळ्या उजळून जायच्या. एखादी छोट्या टोकाची वात त्याच काडीच्या मागच्या टोकानं पुढे ढकलली जायची. माईच्या चेहऱ्यावर तो तांबूस-पिवळा प्रकाश..तिच्या कानातली पांढऱ्या खड्यांची कुडी लखकन्‌ चमकायची. समईच्या ज्योतीतूनच उदबत्ती पेटवून "वनस्पतिरसो: धूपगंधाढ्यो: गंध‌उत्तम:। आग्रह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्‌" म्हणत ती देव्हाऱ्यापुढे हात जोडायची तेव्हा आतला लंगडा पितळी बाळकृष्ण खुदकन्‌ हसतोय की काय, ते मी हळूच पाहून घ्यायचे. सगळं लक्ष भरपूर साखर घातलेल्या चांदीच्या वाटीतल्या दुधाकडे ठेवून "शुभं करोति" पासून सुरुवात करून आमची गाडी "आदौ राम तपोवनादिगमनम्‌" पर्यंत एकदा पोचली, की हायसं वाटायचं. ही 'परवचा' संपवून खोलीतून बाहेर पडताना मात्र का कुणास ठाऊक, त्या समईकडे बघत बघत मी हमखास थोडा वेळ रेंगाळायचे. त्या उदबत्तीचा वास देव्हाऱ्याजवळ दरवळत असायचा... तो वास समईच्या प्रकाशाइतकाच मंद. आणि अंबाबाईच्या तसबिरीच्या काचेत त्या ज्योतींचं प्रतिबिंब.

बास! मला चंद्रशेखर गोखलेंच्या अनुभवावरून धडा न घेतल्याबद्दल हसू येतं:
'आठवणींच्या देशात मी
मनाला पाठवत नाही,
कारण जाताना ते खूश असतं
पण येताना त्याला येववत नाही!'

हं. उगाचच एक खोल वगैरे नि:श्वास. 'समईच्या शुभ्र कळ्या' ऐकलंच पाहिजे. आत्ताच्या आत्ता.

लांबवरून येणारे बासरीचे सूर. तेही त्या बासरीपासून दूर होण्याच्या जाणिवेनं हिरमुसलेले वाटतात. त्या उदास सुरांत एकजीव होऊन आशाचा मातीच्या वासात घोळलेला आवाज येतो...

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते...

आरती प्रभूंचा शब्दन्‌ शब्द हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांत बुडलेला. आणि त्यात तो केळीच्या खोडाच्या तंतूसारखा आवाज. मार्गशीर्षी संध्याकाळ, खोलीतला पुंजक्यात मावणारा अंधुक प्रकाश. मी डोळे मिटूनच घेते. समईच्या वाती दिसायला लागतात. त्या शुभ्र वातींमधून कळ्यांगत ज्योती उजळवायला ती वाकलेली, आणि -


केसातच फुललेली जाई पायाशी पडते


संध्याकाळी जाईच्या कळ्या तोडून गुंफल्या होत्या एकत्र. गजरा तसाच माळला केसांत. चंद्र वर वर येत चालला तशी जाईपण फुलत गेली. पण आज गाठी काही पक्क्या बसल्या नाहीत. ती ज्योतीभवतीचा वारा अडवायला हातांची ओंजळ धरू गेली. त्याच्यासाठी जऽरा खाली झुकली न झुकली तोच सैलसर वेणी पुढे आली खांद्यावरून, आणि त्या झटक्यानं गजऱ्यातून जाईची फुलं टपटपली खाली.

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले माझे माहेर बापुडे

आज हे असं काय होतंय? डोळा लवतोय सारखा. भुवई उगाच फडफडतेय. हा शकुन कसला? उगा हुरहूर जिवाला! माहेरची आठवण अशा वेळी होणार नाही तर कधी? तिचं माहेर ... अंतरानं मागे राहिलेलं माहेर. मनानं तिथंच राहिलेली ती. काळीज घट्ट करून लेकीला दूर पाठवणारं बापुडवाणं माहेर. तिला आईची खूप खूप आठवण येते. डोळे टच्‌कन भरून येतात.


साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची

पण हे काय? त्या डोळ्यातल्या पाण्याला झालंय तरी काय? बेटं वाहातच नाहीये, डोळ्यांतून खाली ओघळत नाहीये. पेंगुळल्यासारखं बसून राहिलंय डोळ्यातच. आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात चांदणी बनून चमकतंय.

