Friday, April 27, 2007

मूक या सखीस तुझ्या बोलवून जा
स्फुल्लिंग मशालीत एक पालवून जा

शब्द तुझे ताल तुझा सूरही तुझे
गाण्याला मान तरी डोलवून जा

जळणारे गाव तशी पेटती मने
शवागार स्वप्नांचे हालवून जा

पोरटीं भुकेजली - दूध मागती
पाण्यातुन पीठ आज कालवून जा

ही शेवटली हाक, सख्या एकदाच ये
आशेचा दीप तूच मालवून जा

अनुदिनी

कोणे एके काळी हेमंतकाकांनी 'दिनचर्यानिष्ठांच्या मांदियाळी' मध्ये खो दिला होता. आता कॉलेजच्या शेवटच्या सत्रात आपण दररोज कसे वागत आहोत ते खुलेआम लिहिताना सुरुवातीला "हे आकाशातल्या बापा, तू मला क्षमा कर कां की मी अजाण बालक आहे..." असा कबुलीजबाब हवा! कारण शेवटची षटकं राहिलेली असताना येणारा प्रत्येक चेंडू निराळ्या पद्धतीने खेळायचा आणि जास्तीत जास्त 'धावा'यला बघायचं, हे एकच उद्दिष्ट. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस नव्या उचापती घेऊन येतो, आणि आखीव-रेखीव दिनचर्येची वासलात लागते. (अर्थात कितीही आखली-रेखली तरी आमची सगळी वेळापत्रकं लहान बाळाच्या काजळासारखी लगेच फिसकटतातच पहिल्यापासून!)
आणि काकाजी देवासकरांच्या थाटात म्हणायचं झालं तर 'ज्या वयात चर्या पहायच्या त्या वयात चर्या पाळत कशाला बसायच्या?' :D त्यामुळे 'दिनचर्या वा दिनचेष्टा वा' या भावनेनं लिहूया म्हणते.

'सकाळ' या शब्दाची माझी लाडकी व्याख्या 'मी ५ तासांपेक्षा जास्त वेळ झोपून उठल्यानंतर आकाशात सूर्य असेल अशी कोणतीही वेळ ' अशी आहे. "जागे हैं देर तक हमें कुछ और सोने दो" हे या वेळेचं भावगीत, आणि " अजून पाच मिनिटं झोपूया" हे ब्रीदवाक्य. आज्ञाधारकपणाने डुलक्या घेत दर पाच मिनिटांनी खडबडून जागा होऊन आरवणारा भ्रमणध्वनी हा मुख्य शत्रू. 'न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:' हे सुभाषित पुटपुटणाऱ्या प्रभातकुक्कुटांनो, भल्या सकाळी रजईचं साडेचार किलोचं वजन अंगावरून हटवणं किती कष्टप्रद असतं याची तुम्हांला कल्पना नसावी.

तर ते एक असो. कितीही नाही म्हटलं तरी आठ वाजताच्या लेक्चरला जावं लागायचंच आठवड्यातून तीन दिवस. रात्री अजिबात न झोपता ते लेक्चर कर्णसंपुटात साठवून घेऊन, यथासांग न्याहारी करून मग अंथरुणात घुसण्याचा एक पर्याय आहेच. पण आपला म्हातारा खडूस नसेल तरच हा पर्याय निवडायचा. आपल्या final year project guide ला 'माझा म्हातारा' किंवा 'आमचा मास्तर' म्हणायचं हे मी पहिल्या वर्षात आमच्या दादालोकांकडून ऐकलं होतं - 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु' च्या जगातून नुकतंच बाहेर पाऊल ठेवल्यामुळे या अशा धडधडीत अनादराला 'शांतम्‌ पापम्‌' म्हणत नाकंही मुरडली होती!

आमचे मार्गदर्शक, प्रोफेसर सरकार - 'एकदम कूल प्रॉफ' असल्यामुळे कामाच्या वेळा बर्‍यापैकी लवचिक. जो-तो आपापल्या सोयीनुसार काम (किंवा त्याचा आभास) करणार. त्यातून आमची ल्याब म्हणजे बटाट्याच्या चाळीच्या जमान्यातली. अगदी कर्मठ Experimental Inorganic Chemistry चालते तिच्यात - त्यामुळे मुलामाणसांनी भरलेलं एखादं घर कितीही आवरलं तरी पसरलेलंच दिसावं तशी ही आमची प्रयोगशाळा तिच्यातल्या दोन हजार चारशे ब्याऐंशी बाटल्या, इतर काचसामान, मोठमोठ्ठी उपकरणं आणि चित्रविचित्र आवाज आणि वास यांनी गजबजून गेलेली असते. ज्या वेळी बांधली गेली त्या वेळी तिला डी.एस. कें.च्या टू बी.एच. के. फ्लॅटची ऐट असली असावी - फक्त परिमाणं जऽरा बदललेली. रसायनांची पाककृती सिद्ध करायची ती भल्यामोठ्या किचन मध्ये. सर बसतात ते पर्सनल ऑफिस - मीटिंग हॉल सारखं. आणि विद्यार्थी लोकांना डुलक्या काढायला दोन बेडरूम्स (वजा बेड्स अधिक खुर्च्या अधिक संगणकयंत्रे).

