Thursday, June 18, 2009

रंगुनी रंगांत सार्‍या...

तुझ्या कथा, तुझ्या कविता.
तू लिहितोस त्यातला शब्द-न्‌-शब्द, वाक्य-न्‌-वाक्य मला तुला अभिप्रेत असलेल्या अर्थासहच जाणवावं असा हट्टाग्रह का तुझा?
का समजावून देऊ पाहतोस प्रत्येक ओळ मला?
तुझं लिखाण वाचताना माझ्यापासचं अनुभूतींचं गठुळं मी का सारायचं बाजूला?
तू लिहिताना त्यात तुझं तुझेपण ओतलंस, मी वाचताना माझं मीपण ओतते.
त्या वाचनाचा पहिला अनुभव तरी माझा मला एकटीला घेऊ देत. उगाच प्रस्तावना देत बसू नकोस.
मला वाटलं तर घेईन तुला विचारून, का-कधी-कुठे सुचलं हे तुला.
काही काही शब्द मला ’कळणार’ नाहीत. अवघड वाटतील.
वाटू देत.
तू तरी कुठे ’कळला’ आहेस मला?
अरे ते सोड, मी तरी कुठे कळली आहे मला?
पण कळत नसलेली प्रत्येक गोष्ट आवडत नाही असं नाही काही.
उलट मला तर कळत नाहीत त्याच गोष्टी जास्त आवडतात कधी कधी!
म्हणजे झुंजता येतं रे त्यांच्याशी..मस्त कुस्ती खेळता येते..
अशी दाबायची एका वाक्याची मुंडी बगलेत..अस्सं लोळवायचं घोळवायचं त्याला तासभर डोक्यातल्या तांबडमातीत..दोघंही जॉकी बिल्डिंगीतल्या पैलवानांसारखे धूळमाखले होईतोवर. कधी कधी आपटी खावी लागते मलाच..पण जेव्हा त्या वाक्याला उताणं पाडायला जमतं तेव्हा काय लाख आनंद होतो!
मग मी विजयोन्मादात तुला सांगत येणार..हे बघ, हे चित्र दडलंय तुझ्या त्या वाक्यात!
आणि तू चक्क हिरमुसणार?
’मला हे असं नव्हतंच म्हणायचं’ म्हणणार?
अरे पावसाच्या पोरा, माझ्या गर्भात मी हौसेनं पेरून घेतलेल्या तुझ्या शुक्राणूचं जितंजागतं बाळ मी तुला कौतुकानं दाखवायला आणलंय आणि तू मात्र ’याच्याशी माझा संबंध नाही हां’ म्हणत त्याला झटकून टाकतो आहेस? मला माहिती आहे ते ’तुझं’ नाहीये..पण तुझ्यामुळे आहे हे सत्य नजरेआड करता नाही यायचं तुला. आणि समजा तिकडे काणाडोळाच केलास तू, तरी गोजिरवाणं ते बाळ, त्याचं आल्यागेल्यासारखं कौतुक तरी करशील!
तुझं म्हणणं तुझी कविता एकसंध शिल्पासारखी. ती तुझ्यासारखी जिला कळेल ती तुझी सिंडरेला.
पण मला माहितीये, कसे तुकडे तुकडे सांधून शिल्प बनवलंयस तू ते. मला एक्कच तुकडा हवाय त्यातला. म्हणजे तुझ्या त्या शंकराच्या पायाच्या अंगठ्याचं नख. किंवा त्या नटराजाचा मुकुटमणी. माझ्याकडे माझे स्वत:चे कित्ती कित्ती तुकडे आहेत..आणि माझ्या तुकड्यांना तुझ्यातला एकुलता तुकडा परिपूर्ती देणारेय.”घेऊ नको’ म्हणूच शकत नाहीस तू. एकदा तू तुझं शिल्प मला दाखवलंस की ते माझ्या डोळ्यांचं झालं. ग्रीकांची शिल्पं हुबेहूब नकलणार्‍या रोमनांचा वारसा मिरवते म्हटलं मी. तुझ्या नटराजाचा मणी भंगला तर भंगेल कधी. पण माझ्या परकर्‍या पोरीच्या कानात डूल म्हणून जाऊन बसलेला तो मणी काही तिथून हटायचा नाही.
