समईच्या शुभ्र कळ्या!
पितळेची लखलखीत समई. जवळ-जवळ माझ्याच उंचीची. संध्याकाळ अशी दाटत असताना बाहेर गप्पांना बसलेली माई लगबगीनं उठायची. शिवलीलामृत वाचता-वाचता वळलेल्या लांबलचक वाती समईच्या पाच पाकळ्यांत रचायची. मग तेलाच्या झारीतून एक सरळ धार बरोब्बर त्या समईच्या मध्यात पडायची. वाती सुरुवातीला थोड्या डगमगायच्या, पण एकदा तेलात भिजल्यावर आपल्या जागी गुपचूप बसून राहायच्या. एका काडीत सगळ्या उजळून जायच्या. एखादी छोट्या टोकाची वात त्याच काडीच्या मागच्या टोकानं पुढे ढकलली जायची. माईच्या चेहऱ्यावर तो तांबूस-पिवळा प्रकाश..तिच्या कानातली पांढऱ्या खड्यांची कुडी लखकन् चमकायची. समईच्या ज्योतीतूनच उदबत्ती पेटवून "वनस्पतिरसो: धूपगंधाढ्यो: गंधउत्तम:। आग्रह्य सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्" म्हणत ती देव्हाऱ्यापुढे हात जोडायची तेव्हा आतला लंगडा पितळी बाळकृष्ण खुदकन् हसतोय की काय, ते मी हळूच पाहून घ्यायचे. सगळं लक्ष भरपूर साखर घातलेल्या चांदीच्या वाटीतल्या दुधाकडे ठेवून "शुभं करोति" पासून सुरुवात करून आमची गाडी "आदौ राम तपोवनादिगमनम्" पर्यंत एकदा पोचली, की हायसं वाटायचं. ही 'परवचा' संपवून खोलीतून बाहेर पडताना मात्र का कुणास ठाऊक, त्या समईकडे बघत बघत मी हमखास थोडा वेळ रेंगाळायचे. त्या उदबत्तीचा वास देव्हाऱ्याजवळ दरवळत असायचा... तो वास समईच्या प्रकाशाइतकाच मंद. आणि अंबाबाईच्या तसबिरीच्या काचेत त्या ज्योतींचं प्रतिबिंब.
बास! मला चंद्रशेखर गोखलेंच्या अनुभवावरून धडा न घेतल्याबद्दल हसू येतं:
'आठवणींच्या देशात मी
मनाला पाठवत नाही,
कारण जाताना ते खूश असतं
पण येताना त्याला येववत नाही!'
हं. उगाचच एक खोल वगैरे नि:श्वास. 'समईच्या शुभ्र कळ्या' ऐकलंच पाहिजे. आत्ताच्या आत्ता.
लांबवरून येणारे बासरीचे सूर. तेही त्या बासरीपासून दूर होण्याच्या जाणिवेनं हिरमुसलेले वाटतात. त्या उदास सुरांत एकजीव होऊन आशाचा मातीच्या वासात घोळलेला आवाज येतो...
समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते...
आरती प्रभूंचा शब्दन् शब्द हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांत बुडलेला. आणि त्यात तो केळीच्या खोडाच्या तंतूसारखा आवाज. मार्गशीर्षी संध्याकाळ, खोलीतला पुंजक्यात मावणारा अंधुक प्रकाश. मी डोळे मिटूनच घेते. समईच्या वाती दिसायला लागतात. त्या शुभ्र वातींमधून कळ्यांगत ज्योती उजळवायला ती वाकलेली, आणि -
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
संध्याकाळी जाईच्या कळ्या तोडून गुंफल्या होत्या एकत्र. गजरा तसाच माळला केसांत. चंद्र वर वर येत चालला तशी जाईपण फुलत गेली. पण आज गाठी काही पक्क्या बसल्या नाहीत. ती ज्योतीभवतीचा वारा अडवायला हातांची ओंजळ धरू गेली. त्याच्यासाठी जऽरा खाली झुकली न झुकली तोच सैलसर वेणी पुढे आली खांद्यावरून, आणि त्या झटक्यानं गजऱ्यातून जाईची फुलं टपटपली खाली.
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले माझे माहेर बापुडे
आज हे असं काय होतंय? डोळा लवतोय सारखा. भुवई उगाच फडफडतेय. हा शकुन कसला? उगा हुरहूर जिवाला! माहेरची आठवण अशा वेळी होणार नाही तर कधी? तिचं माहेर ... अंतरानं मागे राहिलेलं माहेर. मनानं तिथंच राहिलेली ती. काळीज घट्ट करून लेकीला दूर पाठवणारं बापुडवाणं माहेर. तिला आईची खूप खूप आठवण येते. डोळे टच्कन भरून येतात.
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
पण हे काय? त्या डोळ्यातल्या पाण्याला झालंय तरी काय? बेटं वाहातच नाहीये, डोळ्यांतून खाली ओघळत नाहीये. पेंगुळल्यासारखं बसून राहिलंय डोळ्यातच. आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात चांदणी बनून चमकतंय.
