Wednesday, February 25, 2009

पत्रावळ: २

( "आपण का नाही असं सजवून धजवून जेवण मांडत रोज?" या प्रश्नावर "बाळा, वेळ असता तर चिंचेच्या पानाच्या पत्रावळी केल्या असत्या" हे उत्तर वाचलं. वाटलं, वेळ असता तर..मुभा असती तर..जाणीव असती तर..वाचायला कुणी असतं तर..किती जणींनी किती पत्रांतून मन मांडलं असतं आपलं. त्या न लिहिल्या गेलेल्या पत्रांच्या या पत्रावळी.)

सहेला रे,

आज मुद्दाम तुला लिहितीये ते चानीबद्दल सांगण्यासाठी. रंजनानं रंगवलेली खानोलकरांची चानी नाही. प्रणूदादाला कुणीतरी दिलेलं ते खारीचं पिल्लू होतं ना, त्याला ’चानी’ म्हणून हाक मारायचा तो..तसली एक मिळालीय मला चानी.

आम्ही भेटल्याच्या दुसर्‍या दिवशी तिनं मला सांगितलं : 'माझ्या चिपमंकसारख्या क्यूट चेहर्‍यामुळे लोकांना वाटतं मी निरागस आहे. तसं काही नाहीये हां अज्जिबात.'
झकास!
मी मनातल्या मनात स्वत:लाच टाळी दिली. 'राजा माणूस' असायला हरकत नाहीये या मुलीला.
अंदाज चुकला नाही.

तर चिपमंकपेक्षा खार जवळची आपल्याला, आणि 'चिप्पू' आणि 'मंकू' नावं आधीच इतर लोकांना बहाल करून झाल्यामुळे चानीचं माझ्या डोक्यातलं नाव चानी.

शब्दांवर तिचं भारी प्रेम. मराठीतल्या 'च़' आणि 'ज़' या वर्णाक्षरांची तिला फार गंमत वाटते. (लेखी मराठीत 'चहा' तला आणि 'चल'मधला च वेगळा नाही दाखवता येत - म्हणून ऊर्दूतल्यासारखा नुक्ता दिलाय. कसा हनुवटीवरल्या तिळासारखा साजरा दिसतोय किनै?) गेला आठवडाभर तिच्या डोक्यात मराठी शिकायचं खूळ बसलंय. आणि ’च़'कार शब्द शोधून तिला वाक्यं बनवून देता देता माझी चिक्कार करमणूक होते आहे. चानी पहिलं वाक्य शिकली ते : "चु़ळबूळ करू नको!" आणि मग "मी वाचू़न वाचू़न च़कणी झालेय', ’च़ट्च़ट पाय उच़ल’, 'भजी चु़रचु़रीत आणि च़मच़मीत आहेत' 'पोट सुटलंय एवढं तरी च़रतोय बघ मेला कसा' 'आच़रट कार्टी!' अशी चढती भाजणी सुरू आहे. पोरीला कुणी मराठी नवरा मिळाला तर हाल आहेत बिचार्‍याचे.

त्या ’फन फेअर’ मध्ये खूप खूप रंगीबेरंगी फुगे भरलेली काचेची खोली असते, आणि मग लहान लहान मुलं तिच्यात शिरून ते फुगे मनसोक्त उडवत, तुडवत नाचत असतात तशा शब्द आणि कल्पना उधळत खेळत बसतो आम्ही.

तुझं-माझंच घे आता. ’सरकती जाये है, रुख से नक़ाब..आहिस्ता, आहिस्ता’ थाट आपला. कसं सांगायचं तिला समजावून? तिनं तर तुला पाहिलं पण नाहीये रे. आणि दाखवायला तुझा एकपण चांगला फोटो नाही माझ्याकडे. आहेत त्यांच्यात वेडाबावळाच दिसतो आहेस. :P
पेरविणीवरच्या तटतटून भरलेल्या मधाच्या पोळ्यातून कष्टानं ठिबकणार्‍या मधागत तुझं बोलणं तरी कसं ऐकवू तिला?

