Friday, October 20, 2006

My Immortal

१२ जून. ८ नोव्हेंबर.
तारखांमध्ये बांधला जाणारा तू नव्हेस आणि तशी तुला बांधून ठेवणारी मीही नाही. त्या-त्या दिवशी तुझी 'आठवण' येतेय, मी व्याकुळतिकुळ झालेय, असंही झाल्याचं कधी स्मरत नाही. का व्हावं तसं? 'जो कधीच विसरला जात नाही त्याची आठवण कशी येणार?' वगैरे उठावदार ओळी सोडून देऊ. मुख्य गोष्ट अशी, की मी तुझी चाहती नाही. तुझ्या लिखाणाची पारायणं जरूर केलीयत, पण तुझ्या पुस्तकांतले उतारेच्या उतारे मला पाठ नसतात. त्यांतल्या वाक्यांचं 'ससंदर्भ स्पष्टीकरण' देता येईलच याची हमी नसते. आसुसून मिळवलेलं एखादं यश तुझ्या स्मृतीला अर्पण केलंय, असं कधी घडलं नाही.

होता, किशोरवयातला एक काळ होता, जेव्हा तुझ्या भेटीची, एकवार दर्शनाची आस होती. तुझ्या देहाबरोबर तीसुद्धा अदृश्य झाली.

अर्थात खुणा उरल्याच थोड्याफार! :) आत्ता आठवतंय. रविवारी लॉ कॉलेज रस्त्यावर जायचं असायचं. तू राहायचास ती 'मालती-माधव' तिथे आहे, म्हणून भांडारकर रस्त्याने जायचे - यायचे, प्रभात रस्ता टाळून! तू दिसणार नाहीस हे माहिती होतंच रे. तू नसलास तरी ती होतीच राहात तिथे..अंधुक आशा होतीच की, कधीतरी तिची उंच तरतरीत मूर्ती नजरेला पडेल म्हणून. तेही कधी घडलं नाही ते सोड.. पण त्या पाच-दहा मिनिटांत 'हरितात्या' यायचे माझ्या भेटीला. तो इतिहासपुरुष 'परवाचीच गोष्ट..' म्हटल्यासारखा सांगायला लागायचा. "हे असे आम्ही चितळ्यांच्या दुकानी गेलेलो, आणि हे विकत घेतले बुंदीचे लाडू. तो नोकर कसला वस्ताद रे! द्यायला लागला आपला त्या टीचभर पिशवीत घालून. भाईनी विचारलं..आता भाई म्हणजे कोण?"
..मी उत्साहात: "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार,अभिनेता, पद्मश्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडेऽऽऽऽ"...
हरितात्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हासू. "हांऽऽ, बरोब्बर. तर भाई म्हणाला, 'बॉक्समध्ये घालून देता का?' तो नोकर उर्मटपणे म्हणतो कसा - 'त्याचे पैसे द्यावे लागतील.' पट्‌किनी भाईनं विचारलंन्‌: "म्हणजे? लाडवांचे पैसे घेत नाही का तुम्ही?' "
मी त्या कोटीवर नाही, पण हरितात्यांच्या 'स्टाईल'वर फिदा होत हसत राहायचे.

तू असा हवा तेव्हा, हव्या त्या रूपात भेटत राहिल्यावर मग त्या प्रत्यक्षदर्शनाच्या इच्छेचे, चाहतेपणाच्या जबाबदारीचे सल मनात राहतीलच कसे?

मध्ये एका मित्राशी त्याच्या 'जिवीच्या जिवलगा'विषयी बोलणं चाललं होतं. कशावरनं तरी त्याला म्हटलं, "का? तू फॅन नाहीयेस तिचा?" तर म्हणतो: "काहीतरीच काय? अगं तिच्या बाबतीत हे सगळे शब्द तोकडे आहेत गं. ती त्यापलीकडची आहे. हे सगळं घासून गुळगुळीत झालेल्या स्तुती-शब्दांचं जग वेगळं आहे, आणि तिचं जग वेगळं आहे माझ्या मनात."

तुला काय म्हणू मी? 'दुस्तर हा घाट' मध्ये गौरीला अभिप्रेत असलेला माझा शेक्सपीअर, की मेघना म्हणते तसा 'तू माझ्या मनातला चांदीचा गणपती'?

तू तुळशीचं पान. तू बाळकैरीचा गाभा.तू तापल्या डोक्यावरचा आईचा हात. तू शुभ्र पारा. देवचाफ्याच्या फुलाचा गाभारा.

