Sunday, June 11, 2006

मनू

गोनीदांची मृण्मयी. .. आप्पांची मनू! 'शितू' आणि 'मनू' या गोनीदांच्या मानसकन्या त्यांनी काय भावनेनं घडवल्यायत ते कळायला 'मृण्मयी' कादंबरीची त्यांची प्रस्तावना वाचलीच पाहिजे. खरं तर 'उमलत्या कळीचे अंतरंग' त्यांना किती अलवारपणे समजून चुकले होते, ते पाहायला पडघवली, मृण्मयी, शितूच मुळातूनच वाचल्या पाहिजेत!

पुस्तकनिष्ठांच्या मांदियाळीसाठी लिहिताना मनू परत आठवली.. वयानं लहान असूनदेखील उमज मोठी असलेली, आई-बापानं दुधावरल्या सायीगत जपलेली संवेदनशील मनू 'देशावरून' सासरी कोकणात येते. घर मैलोगणती दूर..सासरी मायेच्या ओलाव्याचीच काय, सुबुद्ध मनाचीही वानवाच! काय वाटलं असेल मनूला?

सयींवर सयी बरसत येती जिवास नाही थारा
खारे पाणी डोळां आणी खारा सागर- वारा

हळदीच्या हळव्या हातावर हळकुंडाची बेडी
नथीची वेसण होते, पायी रुपते मासळीजोडी

नवखे पातळ सावरती कसनुसे मेंदीचे हात
मनात थरथर हलकी भरते केळफुलाची पात

नवे चेहरे समोर येती नवीच सांगत नाती
थट्टा, गोष्टी,बडबड-गप्पा भवती रंगत जाती

त्यांत असूनही नसलेली ती जरा आडोसा पाही
तेव्हा वरवर हसलेली ती आता उसासा होई

पाडस बनुनी सुसाट जाते मन मागे वेगाने
आईच्या अन कुशीत शिरुनी मुसमुसते हलक्याने

लिहिता लिहिता आठवतेय - घरीदारी आई, आजी, काक्यांनी सांगितलेल्या कथा. नवखेपणाचे अनुभव. त्यातला एक फारच गोड!
दाराआडुन हळूच बघती भोकरडोळे दोन
हातामधला खाऊ तसाच हातामधी ठेवून

हुंदक्यांतुनी अवचित शिरतो बकुळफुलांचा गंध
हळुच ओंजळित पडतो आणिक नाजुकसा मणिबंध

'वंयनी..अवळं घे ना' ऐकत हसते, पुसते डोळे
एक फूल लागते भराया घाव मनीचे ओले!


आप्पांच्या मनूला मिळायला हवं होतं ना असं एक फूल?

11 Comments:

अलवारचा अर्थ काय ? "हळुवार"पासून आला आहे का हा शब्द ?

- मिलिंद

इतिAnonymous Anonymous
Monday, June 12, 2006 11:14:00 PM  

नमस्ते मिलिंद. अलवार म्हणजे नाजुक / नाजुकपणा. बोलीभाषेतला शब्द असावा - कारण प्रमाणभाषेत फारसा वाचलेला नाही; कवितांमधून किंवा बायकांच्या बोलीत ऐकलेला आहे.
मला 'अलवार' ची व्युत्पत्ती माहिती नाही. (As in wheteher it generates or is generated from हळुवार.) परंतु अल्लाद, अलगद, अलवार,हळुवार एकाच जातकुळीतील असावेतसे वाटतात. ('अळुमाळुं' सुद्धा?)

इतिBlogger Gayatri
Tuesday, June 13, 2006 11:33:00 AM  

I think hyavar 9 the marathi cha pustakat dhada hota...naav athvat nahi... pan sandarbha sadharan athavtayt....

