Wednesday, January 31, 2007

कलापिनी

'उड जायेगा हंस अकेला'...कबीरांचं निर्गुणी भजन मिळालं - कुमारांच्या आवाजातलं, त्यांनीच चाल बांधलेलं!
लगेच मागच्या ऑगस्ट महिन्यातली ती SPIC-MACAYची मैफल आठवली कलापिनी कोमकलींची. 'कुमार गंधर्वांची मुलगी' - केवळ ही एकच गोष्ट 'प्रबळ आकर्षण, उत्सुकता इ. इ. ' निर्माण करायला पुरेशी होती. दप्तर-शिप्तरासकटच आम्ही संध्याकाळी ऑडिटोरियममध्ये हजर.
कलापिनी अगदी वेळेवर मंचावर आल्या. काळी चंद्रकळा नेसल्यात - तिला केशरी नक्षीकामाचा पदर. बसल्यावर आधी नीट सावरून घेतला तो..नक्षी छान सुबकपणे सामोरी यावी असा. साथीला एक तबला, एक पेटी. तानपुऱ्यावर एक शिष्या - बस. वाद्यं अगदी पाच मिनिटांत जुळून आली. तोवर कलापिनींनी मैफिलीची रूपरेषा सांगायला सुरुवात केली.
माळव्यातून आलेल्या. आवाजात तिथल्या मालपुव्यासारखी मिठ्ठास!
" मैं शुरुआत करूँगी पूरिया धनाश्री से.." लगेच एक पसंतीचं स्मितहास्य सभागृहाच्या सामुदायिक चेहऱ्यावरून तरळून गेलं.
"उसके बाद देस, और फिर चंद्रसखी." ( वाह! काय सुरेख नाव आहे ..मी पहिल्यांदाच ऐकत होते!)
त्या बोलतायत आणि मी त्यांचंच निरीक्षण करतेय. सुंदर गोलसर चेहरा. हीच तर चंद्रसखी! आणि साधं बोलताना अगदी शाळकरी मुलीचा निरागसपणा..
"भले ही यहां बारिश ना हो - जहां से मैं आयी हूं वहां तो लबालब बारिश हो रही है. मैं देस राग गाकर ही रहूंगी." आणि रागदारी सादर करताना गायक क्वचितच करतात अशी गोष्ट..चीजेतल्या शब्दांचे अर्थ सांगणं! 'बरसो रे मेघा बोले मोरा, मन बोले मोरा..' मध्ये कसा अर्थश्लेष आहे ते सांगणं.
" और अंत में मैं मेरे पिताजी ने गायी हुई कबीरजी की एक निर्गुणी रचना प्रस्तुत करना चाहूँगी."
आहाहा! दोस्तांनी रसभरीत वर्णन करून सांगितलेला एखादा खास पदार्थ ्खायला 'टपरी'वर गेल्यावर त्याच्या घासा-तोंडाशी गाठ पडेपर्यंत येते तसली अधीरता आली मला. लक्ष विचलित करायला मी पुढच्या रांगेतल्या एका गौरवर्णीय-सुवर्णकेश्या अतिथीकडे जऽरा निरखून बघायला सुरुवात करणार - एवढ्यात सभागृह एकदम शांत झालं.

तानपुऱ्याच्या सुरांच्या पार्श्वभूमीवर तो विलक्षण ताकदीचा, पण तितकाच गोड आलाप वर उसळला...

सूर म्हणजे मांजरीचे बछडे असावेत त्यांच्यासाठी. मनीमाऊच्या गुबगुबीत छोट्या पिल्लांशी खेळावं तसं त्या सुरांशी खेळत होत्या. हलकेच वर फेकत, झेलत, कुरवाळत, कधी हळूच कान पिरगाळत.
हातांच्या मुद्रा तरी किती. दोन हात एकदम आळवणी केल्यासारखे पुढे. कधी डाव्या हाताच्या अंगठा, अनामिका आणि करंगळीचा 'ओ' आकार करून उरलेली दोन बोटं सुरांबरोबर लवतात.
खरं तर मैफिलीत गाणं ऐकताना माझे डोळे आपसूक मिटले जातात - सूर आणखी चांगले अनुभवता यावेत म्हणून. पण त्या दिवशी कोण जाणे, तो दृक-श्राव्य अनुभव घ्यावासा वाटत होता.
एकदा डाव्या हाताची समशेर आली सरळ माझ्या दिशेनं. सुरांची एक धारदार तलवार ('सुरी दुधारी'?) काळजात घुसली. जिथे वर्मावर बसली तिथून वर मस्तकापर्यंत एक शिरशिरी झिणझिणत गेली! म्हणजे हळूहळू विष भिनावं तसे सूर अंगात भिनत गेले, समकेंद्री वर्तुळांसारख्या लहरी उठवत. मग छंदच लागला मला - येणारा सूर कधी हाताच्या बोटावर, कधी नाभीपाशी, कधी भुवयांच्या मधोमध केंद्रित करून 'ऐकायचा'. तिथून निघणारी सळसळ हळूहळू कानापर्यंत, वर डोक्यापर्यंत जाताना अनुभवायची. हे काहीतरी विलक्षण आहे, हे कळत होतं. याच गायिकेपुरतं मर्यादित नाहीये, हेही कळत होतं - पण इथेच पहिल्यांदा घडतंय, ही जाणीवही होतीच. कुठल्यातरी योगायोगानं कलापिनीची कला मला गाणं भोगायला शिकवत होती!
ज्ञानेश्वरांनी म्हटलंय तसं
"सहजे शब्दुं तरी विषो श्रवणाचा, परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल॥ ...
ऐसीं इन्द्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेचि बुझावी। जैसा एकला जग चेववी । सहस्रकरुं ॥ "
म्हणजे काय, ते थोडं थोडं कळतंय असं वाटत होतं.