भावनाविवश होऊ नको म्हणतोस? नाही रे नाही. ही विवशता नाही. भावनासमृद्ध होते मी, तुला आळवताना. कसं रे माझं बोट पकडून मला जग दाखवायला घेऊन गेलास! 'तुझ्या वसंता'बद्दल गर्वानी ऊर भरून काय काय सांगितलंस. भागच पडलं मलाही मग पंडित वसंतखाँ 'अवलिया' देशपांडेंच्या भजनी लागणं. कुमारांच्या सुरांनी पागल होणं. भीमण्णांना लोटांगण घालणं. 'अख्तरीबाई' हा शब्द कानी आला तरी बोटं कानाच्या पाळ्यांना लावणं. शुद्ध निषाद काय आणि वर्ज्य स्वर कुठला आणि हे आणि ते..यातलं ओ का ठो कळत नसताना!
तू वूडहाऊसबद्दल लिहिलंस..अजून एनिड ब्लायटनचं बोट न सोडलेल्या मी 'जीव्ज अँड द फ्यूडल स्पिरिट' हातात घेतलं. तिथून पुढे तुझा वूडहाऊस माझा होणं काही कठीण नव्हतं. आपला प्लम आहेच तसा गुणाचा!
कोण कुठला खानोलकर - तू त्याला शापित यक्ष म्हणालास. देवचारासारखी न्याहाळत बसते मी आता त्याचं नक्षत्रांचं देणं.

तू आणि ती - you're like entangled quantum states to me..essentially unseparable. 'युवाम्‌' द्विवचनासारखं काहीतरी मराठीत असतं तर वापरलं असतं 'तू' च्या जागी. तिनं सांगितल्या तशा कविता ऐकल्या. बाकीबाबांना आपलंसं केल्यावाचून गत्यंतर होतं का मग? कार्लाईल, ब्राउनिंग जोडपं, सॉक्रेटिसापासून ते जी.एं.पर्यंत इहपरदेशीय लोकांशी तिनं दोस्ती घडवली.
आणि तिचं 'आहे मनोहर तरी..' ! तिच्या केसांवरून एकदा मायेनं हात फिरवावा, असं वाटलं वाचता वाचता. 'माणूस' म्हणून तुम्हां दोघांच्याही मी अजूनच प्रेमात त्यानंतर.

तू जाता जाता बोलावं तसं एखादं वाक्य लिहून जायचास. मला विचार करायला कायमची सोबत! 'आमच्याकडं येवढेच पैशे हायत' म्हणत स्वयंपाकाचं तेल पणतीतून नेणाऱ्या मुलीची आठवण तुला प्रत्येक दिवाळीला अस्वस्थ करून जायची..मलाही जाते आता. स्वातंत्र्यवीरांना 'प्रोमीथियस' म्हणालास. डोळ्यांत पाणी आलं रे. माणसाला अग्नी आणून दिल्याचं 'पाप' केल्याबद्दल देवानी साखळदंडांनी जखडलेला..जिवंतपणी गिधाडांच्या भक्ष्यस्थानी पडलेला..कुणाचीच कृतज्ञता न लाभलेला प्रोमीथियस.
नंदाच्या तोंडून "खूप प्रेमं केली" वदवताना किती खोलवर हलवलंस. त्या मध्यमवर्गीय पांढऱ्या पेशींचं अवसान फेकायला लावलंस. 'तोकडं' हा एकच शब्द ज्याला लावावा असं आपलं सुरक्षित अनुभवविश्व आहे, याची जाणीव करून दिलीस. 'अजून ऐकूया, अजून वाचूया, अजून पाहूया' हा हव्यास इथूनच आला असणार नं?

तुझी चाहती होते तेव्हा टीकाकारांशी पूर्वी खूप भांडायचे मी. रडकुंडीला यायचे, तुला 'साहित्यिक प्रतिभा नाही' असं कोणी म्हटलं की. " तूही त्यातलाच : 'मध्यमवर्गीय अनुभवकक्षेतून बाहेर न पडलेला', 'स्त्रियांबद्दल अनुदार दृष्टिकोनातून लिहिलेला', 'भावनावैविध्य न दाखवलेला', 'एखाद्या गोष्टीची/व्यक्तीची वाईट बाजू अजिबात न दाखवणारा'. " हे सगळं ऐकताना राग राग यायचा. आता नाही येत. आता मी शांतपणे हसून 'बरं' म्हणते आणि सोडून देते. ती सुकल्या झाडाला न बोलता पाणी घालते ना, तसंच.

