Friday, October 20, 2006

दिवाळीच्या शुभेच्छा!

My Immortal

१२ जून. ८ नोव्हेंबर.
तारखांमध्ये बांधला जाणारा तू नव्हेस आणि तशी तुला बांधून ठेवणारी मीही नाही. त्या-त्या दिवशी तुझी 'आठवण' येतेय, मी व्याकुळतिकुळ झालेय, असंही झाल्याचं कधी स्मरत नाही. का व्हावं तसं? 'जो कधीच विसरला जात नाही त्याची आठवण कशी येणार?' वगैरे उठावदार ओळी सोडून देऊ. मुख्य गोष्ट अशी, की मी तुझी चाहती नाही. तुझ्या लिखाणाची पारायणं जरूर केलीयत, पण तुझ्या पुस्तकांतले उतारेच्या उतारे मला पाठ नसतात. त्यांतल्या वाक्यांचं 'ससंदर्भ स्पष्टीकरण' देता येईलच याची हमी नसते. आसुसून मिळवलेलं एखादं यश तुझ्या स्मृतीला अर्पण केलंय, असं कधी घडलं नाही.

होता, किशोरवयातला एक काळ होता, जेव्हा तुझ्या भेटीची, एकवार दर्शनाची आस होती. तुझ्या देहाबरोबर तीसुद्धा अदृश्य झाली.

अर्थात खुणा उरल्याच थोड्याफार! :) आत्ता आठवतंय. रविवारी लॉ कॉलेज रस्त्यावर जायचं असायचं. तू राहायचास ती 'मालती-माधव' तिथे आहे, म्हणून भांडारकर रस्त्याने जायचे - यायचे, प्रभात रस्ता टाळून! तू दिसणार नाहीस हे माहिती होतंच रे. तू नसलास तरी ती होतीच राहात तिथे..अंधुक आशा होतीच की, कधीतरी तिची उंच तरतरीत मूर्ती नजरेला पडेल म्हणून. तेही कधी घडलं नाही ते सोड.. पण त्या पाच-दहा मिनिटांत 'हरितात्या' यायचे माझ्या भेटीला. तो इतिहासपुरुष 'परवाचीच गोष्ट..' म्हटल्यासारखा सांगायला लागायचा. "हे असे आम्ही चितळ्यांच्या दुकानी गेलेलो, आणि हे विकत घेतले बुंदीचे लाडू. तो नोकर कसला वस्ताद रे! द्यायला लागला आपला त्या टीचभर पिशवीत घालून. भाईनी विचारलं..आता भाई म्हणजे कोण?"
..मी उत्साहात: "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार,अभिनेता, पद्मश्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडेऽऽऽऽ"...
हरितात्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हासू. "हांऽऽ, बरोब्बर. तर भाई म्हणाला, 'बॉक्समध्ये घालून देता का?' तो नोकर उर्मटपणे म्हणतो कसा - 'त्याचे पैसे द्यावे लागतील.' पट्‌किनी भाईनं विचारलंन्‌: "म्हणजे? लाडवांचे पैसे घेत नाही का तुम्ही?' "
मी त्या कोटीवर नाही, पण हरितात्यांच्या 'स्टाईल'वर फिदा होत हसत राहायचे.

तू असा हवा तेव्हा, हव्या त्या रूपात भेटत राहिल्यावर मग त्या प्रत्यक्षदर्शनाच्या इच्छेचे, चाहतेपणाच्या जबाबदारीचे सल मनात राहतीलच कसे?

मध्ये एका मित्राशी त्याच्या 'जिवीच्या जिवलगा'विषयी बोलणं चाललं होतं. कशावरनं तरी त्याला म्हटलं, "का? तू फॅन नाहीयेस तिचा?" तर म्हणतो: "काहीतरीच काय? अगं तिच्या बाबतीत हे सगळे शब्द तोकडे आहेत गं. ती त्यापलीकडची आहे. हे सगळं घासून गुळगुळीत झालेल्या स्तुती-शब्दांचं जग वेगळं आहे, आणि तिचं जग वेगळं आहे माझ्या मनात."

