तुझे नि माझे नाटक. तुटक..माटक.
दिग्दर्शका..दिग्या, ही ओळ वाचायला लागल्याक्षणापासून हा खेळ तुझा झाला.
तुला 'तो' दिगू किंवा 'ती' दिगू , कसंही संबोधलं जात असू दे, मी तुला 'अरे'च म्हणणार आहे आणि त्यावर फुरंगटून बसलेल्या मुली, मी तुझ्यापेक्षा काकणभर जास्त डोळसपणानं समानतावादी असेन हे लक्षात ठेव. मी स्वत: एक अगं असताना समोरची व्यक्ती अरे असेल तर क्रियापदांमध्ये एक समतोल राखला जातो. होय, मी असंच तर्कहीन आणि वितळलेल्या डांबरासारख अघळपघळ लिहिणार आहे. पटत नसेल तर वाचू नको, ज्जा!
हां, तर दिगुल्या, हा खेळ - म्हणजे हे नाटक - तुझं आहे आता. खरं तर तुमचं..तुमच्या सगळ्या गटाचं आहे, पण अजून तुझ्याकडे ना नट आहेत, ना रंगभूषाकार, ना नेपथ्यकार, ना प्रकाशसंयोजक, ना ध्वनियोजक, ना संगीतकार, ना वादक. आपण एक काम करू. नटांसकट या बाकीच्या सगळ्या इष्टदेवतांना जरा वेळानंतर बोलावू. आणि खरं सांगायचं तर त्यांच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे मध्ये मध्ये. त्यामुळे आधी तू एकट्यानंच ऐक सगळं.
मी नाटक तुला देऊन टाकतेय- ते तूच लिहिलं आहेस किंवा नाक्यावर भेळ खात तुझ्याशीच बोलत असताना तू मांडलेल्या कल्पनेवरून मला ते सुचलं आहे (म्हणजे तुझी तयार, एखाद्या किड्यासारखी कुरकुरीत कल्पना मी सरळ सरळ ढापली आहे) असं तू चारचौघांत बेलाशक सांगू शकतोस. का? हे बघ, मी आत्तापर्यंत फार नाटकांची पुस्तकं 'वाचली' नाही आहेत. जी वाचली आहेत, त्यांपैकी कुठल्याही पुस्तकात नाटककाराने दिग्दर्शकाशी बोलत बोलत अशी पहिली काही पानं खाल्ली नाहीयेत. म्हणजे मला सुचलेली ही कल्पना माझ्यापुरती तरी नवीन आहे. पण ती ्मला पहिल्यांदा सुचली असं मी छातीठोकपणे म्हणू शकत नाही, कारण भास-कालिदासाच्या जमान्याचा कुणी अभ्यासक 'हे पहा, 'भट्टि-दिग्दर्शक संवाद:' ' असं सांगत मला 'हे आधीच कुणीतरी म्हटलंय' असं म्हणेल, कदाचित कल्पनाचौर्याचा आरोपही करेल. आं आं - लगेच अस्तन्या सावरत भांडायला तयार होऊ नकोस. मला बरंच काही लिहायचं आहे या विषयावर. माझं लिहिणं पूर्ण वाच आणि मग तुझे आक्षेप सांगायला घे. (किंवा न घेईनास आणि याच क्षणाला 'मूर्ख बाई!' म्हणत फेकून देईनास हे पुस्तक..आपलं, मिटवून टाकीनास ही खिडकी! मी आपला एक समंजस सल्ला दिला. उगाच तुझ्यावर आततायीपणाचा शिक्का बसायला नको म्हणून.)