___

आदित्यराणूबाई, आज तुम्ही आमच्याच कवितेवरचं निरूपण दाखवायला आणलंत आम्हांला. खरं सांगावं तर अभिमान वाटला तुमचा. पण तुम्हांला जे काय दिसलं होतं ते फक्त तुमचं होतं - आमचे शब्द फक्त निमित्तमात्र. म्हणजे उंच डोंगरावर अगदी ओसंडायला आलेली एक तळी असावी आणि एका ढगानं उगाच मुतल्यासारखी एक धार तिच्यात सोडली की धबाधबा पाणी वाहातं व्हावं असा तो प्रकार. आता बघा, हे असं कधी निसर्गात होत नसतं. पण असं व्हावं असं आम्हांला बुवा वाटतं. त्यामागे आम्ही आंबोलीला गेलो होतो तेव्हाची एक आठवण आहे दडलेली.
विचारलंत, कोणती आठवण होती ते विचारलंत?
अहो, तुमची ही उत्सुकता आमच्याशी प्रत्यक्ष बोलताना जशी दिसते.. तशी ती जरा आमच्या कविता वाचताना दिसूद्यात कधी, एवढंच म्हणतो झालं.
तुम्ही आत्ममग्न, तुम्ही स्वयंपूर्ण, तुमच्या संततीला बापाची गरज फक्त बीजरूपानं - हे का आम्ही ओळखत नाही? पण तुम्हांला बीज म्हणून जे दिसतं आहे, ती आणखी कुणाची संतती आहे...तिचं ”त्याला हवं तसं’ कौतुक व्हावं अशी त्याची अपेक्षा आहे हो. अवाजवी असेल ही अपेक्षा, पण अमानवी नक्कीच नव्हे. आणि तुमच्यासारखे शहाणे दिसणारे लोक अशी उत्सुकतेशिवायची पुनर्निर्मिती करू जातात तेव्हा वाईट वाटतं इतकंच. मी अमूर्त शैलीत काढलेल्या रेड्याच्या चित्राचं तुम्ही ’किती गोंडस उंदीर’ म्हणून कौतुक करून वर त्याच्याशेजारी आपला गणपती आणून बसवणार आणि आम्ही त्या अख्ख्या सजावटीत धन्यता मानावी असं म्हणणार? नाही, विनोदी आहे ही उपमा. आम्ही धन्यताही मानूच. पण तुमच्या विश्वामित्री प्रतिसृष्टीला कधी कधी वल्गनेचा वास येतो. आमची मूळ सृष्टीच काय पण तिच्या इतर सार्‍याच प्रतिकृती तुम्हांला क:पदार्थ वाटायला लागतील अशी भीती वाटते.”तुम्हांला आतून जाणवलेले सर्व सर्व तुमच्यासाठी सत्य’, हे बरोबर. पण अधूनमधून इतरांना जाणवलेले त्यांच्यासाठीचे सत्य न्याहाळत चला. तुमची जाणीव अधिक खोल होईल. स्वत:च्याच विचारांचं डबकं नका बनवू. सर्व जलौघांना सामावणारा समुद्र बनू देत त्यांना.