मग म्हटलं, तीन गोष्टी सुचतायत. एक परिसरजन्य.
संपृक्त गंधकाम्ल (कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड) हातावर पडतं त्याचक्षणी सप्तपाताळ एक होईल एवढा आक्रोश करावासा वाटतो. पण हायड्रोफ्लुओरिक ऍसिड हातावर पडलं तर लगेच काही कळतच नाही म्हणे. वरच्या त्वचेला जराही धक्का न लावता ते रंध्रांतून आत झिरपत जातं. हाडं खिळखिळी करतं. मग तसंच हळूहळू रक्तात मिसळतं..तेव्हा एकदम हृदयच बंद ताडकन! तसं आपलं नातं?
(ए, गंधक म्हणजे सल्फर, स्फुरद म्हणजे फॉस्फरस, तसं फ्लुओरीनला काय म्हणतात तुला माहित्ये का रे? मी व्युत्पत्ती बघितली तर कळलं की ’फ्लुओर’ हे ’प्रवाही’ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून आलं. काच वितळवणारा ’प्रवाहक’ फ्लुओराईड आयन. विचार तुझ्या त्या भाषाशास्त्रज्ञ मित्राला. नाहीतर मराठी विज्ञान शब्दकोशात बघून सांग मला.)

दुसरं उदाहरण कवितेतलं. शार्दूलविक्रीडितातली एक कविता वाचताना सांगत होते चानीला, ही वृत्ताची भानगड काय आहे ते. मग जाणवलं, तू-मी म्हणजे मंदाक्रांता वृत्तासारखे चाललोत. आमच्या हेर्लेकर सरांनी सांगितलेल्या ओळी :

मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त ते मंद चाले
ज्याच्या पादी मभनतत हे आणि गा दोन आले
(असं संऽऽऽथ सुरात गाताना पुढे श्लोक पुरा करायला मला
’नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव
राहो चित्ती प्रिय मम परी मातृभूमी सदैव’

हेच आठवतं नेहमी!)

आणि शेवटचं उदाहरण तिला, मला (तुला पण) प्रिय असणार:
उन्हाळ्यात दलदलीत डुंबत बसलेली म्हैस जितक्या अलबत्या गलबत्या गतीनं तिथून बाहेर निघेल ना, तितक्या मंदपणे आपण चाललोय ;)

जाऊ देत. आता मला शिव्या घालायच्याच असतील तर च़ आणि ज़ त्यांत असतील असं बघ.

येते रे!

--आर्या.

Wednesday, February 04, 2009

आमच्या कंपूत पियानं सुरू केलेला प्रश्नोत्तरी खेळ चांगलाच फोफावला होता. गप्पा कुटायला सहाहीजणी एकत्र आलो की कुणीतरी "What if.." नाहीतर "Who do you think.." नं सुरू होणारा एखादा प्रश्न टाकायचं. प्रत्येकीला त्याचं खरंखुरं उत्तर देणं भागच. मग आपल्यापैकी कोण कोण ’जीवणा’त काय काय बनेल, कोण सगळ्यांत जास्त चक्रम आहे आणि का, अमुक एका शब्दाची व्याख्या कोण कशी करतं, रस्त्याने जाताना उगीचच कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहून तिच्या एक थोतरीत हाणावी असं कुणाच्या मनात येतं का (सर्वांचं उत्तर ’हो’) आणि तसं असेल तर अशा चेहर्‍यांची काही विवक्षित ठेवण सांगू शकाल का, इत्यादी. फेसबुकावर आणि ऑर्कटवर चालणार्‍या सार्वजनिक प्रश्नाप्रश्नीचं एक जास्त मजा आणणारं (क्वचित्‌ जास्त "सखोल" ) खाजगीतलं रूप.

त्यांतलाच एक प्रश्न म्हणजे कोणत्या जिवंत / मृत वलयांकित व्यक्तीमध्ये आणि तुमच्यात साम्य आहे असं तुम्हांला वाटतं - Whom do you identify with and why? माझं उत्तर होतं सॉमरसेट मॉम. ’ऑफ ह्यूमन बॉण्डेज’ मधले काही उतारे वाचता वाचता ’माझे विचार काय म्हणून माझ्या आधीच कागदावर उतरवलेस?’ असं जितक्या तीव्रतेनं वाटलं होतं तसं कधीच इतर कुणाबद्दल वाटलं नव्हतं. ऑर्वेल, पु.ल., विल ड्यूरां, चॉम्स्की, रिचर्ड डॉकिन्स हे आणि असे कित्येक विचारवंत कधी सामोरे भेटले असते तर चरणस्पर्शाशिवाय काही घडलं नसतं. सॉमरसेट मॉमशी मात्र हस्तांदोलन केल्याखेरीज, त्याच्या पाठीवर दोस्तीची थाप घातल्याखेरीज राहावलं नसतं.
आणि आता एका लेखकाचा केवळ एक लेख - त्यातूनही, त्यातला एकच लहानसा परिच्छेद वाचून ’हा भेटता तर याला गळामिठी घातली असती’ असं वाटतंय - तो म्हणजे जेम्स बॉल्डविन.

