Friday, November 09, 2012

बंगालची गाणी (१) : श्यामा संगीत

बंगाल प्रांतातल्या लोकगीतांचं शोधता येईल असं मूळ म्हणजे वैष्णव परंपरेतली भक्तिगीतं आणि सुफ़ी संतांची कवनं. हा काळ होता इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या आसपासचा -म्हणजे महाराष्ट्रातला ज्ञानेश्वरांचा काळ. ’गीतगोविंद’ लिहिणारा कलिंग (ओदिशा) प्रांतातला जयदेव, मैथिल कविकोकिल विद्यापति यांच्यासारख्या कवींच्या रचना ईशान्य भारतातल्या लोकपरंपरेत सहज मिसळल्या. राधा-कृष्णाच्या लीला सांगाणार्‍या त्या सरळसोप्या, खटकेबाज पदांचा प्रभाव आसपासच्या भागात नव्याने जन्माला येणार्‍या बंगाली भाषेवर होता. देवाला माणसात आणणार्‍या या गाण्यांचा आणि भक्तीला तत्त्वज्ञानाचं रूप देणार्‍या सुफ़ी कवितांचा वारसा बंगालच्या श्यामा संगीताला मिळाला असावा.
’श्यामा संगीत’ म्हणजे देवीची आराधना करणारी गाणी. ’शिव’ हे जगामधलं स्थिर असणारं ब्रह्मतत्त्व आणि ’शक्ती’ ही या तत्त्वामध्ये चेतना आणणारी कर्ती या कल्पनांच्या आधारानं शक्तीला, स्त्रीरूप देवतेला प्रमुख मानून तिची पूजा करणारा ’शाक्तपंथ’ त्या भागात प्रचलित होता. आधुनिक बंगालात देवीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमुळेच असावं. दुर्गा, गौरी आणि उमा ही या देवीची शांत रूपं आणि काली हे भयंकर रूप असं मानतात. नवरात्रीच्या काळात होते ती ’दुर्गापूजा’ आणि दिवाळीच्या वेळी होते ती ’कालीपूजा’. पूजेच्या दिवसांत बंगालमध्ये गल्ल्यागल्ल्यांतून लागलेल्या मंडपांमध्ये ’ढाक’ म्हणजे ढोलाच्या तालावर हे पुरातन श्यामासंगीत आजही ऐकू येतं.

श्यामा संगीतामध्ये कालीमातेबद्दलची, तिला ’आई’ म्हणून हाकारून तिची स्तुती करणारी गाणी आहेत, तसंच तिच्यावर चिडून, रुसून आरोप करणारी, तिची थट्टा करणारी गाणीही आहेत. उमासंगीत, आगमनी संगीत आणि विजया संगीत हे श्यामा गाण्यांचे उपप्रकार; पण त्यांच्यात हिमालय आणि मेनकेची मुलगी उमा म्हणजेच दुर्गा, तिचं शंकराच्या घरून नऊ दिवसांकरता माहेरी येणं (आगमन) आणि विजयादशमीला परत जाणं या घटनांची वर्णनं असलेली गाणी आहेत – साधारण आपल्या हादग्याच्या किंवा भोंडल्याच्या गाण्यांसारखी. 
कुठल्यातरी असाध्य, अप्राप्य रूपात देवाची कल्पना करायच्या ऐवजी देव अगदी आपल्यातुपल्या गट्टीत असल्यासारखा हा निरागस भक्तिभाव:


 (१) गीतकार: रामप्रसाद सेन (इ.स. अठरावं शतक) [विकिपीडिया संदर्भ]
(या मूळ गाण्याची ऑडियो फ़ाईल आंतरजालावर मिळाली नाही )

मा, मा बोले आर डाकबो ना
ओ मा दिएछो, दितेछो कॉतोई जॉन्त्रोना
छिलेम ग्रिहोबाशी, कोरिले शोन्नॅशी
आर की खोमोता राखो एलोकेशी
घॉरे घॉरे जाबो
भिख्खा मेगे खाबो
मा बोले आर कोले जाबो ना
डाकी बारे बारे ’मा, मा’ बोलिये
मा, की गो रेखो चोख्खु कॉर्नो फेरे?
मा बिद्दोमाने ए दुख्खो शॉन्तानेर
मा मोले की आर छेले बांचे ना

"आई, तुला आता मी ’आई’ म्हणून हाक मारणारच नाही बघ.
तू मला खूप त्रास दिलायस आणि देतेच आहेस अजून!