___
होय आहेच माझी अपेक्षा - मी लिहिलेल्या ओळींचा मला अभिप्रेत असलेला अर्थच तुला समजावा अशी. आणि हीच माझ्या मनातल्या सिंड्रेलासाठीची कसोटी आहे हेही बरोबरच ओळखलंस तू. लाकूड तासून तासून एकही खिळा न वापरता नौका बनवावी तितक्या काळजीपूर्वक शब्द तासून बसवतो मी माझ्या निर्मितीमध्ये. काय बिशाद आहे की कुठे फट राहील नि पाणी आत शिरेल! एक शब्द इकडचा तिकडे झाला की भाव बदलला वाक्याचा. आणि तू म्हणतेस तुला सांगूच नको मी, तो भाव काय होता? मनात थेंबा-थेंबानं झिरपलेले विचार - काही तर कित्येक वर्षांपासून झिरपत आलेले - ते गोळा होऊन बनलेली ती ताडी. तुला तिची चव ’झेपली’ आहे की नाही ते कळायला नको मला? माझ्या भाषेचं प्रयोजन म्हणजे माझ्या मेंदूत उमटलेला भाव तुझ्यापर्यंत पोहोचवणं. त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता तू हपापल्यासारखं गटागटा सगळं वाचणार, त्यात चार-पाच शब्द पूर्णपणे चुकीचे वाचणार, दहाबारा शब्दांच्या जागा बदलणार, एखादी ओळ तुझ्या डोक्यातच नाही शिरणार - आणि मग त्या कच्च्या पायावर तू स्वत:च्या कल्पनेचे इमले उभे करत सुटणार. कुस्तीबिस्ती खेळलीस तरी तूच बांधलेल्या आखाड्यात. तुझ्या त्या प्रथमदर्शनी कल्पनेचा काहीच प्रभाव त्या कुस्तीत राहात नाही तुझ्यावर, असं छातीठोकपणे सांगत असशील तर मानतो.
आपला तो गाणारा मित्र एकदा म्हणाला नव्हता,’ गाण्यानंतर इतर सगळ्यांनी केलेलं कौतुक आवडत नाही असं नाही - पण ज्याला गाणं ’कळतं’ त्याची शाबासकी मिळाली की फार छान वाटतं.’ माझंही तसंच आहे काहीसं. मी शब्दांच्या माध्यमातून ’ये हृदयीचें ते हृदयीं’ घालू पाहातो आहे. ते मला हवं तसंच समोरच्याच्या हृदयात पोहोचलं तर जो आनंद होतो तो वर्णनातीत. त्यात माझ्या प्रकटीकरणाचा जसा सन्मान आहे तसाच त्या व्यक्तीच्या जाणतेपणाचाही. तू अशी जाणती वाटलीस म्हणून तुझ्याकडे आकृष्ट झालो. पण मग जाणवलं की एकमेकांना छेदून जाणार्‍या आपल्या अनुभवविश्वांच्या सामाईक तुकड्यातलं माझं लिहिणं तुला कळतं जसंच्या तसं. पण उरलेल्या त्या ”केवळ माझ्या’ विश्वाचं काय? ते तर तू पाहिलंही नाहीयेस. तुला ते मी न सांगता कळावं अशी अपेक्षा कशी ठेवावी मी? नाहीच कळायचं तुला मी सांगितल्याशिवाय ते. तुला पहिल्यांदा नहाण आलं तेव्हा तुला काय वाटलं होतं ते कुठे कळलं होतं मला तू सांगितल्याशिवाय?
हौसेनं गर्भात पेरून घ्यायला निर्मितीचं बीज म्हणजे हौसेनं नाक टोचून ल्यायचा खडा नव्हे. आयुष्यभराचं आईपण पेलण्याची तयारी आहे की नाही याचा विचार कर आणि मग बोल...नाहीतर मूल जन्माला घालून मोकळी होशील आणि त्याला काय म्हणायचं आहे ते कधीच लक्षात घेणार नाहीस.
___
त्याचं काही ऐकू नको आदीमाऊ तू. एकदा त्याच्या काळजाजवळच्या मतांच्या विरोधात काही बोललीस की बालेकिल्ले उभे करत बसतो शब्दांचे. तोच म्हणतो तशा विटा अशा तासून बसवत जातो की वार्‍याला आत शिरता येऊ नये. हे स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे लोक असेच! अरे साहित्यनिर्मिती करता आहात...प्रयोगांची निरीक्षणं नाही नोंदवत आहात काही. ”आपले शब्द वस्तु्निष्ठ पद्धतीने स्वीकारले जावेत, व्यक्तिनिष्ठ पद्धतीने नव्हे’ याची काळजी शोधनिबंध लिहिताना करावी(च). शोधनिबंध लिहिताना(च) करावी असं नाही. कायदे, नोटिसा, बातम्या - अनेक प्रकारचं लिखाण आहे जिथे अशी एकेका शब्दाला मोजा-मापायची गरज असते, अन्यथा अनर्थ उद्भवतो. पण महाशय ’साहित्यनिर्मिती’ करताहेत. भावनांच्या प्रकटीकरणाचा खेळ मांडताहेत. (आता चिडेल बघ या शब्दप्रयोगावर. त्याच्या लेखी लिहिणं हे केवढं सीरियस काम! जणूं खेळ मांडणं फार भुक्कड असतं. अरे लिहिताना याची काय तंद्री लागत असेल एवढी माझ्या चिऊची तंद्री लागते रोज घराबाहेरच्या बांधकामाच्या ढिगात दगडगोटे शोधून मांडऽऽऽऽऽऽत बसताना.) तर यानं एक गोष्ट लिहिली आणि ती वाचून तुला प्रतिक्रियेदाखल काही स्फुरलं तर यानं त्याला त्याच्या अपेक्षेनुसार प्रतिक्रिया मिळाली नाही म्हणून का धुसफुसावं? त्याच्याच शब्दांना तू नवा अर्थ दिलाहेस हे स्वीकारण्याइतकं त्यानं तरी मोकळं का न व्हावं?