त्याचा तो लेख इथे अनुवादित केलाय : http://bolaacheekadhee.blogspot.com/2009/02/blog-post.html

पण हा अनुवाद निव्वळ एक ’खाज’ म्हणून केलेला आहे..तो केल्याशिवाय राहावतच नव्हतं म्हणून. बॉल्डविनच्या मूळ इंग्रजीतली गंमत अनुवादात मुळीच नाहीये. सुदैवाने तो मूळ इंग्रजी लेख आंतरजालावर उपलब्धही आहे - तेव्हा तो वाचाच!

बॉल्डविनचं नावही मला काही महिन्यांपूर्वी माहिती नव्हतं. (अर्थात अतिशय उत्तम लिहिणार्‍या इतर अनेक अमेरिकन लेखकांबद्दल तरी कुठे माहिती होती अमेरिकेत येण्यापूर्वी?) एका लेखात त्याचा उल्लेख वाचून उत्सुकता चाळवली आणि ’नोट्स ऑफ अ नेटिव सन’ आणलं वाचायला. ती पहिली आत्मचरित्रात्मक नोंद वाचून संपून गेले. अतिशय कठीण परिस्थितीत स्वत:ची विनोदबुद्धी शाबूत ठेवणारी माणसं कमी असली तरी दुर्मिळ नसतात. पण त्या परिस्थितीत पार्‍यात टाकलेल्या काचेसारखं अलिप्त राहायला कितींना जमत असेल? आसपास ’अरे’ ला ’का रे’ करण्यावरून रक्त उसळत असताना याच्यात कुठून आला हा विवेचक थंडपणा? एकेका शब्दातून कुशाग्र बुद्धी दिसते या माणसाची. वाक्यं गोटीबंद नेमकी. एक शब्द अधिक-उणा नाही. त्यातूनच तो मिस्कीलपणा दाखवणार, उपरोध दाखवणार, स्वत:चा आणि जगाचा मूर्खपणा तितक्याच अलिप्तपणे उघडावाघडा समोर ठेवणार. जरा हळूहळूच पुढे सरकत होती त्याच्या शब्दांतून गाडी. एरवी इतरांचे भुरूभुरू उडणारे शब्द गपागप मटकावून पुढे जायची माझी सवय - पण या गड्याचे शब्द फार सावकाश चावायला लागले. संशोधनात सारखं तुझ्या प्रकल्पाचं ’बिग पिक्चर’ लक्षात घे असं आसपासचे लोक सांगत असतात. बॉल्डविन काळ्या-गोर्‍यांमधल्या सगळ्या करामतीचं मोठ्ठं चित्रच दाखवत होता. सगळा हत्ती एकसाथ.
आणि त्याचं हे वाक्य म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनाचा गाभाच : I think all theories are suspect, that the finest principles may have to be modified, or may even be pulverized by the demands of life, and that one must find, therefore, one's own moral center and move through the world hoping that this center will guide one aright.

मूलभूत विज्ञानात "finest principles being modified" ही सतत चालू असणारी गोष्ट आहे - आणि ती तशी नसेल तर गाडं खुंटलंच.

किती नाजूक समतोल आहे या वाक्यात : त्याच्याकडे एका नजरेनं पाहिलं तर "वारा येईल तिथे पाठ फिरवायच्या अप्पलपोट्या वृत्तीचं समर्थन" असं म्हणता येईल - आणि दुसर्‍या नजरेनं "बदलत्या परिस्थितीनुसार लवचिकपणे आणि योग्य तितकंच बदलून उत्क्रांत होणार्‍या, टिकून राहणार्‍या वृत्तीचं वर्णन" असंही म्हणता येईल. कसं पाहायचं, तेही स्वत:च्या "मॉरल सेंटर"च्या जागेवर अवलंबून.