चांगला खाऊन-पिऊन सुखात घरी राहात होतो, तर तू संन्यासी बनवलंस.
अगं जटियाळे, अजून काय काय वाट्टोळं करणारेस माझं?

दारोदार वणवण करून भिक्षाच मागायला लागतेय ना मला?
जा, अज्जिबात येत नाही आता ’माझी आई गं ती,’ म्हणत तुझ्या कुशीत शिरायला.

मी इतक्यांदा तुला ’आई, ए आई’ म्हणून बोलवतोय, आणि तू तोंड फिरवून बसली आहेस.
माझं ऐकत नाहीस की माझ्याकडे बघत नाहीस. का गं असं करतेस?
आई समोर असताना असं पोरक्यासारखं वाटतंय मला.
सख्ख्या आईला आपल्या पोराचे असे हाल बघवतील तरी का?

ज्जा मग- आता नाहीच म्हणणार तुला ’आई’.


**

(2) गीतकार: काज़ी नज़रूल इस्लाम [विकिपीडिया संदर्भ]




(या गाण्यात ’काली’ या शब्दावर सुरेख श्लेष केलाय - काली म्हणजे देवी आणि काली म्हणजेच काजळी / शाई.)

 माझ्या हातावर काली, तोंडावर काली
माझं शाई-माखलं तोंड पाहून आई
खो-खो हसते गं सारी गल्ली!


मला लिहा-वाचायला होईना मुळी
’म’ मध्ये दिसे श्यामा सावळी
’क’ पाहून, ’काली’ म्हणून
नाचत सुटतो, पिटत टाळी


रेघांच्या कागदावर काळे आकडे
बघून डोळ्यांतून पाण्याच्या रेघा
तुझ्या वर्णाशिवाय दुसरे वर्ण
येतच नाहीत मला गं काली!


तू जे लिहितेस आई रानात-पानांत
दर्याच्या पाण्यात, नभाच्या वहीत
ते सारं येतं की वाचता मला! - मग
म्हणो जग मूर्ख, करो शिवी-गाळी!

आमार हाते काली, मुखे काली
आमार काली-माखा मुख देखे मा
पाडार लोके हांशे खाली
मोर लेखा-पोडा होलो ना मा
आमी ’म’ देखतेई देखी श्यामा
आमी ’क’ देखतेई काली बोले
नाची दिये कॉरो ताली
कालो आंक देखे मा धारा-पातेर
धारा नामे आखी पाते
आमार बॉर्नोपोरिचोय होलो ना मा
तोर बॉर्नोबिना काली
जा लिखीश मा बोनेर पाताय
सागोर जोले आकाश खाताय
आमी शे लेखातो पोडते पारी
लोके मूर्खो बोले दिते ना गाली

--


यातलं ’कालो आंक देखे मा..’ हे कडवं किती अव्वल आहे! शाळेत जायच्या वयात हे गाणं माहिती असायला पाहिजे होतं :)
 

***

(3) उमासंगीत


उमे गं! का गं परक्याच्या घरी नांदतेस?
सांग ना, कशासाठी तिथे नांदतेस?
कुणीबुणी लोक काहीबाही बोलतात -
ऐकूनच काळजात धस्स होतं माझ्या!
कशाला गेलीस बायो तिकडे नवर्‍याकडे?

आईचं मन माझं - कसा धीर धरवेल?
आमचा जावई तिकडे दारोदार भिक्षा मागत फिरतो म्हणे!
या खेपेला परत न्यायला आला तो शंकर तुला, तर 
(तुला दडवून ठेवीन, आणि)
त्याला सांगेन, "आमच्याइथे नाहीच्चेय मुळी उमा."

ओ मा, केमॉन कोरे पोरेर घोरे छिली उमा,
बोलो मा ताइ, केमॉन कोरे पोरेर घोरे?
कोतो लोके कोतो बोले, शुने भेबे मोरे जाइ, केमॉन कोरे पोरेर घोरे?
मा’र प्राने कि धोइर्जो धोरे? जामाई ना कि भिख्खा कोरे!
एबार निते एले बोलबो होरे, उमा आमार घोरे नाई!