प्रयोगशाळेत काम करताना मर्फीचे नियम प्रत्ययाला न आलेली व्यक्ती विरळा! उदा. परीक्षानळी किंवा कुठलंही नाजूक काचसामान मन लावून न्हाऊ-माखू घालून स्वच्छ केल्यावरच फुटतं. दिवसभर काम करून श्रमपरिहारासाठी उगीच पाच मिनिटं पाय मोकळे करायला बाहेर गेल्यावरच मास्तरांना आपली तातडीनं गरज भासते. एरवी आंघोळ करता येईल इतक्या बाटल्याच्या बाटल्या भरून ठेवलेलं ऍसिटोन नेमकं आपल्याला हवं असतं तेव्हा शब्दश: उडत गेलेलं असतं.
आपल्याला वापरायचं असलेलं उपकरण -
१.त्याच वेळी दुसर्‍या कुणालातरी अतिमहत्त्वाच्या कामासाठी हवं असतं
२.बिघडलेलं असतं
३. चालू असतं, पण इतर कुणाला ते कसं वापरायचं त्याची माहिती नसते.
४. ज्याला माहिती असते तो २० दिवसांच्या सुट्टीवर गेलेला असतो.
५. त्या उपकरणाचं माहितीपत्रक हरवलेलं असतं.
६. गूगलेश्वरकृपेने माहितीपत्रक सापडतं, पण ते अत्यंत अ-वाचनीय आणि असंबद्ध असतं.
७. दोन दिवस आणि अर्धा मेंदू खर्च करून ते उपकरण सुरू केल्यावर ... त्यात केलेला प्रयोग सपशेल फसतो!

मग पुनश्च हरि ओम्‌ - शोधा कुठलीतरी दुसरी पद्धत. त्यातसुद्धा 'सेंट्रल फॅसिलिटीज्‌' म्हणून पृथक्करणासाठीची जी धुडं असतात मोठीमोठी, ती वापरायला मिळावीत म्हणून सिनेमाच्या प्रिमीयरला लागत नाहीत तितक्या मोठ्या रांगेत उभं रहा. तिथे ऐन थंडीत ए.सी.त कुडकुडा. तासभराच्या हठयोगानंतर महिन्याभरानंतरची कुठचीतरी 'तारीख' मिळवा. ती उपकरणं चालवणार्‍या लोकांनी केलेल्या बाष्कळ विनोदांवर हसा. (आणि मग हे सगळं नोकरी करणार्‍या दोस्तांना "आमचापण अनुदिनी अनुताप" थाटात सांगून त्यांच्या कडून सहानुभूती/खिजवणूक ('करा! अजून करा रीसर्च!')/तुच्छता ('ह्यॅ! सात गाद्यांखालचं पीस टोचणारी राजकन्या कुठली! अगं लायफातले खरे प्रॉब्लेम्स माहिती आहेत का बये?') यातलं काहीतरी वसूल करा. उभयपक्षी करमणूक! नाहीतरी स्वत:वर केलेले विनोद सगळ्यात चांगले म्हणे. 'Self-depreciating humour is the best humour. quoth Her Highness M'Lady Vasilisa the Fair and Wise.)

तर तेही असोच. दिवसाचा बर्‍यापैकी वेळ अशा नित्य-नैमित्तिक प्रयोगशीलतेमध्ये घालवल्यावर हॉस्टेलवर येऊन दंगा घालणे/ चिल लावणे ('भसड मचाना') हा मुख्य कार्यक्रम. यात लॅबपेक्षाही जास्त प्रयोगशीलता चालते. उदा. फालतू विनोदांची कोणती नीचतम पातळी मानवी मेंदू न तडकता सहन करू शकतो? तडकलेल्या मेंदूवर कोणत्या कँटीनची कोल्ड कॉफी हा सर्वोत्तम उपाय आहे? मेसच्या टेबलावर किती वेळ गप्पा मारत राहिलं की कर्मचारी भांड्यांचे आवाज करायला लागून 'आता टळा इथून' असे संकेत द्यायला लागतात? त्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर ते मौखिक रूप नक्की कधी धारण करतात? जाणं निषिद्ध असलेल्या जागांचे सुरक्षारक्षक नक्की कोणत्या वेळेला गाफील असतात? त्यांनी हटकलं तर कोणती सबब हमखास मदतीला येते? इन्स्टिट्यूटमधला सर्वोच्च बिंदू कोणता? रात्री अडीच वाजता प्राध्यापकांच्या घरांच्या गल्ल्यांतून टोळक्याने गाणी म्हणत जायची खाज आली तर आवाज किती डेसिबल ठेवावा? (इतरांच्या) परीक्षेच्या आधी खोलीत मित्रमंडळ जमवून किती मिनिटं हशा-टाळ्या-आरड्याओरड्याचा खोकाळा उठवला की आसपासचं पब्लिक ठणाणा करत येतं? 'धूम' किंवा तत्सम चित्रपटांची गाणी इतरांनी कर्णकटुत्वात सुरू केली की प्रत्युत्तरादाखल आपण कोणते गाणे लावावे? (सध्याचं हॉट फेव्हरिट: बाबा लगीन!) या आणि अशा अनंत गहन प्रश्नांची अचूक उत्तरं शोधायची म्हणजे केवढी ती चिकाटी हवी, केवढा तो शास्त्रीय दृष्टिकोन हवा, आणि केवढी ती वेळेची किंवा वेळापत्रकाबद्दलची बेपर्वाई हवी! तस्मात्‌, देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या सर्व खंद्या युवकांप्रमाणेच दिनचर्या-अनिष्ठ राहणे हा माझा महाविद्यालयसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवलाच आहे!