Friday, April 27, 2007

अनुदिनी

कोणे एके काळी हेमंतकाकांनी 'दिनचर्यानिष्ठांच्या मांदियाळी' मध्ये खो दिला होता. आता कॉलेजच्या शेवटच्या सत्रात आपण दररोज कसे वागत आहोत ते खुलेआम लिहिताना सुरुवातीला "हे आकाशातल्या बापा, तू मला क्षमा कर कां की मी अजाण बालक आहे..." असा कबुलीजबाब हवा! कारण शेवटची षटकं राहिलेली असताना येणारा प्रत्येक चेंडू निराळ्या पद्धतीने खेळायचा आणि जास्तीत जास्त 'धावा'यला बघायचं, हे एकच उद्दिष्ट. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस नव्या उचापती घेऊन येतो, आणि आखीव-रेखीव दिनचर्येची वासलात लागते. (अर्थात कितीही आखली-रेखली तरी आमची सगळी वेळापत्रकं लहान बाळाच्या काजळासारखी लगेच फिसकटतातच पहिल्यापासून!)
आणि काकाजी देवासकरांच्या थाटात म्हणायचं झालं तर 'ज्या वयात चर्या पहायच्या त्या वयात चर्या पाळत कशाला बसायच्या?' :D त्यामुळे 'दिनचर्या वा दिनचेष्टा वा' या भावनेनं लिहूया म्हणते.

'सकाळ' या शब्दाची माझी लाडकी व्याख्या 'मी ५ तासांपेक्षा जास्त वेळ झोपून उठल्यानंतर आकाशात सूर्य असेल अशी कोणतीही वेळ ' अशी आहे. "जागे हैं देर तक हमें कुछ और सोने दो" हे या वेळेचं भावगीत, आणि " अजून पाच मिनिटं झोपूया" हे ब्रीदवाक्य. आज्ञाधारकपणाने डुलक्या घेत दर पाच मिनिटांनी खडबडून जागा होऊन आरवणारा भ्रमणध्वनी हा मुख्य शत्रू. 'न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:' हे सुभाषित पुटपुटणाऱ्या प्रभातकुक्कुटांनो, भल्या सकाळी रजईचं साडेचार किलोचं वजन अंगावरून हटवणं किती कष्टप्रद असतं याची तुम्हांला कल्पना नसावी.

तर ते एक असो. कितीही नाही म्हटलं तरी आठ वाजताच्या लेक्चरला जावं लागायचंच आठवड्यातून तीन दिवस. रात्री अजिबात न झोपता ते लेक्चर कर्णसंपुटात साठवून घेऊन, यथासांग न्याहारी करून मग अंथरुणात घुसण्याचा एक पर्याय आहेच. पण आपला म्हातारा खडूस नसेल तरच हा पर्याय निवडायचा. आपल्या final year project guide ला 'माझा म्हातारा' किंवा 'आमचा मास्तर' म्हणायचं हे मी पहिल्या वर्षात आमच्या दादालोकांकडून ऐकलं होतं - 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु' च्या जगातून नुकतंच बाहेर पाऊल ठेवल्यामुळे या अशा धडधडीत अनादराला 'शांतम्‌ पापम्‌' म्हणत नाकंही मुरडली होती!

आमचे मार्गदर्शक, प्रोफेसर सरकार - 'एकदम कूल प्रॉफ' असल्यामुळे कामाच्या वेळा बर्‍यापैकी लवचिक. जो-तो आपापल्या सोयीनुसार काम (किंवा त्याचा आभास) करणार. त्यातून आमची ल्याब म्हणजे बटाट्याच्या चाळीच्या जमान्यातली. अगदी कर्मठ Experimental Inorganic Chemistry चालते तिच्यात - त्यामुळे मुलामाणसांनी भरलेलं एखादं घर कितीही आवरलं तरी पसरलेलंच दिसावं तशी ही आमची प्रयोगशाळा तिच्यातल्या दोन हजार चारशे ब्याऐंशी बाटल्या, इतर काचसामान, मोठमोठ्ठी उपकरणं आणि चित्रविचित्र आवाज आणि वास यांनी गजबजून गेलेली असते. ज्या वेळी बांधली गेली त्या वेळी तिला डी.एस. कें.च्या टू बी.एच. के. फ्लॅटची ऐट असली असावी - फक्त परिमाणं जऽरा बदललेली. रसायनांची पाककृती सिद्ध करायची ती भल्यामोठ्या किचन मध्ये. सर बसतात ते पर्सनल ऑफिस - मीटिंग हॉल सारखं. आणि विद्यार्थी लोकांना डुलक्या काढायला दोन बेडरूम्स (वजा बेड्स अधिक खुर्च्या अधिक संगणकयंत्रे).