***

श्यामा संगीतावरचा एक उत्तम इंग्रजी निबंध इथे आहे: 

http://www.parabaas.com/translation/database/translations/essays/shyamasangeet.html

Thursday, November 08, 2012

बंगालची गाणी (०)

लहानपणी स्वत:च्या आवडीनिवडी ठरवत असताना ’पु. लं. काय म्हणतात?’ ही माझी एक हुकमी कसोटी असायची. ’लहान मुलांशी बोललेलं मराठी म्हणजे बंगाली’ असली ती गोजिरी असावीशी भाषा शिकायला हा माणूस साठाव्या वर्षी शांतिनिकेतनात गेला, त्यांच्या आजोबांनी रवीन्द्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा मराठीत अभंगरूपी अनुवाद केला होता असल्या गोष्टी वाचून बंगालीचा मीम आपोआप डोक्यात घुसला. नंतर खुद्द पुलंनी टागोरांच्या लहानपणीच्या आठवणींचा (आमार छेलेबेला) केलेला ’पोरवय’ नावाचा फार सुंदर अनुवाद वाचायला मिळाला, आणि ’क्रेसेंट मून’ मधल्या काही कविता ’सकाळ’ वृत्तपत्रात  यायच्या त्यासुद्धा. त्यामुळे “आपण बांग्लोफाइल आहोत” असं ठरवून टाकायला फार कष्ट पडले नाहीत.

माझं पदवीचं आणि त्यापुढचं शिक्षण केमिस्ट्रीत झाल्यामुळे बंगाली लोक आसपास असायचेच. (“ प्युअर सायन्सचं बंगाली बुद्धिजीवी वर्गाला असलेलं आकर्षण आणि त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये उच्चशिक्षण घेणारे बंगाली घोळके” हा खासगी चर्चेचा विषय आहे!) पण जाता-येता कानांवर पडलेल्या संवादांमधून जे काही किडुकमिडुक बंगाली मला समजायला लागलं, त्यातून ही भाषा खरंच आवडायला लागली. कधीमधी दहा-बारा बंगाली पोरापोरींच्या ’खास अड्ड्या’मध्ये सामील होता आलं, आणि ’क्रीकेट, मूभीज्‌, पॉलिटिक्स’ वरचं भिभेचन – आपलं – विवेचन ऐकायला मिळालं. भाषेचं बोट धरूनच चालीरीती, समजुती, साहित्य वगैरे सांस्कृतिक गोष्टींची झलक मिळाली – मग ’बंगाली कल्चर आणि मराठी कल्चरमध्ये खूपच सिमिलॅरिटीज्‌ आहेत हां ..म्हणजे तुम्हांला नाटकं आवडतात, आम्हांलापण. तुम्हीही तोंडपाटील , आम्हीही (म्हणजे अगदीच ’बाबू’ नसलो तरी..). राजकारणासकट अनेक गोष्टी तुमच्यासाठी ’तत्त्वाचा’ प्रश्न बनतात; आमच्यासाठीही. तुमची दुर्गापूजा आणि पूजोशांखो, तसे आमचे गणेशोत्सव आणि दिवाळी अंक. कोलकाता जसं तुमच्या भाषिक जगाचं केद्रंय असं कोलकातावासी मानतात तसंच पुणं आमच्या जगाचं केंद्र असं पुण्यातल्यांना वाटतं!’ असली खडूस साक्षात्कारी वाक्यं टाकता यायला लागली.