इतिBlogger Parag
Thursday, June 29, 2006 2:58:00 AM  

हो पराग, गोनीदांच्या 'मृण्मयी'तलाच उतारा होता आपल्याला नववीत धडा म्हणून. त्याचं नावही बहुतेक 'मनू'च असावं. मनू ९-१० वर्षांची असताना बैलगाडीतून तिला गाडगेबाबांच्या दर्शनाला घेऊन जातात..गाडीतला अभंग..बाबांनी 'ही पोट्टी दे माले..' असं मनूच्या वडिलांना सांगणं..खूप सुंदर प्रसंग निवडला होता धडा म्हणून. सहावीतल्या 'शितू' सारखाच.

इतिBlogger Gayatri
Friday, June 30, 2006 11:24:00 AM  

khup chhan!!!

इतिBlogger abhijit
Tuesday, July 11, 2006 9:23:00 PM  

गायत्री, नेहमीप्रमाणेच सुंदर लिहिलंयस. कविता तुझी स्वत:ची का? तुझे शब्द आणि भाषाप्रभुत्व अचाट आहे.

गोनीदांची अनेक पुस्तके आठवली...कादंबरीमय शिवकाल, विशेषत: दर्याभवानी...कोकणचे वर्णन आणि भाषा आठवली...मला अजूनही त्यातले कितीतरी शब्द कळलेले नाहीत.

असे लोक गेले आणि त्यांच्याबरोबर ते दिवसही! त्यांची पुस्तके वाचताना आता भरून येतं...त्या काळाशी काहीतरी नातं असल्यासारखं कायम जाणवतं...

असो विषयांतर झालं...

अमित

इतिAnonymous Anonymous
Wednesday, July 19, 2006 6:09:00 PM  

Hi, liked ur article on 'Manu'. Also liked another blog 'Shabdalubdha'. Keep on writing good articles.

Dhananjay

इतिAnonymous Anonymous
Saturday, August 05, 2006 1:37:00 AM  

धन्यवाद अमित, धनंजय.
अमित, गोनीदांबद्दल, त्या काळाबद्दल लिहिलंयस ते अगदी पटलं.

इतिBlogger Gayatri
Thursday, August 17, 2006 4:34:00 PM  

atishay sundar! kavita tuzi ahe? farach chhan.. aajkal 25/26 vya varshi lagn hovun sasari geleli mulagi hi maherachya aThavaNinni vyakuuL hott rahate, tar purvichya kaLi 14/15 vya varshi lugaDa neseun sasari vavarava lagatana tichi kashi sthiti hot asel? te ekaTepaN tuzya kavitet hubehub utaralaye!

इतिBlogger सर्किट
Friday, August 18, 2006 2:54:00 PM  

>> दाराआडुन हळूच बघती भोकरडोळे दोन
हातामधला खाऊ तसाच हातामधी ठेवून

व्व्वा!!! या पूर्ण लेखात मला सगळ्यात जास्ती भिडलेल्या ओळी! तू मर्ढेकरांची "पोरसवदा होतीस" वाचली आहेस का? किंवा जया भादुरीचा 'सुमन' म्हणून एक लघुपट आहे. त्यात जे सांगायचं आहे ते सगळं या दोन ओळींत व्यक्त झालंय. आणि हो, 'भोकरडोळे' ह्या शब्दाची याहून चांगली placement दुस-या कुठल्याही कवितेत नसेल. मस्तच, मझा आला!

इतिBlogger Sthiti Chitra
Friday, April 10, 2009 10:18:00 AM  

किती सुरेख कविता आहे.
कविता वाचून वाटले, कि माझ्या आईच्या "त्या" सुरुवातीच्या दिवसांत मी तिच्याबरोबर हवा होतो ( काल्पनिक मी, तिच्या सगळ्यात जवळचा, अगदी बाबाहून) म्हणजे तिच्या त्या हळव्या मनाचा आधार बनून राहिलो असतो. :).
आभारी आहे.

इतिBlogger Sharad
Monday, December 20, 2010 1:26:00 AM  

Post a Comment

<< Home