एवढ्यात तिची सखी, शेजारीण असेल - जरा मोठी तिच्यापेक्षा - डोकावते तिच्या घरात. ही लगबगीनं डोळ्यातलं पाणी पुसायचा प्रयत्न करते. 'काहीतरी काम राहिलं करायचं' असा बहाणा करत उठते -

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

पण तिच्या मैत्रिणीला कळतं काहीतरी गडबड आहे ते! ती पोक्त्यापुरवत्या स्त्रीसारखा सल्ला देऊ जाते -

थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवूं शिवूं ऊन गं ये

अगं अशी उदास कशाला बसल्येयस? जा, जरा पाणी पुसून घे डोळ्यातलं. अशी सुटी फुलं नको माळू केसांत. नीट तयार हो बरं! ऊन दूर निघून चाललंय बघ... जरा तुझ्या पदराला धरून त्यातलं थोडं ऊन घरात घेऊन ये..घरदार हसू दे!


हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा


मैत्रीण आपल्याला मनातल्या मनात हसतेय, असं वाटतं तिला. चेहरा कष्टी करून ती म्हणते, "हसत्येस तर हस बाई मला... पण मला स्वत:ला काही हसणं सोसणार नाही आता. ती मघाची आसवं मनात खोल रुतली आहेत. त्यांना निपटून टाकून हसू कसं? आणि हसून तरी काय होणार आहे? तो चंद्र का दुप्पट तेजानं आपलं चांदणं सांडत माझ्याबरोबर हसू लागणार आहे?"

***
ग्रेसच्या, किंवा आरती प्रभूंच्या कवितांचा 'अर्थ' लावायला जाऊ नये, हे खरं - कारण त्यांच्या ओळी म्हणजे खरं तर एक अनुभूती असते. भाषेची, विचारांची, कधी फक्त शब्दांची. वाचणारा प्रत्येकजण एक -एक प्रतिमा बनवतो आपल्या मनात, आणि तोच त्या कवितेचा त्या व्यक्तीपुरता 'खरा' अर्थ असतो. इथे ही कविता गाणं होऊन आली. तिच्या सुरांनी अर्थछटेला जरा दिशा दिलीय, असं वाटता वाटता त्यातूनच एक 'गोष्ट' मला दिसली आणि आता मला हेच अर्थरूप 'खरं' वाटायला लागलं. मग ती जी अस्पष्टशी नायिका आहे गाण्याची, तिचं नक्की काय दु:ख आहे ते कळत नाही म्हणून मी अस्वस्थ! मग कवितेचे शब्द आपल्याला नीट कळलेयत तरी का, हे बघायला मराठीवर्ल्ड चा धावा केला, तर अजून अख्खी तीन कडवी जास्तीची सापडली!


गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगाऱ्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?


आता अजून नव्या धाग्यांचे ताणेबाणे विणले गेले त्या आधीच्या गोष्टीत. 'गाठीमध्ये..' हे कडवं '..विसराळू मुलखाची' नंतर येतं, आणि पुढची दोन कडवी '..शिवू शिवू ऊन गं ये' नंतर.

आत्ता कळलं! ही 'वेडी' नायिका पहिलटकरीण तर नसेल? तरीच गाण्याचा सूर असा हुरहुरीचा, तरीपण आतुर वाटणारा. तरीच तिला माहेरची आठवण येता येता थबकते. शेजारीण अनुभवी. तिला हिचं भोळं मन आणि त्यातल्या शंका-कुशंका कळतातच अगदी. देवाला नमस्कार करून लावून घेतलेल्या अंगाऱ्याची आठवण ती हिला करून देते. 'होईल गं सगळं व्यवस्थित' असा दिलासा देते. आणि अनिलांच्या 'आभाळ निळे नि ढग पांढरे..' या दशपदीत म्हटलंय :
"शेवंतीला कुणी उगीच सांगे, इतक्यात तुझी वेळ आली नाही
गवताचे सोने होण्याआधीच पिवळ्या फुलांची करू नको घाई"
त्या चालीवर म्हणते, 'वेडीच आहेस. केतकीचं पातं उघडून गाभा ठीक आहे की नाही ते बघायला जात्येस ती!
मग ही नायिका जरा मोकळेपणानं सांगते आपली अवस्था. "अगं फुलात पराग भरू येताना..भाळी कुंकू लावून घेताना, मन उगाच बावरतं. अंगभर श्रावणझिम्मड उडावी असं वाटतं... नाहीतर त्या बावरलेपणातच नहात रहावं असं वाटतं. डोळ्यात या बाहुल्या पाहते नं आरशात, तेव्हा त्या कधी एकदा हसत्या-खेळत्या पावलांना साथ द्यायला घरात येतील, असं वाट राहातं. मन अस्सं हळवं झालंय...हसणं सोसणारच नाही आता त्याला. खोल रुतलेली आसवंच त्या वेणा सहन करायला मदत करतील आता... डोळ्यातल्या बाहुल्यांच्या. काजळमाखल्या दोन बालचंद्रांच्या!"