प्रयोगशाळेत काम करताना मर्फीचे नियम प्रत्ययाला न आलेली व्यक्ती विरळा! उदा. परीक्षानळी किंवा कुठलंही नाजूक काचसामान मन लावून न्हाऊ-माखू घालून स्वच्छ केल्यावरच फुटतं. दिवसभर काम करून श्रमपरिहारासाठी उगीच पाच मिनिटं पाय मोकळे करायला बाहेर गेल्यावरच मास्तरांना आपली तातडीनं गरज भासते. एरवी आंघोळ करता येईल इतक्या बाटल्याच्या बाटल्या भरून ठेवलेलं ऍसिटोन नेमकं आपल्याला हवं असतं तेव्हा शब्दश: उडत गेलेलं असतं.
आपल्याला वापरायचं असलेलं उपकरण -
१.त्याच वेळी दुसर्‍या कुणालातरी अतिमहत्त्वाच्या कामासाठी हवं असतं
२.बिघडलेलं असतं
३. चालू असतं, पण इतर कुणाला ते कसं वापरायचं त्याची माहिती नसते.
४. ज्याला माहिती असते तो २० दिवसांच्या सुट्टीवर गेलेला असतो.
५. त्या उपकरणाचं माहितीपत्रक हरवलेलं असतं.
६. गूगलेश्वरकृपेने माहितीपत्रक सापडतं, पण ते अत्यंत अ-वाचनीय आणि असंबद्ध असतं.
७. दोन दिवस आणि अर्धा मेंदू खर्च करून ते उपकरण सुरू केल्यावर ... त्यात केलेला प्रयोग सपशेल फसतो!

मग पुनश्च हरि ओम्‌ - शोधा कुठलीतरी दुसरी पद्धत. त्यातसुद्धा 'सेंट्रल फॅसिलिटीज्‌' म्हणून पृथक्करणासाठीची जी धुडं असतात मोठीमोठी, ती वापरायला मिळावीत म्हणून सिनेमाच्या प्रिमीयरला लागत नाहीत तितक्या मोठ्या रांगेत उभं रहा. तिथे ऐन थंडीत ए.सी.त कुडकुडा. तासभराच्या हठयोगानंतर महिन्याभरानंतरची कुठचीतरी 'तारीख' मिळवा. ती उपकरणं चालवणार्‍या लोकांनी केलेल्या बाष्कळ विनोदांवर हसा. (आणि मग हे सगळं नोकरी करणार्‍या दोस्तांना "आमचापण अनुदिनी अनुताप" थाटात सांगून त्यांच्या कडून सहानुभूती/खिजवणूक ('करा! अजून करा रीसर्च!')/तुच्छता ('ह्यॅ! सात गाद्यांखालचं पीस टोचणारी राजकन्या कुठली! अगं लायफातले खरे प्रॉब्लेम्स माहिती आहेत का बये?') यातलं काहीतरी वसूल करा. उभयपक्षी करमणूक! नाहीतरी स्वत:वर केलेले विनोद सगळ्यात चांगले म्हणे. 'Self-depreciating humour is the best humour. quoth Her Highness M'Lady Vasilisa the Fair and Wise.)

