भणाणता वारा. अखंड किनारा निर्मनुष्य. आम्ही सहा जण मोठ्यांदा बडबड करत आलोय.
वाऱ्याबरोबर लाटा कानावर आदळायला लागतात. एक-एक करत सगळेच आपसूक गप्प होत जातात. कातळांच्या बाह्याकृती तेवढ्या दिसतायत. आपल्याला हवी तशी जागा शोधायची धडपड सुरू. कुणाला बूड टेकेल इतपत जागा पुरते..कुणाला पाय पसरायला हवे असतात..कुणाला मागे रेलून बसायला दगड हवा असतो..कुणी पाय पसरून बसलेल्यालाच दगड मानून मोकळा होतो.
सगळे स्थिरस्थावर झाल्यावर बडबड पुन्हा सुरू. एक मुलगा बेंगलुरु चा रहिवासी - मग- 'रजनीकांत सिनेम्यां'तल्या विनोदांची उजळणी सुरू होते. "हीरोला तीन बाजूंनी तीन व्हीलन्सनी वेढलेलं. समोरच्याकडे मेज्जर चांगलं रिव्हॉल्वर. हीरोकडे एक चाकू फक्त. समोरून गोळी सुटते. इकडून चाकू सुटतो. रोंरावत जात बरोब्बर गोळीचा मध्यातून छेद घेतो. मग दोन बाजूच्या व्हीलन्स चा कारभार गोळीच्या दोन भागांनी आटपतो, आणि तो चाकू इमाने-इतबारे मधल्याचा कोथळा बाहेर काढतो आपोआप. :D " मग कुणाला कूटप्रश्न सुचतात..पोरं 'गनितवाली' असल्यामुळे 'You know you are a mathematician if...' वाले विनोद सुरू होतात.
इतक्यात कुणाचंतरी लक्ष दूरवर समुद्राच्या 'कोपऱ्यात' जातं. चांदीसारखा चमचमणारा एकच पट्टा..आणि तिथून खळाळत लाट पुढे येतेय चांदी लेवून. नजर वर वर उठत आकाशात जाते. अष्टमीचा चंद्र चांदणं सांडतोय बेगुमान. एक मोठ्ठा ढगोबा सरकत येतो..तोंड आ वासलेलं. राहूसारखा झटक्यात चंद्राला गिळंकृत करतो. पाणी पुन्हा काळंभोर. कातळांच्या मध्येच एक इवलंसं तळं बनलंय समुद्रात. चंद्र दोन मिनिटांत बाहेर येऊन तळ्यात डोकावतो. पाण्यात शेकडो इवल्या मासोळ्यांची चमचम! मग अजून ढग येत राहतात, रांगेनं पुढे सरकत राहतात. ढगांच्या पडद्यातला चंद्र विद्याधर गोखलेंच्या एका शेरातल्या रूपगर्वितेसारखा वागत राहतो :
"पर्दा उठाया, फ़िर गिराया, और फ़िर उठा दिये
..कि देखें, देखनेवालों में किनमें होश बाक़ी है" !
वारा वासरासारखा उधळलाय. शिरशिरी येऊच देत नाहिये..सरळ हुडहुडीच भरवू पाहतोय. मग मी 'वनवास' पुस्तकाच्या मुखपृष्ठावरल्या लंपन-आसनात बसते - दोन्ही पाय गुडघ्यात मुडपून अंगाजवळ धरत, त्यांना हातांचा घट्ट विळखा घालत. हळूच डोळे मिटून घेते. समुद्राचा गंभीर आवाज एक पार्श्वभूमी बनून राहिलाय सगळ्या 'असण्या'ची. एखादा होम चालू असेल तर गुरुजींच्या मंत्रोच्चारणाचा गंभीर आवाज घरभर भरून राहतो तसा. ईशावास्योपनिषद पाठ असतं तर ते म्हटलं असतं या लाटांच्या तालात.
पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
... आता मात्र आतून शिरशिरी येते. आकाशाची पोकळी..अफाट समुद्र..पंचमहाभूतं.. उगीचच आपण तत्त्वज्ञ ऋषिमुनींच्या काळात पोहोचल्याचा भास होतो.
हळूच डोळे किलकिले करत समोर पाहते, तर मघाशी चंद्राला गिळलेल्या ढगात एक मुठीएवढालं भोक पडलेलं असतं, आणि "चांदणे त्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे"! चांदण्याचा कवडसा समुद्रात पडलेला. नेमके त्या तेवढ्या भागात छोट्या छोट्या कातळांचे उभे सुळके वर आलेले. जलपऱ्यांचा तलाव!! Lord of the Rings च्या जगातल्या चंदेरी पऱ्या त्या क्षणी तिथे उगवल्या असत्या तर मला जरासुद्धा आश्चर्य वाटलं नसतं.
'अबे! गिरा दी नीचे? अब कैसे निकलेगी?' ..जरा गलबला होतो. एका पोट्ट्याची चप्पल दगडांच्या कपारीतून खाली कुठेतरी पडलेली असते. मी परत 'नॉर्मल'ला येते. पटापट सगळ्यांचे भ्रमणध्वनी बाहेर येतात. 'पॉवरफुल टॉर्च' वाले लोक तीन-चार बाजूंनी प्रकाशझोत टाकून चप्पल शोधायचा प्रयत्न करतात..चप्पल काही पायाला लागत नाही.
आता त्या जागेचा 'मूड', 'चार्म' संपलेला असतो. दोन मिनिटं उगीच रेंगाळून मग सगळे उठतातच लगबगीनं: खऱ्या जगातलं स्वप्न सोडून स्वप्नांच्या जगातलं खरं बघायला!
(७ जुलै २००६.)