आणि त्याचं "I do not like people who are earnest about anything" हे वाक्य पहिल्याप्रथम बॉम्बगोळ्यासारखं वाटलं. कळकळ, तळमळ, उत्कटतेची किंमत याच्या लेखी शून्य? पण मग परत आठवलं, कळकळ डोक्याला गोचिडीसारखी चिकटून बसणं किती सोपं असतं..आणि मग त्यातून सारासारविवेकबुद्धी किती चटकन नष्ट होते. शिवाय "कौन रोता है किसी और के खातिर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया" ची उदाहरणं दिसायला लागलीच होती प्रत्यक्ष मला आता -आताशा. जऽरा मुळांत जाऊन तपास केल्यावर त्या "अर्नेस्ट्नेस" चं कारण कळतं तेव्हा हरखलेला जीव परत गुमान जागेवर येतोच की नाही?

पण असं सगळ्याच गोष्टींच्या मुळात जाऊन, सगळं काही पाहून वर त्यावर हसूही शकत होता म्हणे बॉल्डविन..आणि म्हणूनच मला त्याला कवेत घ्यायचं आहे.

जेम्स बॉल्ड्‌‍विनच्या आत्मचरित्रात्मक नोंदी

मूळ इंग्रजीतील लेख: http://www.nytimes.com/books/first/b/baldwin-essays.html
लेखक: James Baldwin
पुस्तक: 'Notes of a Native Son' , Beacon Press, (1955)


माझा जन्म हार्लम मध्ये एकतीस वर्षांपूर्वी झाला. मी वाचायला शिकलो त्याच सुमारास कादंबर्‍यांची कथानके जुळवायला सुरुवात केली होती. माझं लहानपण इतर कुठल्याही शोकात्मिकेसारखं दैन्यात गेलं - आणि 'मला ते अजिबात परत जगायचं नाहीये' एवढ्याच संयत निरीक्षणात आपण त्याची वासलात लावून टाकू. त्या दिवसांत माझ्या आईला एक गूढ आणि वैतागवाणी सवय लागली होती - मुलं जन्माला घालण्याची. नवीन बाळ आलं की मी एका हातात ते बाळ आणि दुसर्‍या हातात पुस्तक अशा थाटात त्यांची देखभाल करायचो. पोरांना त्याचा त्रास होत असणार - पण आता तरी बिचारी तसं म्हणत नाहीत. या पद्धतीने मी 'अंकल टॉम्स केबिन'आणि 'अ टेल ऑफ टू सिटीज्‌'ची कैक पारायणे केली; आणि खरं सांगायचं तर याच पद्धतीने मी हाताला येईल ते सगळं वाचून काढलं - एक बायबल सोडून, कारण कदाचित ते एकमेव पुस्तक वाचायला मला प्रवृत्त केलं गेलं होतं. अजून एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे : मी लिहायचो. भरमसाठ लिहायचो. माझं पहिलं व्यावसायिक यश (किमान माझं छापून आलेलं पहिलं लिखाण) माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी अवतरलं : स्पॅनिश क्रांतीबद्दल मी लिहिलेल्या गोष्टीला एका चर्चच्या अल्पायुषी वृत्तपत्रात कसलंसं बक्षीस मिळालं. संपादिका-बाईंनी त्या गोष्टीत काटछाट केल्याचं मला आठवतंय - का ते मात्र आठवत नाही. काय प्रचंड संतापलो होतो मी.