तर तेही असोच. दिवसाचा बर्‍यापैकी वेळ अशा नित्य-नैमित्तिक प्रयोगशीलतेमध्ये घालवल्यावर हॉस्टेलवर येऊन दंगा घालणे/ चिल लावणे ('भसड मचाना') हा मुख्य कार्यक्रम. यात लॅबपेक्षाही जास्त प्रयोगशीलता चालते. उदा. फालतू विनोदांची कोणती नीचतम पातळी मानवी मेंदू न तडकता सहन करू शकतो? तडकलेल्या मेंदूवर कोणत्या कँटीनची कोल्ड कॉफी हा सर्वोत्तम उपाय आहे? मेसच्या टेबलावर किती वेळ गप्पा मारत राहिलं की कर्मचारी भांड्यांचे आवाज करायला लागून 'आता टळा इथून' असे संकेत द्यायला लागतात? त्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर ते मौखिक रूप नक्की कधी धारण करतात? जाणं निषिद्ध असलेल्या जागांचे सुरक्षारक्षक नक्की कोणत्या वेळेला गाफील असतात? त्यांनी हटकलं तर कोणती सबब हमखास मदतीला येते? इन्स्टिट्यूटमधला सर्वोच्च बिंदू कोणता? रात्री अडीच वाजता प्राध्यापकांच्या घरांच्या गल्ल्यांतून टोळक्याने गाणी म्हणत जायची खाज आली तर आवाज किती डेसिबल ठेवावा? (इतरांच्या) परीक्षेच्या आधी खोलीत मित्रमंडळ जमवून किती मिनिटं हशा-टाळ्या-आरड्याओरड्याचा खोकाळा उठवला की आसपासचं पब्लिक ठणाणा करत येतं? 'धूम' किंवा तत्सम चित्रपटांची गाणी इतरांनी कर्णकटुत्वात सुरू केली की प्रत्युत्तरादाखल आपण कोणते गाणे लावावे? (सध्याचं हॉट फेव्हरिट: बाबा लगीन!) या आणि अशा अनंत गहन प्रश्नांची अचूक उत्तरं शोधायची म्हणजे केवढी ती चिकाटी हवी, केवढा तो शास्त्रीय दृष्टिकोन हवा, आणि केवढी ती वेळेची किंवा वेळापत्रकाबद्दलची बेपर्वाई हवी! तस्मात्‌, देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या सर्व खंद्या युवकांप्रमाणेच दिनचर्या-अनिष्ठ राहणे हा माझा महाविद्यालयसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवलाच आहे!

16 Comments:

परफ्येक्ट!
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ल्याबमध्ये रिसर्च करणा-यांची दुःखं ज्यांची त्यांनाच ठावूक, नाही का?
नोंद वाचताना अगदी आपले अनुभव वाचतोय असं वाटत होतं.
'सोयीनुसार काम (किंवा त्याचा आभास)' सहीच.

इतिBlogger Vishal K
Friday, April 27, 2007 8:43:00 AM  

विशाल मी पहिली कॉमेन्ट टाकतेय म्हणूण उत्साहात होते तर अगदी लगेच टपकलास:))

अहा गायत्री.. मस्तं ताजंतवानं वाटतय तुझं पोस्ट वाचून. आणि प्रोजेक्ट गाईडला ’खडूस म्हातारा’ असं मी पण आता आज मनातल्या मनात उच्चारून पाहिलं. कसं ’सुख’ झालं मनाला:)).

इतिBlogger Tulip
Friday, April 27, 2007 8:45:00 AM  

excellent post! it brought back some absolutely fond memories of life on campus & hostel @ iim-bangalore. :)
"bhasad machaanaa" haa shabd kiti divsanni aikat aahe :))
a few things i enjoyed on campus -
1) play badminton after midnight
2) have sarkaari chai at 2am - night canteen closed at 2am on our campus, and the mess guys would keep hot tea with plastic cups o'side the mess - free for e'one.
3) freak out at the fortnightly parties in L-square
4) watch movies, friends, et al at any given hour of the day
5) either sleep endlessly or stay awake endlessly
and so many more.
btw, i keep referring to my boss @ work as "maastar". guess i should now change it to "khadus mhaataaraa" :D

~ketan

इतिBlogger Monsieur K
Friday, April 27, 2007 9:30:00 AM  

majeshir lihile ahe..
Chemistry baddal pan kahitari majeshir lihi na.