मला पूर्वी कधीतरी लिहिलेल्या ओळी आठवल्या..तेव्हा नुसत्याच कल्पनेतून लिहिल्या होत्या. त्या मैफिलीत अनुभवल्या प्रत्यक्ष, प्रति-कर्ण, प्रत्यांगांनी!

"
तानपुऱ्यावर हलके हलके स्पर्शलहर उमटते
रोमांचित सुख त्याचे कंपित स्वर बनुनी प्रकटते

तडतड तांडव तबल्यावरती मत्तपणे घडवीत
घनगंभीरशा पोकळीतुनी नादब्रह्म अवतरते

वीणेच्या अलकातुन अत्तर सुरांसवे पाझरते
हळवी शिशिर हवा भवताली शहारुनी थरथरते

अंगुलिवर्तुळ हवेमध्ये लयदार फिरत झोकात
सर्पिल तान कधी सळसळुनी गोलांटीमधि शिरते

वैखरीतुनी भास परेचा, की पश्यति सापडते?
अलौकिकाचे लौकिक दर्शन असेच अवचित होते!

"

18 Comments:

badibi, abhi kuch hafto pahale idhar puna me 'Sawai Gandharv' ki ek rat Koushiki Chakraborty ka gayan tha, ditto waisa hi laga.
apan ko gana,rag, ragini ke bare mai O ka Tho nahi kalata lekin us rat ko kuch to aaisich hua tha.

mane tum bole waisa sur ko apan alag alag style se nahi sun saka ,utana kubbat nahi hai apuna lekin kuch to pakka hua tha, yad aa gaya...:)

इतिAnonymous Anonymous
Wednesday, January 31, 2007 4:50:00 PM  

नेहमीप्रमाणेच छान :)

इतिAnonymous Anonymous
Wednesday, January 31, 2007 9:40:00 PM  

अप्रतिम गायत्री!!!
तुझी शब्दकळा अवर्णनीय आहे!!

इतिBlogger Tulip
Thursday, February 01, 2007 12:05:00 AM  

गायत्री,

कानपूरला एल-७ मध्ये अनेक वर्षांपूर्वी ऐकलेल्या स्पिकमॅकेच्या अनेक मैफिली आठवल्या. मध्यंतरात टपरीवर पळत जाऊन गाजर का हलवा खायचा एक प्रघात आम्ही खादाडखाऊ लोकांनी पाडला होता. तो अद्याप आहे का?

- मिलिंद

इतिBlogger MilindB
Thursday, February 01, 2007 2:52:00 AM  

"येणारा सूर कधी हाताच्या बोटावर, कधी नाभीपाशी, कधी भुवयांच्या मधोमध केंद्रित करून 'ऐकायचा'. तिथून निघणारी सळसळ हळूहळू कानापर्यंत, वर डोक्यापर्यंत जाताना अनुभवायची"

jabari!

इतिBlogger Sumedha
Thursday, February 01, 2007 5:15:00 AM  

उत्तम लेख - वाचें बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वीं परतत्त्वस्पर्शु, जैसा.

इतिBlogger Nandan
Thursday, February 01, 2007 12:39:00 PM  

सुरेख!

इतिBlogger Manjiri
Thursday, February 01, 2007 3:49:00 PM  

Good as expected and as usual...... Kumaranche Gaane recording madhunhi asach anubhav dete.....

