Sunday, June 11, 2006

मनू

गोनीदांची मृण्मयी. .. आप्पांची मनू! 'शितू' आणि 'मनू' या गोनीदांच्या मानसकन्या त्यांनी काय भावनेनं घडवल्यायत ते कळायला 'मृण्मयी' कादंबरीची त्यांची प्रस्तावना वाचलीच पाहिजे. खरं तर 'उमलत्या कळीचे अंतरंग' त्यांना किती अलवारपणे समजून चुकले होते, ते पाहायला पडघवली, मृण्मयी, शितूच मुळातूनच वाचल्या पाहिजेत!

पुस्तकनिष्ठांच्या मांदियाळीसाठी लिहिताना मनू परत आठवली.. वयानं लहान असूनदेखील उमज मोठी असलेली, आई-बापानं दुधावरल्या सायीगत जपलेली संवेदनशील मनू 'देशावरून' सासरी कोकणात येते. घर मैलोगणती दूर..सासरी मायेच्या ओलाव्याचीच काय, सुबुद्ध मनाचीही वानवाच! काय वाटलं असेल मनूला?

सयींवर सयी बरसत येती जिवास नाही थारा
खारे पाणी डोळां आणी खारा सागर- वारा

हळदीच्या हळव्या हातावर हळकुंडाची बेडी
नथीची वेसण होते, पायी रुपते मासळीजोडी

नवखे पातळ सावरती कसनुसे मेंदीचे हात
मनात थरथर हलकी भरते केळफुलाची पात

नवे चेहरे समोर येती नवीच सांगत नाती
थट्टा, गोष्टी,बडबड-गप्पा भवती रंगत जाती

त्यांत असूनही नसलेली ती जरा आडोसा पाही
तेव्हा वरवर हसलेली ती आता उसासा होई

पाडस बनुनी सुसाट जाते मन मागे वेगाने
आईच्या अन कुशीत शिरुनी मुसमुसते हलक्याने

लिहिता लिहिता आठवतेय - घरीदारी आई, आजी, काक्यांनी सांगितलेल्या कथा. नवखेपणाचे अनुभव. त्यातला एक फारच गोड!
दाराआडुन हळूच बघती भोकरडोळे दोन
हातामधला खाऊ तसाच हातामधी ठेवून

हुंदक्यांतुनी अवचित शिरतो बकुळफुलांचा गंध
हळुच ओंजळित पडतो आणिक नाजुकसा मणिबंध

'वंयनी..अवळं घे ना' ऐकत हसते, पुसते डोळे
एक फूल लागते भराया घाव मनीचे ओले!


आप्पांच्या मनूला मिळायला हवं होतं ना असं एक फूल?

Friday, June 02, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

नंदनने "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी व्हावी ही तो श्रींची इच्छा" या भावनेने 'जो जे वाचेल तो ते लिहो' असे फर्मान सोडल्याला महिना होऊन गेलाय. पण त्याने या टॅगिंगच्या खेळात खो दिलेला माहितीच नव्हता मला :) फलंदाजाने कधी नव्हे तो एखादा सोपा कॅच द्यावा आणि आपण आईने केलेल्या मुगाच्या लाडवांच्या आठवणीत चेंडूकडे सुहास्य मुद्रेने बघत राहून तो सोडून द्यावा..मग 'लक्ष कुठे होतं @#$%' च्या प्रसादावर जीभ चावून दाखवावी, तसं वाटतंय आत्ता.

अर्थात त्याने परत आठवण करून दिल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष लिहायला बसले, तेव्हा हे सोपं वगैरे काही नाहीय, असं लक्षात आलंय. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना वाटलं , आपण 'अभ्यासू' वृत्तीने पुस्तकं वाचलेली नाहीत, आणि जी वाचलीत त्यात इतके वेगवेगळे लेखक आहेत की सुरुवात कुठून करायची? खूप काही बोलायचं असलं की काहीच बोलता येत नाही, तसं काहीसं!