'तू दिलंयस ते इतकं आहे, की काय दिलं नाहीस याचा विचार कोण करेल' असं मी म्हणत नाही. खरं तर, तू जे दिलंस त्यानंच 'काय दिलं नाहीस' याचा विचार करायला समर्थ बनवलं. 'अजून काय मिळवायचं आहे' यावर विचार करायला भाग पाडलं.

कधी वाटतं, तुला देव्हाऱ्यात बसवतेय का रे मी? तुझी कोणतीच गोष्ट मला खटकत नाही, असं का? कधीतरी..ज्या वयात मूर्तीपूजेसाठी कोणीतरी समोर असण्याची गरज असते, तेव्हा नेमका तू सापडलास म्हणून तुला बसवून टाकलं का मी तिथे?
असेल. तसं झालं असेलही सुरुवातीला. तुझा विनोद सुंदर होता..निर्मळ होता. तू वर्णन केलंस ते 'हे जीवन सुंदर आहे' याचंच. कधी क्वचित एखादी कुरूप गोष्ट आलीच अपरिहार्यपणे पुढे तरी तिचा विखार माझ्या डोळ्यासमोर येऊ दिला नाहीस. सावध केलंस, पण 'ही कुरूप गोष्टदेखील सुंदर बनवता येईल' असा आशावाद आधी दिलास. आपल्याच मनातल्या स्वत:च्या आदर्श प्रतिमेमागे धावत कुचम्बत जगणारे आम्ही..तुझा बंधनांतून मुक्त करणारा 'काकाजी' भुलावणारच आम्हांला.

पण मला वाटतं, सुरुवात अशी मूर्तिपूजेतून झाली असली, तरी आज तुला मी देव्हाऱ्यात ठेवलेलं नाही. देवाला तरी बांधून कशाला, आणि कसं ठेवायचं रे? 'देव' ही संकल्पनाच आहे नं शेवटी? मनातल्या सगळ्या मंगल, सकारात्मक, समर्थ, समजूतदार, ज्ञानी, आशावादी विचारांचं एक सगुण रुपडं - आपल्याच 'मोठ्या मनाचं' एक प्रतीक? माझ्या मनातला तूसुद्धा एक वृत्ती आहेस खरं म्हणजे..आणि माझ्यासाठी तिचं एक निखालस गोजिरं प्रतीक आहेस तू!

दररोज जगताना, डोळे-कान उघडे असले तर आणि नसले तरीही..किती असुंदर भुतावळ हल्ला करत असते! ती इतकी अपरिहार्य असते, की दूर पळून जायला ना जागा असते, ना वेळ असतो.
पण 'सारा सारा तुझा तुझा सडा' माझ्या सामोरा असतो. तुझ्या ..म्हणजे आता माझ्याच..विचारांच्या अमलताशाच्या सोनसळी पाकळ्या माझ्या वाटेवर पडलेल्या. 'काट्यांतून जातानाही पायभर मखमल' होतेच आपसूक!

You're My Immortal .
Just the reverse of how 'Evanescence' puts it.


When I cried, you'd wipe away all of my tears
when I'd scream, you'd fight away all of my fears
You've held my hand through all of these years
And I still have..all of you!

27 Comments:

वाह! कौतुक करायला शब्दच नाहीत माझ्याकडे! वाचताना असं वाटत होतं जणू मीरा तिच्या कृष्णाशी बोलतेय, आणि आपणही तिचं ते बोलणं नि:शब्द होवून फ़क्त ऐकतोये..!

इतिBlogger सर्किट
Friday, October 20, 2006 6:27:00 PM  

वा गायत्री! अभिजीतशी सहमत. I am speechless!

इतिBlogger Sumedha
Friday, October 20, 2006 7:58:00 PM  

अतिशय सुंदर लिहिलंय... Hats off to you!

इतिAnonymous Anonymous
Friday, October 20, 2006 9:01:00 PM  

किती तन्मयतेनं लिहिलं आहेस गायत्री! प्रत्येक ओळ न ओळ सुरेख आहे. मनापासून आवडलं.

इतिBlogger Tulip
Friday, October 20, 2006 9:53:00 PM  

चुप चुप खडे हो जरूर कोइ बात है
पहली मुलाकात है ये पहली मुलाकात है.
ही पहिली भेटच फ़ार चटका लावून जाते.

ही भेट प्रेमभंगाची नाही तर,
ही भेट प्रेमसमर्पितेची आहे
या शापित प्रेमकहाणीला उ:शाप मिळो
हीच सदिच्छा.
जाता जाता एका गाण्याची आठवण करून द्याविशी वाटते.
अजीत कडकडे यांचे अगदी सुरवातीचे आहे
"छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये,
त्रुणांकुरांची शय्या आणिक
तुझाच बाहू उशाला,
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला"
गायत्री, तुझ्या अनुभवसिद्ध लिहीण्याबद्दल मी वेगळे काय लिहू.
जपून रहा हेच म्हणू शकतो.