मग, ’हे एकदा करायचं आहे’ असं वाटलेल्या कितीतरी आराम-इच्छा डोक्यात लोळत असतात त्यांत ’बंगाली लिपी शिकायचीय’ ही इच्छा सामील झाली, आणि ती गेल्या वर्षी अगदी अनपेक्षितपणे पूर्णही झाली. केमिस्ट्रीतल्याच दोन सहकारी मित्र-मैत्रिणींसोबत वहीपुस्तक घेऊन शास्त्रशुद्ध बंगाली शिकायला मिळालं. अगदी ईश्वरचंद्र विद्यासागरांनी छापलेल्या अंकलिपीनुसार शास्त्रशुद्ध. गेली दीडशे वर्षं पश्चिम बंगालातली बालकं विद्यासागरांच्याच ’बॉर्नोपोरिचोय’मधून बंगाली मुळाक्षरं शिकायला सुरुवात करतात – वुडवर्ड ग्राइपवॉटर किंवा पॅरॅशूट तेलाहूनही जुनी परंपराय म्हणे. (हे असं सांगितल्यावर समोरच्यानं ’सहीऽऽऽ’ असं चीत्कारायचं असतं किंवा ’आहे ब्ब्वा!’ सारखे भाव तोंडावर आणायचे असतात. ’फुक्कटच्या गोष्टींचा माज नकोय/ स्वत:चा अभ्यास नीट आटपा आधी/ त्यात काय?’ असा भाव आणला तर परिणाम वाईट होतात. (माझ्या कोमल मनावर.) )

बंगालीतला ’अहो मला वाचता येतंय’ वाला आनंद लवकरच संपला, कारण शब्दसंग्रह आणि व्याकरण यांची वानवा! त्यामुळे ’शरत्‌चंद्रांच्या कादंबर्‍या मुळातून वाचायच्या आहेत’ चा आवेशसुद्धा झटक्यात ओसरला. मग पूर्वीची हुकमी युक्ती कामाला आली: गाणी ऐकत किंवा सिनेमे बघत भाषा शिकायची. अख्खा लेख वाचायला जड जातो; त्यामानाने दोन-तीन कडव्यांची गाणी वाचायलाही सोपी आणि समजावून घ्यायलाही.

रवीन्द्रसंगीतातली दोन-तीन गाणी पूर्वी माहिती होती; एक तर शाळेत आंतरभारती प्रकल्पात शिकून पाठ केलेलं. त्यांचा यूट्यूबवर माग काढता काढता अजून खूप काय काय सापडलं. जुनं बंगाली लोकसंगीत, बांग्लादेशातली काज़ी नज़रुल इस्लामची गाणी, रवीन्द्रसंगीताबद्दलची मतमतांतरं, बंगाली सिनेमाच्या सुवर्णयुगातली उत्तमकुमार-सुचित्रा सेनवर चित्रित झालेली गाणी, आधुनिक बंगाली बॅन्ड्सची गाणी. ओळखीच्या समवयस्क बंगाली मुलामुलींच्या बोलण्यात कधीकधी ’रवीन्द्रसंगीत म्हणजेच बंगाली संगीत असं नव्हे’ हा सूर का ऐकू यायचा ते हळूहळू कळत गेलं. मग वाटलं की बंगाली भाषेतल्या संगीताबद्दल मराठीत काही लिहिता येईल का? किमान मला आवडलेली गाणी, त्यांच्या ओळींच्या मला उमगलेल्या अर्थासकट इथे लिहिता येतील.

लिपी वाचता आल्यामुळे आंतरजालावर बंगाली शब्दकोश वाचणं, बंगाली चावड्यांमध्ये एखाद्या गाण्याबद्दल चाललेल्या गप्पाटप्पा पाहाणं जमायला लागलंय. एखादा अडलेला शब्द किंवा संकल्पना समजावून द्यायला बंगाली मित्र-मैत्रिणी (आणि गूगल, विकिपीडिया) आहेतच – अशा अनेक उसन्या काठ्यांवर माझ्या बंगालीचा डोलारा उभा राहिलाय. हा गाण्यांच्या भाषांतराचा प्रकल्पदेखील माझ्या बंगाली शिकायच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. त्यामुळे गाण्यांच्या अनुवादात कुठे त्रुटी आढळल्या, किंवा या विषयाबद्दल काहीही संदर्भ माहिती असेल तर नक्की कळवा.

लिहायला सुरुवात करण्यापूर्वी, बंगाली भाषा लिहा-वाचायला शिकवणारे चित्रक आणि स्वागता (चित्रोक, शागोता), ’अजून भाषांतरं ब्लॉगवर टाक’ म्हणणारे अनुप आणि चारु, ’आता लिही’ म्हणणारे सगळेच भद्रलोक: तुम्हांला धॉन्नोबाद.