एवढ्यात तिची सखी, शेजारीण असेल - जरा मोठी तिच्यापेक्षा - डोकावते तिच्या घरात. ही लगबगीनं डोळ्यातलं पाणी पुसायचा प्रयत्न करते. 'काहीतरी काम राहिलं करायचं' असा बहाणा करत उठते -
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाचीपण तिच्या मैत्रिणीला कळतं काहीतरी गडबड आहे ते! ती पोक्त्यापुरवत्या स्त्रीसारखा सल्ला देऊ जाते -
थोडी फुले माळू नये, डोळां पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवूं शिवूं ऊन गं ये
अगं अशी उदास कशाला बसल्येयस? जा, जरा पाणी पुसून घे डोळ्यातलं. अशी सुटी फुलं नको माळू केसांत. नीट तयार हो बरं! ऊन दूर निघून चाललंय बघ... जरा तुझ्या पदराला धरून त्यातलं थोडं ऊन घरात घेऊन ये..घरदार हसू दे!
हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा
मैत्रीण आपल्याला मनातल्या मनात हसतेय, असं वाटतं तिला. चेहरा कष्टी करून ती म्हणते, "हसत्येस तर हस बाई मला... पण मला स्वत:ला काही हसणं सोसणार नाही आता. ती मघाची आसवं मनात खोल रुतली आहेत. त्यांना निपटून टाकून हसू कसं? आणि हसून तरी काय होणार आहे? तो चंद्र का दुप्पट तेजानं आपलं चांदणं सांडत माझ्याबरोबर हसू लागणार आहे?"
***
ग्रेसच्या, किंवा आरती प्रभूंच्या कवितांचा 'अर्थ' लावायला जाऊ नये, हे खरं - कारण त्यांच्या ओळी म्हणजे खरं तर एक अनुभूती असते. भाषेची, विचारांची, कधी फक्त शब्दांची. वाचणारा प्रत्येकजण एक -एक प्रतिमा बनवतो आपल्या मनात, आणि तोच त्या कवितेचा त्या व्यक्तीपुरता 'खरा' अर्थ असतो. इथे ही कविता गाणं होऊन आली. तिच्या सुरांनी अर्थछटेला जरा दिशा दिलीय, असं वाटता वाटता त्यातूनच एक 'गोष्ट' मला दिसली आणि आता मला हेच अर्थरूप 'खरं' वाटायला लागलं. मग ती जी अस्पष्टशी नायिका आहे गाण्याची, तिचं नक्की काय दु:ख आहे ते कळत नाही म्हणून मी अस्वस्थ! मग कवितेचे शब्द आपल्याला नीट कळलेयत तरी का, हे बघायला मराठीवर्ल्ड चा धावा केला, तर अजून अख्खी तीन कडवी जास्तीची सापडली!
गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगाऱ्याची बोटे
वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते
उगा बावरते मन भरू येताना केसर
अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर
डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे
असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?
आता अजून नव्या धाग्यांचे ताणेबाणे विणले गेले त्या आधीच्या गोष्टीत. 'गाठीमध्ये..' हे कडवं '..विसराळू मुलखाची' नंतर येतं, आणि पुढची दोन कडवी '..शिवू शिवू ऊन गं ये' नंतर.
आत्ता कळलं! ही 'वेडी' नायिका पहिलटकरीण तर नसेल? तरीच गाण्याचा सूर असा हुरहुरीचा, तरीपण आतुर वाटणारा. तरीच तिला माहेरची आठवण येता येता थबकते. शेजारीण अनुभवी. तिला हिचं भोळं मन आणि त्यातल्या शंका-कुशंका कळतातच अगदी. देवाला नमस्कार करून लावून घेतलेल्या अंगाऱ्याची आठवण ती हिला करून देते. 'होईल गं सगळं व्यवस्थित' असा दिलासा देते. आणि अनिलांच्या 'आभाळ निळे नि ढग पांढरे..' या दशपदीत म्हटलंय :
"शेवंतीला कुणी उगीच सांगे, इतक्यात तुझी वेळ आली नाही
गवताचे सोने होण्याआधीच पिवळ्या फुलांची करू नको घाई"
त्या चालीवर म्हणते, 'वेडीच आहेस. केतकीचं पातं उघडून गाभा ठीक आहे की नाही ते बघायला जात्येस ती!
मग ही नायिका जरा मोकळेपणानं सांगते आपली अवस्था. "अगं फुलात पराग भरू येताना..भाळी कुंकू लावून घेताना, मन उगाच बावरतं. अंगभर श्रावणझिम्मड उडावी असं वाटतं... नाहीतर त्या बावरलेपणातच नहात रहावं असं वाटतं. डोळ्यात या बाहुल्या पाहते नं आरशात, तेव्हा त्या कधी एकदा हसत्या-खेळत्या पावलांना साथ द्यायला घरात येतील, असं वाट राहातं. मन अस्सं हळवं झालंय...हसणं सोसणारच नाही आता त्याला. खोल रुतलेली आसवंच त्या वेणा सहन करायला मदत करतील आता... डोळ्यातल्या बाहुल्यांच्या. काजळमाखल्या दोन बालचंद्रांच्या!"