____
सम्राट, आपल्यासमोर वाद चालला असेल तर कुण्या एकाची बाजू घेऊ नये. विशेषत: आपलाच पुरेसा विचार झाला नसेल त्या विषयावर तर. आणि आजचे प्रतिद्वंद्वी तुल्यबळ आहेत. एकमेकांशी युद्ध खेळतानाच एकमेकांना स्वत:चे डावपेच शिकवताहेत. बघ वाद संपे-संपेतो दोघंही अजून जास्त कळायला लागतील एकमेकांना. तटबंदी मजबूत असेल आपापली पण गवाक्षं नक्की उघडतील. आम्हीही थोडे विचलित झालो होतो सुरुवातीला, पोरीचा हेका बघून. पण आता वाटतं ’वादे वादे जायते तत्त्वबोध:’ मध्ये खरंच काही तथ्य असावं. आता कुणी तिच्यासमोर व्यक्त होत असेल तर ती थोडं अजून बारकाईने ऐकेल - ’आपण ऐकतो आहोत तेच त्याला म्हणायचं आहे का’ या विचाराला ’काय फरक पडतो?’ नं धुडकावून लावणार नाही कदाचित. आणि तो कदाचित ’आपली निर्मिती थोडी तटस्थपणे पाहायची असते’ या विचाराला थोडी जागा देईल मनात.
भावनांना शब्दरूप देणं म्हणजे कॅलिडोस्कोपमध्ये काचांचे तुकडे मांडणं. येणारा प्रत्येकजण स्वत:ला हवं तसं त्यांना फिरवणार, दर वेळी एक वेगळीच आकृती त्याला दिसणार - हे त्याला जाणवायला लागेल. ’आपली कला नितळ व्हावी’ असं कोणत्या कलाकाराला वाटत नाही? नवनिर्मिती हातून घडताना ती ज्या भावभावनांसकट निपजली, त्याच जर तिचा आस्वाद घेणार्‍या व्यक्तीच्या मनात उमटल्या तर तो निर्मात्याच्या अट्टाहासाचं सार्थक झाल्याचा क्षण हे का आम्हांला ठाऊक नाही? पण समजा तसं झालं नाही तरीही ती निर्मिती उणी ठरत नाही, उलट निर्मात्यानंही न कल्पिलेले भाव ती पाझरवू शकते - ती निर्मात्याहून स्वतंत्र होते - कदाचित त्याच्याहून मोठी! तो धास्तावल्यासारखा वाटतो तो याच कल्पनेनं की काय? पण मी सांगू, त्याच्या लिखाणाला आपले चेहरे चिकटवणार्‍या लोकांची धास्ती घेऊ नये त्यानं. आपले विचार त्याला करू देऊन, त्याच्या विचारांबाहेर जगच नाही असं त्याला वाटायला लावणार्‍या लोकांची धास्ती घ्यावी!!!
______
“It comes about that if anyone spends almost the whole day in reading, and by way of relaxation devotes the intervals to some thoughtless pastime, he gradually loses the capacity for thinking, just as the man who always rides forgets how to walk. This is the case with many learned persons; they have read themselves stupid.” : Schopenhauer