इतिBlogger अनु
Friday, April 27, 2007 2:13:00 PM  

अगदी अगदी! Electronic equipments चं documentation पण असलं बंडल असतं की विचारू नकोस! :( पान नं. ३२ वरची कुठलीतरी एक ओळ आणि पान नं. १४३ वरची दुसरी कुठलीतरी ओळ यांचा परस्पर संबंध जोडून कुठलीतरी उपयुक्त माहिती आपण त्यातून काढावी अशी अपेक्षा असते. आपण काम करत असताना विचित्र वागणारी system 'म्हाताऱ्या'समोर मात्र अगदी शहाण्यासारखी वागते! काही विचारू नकोस.... :(

इतिBlogger प्रिया
Saturday, April 28, 2007 2:39:00 AM  

गायत्री,
ऊशिरा लिहीलस पण फ़ार फ़ार समर्पक लिहीलस! असंच हव होतं. "इंतजार का फ़ल मीठा होता है." आता नंदन, ट्युलिप यांच्याकडून काय response येतोय त्याची उत्सुकता आहे (ट्युलिप, नंदन इ. वाचताय नं?). अख्खया सेमेस्टरचा ग्राफ़ डोळ्यांसमोरून सरकला.
आता मीच एक खडूस म्हातारा आहे माझ्या students साठी, पण मला आवडले हे संबोधन. आम्ही आमच्या guide ना बूढे बाबा म्हणायचो.
आता माझा problem आहे वेगळाच!
दुपारी मी जेवायला घरी येतो तेव्हा त्यानंतर झोप अनावर होते त्याबद्दल :
माणसाने एक तर जन्मं घेउ नये.
घेतला तर मोठं होवू नये.
मोठं झालम तर शिकू नये.
शिकलं तर नोकरी करू नये.
नोकरी केली तर दुपारी घरी येवू नये
दुपारी घरी आलं तर जेवू नये
आणि जेवलं तर झोपू नये
झोपलं दुपारी तर ऊठू नये
ऊठलं तर कामाला जाऊ नये
माणसाने कोणाला शिकवू नये

इतिBlogger hemant_surat
Saturday, April 28, 2007 9:51:00 AM  

Atishay zakkas.REsearch lab baddalche evadhe surekh warnan mazyasarkhya chemistry lab madhe PhD karnaryala nahi samaznar tar kunala samaznar? Mastar, Khadus mhatara amhi pan waparto. Ankhi ek-Budhau. Asech warchewar lihit ja.

इतिBlogger Unknown
Saturday, April 28, 2007 2:36:00 PM  

आवडून गेलंकी!:-)
आमची केमिश्ट्री बारावीतंच "चचली". फारा दिवसांनी ल्याब, म्हातारा वगैरे प्रात:स्मरणीय नामे वाचली, आणि आम्ही केलेल्या शिमग्याच्या आठवणी उचंबळून (शिंचा काय शब्द आहे!) आल्या! :-)

इतिAnonymous Anonymous
Monday, April 30, 2007 12:33:00 PM  

नॉस्टाल्जिक करणारा लेख. पीजेगिरीच्या आठवणी आल्या. देहांतशासनाच्या लायकीचे विनोद केल्यानंतरही एकही मेंदू मी तडकवलेला नाही :)

इतिBlogger Raj
Tuesday, May 01, 2007 9:42:00 PM  

झकास गं!!! प्रयोगशाळेत काम करताना मर्फीचे नियम प्रत्ययाला न आलेली व्यक्ती विरळा! हे तर अगदी खरं..

इतिBlogger abhijit
Monday, May 14, 2007 4:21:00 PM  

हे कोमट काळजाच्या आकाशातल्या बापा हीला माफ कर ...
हे हे मस्तच गं

इतिBlogger Meenakshi Hardikar
Friday, June 01, 2007 3:49:00 PM  

This comment has been removed by the author.

इतिBlogger Jay
Monday, June 25, 2007 2:14:00 PM  

तुझी लेखन शैली अप्रतीम आहे. असे अनुभव दुसय्रांकडुनही ऎकले आहेत, पण मराठीतुन वाचताना , एक वेगळीच मजा आली.

इतिBlogger Jay
Monday, June 25, 2007 2:25:00 PM  

zakkas...ushira vachtoy khup...paN labmadhe dupari basun kamacha aabhas nirmaN karatana ekdam refreshing watala...nice!!!

इतिBlogger a Sane man
Tuesday, July 31, 2007 11:47:00 PM  

dhamal! ha ha lo po.

इतिAnonymous Anonymous
Thursday, August 02, 2007 9:40:00 PM  

Shevatchya shatkaant ball kasahi yeto ani => welapatrakachi vaslat lagte : hi analogy uchcha ahe!
--
milind gadre

इतिAnonymous Anonymous
Thursday, September 13, 2007 10:06:00 PM  

Post a Comment

<< Home