मी नाटकं लिहायचो, गाणी लिहायचो (एका गाण्याबद्दल मला महापौर ला ग्वार्डियांकडून अभिनंदनाचं पत्र आलं होतं) - आणि कवितासुद्धा. (त्यांच्याबद्दल जितकं कमी सांगावं तितकं बरं!) माझ्या आईला या सगळ्याचा खूप आनंद व्हायचा, पण माझ्या वडिलांना ते फारसं पसंत नसावं. मी धर्मोपदेशक व्हावं असं त्यांना वाटे. मी चौदाव्या वर्षी धर्मोपदेशक झालो, आणि सतराव्या वर्षी ते काम थांबवलं. त्यानंतर लवकरच घर सोडून बाहेर पडलो. नंतर किती काळ मी उद्योगधंद्याच्या जगाशी लढलो - मला वाटतं ते लोक म्हणतील की ते माझ्याशी लढले - ते देवाला ठाऊक. वयाच्या एकविशीत पोचेतो सॅक्स्टन शिष्यवृत्ती मिळवण्याएवढं एका कादंबरीचं भांडवल माझ्यापाशी तयार होतं. मी बावीस वर्षांचा झालो तोवर ती शिष्यवृत्ती संपून गेली होती, त्या कादंबरीवर "विक्रीलायक नाही" असा शिक्का बसला होता, आणि मी गावातल्या हॉटेलात पोर्‍याचं काम करू लागलो होतो. मी पुस्तक परीक्षणंही लिहायचो - बर्‍याचदा 'निग्रो प्रश्ना'वर - माझ्या कातडीच्या रंगामुळे मी आपसूकच या बाबीतला तज्ञ ठरलो होतो. मग थियोडोर पेलॅटोव्स्की नावाच्या एका फोटोग्राफरसोबत हार्लम मधल्या स्टोअरफ्रंट चर्चबद्दल एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं नशीब तंतोतंत माझ्या पहिल्या पुस्तकासारखंच होतं: शिष्यवृत्ती आहे पण खप नाही. (रोझेनवॉल्ड अभ्यासवृत्ती.) मी पंचविशीत शिरलो तेव्हा निग्रो प्रश्नावरच्या पुस्तकांची परीक्षणं लिहिणं बंद करायचं ठरवलं. या वेळेपर्यंत हा 'प्रश्न' छापील जगतात जवळपास खर्‍या जगाइतकाच भयावह बनला होता. मी बाडबिस्तरा गुंडाळून फ्रान्सला गेलो आणि तिथे, कसं ते देवच जाणे, 'गो टेल इट ऑन द माउंटन' लिहून संपवलं.

माझी अशी समजूत आहे की प्रत्येक लेखकाला 'आपण जिथे जन्मलो ते जग म्हणजे आपल्या लेखनकौशल्याच्या जोपासनेविरुद्ध रचलेला एक कट आहे' असंच वाटत असतं - आणि त्या वाटण्याला सबळ कारणंही आहेत. पण जगाच्या या पराकोटीच्या बेपर्वाईमुळेच कलाकारांना आपल्या कलेला महानपण यावं म्हणून झटावं लागतं. त्यामुळे आत्ता मी घेतोय तसा छोट्याशा काळाचा आढावा घेतानादेखील कुणाही लेखकाच्या लक्षात येईल की त्याला ज्या गोष्टींनी दुखावलं आणि ज्या गोष्टींनी मदत केली त्यांना एकामेकांपासून वेगळं काढता यायचं नाही. तो एका प्रकारे दुखावला गेला म्हणूनच त्याला दुसर्‍या प्रकारे मदत मिळू शकली- त्याला एका कूटप्रश्नाकडून दुसर्‍याकडे नेणारी मदत. इथे 'एका सर्वनाशाकडून दुसर्‍या सर्वनाशाकडे' असं म्हणण्याचा मोह होतोय. आपल्या लिखाणावर कुणाचा प्रभाव आहे हे शोधायला गेलं तर खंडीभर नावं सापडतात. माझ्यावरच्या प्रभावांबद्दल मी फार विचार केलेला नाही - किंवा जो केलाय तो पुरेसा नाही. तरीसुद्धा, स्टोअर-फ्रंट चर्चच्या बोधामृताचा पाया असलेल्या आणि निग्रोंच्या बोलण्यात ज्याचे बेताचेच संदर्भ येत अशा 'किंग जेम्स बायबल'मधला हिंसकपणा आणि उपरोध- आणि डिकन्सच्या लिखाणामधलं भपकेबाजीवरचं प्रेम - या दोन्हींचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे असा दावा मी करू शकेन; हा दावा छातीठोक मात्र नाही. तसंच, असंख्य लोकांनी मला अनेक प्रकारे मदत केली आहे; पण माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण गोष्ट (आणि सगळ्यात मोठी देणगी) म्हणजे मी निग्रो म्हणून जन्माला आलो आणि त्यामुळे या सत्याशी एक प्रकारचा तह करणं मला भाग पडलं. (इथे फार फार तर तहाचीच आशा बाळगता येते.)