असा आरोप कुणी केलाच, तर भट्टीचं ते पुस्तक मी वाचलेलं नाही, हे पटवून देण्यासाठी माझ्याकडे कोणताही सोपा पुरावा नसेल. 'ढिकाण्या शहरात जर्दाळूचे एक झाड आहे" या विधानाचा पुरावा मिळवायला ते एक झाड कुठे आहे हे माहिती असलं म्हणजे झालं. पण 'त्याच ढिकाण्या शहरात काडेचिराइताचे एकही झाड नाही' या विधानाच्या पुष्ट्यर्थ सार्या शहराचं उपग्रह-सर्वेक्षण करावं लागेल बहुधा! तात्पर्य काय, तर 'नकारात्मक पुरावा गोळा करणे महाकर्मकठीण असते'. (तू वाक्यं टिपून ठेवणार्या जमातीतला असलास, तर तातडीने कुठेतरी टीप हे वाक्य. मला पुस्तकात पेनाने अधोरेखांकन (अंडरलायनिंग) केलेलं आवडत नाही. पेन्सिलीने चालतं, हायलाइटिंग सुद्धा चालतं. पण महत्त्वाचं म्हणजे 'खोपडी में रखो, चोपडी में नहीं.')
एक गोष्ट मात्र पक्की - कल्पनाचौर्य आणी लेखनचौर्य यांतला फरक मला पामरा(री)ला कळतो.म्हणजे ही कल्पना आधी कुणी मांडली आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी हे जे काही एकापुढे एक शब्द गाळत माझं लिहिणं चाललंय ना, ते सगळं अस्संच्या अस्सं कुठल्यातरी व्यक्तीनं आधी लिहिलेलं नसणार. (ती गोष्ट घडण्याची अंदाजे शक्यता, एक भागिले मराठीतील एकूण शब्दसंख्येचा या लिखाणातील एकूण शब्दसंख्यावा घात इतकी नगण्य आहे म्हणून म्हणते हं!)
बरं, कुणी हे लिखाण असंच्या असं ढापून (हे असलं यडंबिद्रं ढापायला वेड लागलंय की काय कुणाला? पण आपण अशी सुखद कल्पना करू की हे लिखाण कुणाला ढापण्याइतपत बरं वाटलं.) ते स्वत:चंच असल्याची बतावणी केली, तर हे लिखाण इथे प्रसिद्ध करण्यापूर्वीच सावध सज्जनगिरीचे दोन उपाय मी योजून ठेवले आहेत. एक: याची एक प्रत्त कागदावर उतरवून, तारखेनिशी लिफाफ्यात सीलबंद करून माझ्या बँकेच्या लॉकरमध्ये जमा करून टाकली आहे. तेथील कर्मचारी अतिशय नि:पक्षपातीपणे आवक-जावकेच्या दिवसांची आणि वेळेची नोंद करत असल्यामुळे आजच्या तारखेचा हा एक सज्जड पुरावा झाला. दोन: याची दुसरी प्रत कागदावर उतरवून, लिफाफ्यात भरून, सोबत 'तू मरेपर्यंत सांभाळून ठेवणे आणि मृत्युपत्रात हे सांभाळल्याशिवाय वारसाला तुझी मालमत्ता मिळणार नाही अशी अट घालणे' अशी चिठ्ठी लिहून माझ्या विश्वासू (म्हणजे मराठी साहित्याचा गंध नसलेल्या) व्यक्तीला पत्राने पाठवून दिली आहे. पोस्ट ऑफिसात मारलेले तारखेचे शिक्के आजकाल वाचता येतात याची खात्री करून घेतली आहे.
आंतरजालावर तारखेचे घोटाळे फार सहज करता येतात! थोऽडीशी तांत्रिक माहिती असेल तर ते तितक्याच सहज पकडताही येतात..पण आम्ही पडलो सावध सज्जन, तेव्हा..हंऽऽऽ.