मग म्हटलं एक पळवाट आहे. आधी 'all-time favourites' ना मानाची पानं देऊन घेऊया. म्हणजे काही काही नावं अशी असतात ना, की कुठल्याही छापील मजकुराच्या खाली त्यांचं नाव वाचलं की डोळे झाकून - आपलं, टक्क डोळे उघडून तो मजकूर अधाशासारखा वाचून टाकावा.. तसे माझे 'सदासर्वदा प्रिय' साहित्यिक म्हणजे प्रकाश नारायण संत (टागोरांच्या 'Cresent Moon' किंवा जी.एं. च्या 'बखर बिम्मची' नंतर इतकं तंतोतंत सुंदर लहानपण वाचलं तेव्हा जे वाटलं, तेच 'झांज' ऐकताना लंपन ला वाटलं असणार अशी माझी भाबडी समजूत आहे) , पु.ल. (केवळ त्यांच्या प्रस्तावनेमुळे लंपन पहिल्यांदा वाचला, एवढं म्हणणं पुरे आहे! या माणसाचे महाराष्ट्रावर, मराठी संस्कृतीवर आणि वैयक्तिकरित्या आपल्या स्वत:वर अनंत उपकार आहेत असं वाटणाऱ्यांचीच एक मांदियाळी आहे हे निश्चित), बा.भ.बोरकर(शब्द सुंदर असतात, आणि 'कधी अर्थाचा भास दिवाणा' वाटला तरी एक एक शब्द मनात घोळवताना कधीतरी तो भास समूर्त होऊन येतो, याची जाणीव यांनी करून दिली नसती तर मर्ढेकर, आरती प्रभु, ग्रेस यांच्या कवितांचं सौंदर्य अनुभवायची इच्छाच झाली नसती) , इंदिरा संत-शांता शेळके-संजीवनी मराठे-पद्मा गोळे (प्रत्येकीच्या कवितांचं स्वतंचं वैशिष्ट्य असलं तरी मला या 'चौघीजणी' एकाच मुशीतून घडलेल्या वाटतात..'मला समजून घेणारं कुणीतरी आहे' असं मला वाटायला लावणाऱ्या प्रेमळ आज्या!), कुसुमाग्रज (अर्थात!..आणि 'आमचे नाव बाबूराव' पासून तर जास्तच. ), जी.ए. कुलकर्णी(त्यांच्यासारखंच त्यांच्या प्रत्येक गोष्टीला स्वत:चं वल्लीमत्व आहे), गौरी देशपांडे et.al. (वाचणाऱ्याला 'मोठं' बनवतात या लेखिका!), अनिल अवचट ('सामाजिक जाणीव असलेला साहित्यिक' यापेक्षा 'साहित्यिक जाणीव असलेला कार्यकर्ता' या भावनेतून लिहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात 'हे तो अनुभवाचे बोल' हे अनुकरणीय वाटण्याइतक्या स्पष्टपणे दिसतं.) मंगला आणि जयंत नारळीकर (गणित आणि विज्ञान वाचून 'मोहरून जायला' होईल असं वाटायचं नाही आधी :) )

नमनाला अर्धा internet-hour जाळून झाल्यावर आता मूळ मुद्दे:

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक - ज्वाला आणि फुलें (बाबा आमटे)

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -

या १५०-पानी पुस्तकाला वि.स. खांडेकरांची २५ पानी (तीसुद्धा संक्षिप्त आणि संपादित!) प्रस्तावना आहे. बाबांचे हे चिंतन म्हणजे खांडेकरांच्या शब्दांत 'एका लोकविलक्षण आत्म्याचे ऊर्जस्वल शब्दविलसित' आहे. एकेका वाक्यावर एक एक दिवस विचार करायला लावणारं..निव्वळ अफाट पुस्तक.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके - (५ म्हणजे खूप कमी होतात!)

(१) अतिशय आवडणारी:

*थँक यू मि. ग्लाड (अनिल बर्वे)

*पार्टनर (व.पु.)

*मृण्मयी (गो.नी.दांडेकर)

*सारे प्रवासी घडीचे (जयवंत दळवी)

*एक झाड दोन पक्षी (विश्राम बेडेकर)

*मृत्यंजय (शिवाजी सावंत)

(२) अतिशय आवडणारी + दृश्य प्रभाव पाडणारी:

* एका रानवेड्याची शोधयात्रा (कृष्णमेघ कुंटे)
http://www.bio.utexas.edu/grad/krushnamegh/Moorings/ShodhyatraHome.htm

* एक होता कार्व्हर (वीणा गवाणकर)

* ही 'श्री'ची इच्छा (श्रीनिवास ठाणेदार)

* एका शेवटाची सुरुवात (सुधीर थत्ते)

* झेंडूची फुलें (आचार्य अत्रे)

(३) अतिशय आवडणारी अनुवादित:

*पाडस ('the yearling' : marjorie kinon rowlings ) , अनुवाद:राम पटवर्धन

*डायरी ऑफ ऍन फ्रँक, अनुवाद: मंगला निगुडकर

*देनिसच्या गोष्टी(व्हिक्टर द्रागून्स्की), ?

*पोरवय(रवीन्द्रनाथ ठाकुर) अनुवाद: पु.ल.देशपांडे

*ती फुलराणी(जॉर्ज बर्नार्ड शॉ) अनुसर्जन: पु.ल.देशपांडे

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

बक्कळ आहेत! पण 'तातडीने वाचलीच पाहिजेत' असं वाटतंय ती:


१) शाळा, उदकाचिये आर्ती (मिलिंद बोकील)

२) चानी, गणुराया (चिं.त्र्यं. खानोलकर)

३) प्रिय जी.ए. (सुनीता देशपांडे)

४) *.अरुण कोलटकर

५) गांधीहत्या आणि मी (गोपाळ गोडसे)

. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -

इथे 'मराठी' हा निकष लावला न गेल्याची पळवाट साधून, 'Jonathan Livingston Seagull' या Richard Bach च्या पुस्तकाबद्दल लिहिण्याचा मोह आवरणार नाहिये. (बहुतेक या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील झालेला आहे. अविनाश धर्माधिकारींच्या भाषणांच्या ध्वनिफितींमध्येही एक व्याख्यान आहे या पुस्तकावर.)