Dhananjay

इतिAnonymous Anonymous
Thursday, February 01, 2007 9:23:00 PM  

chaan lekh.....shastriya sangeet mhanage brain massage aahe asa mala nehami vatta. Yenarya lahari halake halake apalyalach halaka karun sodatat ani kapasane varyavar udava tasa apan swaranvar udu lagato.....sundar..

इतिBlogger U2ISolutions
Friday, February 02, 2007 7:52:00 AM  

:) वाह ! सुंदर ! ज्ञानेश्वरांनी लिहिलंय -
तेणे कारणे मी बोलीन । बोली अरूपाचे रूप दावीन ।
अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियाकरवीं ।
हे गायक लोक अशीच अतींद्रिय अनुभूती आपल्याला श्रवणेंद्रियांनी देतात :) असा अनुभव भरभरून घेता येणं ही श्रीमंती आहे. अभिनंदन !

इतिBlogger Mandar Gadre
Wednesday, February 07, 2007 11:52:00 PM  

तडतड तांडव तबल्यावरती मत्तपणे घडवीत
घनगंभीरशा पोकळीतुनी नादब्रह्म अवतरते

u tta m !

इतिAnonymous Anonymous
Saturday, February 10, 2007 7:39:00 PM  

EXCELLENT WRITE UP ABOUT KALAPINI KOMKALI. I WISHED I COULD WRITE SO WELL.

HAVE YOU HEARD MUKUL SHIVPUTRA, SHAPIT GHANDHRVA ?

RAAGA PURIYA DHANASHREE - KUMARJI

BALGAYI JOTA SAANZ BHAIL
NAHI AAYAL BALAK DHARU KAISAN DHEER
MAN GHABARAYO RI ||
ARU SABKE GHAR AAYAL HO AAPNO
HAMRA NAHI AAYAL, AAB DEKHAN KO
MAN UBHARAYORI ||

KAAHA CHALA HO RE, MUKH PHERILO PIYA
RE AAB NA JAVO, RUTH KAR MUM SUN ||
KHACHU NA KAHI MAITO, JANU NA JANU RE
SAPNE ME KAHI HO, TO RUTH KAR HUM SAN ||

इतिBlogger HAREKRISHNAJI
Wednesday, February 14, 2007 6:57:00 PM  

त्या वेळी मला लक्षात नाही आलं, पण चंद्रसखी हे खरंच फार गोड नाव आहे.

त्या वेळच्या त्यांच्या एखाद्या जागेला, तानेला माझ्याकडून जशी दाद गेली असेल, अगदी तश्शीच दाद तू केलेली वर्णनं वाचून गेली.
वाह! क्या बात है!

इतिBlogger Shashank Kanade
Sunday, February 18, 2007 11:30:00 PM  

आणी मी समजत होतो की मला मराठी येतं. :)
शब्दांचे टपोरे मोती उधळून तु मोकळी झालीस आणी ते वेचताना मात्र आमची दमछाक होते आहे.

त्या गाण्याईतकाच लेखही रंगला आहे.

इतिBlogger Rahul Deshmukh
Tuesday, February 20, 2007 9:16:00 PM  

गायत्री,

ह्या सुंदर लेखासारखाच नवीन लेख केव्हा प्रकाशित करणार? :)

इतिAnonymous Anonymous
Friday, February 23, 2007 2:33:00 PM  

hi
Tujhe lekh mi niyamit vachat aste. ha lekh matra atishay avadla

ashich lihit raha

इतिAnonymous Anonymous
Thursday, March 01, 2007 12:50:00 PM  

केवळ सुंदर. बसल्या बसल्या एका अपूर्व मैफिलीचा आनंद मिळाला. मूळ अनुभवाची सर येणार नाहीच त्याला, पण कल्पना तरी करू शकलो! पुलंनी केलेलं माशांचं वर्णन ऐकलं तेव्हा वाटलं की मासे खायलाच पाहिजेत :) तुम्ही ती मैफिल अशी काही समोर उभी केलीत की वाटलं खरंच, गाणं शिकलं नाही तर एक खजिना उपभोगण्यापासून वंचित राहायला होईल... प्रत्येकाला गाणं गाणं (फक्त गाणंच कशाला, ऐकणंही!) जमेलच असं नाही पण तुम्ही तो अनुभव अनेकांपर्यंत अप्रत्यक्षपणे पोचवलात. धन्यवाद!

इतिBlogger रोहित
Wednesday, March 28, 2007 5:27:00 PM  

चंद्रसखी ही मीराप्रमाणेच रचना ककरीत असे. माझा बॉगवर सविस्त्रर लिहीले आहे.

इतिBlogger HAREKRISHNAJI
Sunday, June 15, 2008 11:40:00 AM  

Post a Comment

<< Home