अरे दिगडू, माझ्या निर्मळ लिखाणाला उपहासाचा खवट वास येतोय असं म्हणतोस? राहिलं. चल जरा सुमडीत चल. कुणालाही त्याच्या/तिच्या (हे बघ! लिहिलंच पॉलिटिकली करेक्ट. उगाच हाकललं त्या अगं ला मगाशी.) लिखाणाचं श्रेय दिलेलं दिसलं नाही की माझा फार संताप होतो. माहितीये, तुम्हांला 'अशीच कुठेतरी' मिळाली ती कविता. किमान 'संकलित' असं लिहा की, ती इतरांना धाडताना. पण कधी असं काही करायचं असतं याबद्दलच्या अज्ञानामुळे, कधी आळसामुळे तर ्फार क्वचित खरोखरच ते आपलंच लिखाण आहे असं भासवायला हे करणं टाळलं जातं. अशी गोष्ट कुणाच्याही लिखाणाच्या बाबतीत घडतेय हे लक्षात आल्यावर मी सगळा 'मला काय त्याचं' पणा गुंडाळून ठेवून त्या त्या लोकांकडे 'विनम्रता के साथ' माझं म्हणणं मांडलं आहेच. पण तुला सांगू, मुद्दा फार फार मोठा होत जातो याच्यानंतर. विशेषत: लिखाण (कोणतीही कलाकृती रे) आणि पैसा एकत्र गुंतले की. ती विमल लिमयेंची 'घर असावे घरासारखे' कविता. किती भिंतींवर किती रूपांत पाहिली आहेस? तुला वाटतं प्रत्येक उद्योजकानेे त्यांना रॉयल्टी पोचवलीय असं? 'आहे मनोहर तरी' कोळून प्यायला असशील तू. त्यातल्या प्रताधिकाराच्या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया तुझी? मला तर ते सगळं प्रकरण वाचूनच पहिल्यांदा लेखकाची परवानगी, हक्क, प्रताधिकार हे सगळं किती गांभीर्याने घेतलं पाहिजे ते कळलं. आता पुढे ऐक. ते सारं माहिती असूनही, कॉलेजात असताना आम्ही पुलंच्या एकांकिका / नाटकं केली आहेत. दत्तानींची नाटकं केली आहेत. एड मंकचं नाटक तर अर्धवटच - जेवढं नेटवर फुकटात मिळालं तेवढं केलं आहे. तिकिटं न लावता वगैरे केलं , हे 'समर्थन' म्हणून मलाही दुबळं वाटतं - कारण कोणत्याही स्वरूपात नाटक करायला लेखकाची/ त्याच्या उत्तराधिकार्य़ांची पूर्वपरवानगी लागते. (ती घेण्याची गरज नाही असं स्पष्टपणे लिहिलं असेल, तर ठीकेय. या बाबतीत आम्ही केलेल्या एकाच नाटकाबद्दल मी समाधानी आहे : काज हिमेलस्ट्रपचं क्लाट्टा.) त्या त्या वेळी मूळ लेखकाचं नाव मोठ्ठ्याने जाहीर केलं होतं, म्हणजे छोट्या पातळीवरचं वाङ्मयचौर्य आम्ही केलं नाही, हे कबूल. पण ह्या मोठ्या मुद्द्याचं काय? आम्हांला नाटकं करायची भयानक खाज होती, परवानगी घेईपर्यंत वेळ नव्हता आणि रॉयल्टी द्यायला पैसे नव्हते(!) हे एवढंच म्हणून मी मनाला शांत बसवलं. मी स्वत:च तो लेखक आहे अशी कल्पना करून , मलाच 'आम्ही तुमचं नाटक हौसेपोटी करणार आहोत' असं सांगत परत स्वत:लाच ' अरे करा, करा नं बच्चेलोग. ते नाटक धूळ खात पडण्यासाठी नाही जन्मलेलं. रंगमंचावर उतरलं पाहिजे, टाळ्यांनी दणदणलं पाहिजे थेटर त्याच्यावर.' असं उत्तरही दिलं आणि जोवर आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही कलाकृतीचा उपयोग मी करत नाही आहे, तोवर 'सब चलता है' असं निर्लज्ज समाधान ्करून घेतलं स्वत:चं.