इतिBlogger hemant_surat
Saturday, October 21, 2006 12:52:00 AM  

Deadly!

इतिBlogger Ojas
Saturday, October 21, 2006 2:53:00 AM  

पु.लं. शिवायही मराठीत चांगलं लिहिणारे लोक आहेत, मराठीत फक्त विनोदच लिहिले गेले नाहीत, रीरीयस (आणि खरं तर सेन्सिबल) लिटरेचर लिहिणारे मराठीत होऊन गेले आणि अजुन आहेत - या आणि अशा लॉगिकला डिफेंड करताना पु.लं. वर मी तुझ्याएवढं प्रेम मी कधीच करु शकलो नाही ही बोच नेहमीच मला राहील.

बऱ्याचदा टाळूनही कधीही न टाळता येणारे पु.ल. जेव्हा जेव्हा वाचत गेलो, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर टीकाच काय स्तुती करायचीही आपली लायकी नाही हे पटत गेलं. लहानपणी ते आवडले होते ते वेगळ्या कारणांसाठी, मोठेपणी वेगळ्या. 'आमच्याकडे धाच पैशे हायेत' च्या आठवणीनेही आत, अजुनही, 'गदगदल्या' शिवाय रहात नाही....
कधीकाळी मी मराठी साहित्याच्या काहीशा तोकडेपणासाठी त्यांना जबाबदार धरलं होतं याची खंत नेहमीच मनात राहिल.....

राहुलने मला लग्नात भेट म्हणुन 'एक कवितांजली' हा सुनिताबाईंच्या कवितांचा कॅसेट सेट दिला. का कुणास ठाऊक कुठल्या हेक्यातुन - त्यांचं 'आहे मनोहर तरी' मी कधीच वाचलं नाही. कॅसेट प्लेयर (हल्ली कोण वापरतं) नसल्याने मागच्या आठवड्यापर्यंत त्या कॅसेट्स ऐकल्या नव्हत्या.
बायको ने नविन म्युझिक सिस्टिम घेतली, त्यात कॅसेट प्लेयरही होता. पण तिला मराठी कळत नाही या सबबी खाली त्या ऐकणं परत टाळलं.....
परवा अगदीच ऐकायला काही नव्हतं म्हणुन पहिली कॅसेट लावली.
ऐकायला लागलो आणि आईशपथ पूर्ण करू शकलो नाही!
काही ऐकलेल्या - न ऐकलेल्या कविता, त्यांचे पु.लं. बरोबरचे अनुभव......

च्यामारी मला शब्दांशी खेळायला आवडतं, पण मला 'लायकीचा' एकही शब्द सुचत नाहिये वर्णन करायला! आणि पुरेसं धैर्य एकवटत नाहिये पुढच्या कविता भोगायला....

गायत्री - मी उगीच कुणाची फालतु स्तुती करत नाही, पण तुझा हा लेख ईमान्दारीत तिनदा वाचलाय, दरवेळेस नविन काहीतरी सापडलंय, आणि दरवेळेस अजुन काही नविन सापडेल याची खात्री वाटतिए.

लढ.

इतिBlogger Abhijit Bathe
Saturday, October 21, 2006 3:09:00 AM  

great!

इतिBlogger Nandan
Saturday, October 21, 2006 3:49:00 AM  

पुन्हा वाचणे आणि पुन्हा विचार करणे यातून गुलजारचेच बोल आठवले
"हमने देखी है उन ऑंखोकी महकती खुशबू,
हाथ से छू के उन्हे रिश्तोंका इल्जाम नादो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यारही रहने दो कोइ नाम ना दो."

इतिBlogger hemant_surat
Saturday, October 21, 2006 9:26:00 AM  

या अप्रतिम लेखावर काय गं लिहू प्रतिक्रीया??, एव्ह्ढच सांगतो, वाचताना डोळ्यातुन पाणी आलं आणि ते अडवावसं अजिबात वाटलं नाही... पु.ल. गेले तो दिवस , आणि त्या दिवशी मी त्यांच अंतिम दर्शन घेऊन रस्त्यावरून रडत-रडत जात होतो, तो प्रसंग आला बघ एकदम डोळ्यासमोर...

इतिBlogger Prasad Chaphekar
Saturday, October 21, 2006 2:22:00 PM  

excellent gayatri;
sometimes when you read some kind of heart-touching like this you feel that you must write like this!!!! and at the second instant you suddenly realise that you are just not suppose to take that height!!!!!!
But one thing for sure that you can appreciate this from heart!
Thanks for providing some touchy to the heart!!!