21 Comments:
ग्रेसच्या, किंवा आरती प्रभूंच्या कवितांचा 'अर्थ' लावायला जाऊ नये, हे खरं - कारण त्यांच्या ओळी म्हणजे खरं तर एक अनुभूती असते. -- khara aahe. By the way, tula chandrashekhar gokhale mhaNaayache asaave chandrakant gokhalenchya aivaji :)
:D right you are, nandan. corrected the mishTake.
पणती आणि तिचा उजेड. त्या प्रकाशात हुरहूरलेले दिसणारे मन. हाच प्रसंग मला नेहमी "हम दोनो" मध्ये एक आई कोनाड्यातली समई लावत हात जोडते तो मनात कोरल्यासारखा आठवतो. आईचा सुर्कुतलेला चेहरा, मंद उजळलेली वात, दगडी भिंतीवरून परतलेली एक छोटीशी तिरीप, आईची काळजी, तिची करूणा, कितीही हतबल करणार्या प्रसंगात अविचल, निश्चल राहणारी तिची श्रध्धा, सर्वं काही एका क्षणात लखलखून जातं.
गायत्री, एक सुंदर अनुभूती, तू तुझ्या लिखाणामुळे देऊन जातेस.
मस्त लिहीलय. "समईच्या शुभ्र कळ्या" ह्या तीन शब्दांनीच त्या कवितेच्या प्रेमात पडले होते.आता पू्र्ण कवितेचे रसग्रहण वाचून ती अधिकच आवडायला लागली....
वा! नेहेमीसारखंच सुरेख! तुझ्या नोंदी जरा अधिक वारंवारतेने (frequency ग ;) आल्या तर आणखी आवडेल :-)
सुंदर लेख.कवितेप्रमाणेच तरल रसग्रहण. अभिनंदन.
सुंदर! तू केलेली रसग्रहणे खरंच पुन:प्रत्ययापेक्षा खुप काही नवीन देउन जातात.
ग्रेस आणि आरती प्रभुंच्या ओळींबद्द्ल बोलायचं म्हणजे ते "सिर्फ अहसास है ये रुह से महसुस करो हात से छु के उसे रिश्तोंका इल्जाम न दो" असं वाटतं नाही? पण तुझे रसग्रहण "भ्रमर जैसे कमलिनीस" असे अलवार जमले आहे.
सुरेख!
Tu khoopach chan lihites. An excellent rasagrahan! Recommending you to read Shantabai's 'Athavanitalya kavita' - a book by Shantabai with 'rasagrahan' of different poems.
dhananjay
कवितेतली आर्तता लेखामध्ये पुरेपुर उतरली आहे.
सुरेख!!! आणखी काय म्हणू.... :)
shabdaanna sharaN kasa aaNava he tumachyaa kaDoon shikaava:-) aamachya samor te faar naaThaaL asataat. Tumachyaa samor kase haat joDoon nimooTpaNe ubhe aahet!!
OGhavatya shaileet far Chhan lihilay!
झकास!
hi! i had my school education in Marathi, n i remember a poem v had in 9th std. Marathi textbook, titled : "Pitaat Saare God HivaaLa". Is it one of Borkar's creation? Kindly send d whole poem or it's link if u can manage to find it.
I wud also like to say that i loved ur write ups on d blog.
Thank you.
hi! i had my scooling in marathi. i remember a poem in d 9'th std. text, titled : 'Pitaat Saare God HivaaLa'. is it one of Borkar's creations? kindly send me d complete poem if u (or anybody who happens to read this) hv it.
I wud also like to say that i really loved ur write ups on this blog.
Thank u.
my id: fangorn.treebeard@gmail.com
काटा आला वाचताना इतकी आर्तता उतरलीये तुझ्या लिखाणात ...
surekh.
Ekdam kaljaat jaun pohochal
mala ba.bha.borkaranchya kavita pahijet.
kuth bhettil
eg. nilya khadichya kaathala
maza hirvach gav
jagaat mi mirvito
tyache lavuniya naav
काय बोलू..?
शब्द नाहीत..!
तात्या.
"लांबवरून येणारे बासरीचे सूर. तेही त्या बासरीपासून दूर होण्याच्या जाणिवेनं हिरमुसलेले वाटतात. त्या उदास सुरांत एकजीव होऊन आशाचा मातीच्या वासात घोळलेला आवाज येतो..."
Amazing interpretation. kavitechya olinche artha tar bhari ahetach, pan ganyachya opening cha asa tula samajlela artha wachun thakka zalo. god bless you.
फारच सुंदर. शाळा सोडल्यानंतर कितीतरी दिवसांनी असे रसग्रहण वाचले.स्मरणरंजनात किती वेळ गेला ते कळलेच नाही.
Superb! Shabdach apure. U r really great. Saraswati bolate ahe tuzya lekhanitun!
नमस्कार गायत्री,
आपली ओळख नाही. पण एक महत्वाचे काम आहे. आपल्याशी संपर्क कसा साधता येईल?
मी अलका विभास- alka.vibhas@gmail.com (www.aathavanitli-gani.com)
Post a Comment
<< Home