रिचर्ड बाख हा एक अवलिया. स्वत: वैमानिक, आणि उडण्यावर मनापासून प्रेम करणारा. त्याची बरीचशी पुस्तकं प्रथमपुरुषात लिहिलेली आहेत. सगळी सत्य आणि कल्पिताच्या ताण्याबाण्यांनी , आणि 'quotable quotes' नी भरलेली.[वैधानिक इशारा: दोन-तीन पुस्तकं वाचेतो 'बास आता, खूप पकवतोय' असं वाटू शकतं ]

पण त्याचं Jonathan Livingston Seagull हे उण्यापुऱ्या ८७ पानांचं पुस्तक माझ्या पुस्तकविश्वात अढळपद मिळवून बसलंय. कदाचित अशी दीर्घ रूपक-कथा इतक्या सहजपणे, आणि 'हे असंच घडलं होतं - आणि घडत असतं' इतक्या ठामपणे मांडली गेलेली पहिल्यांदाच वाचली होती दहावी-अकरावीच्या 'संस्कारक्षम' वयात ;)

लोक आयुष्य जगतात. अनेक परींचे अनुभव घेतात. काहीजण जगाला सांगू पाहतात. फार थोड्या लोकांकडे अशी निसर्गदत्त क्षमता असते, की समोरच्या व्यक्तीला ते वर्णन ऐकूनच आपण स्वत:देखील तो अनुभव जगलो आहोत असं वाटायला लागतं. 'जोनथन' मधलं उड्डाणाचं वर्णन असं आहे!

एका पुस्तकाचे तीन भाग.

१:"We can lift ourselves out of ignorance, we can find ourselves as creatures of excellence and intelligence and skill."

'उडणं' हे सीगल्सचं - समुद्रपक्ष्यांचं साधन असतं, आणि 'खाणं' हे साध्य. हवेत उडण्याची केवळ प्राथमिक माहिती असणारा सीगल कधीही हवेत डळमळत नाही, थांबत नाही. पंखांच्या एका लयदार, राजस हालचालीसरशी समुद्रावर झेप घेऊन, कोळ्यांनी किंवा इतर कुणी पकडलेला मासा चोचीत धरून परत एका फलकाऱ्यात जमिनीवर येतो.

'जोनथन लिविन्ग्स्टन सीगल' मात्र सीगलकुळाला लाज आणेल इतक्या वेळा धडपडत एखाद्या पिसांच्या चेंडूसारखा पाण्यात आदळायचा.

त्याला 'उड्डाणतंत्रांचा अभ्यास' करायचा होता म्हणे! खाण्याच्या एका तुकड्यासाठी शेकडो जातभाईंची चाललेली वखवख त्याला समजायची नाही आणि त्याचं उडण्याचं खूळ त्यांना कळायचं नाही. एवढंच काय, त्यांना ते सहन व्हायचं नाही. गरुडासारखी आकाशात भरारी घ्यायचं जोनथनचं स्वप्न पूर्ण झाल्यादिवशी त्याच्या जातभाईंनी त्याला खास बक्षीस दिलं: हद्दपारी.

**

पहिल्या भागात जोनथन स्वबळावर शिकतो. इथली झेप यशस्वी झाल्यावर दुसऱ्या भागात त्याला भेटतात दोन 'दुसऱ्या जगातले' मार्गदर्शक सीगल्स.

"You will begin to touch heaven, Jonathan, in the moment that you touch perfect speed. And that isn't flying a thousand miles an hour, or a million, or flying at the speed of light. Because any number is a limit, and perfection doesn't have limits. Perfect speed, my son, is being there."

**

तिसऱ्या भागात जोनथन स्वत:च 'गुरू' बनतो..'फ्लेच' नावाच्या, त्याच्यासारख्याच 'धडपडणाऱ्या सीगल -मुला'ला सांगतो:

"The only true law is that which leads to freedom," Jonathan said. "There is no other."

**

खूप 'वरचं' काहीतरी देऊन जातं हे पुस्तक. दोस्त-भाषेत "गॉड लेव्हल माज."



अजुनी चिं.वि.,शकुंतला परांजपे, अण्णा भाऊ साठे, तें., भालचंद्र नेमाडे, काका विधाते, आनंद यादव, बाळ फोंडके,प्रवीण दवणे, मंगला गोडबोले, दिलीप प्रभावळकर, प्रवीण टोकेकर..कितीतरी नावं आणि कितीतरी अनाम लेखक रुंजी घालतायत मनात - त्या-त्या वेळी 'अतिशय आवडतं' काहीतरी लिहिलं होतं म्हणून.

पण शेवटी 'लिहिणाऱ्यांचे हात हजारो, दुबळे माझे डोळे' हेच खरं!

आता प्रसाद, आव्या, कौस्तुभ, खो!

आणि या आळशी/अतिउद्योगी लोकांनाच मुद्दाम असा खो घालण्याची गरज आहे. बाकी वाचक लोग, तुम्हांला पण टॅग लागू होतोच..लिखते रहो :)