तुला काय म्हणू मी? 'दुस्तर हा घाट' मध्ये गौरीला अभिप्रेत असलेला माझा शेक्सपीअर, की मेघना म्हणते तसा 'तू माझ्या मनातला चांदीचा गणपती'?

तू तुळशीचं पान. तू बाळकैरीचा गाभा.तू तापल्या डोक्यावरचा आईचा हात. तू शुभ्र पारा. देवचाफ्याच्या फुलाचा गाभारा.

भावनाविवश होऊ नको म्हणतोस? नाही रे नाही. ही विवशता नाही. भावनासमृद्ध होते मी, तुला आळवताना. कसं रे माझं बोट पकडून मला जग दाखवायला घेऊन गेलास! 'तुझ्या वसंता'बद्दल गर्वानी ऊर भरून काय काय सांगितलंस. भागच पडलं मलाही मग पंडित वसंतखाँ 'अवलिया' देशपांडेंच्या भजनी लागणं. कुमारांच्या सुरांनी पागल होणं. भीमण्णांना लोटांगण घालणं. 'अख्तरीबाई' हा शब्द कानी आला तरी बोटं कानाच्या पाळ्यांना लावणं. शुद्ध निषाद काय आणि वर्ज्य स्वर कुठला आणि हे आणि ते..यातलं ओ का ठो कळत नसताना!
तू वूडहाऊसबद्दल लिहिलंस..अजून एनिड ब्लायटनचं बोट न सोडलेल्या मी 'जीव्ज अँड द फ्यूडल स्पिरिट' हातात घेतलं. तिथून पुढे तुझा वूडहाऊस माझा होणं काही कठीण नव्हतं. आपला प्लम आहेच तसा गुणाचा!
कोण कुठला खानोलकर - तू त्याला शापित यक्ष म्हणालास. देवचारासारखी न्याहाळत बसते मी आता त्याचं नक्षत्रांचं देणं.

तू आणि ती - you're like entangled quantum states to me..essentially unseparable. 'युवाम्‌' द्विवचनासारखं काहीतरी मराठीत असतं तर वापरलं असतं 'तू' च्या जागी. तिनं सांगितल्या तशा कविता ऐकल्या. बाकीबाबांना आपलंसं केल्यावाचून गत्यंतर होतं का मग? कार्लाईल, ब्राउनिंग जोडपं, सॉक्रेटिसापासून ते जी.एं.पर्यंत इहपरदेशीय लोकांशी तिनं दोस्ती घडवली.
आणि तिचं 'आहे मनोहर तरी..' ! तिच्या केसांवरून एकदा मायेनं हात फिरवावा, असं वाटलं वाचता वाचता. 'माणूस' म्हणून तुम्हां दोघांच्याही मी अजूनच प्रेमात त्यानंतर.

तू जाता जाता बोलावं तसं एखादं वाक्य लिहून जायचास. मला विचार करायला कायमची सोबत! 'आमच्याकडं येवढेच पैशे हायत' म्हणत स्वयंपाकाचं तेल पणतीतून नेणाऱ्या मुलीची आठवण तुला प्रत्येक दिवाळीला अस्वस्थ करून जायची..मलाही जाते आता. स्वातंत्र्यवीरांना 'प्रोमीथियस' म्हणालास. डोळ्यांत पाणी आलं रे. माणसाला अग्नी आणून दिल्याचं 'पाप' केल्याबद्दल देवानी साखळदंडांनी जखडलेला..जिवंतपणी गिधाडांच्या भक्ष्यस्थानी पडलेला..कुणाचीच कृतज्ञता न लाभलेला प्रोमीथियस.
नंदाच्या तोंडून "खूप प्रेमं केली" वदवताना किती खोलवर हलवलंस. त्या मध्यमवर्गीय पांढऱ्या पेशींचं अवसान फेकायला लावलंस. 'तोकडं' हा एकच शब्द ज्याला लावावा असं आपलं सुरक्षित अनुभवविश्व आहे, याची जाणीव करून दिलीस. 'अजून ऐकूया, अजून वाचूया, अजून पाहूया' हा हव्यास इथूनच आला असणार नं?