निग्रो लेखकासमोरच्या अडचणींपैकी (आणि हे नुसत्या निग्रोंसाठीचं रडगाणं नाही : इतर लेखकांपेक्षा त्यांना काही जास्त वाईट सहन करावं लागतं असं नव्हे) एक म्हणजे निग्रो प्रश्नावर खूप जास्त लिहिलं गेलं आहे. पुस्तकांतल्या माहितीच्या ओझ्याखाली कपाटं दबून जाताहेत, आणि त्यामुळे प्रत्येकाला 'आपण माहितगार आहोत' असं वाटतं आहे. इतकंच नव्हे तर ही माहिती बहुतेक वेळा (लोकप्रिय रीतीनं) पारंपरिक भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी वापरली जाते. पारंपरिक भूमिका दोनच आहेत - बाजूने किंवा विरुद्ध - आणि व्यक्तिश: मला या दोन्हींपैकी कुणामुळे जास्त दु:ख झालंय हे ठरवणं कठीण जातं. हे माझ्यातला लेखक बोलतो आहे. सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मात्र वाईटपणाकडून चांगुलपणाकडे होणारा बदल हा कुठल्याही प्रेरणेतून आलेला असो, कितीही सदोष असो, कसाही व्यक्त होवो - तो काहीच बदल न होण्यापेक्षा नक्कीच चांगला असतो याची मला पूर्ण जाणीव आहे.

पण माझ्या मते, भूमिका आणि दृष्टिकोन तपासणं, वरवरच्या आवरणाखाली उकरून पाहणं, मूळ स्रोताला हात घालणं हा लेखकी पेशाचा एक भाग आहे. निग्रो प्रश्न मात्र या नजरेच्या कक्षेबाहेरच आहे जवळजवळ. त्याच्याबद्दल खूप विस्तारानंच लिहिलं गेलंय असं नाही, तर खूप फडतूसपणेही लिहिलं गेलं आहे. असं म्हणता येईल की आता बोलतं होण्यासाठी निग्रोला द्यावी लागणारी किंमत म्हणजे 'शेवटी आपल्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही' याची जाणीव. ("तू मला भाषा शिकवलीस", कॅलिबॅन प्रॉस्पेरोला म्हणाला," आणि त्याचा मला फायदा इतकाच झाला की मला आता शिव्या देता येतात.") जरा विचार करा: या प्रश्नातून जी प्रचंड सामाजिक उलाढाल निर्माण होते, तिच्यामुळे काळ्या आणि गोर्‍यांवर उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची एकसारखीच जबाबदारी येऊन पडते. हे बरंच आहे - त्यामुळे हवेत जरा खळबळ राहते - आणि खरं तर त्याचमुळे निग्रोंची प्रगती शक्य झाली आहे. तरीही, सर्वसाधारणपणे पाहिलं तर सामाजिक घडामोडी हा लेखकाच्या चिंतेचा मुख्य विषय नसतो - तो तसा असायला हवा असो किंवा नसो - कारण त्यानं स्वत:मध्ये आणि या घटनांमध्ये किमान इतकं अंतर ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तो पारदर्शक नजरेनं त्यांच्याकडे पाहू शकेल. भविष्याचा अर्थपूर्ण वेध घेता यावा म्हणून भूतकाळाची पाळंमुळं तो उकरू शकेल. निग्रो प्रश्नाच्या संदर्भात बोलायचं तर काळ्यांना काय किंवा गोर्‍यांना काय - मागे वळून पाहण्याची सुतराम इच्छा नाही - आणि दोघांकडेही यासाठी उत्कृष्ट कारणंही आहेत.पण मला वाटतं की भूतकाळामुळेच वर्तमानकाळाला सुसूत्रता येते, आणि जोपर्यंत आपण भूतकाळाची प्रामाणिकपणे छाननी करायला नकार देत राहू तोपर्यंत तो भयावहच राहील.