इतिBlogger varad
Monday, October 23, 2006 4:07:00 AM  

...

इतिAnonymous Anonymous
Monday, October 23, 2006 9:52:00 AM  

Badibi, aapane ye aehsaan kiya hai muz par !

- saksham

इतिAnonymous Anonymous
Thursday, October 26, 2006 7:11:00 PM  

good writing . u can add a little to make a complete creative critic artical ! changla nirikshan ahe ani sangatwar mandani ahe . keep it up !

Ashutosh Javadekar

इतिAnonymous Anonymous
Friday, November 03, 2006 12:54:00 AM  

Simply amazing...kharach I can't explain what i felt after reading this...

इतिBlogger Anand Sarolkar
Monday, November 13, 2006 12:10:00 PM  

गायत्री,

अप्रतिम लिहीलं आहेस. शब्द अन शब्द मनाला भिडतोय.

इतिBlogger Raina
Wednesday, November 15, 2006 7:07:00 AM  

tuzya 'tyachi'samvedansheelta, soundarydrishti aani gungrahakata tuzyamadhye akhand zirpat raaho hi shubhechcha. i think it will be a major life support.

इतिAnonymous Anonymous
Wednesday, November 15, 2006 8:57:00 AM  

भावनासमृद्ध होते मी, तुला आळवताना.

हे वाक्य तमाम भावनप्रधान जनांचे मनोगत व्यक्त करते. पु.लं. किंवा तत्सम असामी काळाच्या पडद्याआड जाते तेव्हा आपल्याबरोबर प्रतिभेचा, अनुभवाचा अनमोल खजिना घेऊन जाते. सुरेश भट गेले तेव्हा ही मी असाच हळवा झालो होतो. प्रश्न पडतो की आत कोण तशा कथा लिहिणार? कोण गझला लिहिणार? आणि लिहिल्या तरी ते पु.लं किंवा भट थोडेच असणार आहेत. :-(

इतिBlogger abhijit
Wednesday, November 15, 2006 1:15:00 PM  

अगदी खरं लिहिलंय!
नि:श्वास टाकण्यापलिकडे काही प्रतिक्रीया तरी का द्यावी?

इतिAnonymous Anonymous
Wednesday, November 15, 2006 9:31:00 PM  

कंप्लीट नाद खुळा!

इतिAnonymous Anonymous
Saturday, November 18, 2006 5:02:00 PM  

केवळ उच्च! पु.लं.बद्दल कुठलेही मत असणारी व्यक्ती ह्या लेखाला नमस्कार केल्याशिवाय राहूच शकत नाही. इतकी सुंदर रचना वाचण्याचा सुदिन रोज येत नाही. अप्रतिम !

इतिAnonymous Anonymous
Saturday, December 16, 2006 3:08:00 PM  

I am truly speechless...!!!

इतिAnonymous Anonymous
Tuesday, December 26, 2006 9:06:00 PM  

Cant stop to comment........

SPEECHLESS,OR U CAN SAY JUST
SPELLBOUND BY UR WRITTING !

KEEP IT UP :)

इतिAnonymous Anonymous
Tuesday, February 06, 2007 6:28:00 PM  

बऱ्याच दिवसानी भेट झाली! ती ही अशी ... ईथे होईल कल्पना नव्हती! कोणीतरी तुझ्या 'या' ब्लॉगची लिंक दिली ... आणि नाव बघतोय तर गायत्री नातु!

प्रेमाच्या व्याख्या हजार बनल्या ... हजार लोक हजार वेगवेगळ्या प्रकारे गुंतले ... तुझे प्रेमही असेच एक. छान लिहीलेयस. पुलं ऐकून बरेच दिवस झालेत, पण आता परत वाचायची लहर आली हे वाचल्यानंतर.

बाकी keep loving :)

इतिBlogger ओहित म्हणे
Thursday, May 03, 2007 1:28:00 AM  

वा वा वा!!

इतिBlogger स्वाती आंबोळे
Thursday, May 24, 2007 11:27:00 PM  

khup chhan lihal ahe

इतिBlogger arvind kulkarni
Tuesday, May 29, 2007 8:06:00 PM  

exquisite.......!!!!!!!!!!!
वाचल्यापासून एक हुरहुर दाटून राहीली आहे उरात..!
......अभिजित

इतिAnonymous Anonymous
Saturday, March 08, 2008 2:45:00 AM  

Post a Comment

<< Home