तुझी चाहती होते तेव्हा टीकाकारांशी पूर्वी खूप भांडायचे मी. रडकुंडीला यायचे, तुला 'साहित्यिक प्रतिभा नाही' असं कोणी म्हटलं की. " तूही त्यातलाच : 'मध्यमवर्गीय अनुभवकक्षेतून बाहेर न पडलेला', 'स्त्रियांबद्दल अनुदार दृष्टिकोनातून लिहिलेला', 'भावनावैविध्य न दाखवलेला', 'एखाद्या गोष्टीची/व्यक्तीची वाईट बाजू अजिबात न दाखवणारा'. " हे सगळं ऐकताना राग राग यायचा. आता नाही येत. आता मी शांतपणे हसून 'बरं' म्हणते आणि सोडून देते. ती सुकल्या झाडाला न बोलता पाणी घालते ना, तसंच.

'तू दिलंयस ते इतकं आहे, की काय दिलं नाहीस याचा विचार कोण करेल' असं मी म्हणत नाही. खरं तर, तू जे दिलंस त्यानंच 'काय दिलं नाहीस' याचा विचार करायला समर्थ बनवलं. 'अजून काय मिळवायचं आहे' यावर विचार करायला भाग पाडलं.

कधी वाटतं, तुला देव्हाऱ्यात बसवतेय का रे मी? तुझी कोणतीच गोष्ट मला खटकत नाही, असं का? कधीतरी..ज्या वयात मूर्तीपूजेसाठी कोणीतरी समोर असण्याची गरज असते, तेव्हा नेमका तू सापडलास म्हणून तुला बसवून टाकलं का मी तिथे?
असेल. तसं झालं असेलही सुरुवातीला. तुझा विनोद सुंदर होता..निर्मळ होता. तू वर्णन केलंस ते 'हे जीवन सुंदर आहे' याचंच. कधी क्वचित एखादी कुरूप गोष्ट आलीच अपरिहार्यपणे पुढे तरी तिचा विखार माझ्या डोळ्यासमोर येऊ दिला नाहीस. सावध केलंस, पण 'ही कुरूप गोष्टदेखील सुंदर बनवता येईल' असा आशावाद आधी दिलास. आपल्याच मनातल्या स्वत:च्या आदर्श प्रतिमेमागे धावत कुचम्बत जगणारे आम्ही..तुझा बंधनांतून मुक्त करणारा 'काकाजी' भुलावणारच आम्हांला.

पण मला वाटतं, सुरुवात अशी मूर्तिपूजेतून झाली असली, तरी आज तुला मी देव्हाऱ्यात ठेवलेलं नाही. देवाला तरी बांधून कशाला, आणि कसं ठेवायचं रे? 'देव' ही संकल्पनाच आहे नं शेवटी? मनातल्या सगळ्या मंगल, सकारात्मक, समर्थ, समजूतदार, ज्ञानी, आशावादी विचारांचं एक सगुण रुपडं - आपल्याच 'मोठ्या मनाचं' एक प्रतीक? माझ्या मनातला तूसुद्धा एक वृत्ती आहेस खरं म्हणजे..आणि माझ्यासाठी तिचं एक निखालस गोजिरं प्रतीक आहेस तू!

दररोज जगताना, डोळे-कान उघडे असले तर आणि नसले तरीही..किती असुंदर भुतावळ हल्ला करत असते! ती इतकी अपरिहार्य असते, की दूर पळून जायला ना जागा असते, ना वेळ असतो.
पण 'सारा सारा तुझा तुझा सडा' माझ्या सामोरा असतो. तुझ्या ..म्हणजे आता माझ्याच..विचारांच्या अमलताशाच्या सोनसळी पाकळ्या माझ्या वाटेवर पडलेल्या. 'काट्यांतून जातानाही पायभर मखमल' होतेच आपसूक!

You're My Immortal .
Just the reverse of how 'Evanescence' puts it.


When I cried, you'd wipe away all of my tears
when I'd scream, you'd fight away all of my fears
You've held my hand through all of these years
And I still have..all of you!