निदान माझ्या स्वत:च्या विकासाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तरी 'मी पाश्चिमात्य संस्कृतीची अक्करमाशी अवलाद आहे' हे ओळखणं मला भाग पडल्यानंतरच सुरू झाला : कारण मी माझ्या भूतकाळाचा माग घेत गेलो तेव्हा युरोपात न जाता आफ्रिकेत जाऊन पोचलो. म्हणजे एका गर्भित, खोल अर्थानं पाहिलं तर मी शेक्सपीअर, बाख आणि रेम्ब्रांकडे, पॅरिसच्या दगडांकडे, शार्तेच्या प्रार्थनागृहाकडे आणि एम्पायर स्टेट बिल्डिंगकडे एका वेगळ्याच भूमिकेतून बघत होतो. या गोष्टी मी निर्माण केलेल्या नव्हत्या, त्यांच्यात माझ्या इतिहासाच्या कसल्याही खुणा नव्हत्या - मी अनंत काळ शोधलं असतं तरी मला त्यांत माझं प्रतिबिंब कुठेच सापडलं नसतं. मी तिथे उपरा होतो; तो माझा वारसा नव्हता. पण मला हेही ठाऊक होतं की मिरवता येण्याजोगा दुसरा कोणताही वारसा माझ्यापाशी नव्हता - जंगल आणि वनवासी जमात यांच्यासोबत राहायला मी लायक उरलो नव्हतो. मला या मधल्या गोर्‍या शतकांना आपलंसं करावं लागणार होतं - मला माझ्याच वेगळ्या नजरेचा, या जगाच्या आकृतिबंधातल्या माझ्या विशिष्ट जागेचा स्वीकार करावा लागणार होता - नाहीतर मग मला कुठल्याही आकृतिबंधात कोणतीच जागा उरली नसती. यांतला सगळ्यात कठीण भाग म्हणजे मी स्वत:पासून नेहमीच लपवत आलेली एक गोष्ट कबूल करणं मला भाग पडलं (लोकमान्यता मिळवण्यासाठी अमेरिकन निग्रोंना द्यावी लागत असलेली किंमत म्हणजे ही गोष्ट लपवणं) - आणि ती म्हणजे, मला गोर्‍या लोकांबद्दल तिरस्कार आणि भीती वाटे. याचा अर्थ असा नव्हे की मला काळ्या लोकांबद्दल प्रेम होतं - उलट त्यांची मला घृणा वाटे - कदाचित त्यांच्यातून कुणी रेम्ब्रां उपजला नाही म्हणूनही असेल! एकूणात मला अख्ख्या जगाचा तिरस्कार आणि भीती वाटत होती. याचाच अर्थ मी जगाला माझ्यावर एक खुनशी अधिसत्ता गाजवू देत होतो; इतकंच नव्हे तर असल्या आत्मघातकी सापळ्यात स्वत:ला अडकवून मी लेखक बनण्याच्या माझ्या आशेला तिलांजलीच दिली होती.

माणसाचं लिखाण एकाच गोष्टीतून निपजतं -त्याच्या स्वत:च्या अनुभवातून. या अनुभवातला अर्क त्याच्या शेवटच्या कडू - गोड थेंबापर्यंत पिळून काढण्यासाठी तो किती असोशीनं झटतो, त्यावरच सारं काही अवलंबून असतं. कलाकाराची खरी तडफड एकाच गोष्टीसाठी चालते : आयुष्याच्या गडबडगुंत्यातून एक सुसंगती शोधायची - ही संगतवार मांडणी म्हणजेच त्याची कला. आणि माझ्या 'निग्रो लेखक' बनण्यातली मुख्य अडचण हीच होती की माझ्या सामाजिक परिस्थितीच्या प्रचंड दडपणामुळे आणि तिच्यातल्या खर्‍याखुर्‍या धोक्यांमुळे मला माझ्या स्वत:च्या अनुभवांची कसून तपासणी करणं जवळजवळ अशक्य झालं होतं.