संपलं बोलून. डोळे पूस.
पण मी हे असले अपराध केलेत म्हणून 'माझ्या नाटकाला तुझं म्हण' अशी मुभा तुला देतेय, असं नाही. हे नाटक खरोखरीच तुझं आहे कारण मी तुला खूप स्वातंत्र्य देणारेय नाटकात. अरे हो दिगडच्या, ते दिलं नाही तरी तू घेणारच हे मला माहिती आहे. पण तरी आपलं सांगितलं. शिवाय एक कळीचा मुद्दा तुझ्या ध्यानात आलेला दिसत नाही. हे जे 'ही माझी कारागिरी' म्हणणं असतं ना, ती दुधारी तलवार आहे. एकदा काही केलंस आणि लोकांच्या पसंतीला पडलं म्हणजे त्याच तोडीच्या कलाकृतीची अपेक्षा होणार तुझ्याकडून. दर वेळी नवे नवे स्रोत चोरून थकशील की बंडोबा. हां, आता तुला 'आयुष्यातला एकमेव मास्टरपीस' म्हणून शेवटचं काही चोरायचं असेल तर गोष्ट वेगळी. (पण मग तू हा वायफळाचा मळा कशाला चोरशील? मी एवढी निश्चिंत / उदासीन का आहे "माझ्या" लिखाणाच्या चोरीच्या बाबतीत, ते समजलं ? बरं त्याहीपुढे, माझ्या नकळत ..कधी कधी लिहिल्यानंतर कळत.. मी किती लेखकांची शैली आणि संदर्भ "चोरले" असणार त्याची काय मोजदाद?)
पॉण तू नॉवा नॉवा दिग्दॉर्शॉक ऐस किनै?
(हे मराठीच आहे. असामिया नव्हे. जरा लाडात बोलले एवढंच.)
त्यामुळे नं बाळ, अशी चोरी करण्याचा मोह तू टाळच.
॥ इति दीर्घबोअरिंग्प्रस्तावनया: ॥
॥ अथ आख्यानम् ॥
नाटकात पात्रं दोन.
एक टिमकी, आणि दुसरा परीस.
टिमकी ही एक हौशी नाटककार आहे.
परीस हे तिचं स्फूर्तिदैवत. तुला 'म्यूज' ही संकल्पना माहिती असेल. नसेल माहिती तर मोठ्ठ्याने नकाराची मानदेखील हलवू नकोस चारचौघांत. आपलं अज्ञान स्वच्छपणे प्रकट करणं ही गोष्ट मनाच्या निर्मळतेचा पुरावा असते वगैरे ठीक आहे; पण कोणी कोणतं अज्ञान प्रकट करावं याचेही काही नियम आहेत. तू 'गळिताची धान्ये' किंवा ’पॅलॅझोइक काळातील पक्ष्यांच्या शेपटीची लांबी' यासारख्या विषयाबद्दलचं आपलं अज्ञान बेधडकपणे आल्या-गेल्यासमोर दाखवू शकतोस, पण 'शेक्सपीयरचा ऑथेल्लो, देवलांचा फाल्गुनराव आणि रोबीन भट्टाचा ओंकारा यांची गुणात्मक तुल-ना' तुला करता येत नसेल तर मित्रा, तुझं खरंच काही म्हणजे काहीसुद्धा खरं नाही.
तर म्यूज माहिती नसल्यास पटकन शेजारच्या खिडकीत विकिपिडियाला साकडं घाल, आणि मगच पुढे वाचायला लाग.
(आयला! मी इतालो कॅल्विनोची शैली (?) ..म्हणजे त्याच्या एका पुस्तकाच्या एका प्रकरणातली शैली उचलली आहे इथपर्यंतच्या मोठ्ठ्याश्या भागात. वा! हे लिहिता लिहिता लक्षात आलं की कसं.. बर्रंऽऽऽ वाटतं.)
(अपूर्ण)