हा तिढा जगावेगळा आहे असं नाही मला वाटत. पण लेखक भाषेसारख्या सारंकाही उघडउघड प्रकट करणार्‍या घातकी माध्यमाचा वापर करत असल्यामुळे मला हे मात्र जरूर वाटतं की निग्रो बोलचाल आणि जीवनपद्धतीचं अमाप भांडार खुलं असताना, आणि निग्रो संगीताचं सुरेख उदाहरण पुढे असूनही निग्रो-लिखित गद्य बहुतेकदा इतकं फिकं आणि कठोर का राहिलं आहे याचं कारण या तिढ्यात सापडू शकेल. स्वत:च्या निग्रो असण्याबाबत मी इतकं लिहिलंय याचं कारण ' लिहिण्यासारखा तेवढा एकच विषय माझ्यापाशी आहे' असं नव्हे, तर इतर कोणत्याही विषयावर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मला या विषयाची कवाडं उघडून टाकणं गरजेचं होतं म्हणून. अमेरिकेतल्या निग्रो प्रश्नावर त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतल्याखेरीज सुसंबद्ध चर्चा करणंदेखील शक्य नाही असं मला वाटतं, आणि ही पार्श्वभूमी म्हणजे इथला इतिहास, परंपरा, रीतीभाती, या देशाची नीतिमूल्यं आणि आचारविचार - थोडक्यात समाजपटाचे सगळे ताणेबाणे.
वरवर तसं दिसत नसलं तरी अमेरिकेतील कोणीही या प्रश्नाच्या परिणामांपासून पळ काढू शकत नाही आणि इथल्या प्रत्येकाच्याच खांद्यावर त्याची थोडीफार तरी जबाबदारी आहे. या प्रश्नाबद्दल 'ही आपल्यापासून दूर असलेली बाब आहे' असा पद्धतीनं बोलायची प्रवृत्ती बोकाळलेली मी जसजशी पाहतो, तसतसा त्याच्या विरुद्ध गोष्टीवर माझा ठाम विश्वास बसत जातो. पण फॉकनरच्या लिखाणात, रॉबर्ट पेन वॉरनच्या एकूण दृष्टिकोनात आणि त्याच्या लिखाणातल्या काही विशिष्ट उतार्‍यांमध्ये, आणि सर्वांत ठळकपणे राल्फ एलिसनच्या उदयात अजून प्रामाणिक, सखोल शोधाची किमान सुरुवात तरी दिसू लागली आहे.(जाता जाता: निग्रो जीवनातली दुविधा आणि उपरोध यांचा ज्यानं भाषेमध्ये अत्युत्कृष्ट उपयोग केला आहे असा मी वाचलेला पहिला निग्रो कादंबरीकार म्हणजे श्री. एलिसन.)

माझ्या आवडीनिवडींविषयी: त्या असल्याच तर मला माहीत नाहीत - (हां, 'आपला एक सोळा मि.मी. कॅमेरा असावा आणि तो घेऊन आपण प्रायोगिक चित्रपट बनवावेत'अशी आत्यंतिक इच्छा 'आवडनिवड' प्रकारात येत नसेल तरच). अन्यथा मला खायला-प्यायला खूप आवडतं - माझी बापडी एक समजूत आहे की मला फार कमी वेळा पुरेसं खायला मिळालंय (कारण तुम्ही पुढच्या वेळचं जेवण मिळेल का नाही याच्या चिंतेत असाल तर भरपेट जेवणं अशक्य होऊन जातं). माझ्या मतांच्या पार मुळापासून विरोधात नसलेल्या लोकांशी वादविवाद करायला मला आवडतं, आणि मला हसायला आवडतं. मला 'ऋण काढून सण करावा' धाटणीचं बोहेमियन राहणीमान, किंवा मौजमजा हे ज्यांचं मुख्य ध्येय आहे असे लोक आवडत नाहीत. मला कुठल्याही गोष्टीबाबत कळकळ असलेले लोक आवडत नाहीत. मी निग्रो आहे म्हणून ज्यांना मी आवडतो, ते लोक मला आवडत नाहीत; आणि माझ्या निग्रोपणात ज्यांना मला कमी लेखण्याची संधी दिसते ते लोकही मला आवडत नाहीत. जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा मला अमेरिका अधिक आवडते, आणि अगदी याच कारणासाठी मी तिच्यावर टीकास्त्र सोडण्याचा माझा हक्क सतत बजावत असतो.
मला वाटतं की सारे सिद्धांत संशयास्पद असतात, आणि जगण्याच्या रेट्यामुळे सर्वोत्तम तत्त्वांत बदल करावा लागू शकतो किंवा त्यांचा पूर्णत: विनाशदेखील होऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येकाला स्वत:च्या नीतिमूल्यांचा केंद्रबिंदू स्वत:च शोधून, तो बिंदू आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल या आशेवर जगात वाटचाल करावी लागते. माझ्यावरच्या अनेक जबाबदार्‍यांची मला जाणीव आहे - पण त्यांतली सर्वांत मोठी जबाबदारी हेमिंग्वेच्या शब्दांत सांगायची तर अशी: "टिकून राहणे आणि माझे काम पुरे करणे."

मला एक प्रामाणिक माणूस बनायचं आहे, आणि एक चांगला लेखक.

Labels: