Sunday, August 29, 2010

टेडातल्या टॉकाचं ट्रान्स्लेशन : विचित्र विश्व आणि विज्ञानाचं वैविध्य.

चार-पाच वर्षांपूर्वी "टेड टॉक्स" बद्दल कळलं आणि मग टेडच्या संकेतस्थळावर चक्कर टाकणं नेमाचं होऊन गेलं. जगभरात तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरेखन (टेक्नॉलॉजी, एड्युकेशन, डिझाइन) यांच्याशी संबंधित विषयांवर (म्हणजेच जगाच्या पाठीवरल्या कुठल्याही विषयावर) काम करणार्‍या ’लै भारी’ लोकांना आमंत्रणं देऊन दर वर्षी एका व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांनी आपापल्या कामाबद्दल इतरांना छोटी-छोटी प्रेझेन्टेशन्स द्यायची असं या टेड कॉन्फरन्सचं स्वरूप. सुरुवातीला आतल्या गोटातच असलेली ही परिषद मग सगळ्या लोकांसाठी खुली करण्यात आली, टेडच्या संकेतस्थळावर या भाषणांचं संकलन होऊ लागलं. यातली काही उच्च भाषणं आपल्या शाळेत पोरींना, शिक्षकांना ऐकवायला पायजेत असं मधूनच वाटून जायचं. माझी शाळा पूर्ण मराठी माध्यमाची होती - त्यामुळे मग त्या -त्या भाषणाचा मराठीत अनुवाद, किमान संक्षिप्त अर्थ लिहावा असंही डोक्यात होतं. पण मग दोन महिन्यांपूर्वी असं कळलं की मागच्या वर्षीपासून त्या भाषणांना सबटायटल्स द्यायची सोय झालीये! ज्याला इंग्रजीतून इतर कुठल्या भाषेत ते भाषण यावं असं वाटत असेल त्याने स्वयंसेवकगिरी करून एका सोप्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून एकेका ओळीचं भाषांतर करायचं, आणि टेडतर्फे ते दुसर्‍या स्वयंसेवकाकडून तपासून घेतल्यावर मग ते इतर लोकांना बघता येतं.
खूप उत्साहात मी रिचर्ड डॉकिन्सचं एक भाषण अनुवादायला घेतलं. आत्ताच ते सबटायटलिंगचं काम पुरं झालंय. (त्याची चित्तरकथा नंतर लिहेन).

मूळ भाषणाचं transcript + भाषांतर इथे देतेय. भाषांतर करताना ’कलोकियल टोन’, - संभाषणाचा बोलीभाषेतला सूर असू द्यात, शब्दश: भाषांतर नको असं टेडच्या गाइडलाइन्समध्ये लिहिलं होतं. वैज्ञानिक परिभाषेनं खचाखच भरलेल्या या भाषणात ते तत्त्व सांभाळणं जरा कठीण गेलं. मग एक-दोन ठिकाणी सरळ इंग्रजी शब्दच वापरलेत. कुठे चुका दिसल्या, बदल सुचवायचे असले तर नक्की सांगा.

***
[भाषणाचा व्हिडियो: ]

Richard Dawkins on our "queer" universe
रिचर्ड डॉकिन्स सांगतायत आपल्या "विचित्र" विश्वाबद्दल.

Biologist Richard Dawkins makes a case for "thinking the improbable" by looking at how the human frame of reference limits our understanding of the universe.
विश्वातल्या प्रक्रिया कळून घ्यायला मानवी नजर कशी तोकडी पडू शकते हे दाखवत जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स "अतर्क्य गोष्टींचा विचार" करायला सुचवतात.

My title: "Queerer than we can suppose: The strangeness of science." "Queerer than we can suppose" comes from J.B.S. Haldane, the famous biologist, who said, "Now, my own suspicion is that the universe is not only queerer than we suppose, but queerer than we can suppose. I suspect that there are more things in heaven and earth than are dreamed of, or can be dreamed of, in any philosophy." Richard Feynman compared the accuracy of quantum theories -- experimental predictions -- to specifying the width of North America to within one hair's breadth of accuracy. This means that quantum theory has got to be in some sense true. Yet the assumptions that quantum theory needs to make in order to deliver those predictions are so mysterious that even Feynman himself was moved to remark, "If you think you understand quantum theory, you don't understand quantum theory."
माझ्या भाषणाचं शीर्षक आहे: "आपल्याला वाटू शकते त्याहूनही विचित्र : विज्ञानाची नवलाई". "आपल्याला वाटू शकते त्याहूनही विचित्र" हे शब्द आहेत प्रख्यात जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस्‌. हॉल्डेन यांचे. हॉल्डेन म्हणाले होते, "आता मला स्वत:ला अशी शंका येतेय की हे विश्व केवळ आपल्याला वाटतं त्याहून विचित्र नसून आपल्याला वाटू शकतं त्याहूनही जास्त विचित्र आहे. माझ्या अदमासाने, कोणत्याही तत्त्वविचारात ज्यांची कल्पना केली गेली आहे किंवा ज्यांची कल्पना करणं शक्य आहे,अशा गोष्टींपेक्षा जास्त गोष्टी अंतराळात आणि पृथ्वीवर अस्तित्त्वात आहेत." रिचर्ड फ़ाइनमननी पुंजसिद्धांताच्या (क्वांटम थियरी) प्रयोगांचे निष्कर्ष वर्तवण्याबाबतच्या अचूकपणाची तुलना उत्तर अमेरिकेची रुंदी एका केसभर अंतराच्या फरकाने अचूक सांगता येण्याशी केली होती. म्हणजेच पुंजसिद्धांत एका अर्थी ’खरा’ आहे. तरीदेखील, अशी प्रयोगांची भाकितं मांडण्यासाठी पुंजसिद्धांतामध्ये जी गृहीतकं वापरावी लागतात ती इतकी गूढ आहेत की एकदा खुद्द फ़ाइनमनवर, " आपल्याला पुंजसिद्धांत कळला आहे असं तुम्हांला वाटत असेल तर तुम्हांला पुंजसिद्धांत कळलेला नाही" असं म्हणायची पाळी आली होती.

It's so queer that physicists resort to one or another paradoxical interpretation of it. David Deutsch, who's talking here, in The Fabric of Reality, embraces the "many worlds" interpretation of quantum theory, because the worst that you can say about it is that it's preposterously wasteful. It postulates a vast and rapidly growing number of universes existing in parallel -- mutually undetectable except through the narrow porthole of quantum mechanical experiments. And that's Richard Feynman.
हा सिद्धांत इतका विचित्र आहे की वेगवेगळे भौतिकशास्त्रज्ञ या सिद्धांतातून निघणार्‍या वेगवेगळ्या विरोधाभासी अर्थांवर विश्वास ठेवतात. "खरेपणाचे वस्त्र" या विषयावर इथे बोलणार असलेले डेविड डॉयश यांनी पुंजसिद्धांताच्या "बहुवैश्विक" अर्थांतराची बाजू घेतली आहे. कारण या अर्थांतरात काही वाईट असेल तर ते फार फार तर इतकंच: त्यात प्रचंड उधळेपणा आहे! या अर्थांतरानुसार भरमसाठ आणि वेगात वाढत राहणार्‍या संख्येनं अनेक समांतर विश्वं अस्तित्त्वात आहेत. पुंजभौतिकी (क्वांटम मेकॅनिक्स)मधल्या प्रयोगांच्या अरुंद भुयारातूनच फक्त एका विश्वाला दुसर्‍या विश्वाचं दर्शन होऊ शकतं; एरवी त्यांना एकमेकांच्या अस्तित्त्वाचा पत्ता लावता येत नाही. आणि ही रिचर्ड फ़ाइनमनची कल्पना होती.

The biologist Lewis Wolpert believes that the queerness of modern physics is just an extreme example. Science, as opposed to technology, does violence to common sense. Every time you drink a glass of water, he points out, the odds are that you will imbibe at least one molecule that passed through the bladder of Oliver Cromwell. (Laughter) It's just elementary probability theory. The number of molecules per glassful is hugely greater than the number of glassfuls, or bladdersful, in the world -- and, of course, there's nothing special about Cromwell or bladders. You have just breathed in a nitrogen atom that passed through the right lung of the third iguanodon to the left of the tall cycad tree.
जीवशास्त्रज्ञ लुईस वॉलपर्ट यांच्या मते आधुनिक भौतिकशास्त्राचं वैचित्र्य हे एका टोकाचं उदाहरण झालं. विज्ञान (तंत्रज्ञान नव्हे) माणसाच्या सारासार विचाराला (कॉमन सेन्स) धक्का देतं. वॉलपर्ट आपल्या ध्यानात आणून देतात की जेव्हा आपण एक पेलाभर पाणी पितो, त्या प्रत्येक वेळी आपल्या शरीरात ऑलिव्हर क्रॉमवेलच्या मूत्राशयातून गेलेला किमान एक तरी पाण्याचा रेणू जात असतो. (हशा) हा अगदी प्राथमिक स्वरूपाच्या संभाव्यतेच्या सिद्धांतातून (प्रोबॅबिलिटी थियरी) आलेला निष्कर्ष आहे. एका पेल्यातल्या पाण्याच्या रेणूंची संख्या ही जगातल्या पाण्याने भरलेल्या पेल्यांच्या किंवा मूत्राशयांच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे. आणि अर्थात, ही गोष्ट खास क्रॉमवेल किंवा मूत्राशयांनाच लागू होते असं नाही. तुम्ही आत्ताच एका उंच सायकॅड झाडाच्या डाव्या बाजूला असलेल्या तिसर्‍या इग्वानॉडॉनच्या (एक डायनॉसॉर) उजव्या फुप्फुसातून गेलेला नायट्रोजनचा अणू तुमच्या श्वासावाटे आत घेतलाय!

"Queerer than we can suppose." What is it that makes us capable of supposing anything, and does this tell us anything about what we can suppose? Are there things about the universe that will be forever beyond our grasp, but not beyond the grasp of some superior intelligence? Are there things about the universe that are, in principle, ungraspable by any mind, however superior? The history of science has been one long series of violent brainstorms, as successive generations have come to terms with increasing levels of queerness in the universe.
"आपल्याला वाटू शकतं त्याहूनही विचित्र." आपल्यामध्ये ही ’वाटण्याची’, ’गृहीत धरण्याची’ क्षमता आहे ती कशामुळे? आणि त्यातून आपल्याला आपण काय गृहीत धरू शकतो याबद्दल काही माहिती मिळू शकते का? या जगात अशा काही गोष्टी आहेत का ज्या कायमच आपल्या आकलनाच्या पलीकडे राहतील, पण कुठल्यातरी प्रगत बुद्धीच्या जीवांना त्या सहज कळतील? विश्वामध्ये अशा गोष्टी आहेत का, ज्या तत्वत: कितीही सर्वोत्तम बुद्धीच्या आकलनशक्तीच्याही पलीकडे असतील? विज्ञानाचा इतिहास म्हणजे विचारांच्या विराट घुसळणींची (ब्रेनस्टॉर्मिंगची) एक मालिकाच आहे. प्रत्येक नवी पिढी विश्वातल्या चढत्या भाजणीने विचित्र वाटत जाणार्‍या गोष्टींचं अस्तित्त्व मान्य करत आली आहे.

We're now so used to the idea that the Earth spins -- rather than the Sun moves across the sky -- it's hard for us to realize what a shattering mental revolution that must have been. After all, it seems obvious that the Earth is large and motionless, the Sun small and mobile. But it's worth recalling Wittgenstein's remark on the subject. "Tell me," he asked a friend, "why do people always say, it was natural for man to assume that the sun went round the earth rather than that the earth was rotating?" His friend replied, "Well, obviously because it just looks as though the Sun is going round the Earth." Wittgenstein replied, "Well, what would it have looked like if it had looked as though the Earth was rotating?" (Laughter)
आता ’पृथ्वी स्वत:भोवती फिरते आणि सूर्य आकाशात या टोकाकडून त्या टोकाकडे जात नाही’ या संकल्पनेची आपल्याला इतकी सवय झाली आहे, की ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात आली ती वेळ म्हणजे केवढी मोठी वैचारिक क्रांती असेल त्याची कल्पना करणं आपल्याला कठीण जातं. किती झालं तरी पृथ्वी खूप मोठ्ठी आणि स्थिर आहे आणि सूर्य अगदीच लहान आणि फिरता आहे हे डोळ्यांना ढळढळीतपणे दिसत असतं. पण या विषयावरची (तत्त्वज्ञ) विटगनस्टाइनची टिप्पणी मोठी मार्मिक आहे. ते एका मित्राला म्हणाले, "मला असं सांग, माणसाला ’पृथ्वी स्वत:भोवती फिरते’याच्याऐवजी ’सूर्य पृथ्वीभोवती फिरतो’ असं वाटणं जास्त साहजिक आहे असं लोक का म्हणतात?" त्यांचा मित्र म्हणाला, "अरे, सोप्पं आहे. कारण सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे सरळ सरळ दिसतंच की आपल्याला रोज." विटगनस्टाइन म्हणाले, "मग ’पृथ्वी स्वत:भोवती फिरते’ हे दिसायचं झालं तर ते नक्की कसं दिसलं असतं ते सांग बरं!" (हशा)

Science has taught us, against all intuition, that apparently solid things, like crystals and rocks, are really almost entirely composed of empty space. And the familiar illustration is the nucleus of an atom is a fly in the middle of a sports stadium and the next atom is in the next sports stadium. So it would seem the hardest, solidest, densest rock is really almost entirely empty space, broken only by tiny particles so widely spaced they shouldn't count. Why, then, do rocks look and feel solid and hard and impenetrable?
आपल्या अंत:प्रेरणेच्या (इन्ट्यूशन) विरोधात जाऊन विज्ञानाने आपल्याला असं शिकवलंय की दगड, स्फटिक अशा सगळ्या ’सघन’ भासणार्‍या गोष्टी खरं म्हणजे जवळजवळ संपूर्णपणे रिकाम्या जागेने, अवकाशाने व्यापलेल्या असतात. त्यासाठी नेहमी वापरली जाणारी प्रतिमाही आपल्या ओळखीची आहे : अणुकेंद्रक हे एखाद्या खेळाच्या मोठ्ठ्या मैदानाच्या मध्यभागी असलेल्या माशीएवढं असतं, आणि त्या माशीच्या जवळची दुसरी माशी ही दुसर्‍या मैदानात असते. म्हणजेच कठीणात कठीण, सघनतम खडक हा खरं तर जवळपास पूर्णच रिकाम्या जागेचा बनलेला असतो, आणि त्या जागेत भर घालणारे कण इतके सूक्ष्म आणि एकमेकांपासून इतक्या दूरवर असतात, की त्यांनी त्या रिकामपणात काहीच फरक पडू नये. मग खडक इतके कठीण, घन आणि अभेद्य का दिसतात? हाताळायलाही तसेच का वाटतात?

As an evolutionary biologist I'd say this: our brains have evolved to help us survive within the orders of magnitude of size and speed which our bodies operate at. We never evolved to navigate in the world of atoms. If we had, our brains probably would perceive rocks as full of empty space. Rocks feel hard and impenetrable to our hands precisely because objects like rocks and hands cannot penetrate each other. It's therefore useful for our brains to construct notions like "solidity" and "impenetrability," because such notions help us to navigate our bodies through the middle-sized world in which we have to navigate.
एक उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ या भूमिकेतून मी असं म्हणेन: आपलं शरीर ज्या आकार आणि वेगांच्या पातळीवर काम करत असतं, त्याच पातळीवरच्या मोजमापांमध्ये आपल्याला तगवण्यासाठी आपला मेंदू उत्क्रांत झालेला आहे. अणूंच्या जगात वावरण्यासाठी आपली उत्क्रांती कधीच झाली नाही. तशी ती झाली असती, तर आपल्या मेंदूने ’दगड रिकाम्या जागेने भरलेले असतात’ अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं असतं. दगड आपल्या हातांना कठीण आणि अभेद्य वाटतात याचं कारण हात दगडांमधून आरपार जाऊ शकत नाहीत हेच आहे. त्यामुळे ’सघनता’, ’अभेद्यपणा’ अशा कल्पना रचणं आपल्या मेंदूसाठी उपयोगाचं असतं, कारण अशा संकल्पनांमुळे, आपला ज्या मध्यम-आकाराच्या जगात वावर होत असतो तिथे हालचाली करायला आपल्याला मदत होते.

Moving to the other end of the scale, our ancestors never had to navigate through the cosmos at speeds close to the speed of light. If they had, our brains would be much better at understanding Einstein. I want to give the name "Middle World" to the medium-scaled environment in which we've evolved the ability to take act -- nothing to do with Middle Earth. Middle World. (Laughter) We are evolved denizens of Midde World, and that limits what we are capable of imagining. You find it intuitively easy to grasp ideas like, when a rabbit moves at the -- sort of medium velocity at which rabbits and other Middle World objects move, and hits another Middle World object, like a rock, it knocks itself out.
या मोजमापांच्या पट्टीच्या दुसर्‍या टोकाला जायचं म्हटलं, तर आपल्या पूर्वजांना कधीच अंतराळातून प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाणार्‍या गतीने प्रवास करावा लागला नव्हता. जर त्यांना तसं करावं लागलं असतं, तर आपल्या मेंदूंना आइनस्टाइन फार चांगल्या पद्धतीनं कळला असता. आपण या ज्या मध्यम पटीतली मोजमापं असलेल्या वातावरणात नांदण्यासाठी उत्क्रांत झालो आहोत, त्याला ’मधलं जग’ असं नाव द्यावंसं मला वाटतं. याचा (जे. आर. आर. टॉलकिन या लेखकाच्या कल्पनेतल्या) ’मधल्या पृथ्वी’शी काहीएक संबंध नाही. मधलं जग. (हशा) आपण या ’मधल्या जगा’तले उत्क्रांत रहिवासी आहोत, आणि त्यामुळेच आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादा पडतात. आपल्याला आपल्या पातळीवरची एखादी कल्पना समजणं निसर्गत:च सोपं जातं, उदाहरणार्थ : जर एखादा ससा, या मधल्या जगातले ससे आणि इतर वस्तू ज्या मध्यम गतीच्या पटीत वाटचाल करतात त्या गतीने पळाला आणि एखाद्या खडकासारख्या दुसर्‍या एखाद्या मधल्या-जगातल्या वस्तूवर आदळला तर तो बेशुद्ध होईल.

May I introduce Major General Albert Stubblebine III, commander of military intelligence in 1983. He stared at his wall in Arlington, Virginia, and decided to do it. As frightening as the prospect was, he was going into the next office. He stood up, and moved out from behind his desk. What is the atom mostly made of? He thought. Space. He started walking. What am I mostly made of? Atoms. He quickened his pace, almost to a jog now. What is the wall mostly made of? Atoms. All I have to do is merge the spaces. Then, General Stubblebine banged his nose hard on the wall of his office. Stubblebine, who commanded 16,000 soldiers, was confounded by his continual failure to walk through the wall. He has no doubt that this ability will, one day, be a common tool in the military arsenal. Who would screw around with an army that could do that? That's from an article in Playboy, which I was reading the other day. (Laughter) I have every reason to think it's true; I was reading Playboy because I, myself, had an article in it. (Laughter)
आता मला तुमच्याशी एका व्यक्तीची ओळख करून द्यायचीय: ते म्हणजे १९८३ साली अमेरिकन सैन्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेले मेजर जनरल अल्बर्ट स्टबलबाइन (तिसरे). त्यांनी व्हर्जिनियातल्या आर्लिंग्टनमधल्या आपल्या कार्यालयाच्या भिंतीकडे रोखून बघायला सुरुवात केली, आणि ठरवलं:ऐकायला कितीही भीतीदायक वाटत असलं, तरी ते भिंत भेदून पलीकडच्या खोलीत जाणारच होते. ते उठले, आणि आपल्या टेबलामागून उठून समोर आले. ’अणू मुख्यत: कशापासून बनलेले असतात?’ त्यांनी विचार केला. मोकळ्या जागेपासून. त्यांनी चालायला सुरुवात केली. मी मुख्यत: कशापासून बनलो आहे? अणूंपासून. त्यांनी चालण्याची गती वाढवत हळूहळू धावायला सुरुवात केली. भिंत मुख्यत: कशाची बनलेली आहे? अणूंची. आता मला फक्त इतकंच करायचं आहे, की या सगळ्या मोकळ्या जागा एकत्र जोडून टाकायच्या आहेत! आणि मग, जनरल स्टबलबाइनचं नाक खूप जोरात त्यांच्या खोलीच्या भिंतीवर आदळलं. सोळा हजार सैनिकांवर हुकूम गाजवणार्‍या स्टबलबाइनना स्वत:च्या या भिंतीमधून चालत जाता येण्यातल्या सततच्या अपयशाने पुरतं गोंधळून टाकलं होतं. एके दिवशी ही अशी क्षमता म्हणजे त्यांच्या सैन्याच्या शस्त्रागारातलं नेहमीचं हत्यार होऊन जाईल याबद्दल त्यांना मुळीच शंका नव्हती. भिंती भेदून आरपार जाऊ शकणार्‍या सेनेला कोण डिवचायला जाईल? हा किस्सा ’प्लेबॉय’मधल्या एका लेखात होता. परवाच वाचत होतो मी तो लेख. (हशा) या लेखावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे खूप कारणं आहेत; एक तर मी प्लेबॉय वाचत होतो कारण माझा स्वत:चा एक लेखही त्यात होता. (हशा)

Unaided human intuition schooled in Middle World finds it hard to believe Galileo when he tells us a heavy object and a light object, air friction aside, would hit the ground at the same instant. And that's because in Middle World, air friction is always there. If we'd evolved in a vacuum we would expect them to hit the ground simultaneously. If we were bacteria, constantly buffeted by thermal movements of molecules, it would be different, but we Middle Worlders are too big to notice Brownian motion. In the same way, our lives are dominated by gravity but are almost oblivious to the force of surface tension. A small insect would reverse these priorities.
बाहेरून काहीच मदत नसलेल्या आणि मधल्या जगात शिकलेल्या मानवी अंत:प्रेरणेला ’हवेचं घर्षण नसेल तर उंचावरून एकाच वेळी टाकलेल्या जड आणि हलक्या वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडतील’ असं सांगणार्‍या गॅलिलियोवर विश्वास ठेवणं कठीण जातं. आणि याचं कारण इतकंच की मधल्या जगात हवा आणि तिच्यामुळे निर्माण होणारं घर्षण नेहमीच हजर असतं. जर आपण निर्वात (व्हॅक्यूम) ठिकाणी उत्क्रांत झालो असतो तर आपण त्या वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडतील अशीच अपेक्षा केली असती. आपण जीवाणू असतो, आणि सतत रेणूंच्या उष्णतेमुळे होणार्‍या हालचालींच्या धक्काबुक्कीत सापडलो असतो, तर गोष्ट वेगळी असती, पण आत्ता तरी आपण मधले जगवाले इतके मोठे आहोत की आपल्याला’ब्राउनियन गती’जाणवतच नाही. तसंच, आपल्या रोजच्या जगण्यात गुरुत्वाकर्षणाचा खूपच प्रभाव पडत असला तरी आपल्याला पृष्ठताण (सरफेस टेन्शन) जवळजवळ अजिबात जाणवत नाही. एखाद्या छोट्याशा कीटकासाठी हाच प्राधान्यक्रम बरोब्बर उलटा असेल.

Steve Grand -- he's the one on the left, Douglas Adams is on the right -- Steve Grand, in his book, Creation: Life and How to Make It, is positively scathing about our preoccupation with matter itself. We have this tendency to think that only solid, material things are really things at all. Waves of electromagnetic fluctuation in a vacuum seem unreal. Victorians thought the waves had to be waves in some material medium -- the ether. But we find real matter comforting only because we've evolved to survive in Middle World, where matter is a useful fiction. A whirlpool, for Steve Grand, is a thing with just as much reality as a rock.
स्टीव्ह ग्रॅन्ड -- डावीकडले, (उजवीकडचे आहेत ते डग्लस ऍडम्स) -- स्टीव्ह ग्रॅन्ड त्यांच्या ’क्रिएशन: लाइफ़ ऍन्ड हाउ वी मेक इट’ (निर्मिती: आयुष्य आणि आपण ते कसं निर्माण करतो) या पुस्तकात आपल्या द्रव्यवस्तूं(मॅटर)मध्येच गुंतून राहण्यावर परखड टीका करतात. फक्त समूर्त,सहज जाणवणारे पदार्थ ह्याच खर्‍या ’वस्तू’ आहेत असा विचार करण्याकडे आपला कल असतो. निर्वातातल्या विद्युतचुंबकीय लहरी (इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज्‌) आपल्याला ’खर्‍या’ वाटत नाहीत. व्हिक्टोरियन जमान्यातल्या लोकांना वाटे की या लहरी नक्कीच कुठल्यातरी सघन माध्यमात असल्या पाहिजेत -- त्याला त्यांनी नाव दिलं ’ईथर’. पण आपल्याला खरे द्रव्यपदार्थ चटकन कळतात कारण आपण मधल्या जगात जगण्यासाठी उत्क्रांत झालो आहोत. इथे द्रव्यवस्तू ही एक उपयोगी संकल्पना आहे. स्टीव्ह ग्रॅन्डच्या मते ’पाण्यातला भोवरा’ हीदेखील एखाद्या दगडाइतकीच खरी वस्तू आहे.

In a desert plain in Tanzania, in the shadow of the volcano Ol Donyo Lengai, there's a dune made of volcanic ash. The beautiful thing is that it moves bodily. It's what's technically known as a barchan, and the entire dune walks across the desert in a westerly direction at a speed of about 17 meters per year. It retains its crescent shape and moves in the direction of the horns. What happens is that the wind blows the sand up the shallow slope on the other side, and then, as each sand grain hits the top of the ridge, it cascades down on the inside of the crescent, and so the whole horn-shaped dune moves.
टान्झानियाच्या वाळवंटात, ’ओल डोन्यो लेन्गाई’ नावाच्या ज्वालामुखी पर्वतापाशी ज्वालामुखीय राखेची एक प्रचंड ढिगार्‍यासारखी टेकडी (ड्यून) आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ही टेकडी सबंध हलते. अशा भूभागांना ’बार्चन’ म्हणतात, आणि अशी अख्खीच्या अख्खी टेकडी त्या वाळवंटातून वर्षाला सुमारे सतरा मीटर या गतीने पश्चिम दिशेकडे सरपटत जाते. तिचा चंद्रकोरीसारखा आकार कायम राहतो आणि त्या कोरीच्या टोकांच्या दिशेत टेकडी हलते. होतं असं, की वार्‍यामुळे वाळू त्या उथळ उतारावरून पलीकडच्या बाजूला फेकली जाते, आणि जसजसा वाळूचा एक एक कण त्या उतरणीच्या वरच्या कड्यावर आदळतो तसतसा तो घरंगळत त्या चंद्रकोरीच्या आतल्या बाजूला उतरतो. अशा तर्‍हेनं ती शिंगासारखी वाकलेली अख्खी टेकडी हलते.

Steve Grand points out that you and I are, ourselves, more like a wave than a permanent thing. He invites us, the reader, to "think of an experience from your childhood -- something you remember clearly, something you can see, feel, maybe even smell, as if you were really there. After all, you really were there at the time, weren't you? How else would you remember it? But here is the bombshell: You weren't there. Not a single atom that is in your body today was there when that event took place. Matter flows from place to place and momentarily comes together to be you. Whatever you are, therefore, you are not the stuff of which you are made. If that doesn't make the hair stand up on the back of your neck, read it again until it does, because it is important."
स्टीव्ह ग्रॅन्ड आपल्या असं लक्षात आणून देतात, की तुम्ही-आम्ही सगळेच शाश्वत वस्तूंसारखे कमी आणि लहरींसारखे जास्त आहोत. ते आपल्यासारख्या वाचकाला सांगतात, "तुमच्या लहानपणचा एखादा अनुभव आठवा -- असं काहीतरी, जे तुम्हांला फार स्पष्टपणे आठवतंय, जे तुम्हांला दिसतंय, जाणवतंय, कदाचित त्याचा वासही येतोय - इतकं , की जणुकाही तुम्ही खरोखरच तिथे आहात. मग काय, तुम्ही त्या वेळी खरोखरीचे तिथे होतात, बरोबर ना? नाहीतर तुम्हांला ते कसं आठवलं असतं? पण आता एक धक्कादायक गोष्ट ऐका: तुम्ही तिथे नव्हताच. आज तुमच्या शरीरात असलेला एकही अणू त्या प्रसंगी तिथे हजर नव्हता. द्रव्यपदार्थ एका जागेहून दुसर्‍या जागी वाहत असतात, आणि फक्त काही काळासाठी ’तुम्ही’ बनून एकत्र येतात. त्यामुळेच तुम्ही कुणीही असाल, पण ज्या पदार्थांपासून तुम्ही बनला आहात ते म्हणजे तुम्ही नक्कीच नव्हेत. जर हे वाचून तुमच्या अंगावर काटा आला नसेल तर तसं होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे."

So "really" isn't a word that we should use with simple confidence. If a neutrino had a brain, which it evolved in neutrino-sized ancestors, it would say that rocks really do consist of empty space. We have brains that evolved in medium-sized ancestors which couldn't walk through rocks. "Really," for an animal, is whatever its brain needs it to be in order to assist its survival, and because different species live in different worlds, there will be a discomforting variety of reallys. What we see of the real world is not the unvarnished world but a model of the world, regulated and adjusted by sense data, but constructed so it's useful for dealing with the real world.
त्यामुळे ’खरोखर’ हा शब्द आपण ठाम विश्वासाने वापरायला नको. जर न्यूट्रिनोला त्याच्याच आकाराच्या पूर्वजांपासून उत्क्रांत झालेला मेंदू असता तर तो म्हणाला असता, ’दगड हे खरोखरच मोकळ्या जागेपासून बनलेले असतात.’ आपले मेंदू मध्यम-आकाराच्या पूर्वजांपासून उत्क्रांत झाले. त्या पूर्वजांना दगडांमधून आरपार चालत जाता येत नव्हते. एखाद्या प्राण्यासाठी "खरोखर" असलेली बाब म्हणजे त्याला जगात टिकून राहायला मदत व्हावी म्हणून त्याच्या मेंदूने रचलेली कोणतीही गोष्ट. आणि प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या ’जगा’त राहात असल्यामुळे "खरोखरी"च्या गोष्टींमध्येही आपण हबकून जाऊ इतकं वैविध्य असणार. आपल्याला जे ’खरं’ जग दिसतं ती जगाची मूळ आवृत्ती नसून त्याच्या आकृतीचा एक नमुना (मॉडेल) आहे. या मॉडेलचं नियमन आणि पुनर्रचना ज्ञानेंद्रियांमधून मिळालेल्या माहितीनुसार होत असते, पण त्याची उभारणी नेहमीच अशा पद्धतीने होते जेणेकरून आपल्यापुरत्या ’खर्‍या’ जगाशी सामना करताना ते उपयोगी ठरावं.

The nature of the model depends on the kind of animal we are. A flying animal needs a different kind of model from a walking, climbing or swimming animal. A monkey's brain must have software capable of simulating a three-dimensional world of branches and trunks. A mole's software for constructing models of its world will be customized for underground use. A water strider's brain doesn't need 3D software at all, since it lives on the surface of the pond in an Edwin Abbott flatland.
या मॉडेलचं स्वरूप आपण कोणत्या प्रकारचे प्राणी आहोत त्यावर ठरतं. उडणार्‍या प्राण्याला चालणार्‍या, झाडावर चढणार्‍या किंवा पोहोणार्‍या प्राण्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या मॉडेलची गरज असते. माकडाच्या मेंदूमध्ये फांद्या आणि खोडांचे त्रिमित (थ्री-डी) जग उभं करू शकणारं आज्ञांकन (सॉफ़्टवेअर) असायलाच हवं. घुशीच्या डोक्यातलं जगाचं मॉडेल बनवणारं सॉफ़्टवेअर खास जमिनीखालच्या वापराकरता बनवलेलं असणार. पाणकिड्याच्या (वॉटर स्ट्रायडर) मेंदूला त्रिमित आज्ञांकनाची अजिबातच गरज नाही, कारण तो डबक्याच्या पृष्टभागावर राहतो - एडविन एबटनी ’फ़्लॅटलॅन्ड’ कादंबरीत वर्णन केलंय तशा सपाट जगात.

I've speculated that bats may see color with their ears. The world model that a bat needs in order to navigate through three dimensions catching insects must be pretty similar to the world model that any flying bird, a day-flying bird like a swallow, needs to perform the same kind of tasks. The fact that the bat uses echoes in pitch darkness to input the current variables to its model, while the swallow uses light, is incidental. Bats, I even suggested, use perceived hues, such as red and blue, as labels, internal labels, for some useful aspect of echoes -- perhaps the acoustic texture of surfaces, furry or smooth and so on, in the same way as swallows or, indeed, we, use those perceived hues -- redness and blueness etcetera -- to label long and short wavelengths of light. There's nothing inherent about red that makes it long wavelength.
माझा असा अंदाज आहे की वटवाघुळं त्यांच्या कानांनी रंग पाहात असावीत. वटवाघुळाला त्रिमित परिसरात योग्य वाटचाल करत किडे पकडण्यासाठी जगाच्या ज्या प्रकारच्या मॉडेलची गरज असते तशाच प्रकारचं मॉडेल कुठल्याही उडणार्‍या पक्ष्याला, उदाहरणार्थ चिमणीसारख्या दिनचर पक्ष्याला त्याच प्रकारची कामं करण्यासाठी हवं असतं. त्या मॉडेलमध्ये ताजी माहिती (चल मानकं / व्हॅरिएबल्स) भरायला वटवाघूळ ठार अंधारात प्रतिध्वनींचा वापर करतं आणि चिमणी प्रकाशाचा वापर करते इतकाच काय तो प्रसंगोत्पात (इन्सिडेन्टल) पडलेला फरक. मी तर असंही सुचवलं होतं की वटवाघुळं त्यांना जाणवलेल्या लाल, निळा अशा रंगछटांचा वापर प्रतिध्वनीच्या कुठल्यातरी महत्त्वाच्या पैलूसाठीची खाजगी लेबलं म्हणून करत असावीत -- कदाचित पृष्ठभागांचा आवाजानुसारचा पोत (टेक्श्चर) कसा आहे : केसाळ , गुळगुळीत किंवा आणखी कसा त्यासाठी. ज्या पद्धतीनं चिमण्या किंवा खरंतर आपण मनुष्यप्राणीदेखील आपल्याला जाणवलेल्या त्या तांबडेपणा, निळेपणा वगैरे रंगछटा प्रकाशाच्या लांब किंवा आखूड तरंगलांबीला लेबलं द्यायला वापरतो तसंच. लाल रंगामध्ये त्याला ’जास्त तरंगलांबी’ देणारी कोणतीही मूलभूत गोष्ट नाही.

And the point is that the nature of the model is governed by how it is to be used, rather than by the sensory modality involved. J. B .S. Haldane himself had something to say about animals whose world is dominated by smell. Dogs can distinguish two very similar fatty acids, extremely diluted: caprylic acid and caproic acid. The only difference, you see, is that one has an extra pair of carbon atoms in the chain. Haldane guesses that a dog would probably be able to place the acids in the order of their molecular weights by their smells, just as a man could place a number of piano wires in the order of their lengths by means of their notes.
मुद्दा एवढाच, की एखाद्या मॉडेलचं स्वरूप हे त्याचा उपयोग कसा होणार आहे यावर अवलंबून असतं, त्यासाठी कोणती ज्ञानेंद्रियं आणि जाणिवा वापरल्या जातात यावर नव्हे. खुद्द जे. बी. एस्‌. हॉल्डेननीही गंधाच्या अधिराज्यात जगणार्‍या प्राण्यांबद्दल सांगितलं होतं. कुत्र्यांना एकमेकांसारखी असलेली दोन तैल-आम्लं (फ़ॅटी ऍसिड्स) अगदी विरल (डायल्यूटेड) असली तरी वेगळी ओळखता येतात : कॅप्रिलिक ऍसिड आणि कॅप्रोइक ऍसिड. या दोन आम्लांमधला फरक इतकाच की एका आम्लातल्या कार्बन अणूंच्या साखळीत दुसर्‍यापेक्षा दोन कार्बन जास्त आहेत. हॉल्डेनच्या अंदाजाने, एखाद्या कुत्र्याला वेगवेगळ्या आम्लांचा वास घेऊन ती त्यांच्या रेणवीय वस्तुमानांच्या (मॉलेक्युलर वेट) क्रमात लावता येतील. (जसं एखाद्या माणसाला पियानोच्या पट्ट्यांमधून निघणारे ध्वनी ऐकून त्यांना त्यांच्या तारांच्या कमी-जास्त लांबीनुसार क्रमात लावता येईल.)

Now, there's another fatty acid, capric acid, which is just like the other two, except that it has two more carbon atoms. A dog that had never met capric acid would, perhaps, have no more trouble imagining its smell than we would have trouble imagining a trumpet, say, playing one note higher than we've heard a trumpet play before. Perhaps dogs and rhinos and other smell-oriented animals smell in color. And the argument would be exactly the same as for the bats.
कॅप्रिक ऍसिड नावाचं अजून एक फ़ॅटी ऍसिड आहे - आधीच्या दोघांसारखंच, फक्त त्यात अजून दोन कार्बन अणू जास्त आहेत. कॅप्रिक ऍसिडशी कधीही गाठभेट न घडलेल्या एखाद्या कुत्र्याला त्याच्या वासाची कल्पना करता येणं हे कदाचित आपल्याला ट्रम्पेटवर आपण पूर्वी ऐकलेल्या स्वराहून वरच्या एका स्वराची कल्पना करता येण्याइतपतच अडचणीचं आहे. कदाचित कुत्रे, गेंडे आणि घ्राणेंद्रियं तीक्ष्ण असलेले इतर प्राणी वासावरूनच रंग ओळखत असतील. आणि यामागचं तर्कशास्त्रही तंतोतंत वटवाघुळांच्या उदाहरणासारखंच आहे.

Middle World -- the range of sizes and speeds which we have evolved to feel intuitively comfortable with -- is a bit like the narrow range of the electromagnetic spectrum that we see as light of various colors. We're blind to all frequencies outside that, unless we use instruments to help us. Middle World is the narrow range of reality which we judge to be normal, as opposed to the queerness of the very small, the very large and the very fast. We could make a similar scale of improbabilities; nothing is totally impossible.
मधलं जग -- म्हणजे उत्क्रांतीमुळे ज्या आकार आणि वेगांच्या मर्यादा आपल्याला आपसूकच सवयीच्या वाटतात -- ते जग म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा थोडासाच भाग जसा वेगवेगळ्या रंगांच्या दृश्य प्रकाशाच्या स्वरूपात दिसतो, तसंच आहे. दृश्य प्रकाशाखेरीज इतर कुठल्याही वारंवारितेच्या लहरी आपल्याला काही खास उपकरणं वापरल्याशिवाय ’दिसत’ नाहीत. ’मधलं जग’ हा ’खर्‍या’ जगाचा छोटासा तुकडा आहे. हा छोटा तुकडा आपल्याला ठीकठाक, नॉर्मल वाटतो आणि अतिसूक्ष्म, अतिप्रचंड आणि अतिवेगवान गोष्टी ’विचित्र’ वाटतात. आपण ’असंभाव्य’पणाची अशीच मोजपट्टी तयार करू शकतो; कोणतीही गोष्ट पूर्णत: अशक्य नसते.

Miracles are just events that are extremely improbable. A marble statue could wave its hand at us; the atoms that make up its crystalline structure are all vibrating back and forth anyway. Because there are so many of them, and because there's no agreement among them in their preferred direction of movement, the marble, as we see it in Middle World, stays rock steady. But the atoms in the hand could all just happen to move the same way at the same time, and again and again. In this case, the hand would move and we'd see it waving at us in Middle World. The odds against it, of course, are so great that if you set out writing zeros at the time of the origin of the universe, you still would not have written enough zeros to this day.
’चमत्कार’म्हणजे अत्यंत असंभाव्य घटना असतात इतकंच. एखादा संगमरवरी पुतळा आपल्याला पाहून हात हलवू शकतो; तशीही त्याच्या स्फटिक-संरचनेमधल्या सगळ्या अणूंची पुढे-मागे आंदोलनं चालूच असतात. पण त्या अणूंची संख्या खूपच मोठी असते, आणि त्यांच्या हालचालींच्या दिशांमध्ये कसलाही ताळमेळ नसतो - त्यामुळे मधल्या जगात आपल्याला दिसणारा संगमरवर हा दगडारखाच निश्चल राहतो. पण कधीतरी त्या पुतळ्याच्या हातातले अणू एकाच वेळी एकाच दिशेने हलत आहेत असं घडू शकतं, आणि एकदा नव्हे तर अनेकदा. तसं झालं तर तो हात हलू शकतो आणि मधल्या जगातला तो पुतळा आपल्याकडे पाहून हात हलवतोय असं आपल्याला वाटू शकतं. अर्थात असं घडण्याची शक्यता इतकी कमी आहे, की शून्य पूर्णांक शून्य शून्य शून्य..अशा पद्धतीनं ती आकड्यात मांडायला गेलं, तर विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी ती शून्यं लिहायला आपण बसलो तरी आजच्या या दिवसापर्यंत ती सगळी शून्यं लिहून संपणार नाहीत!

Evolution in Middle World has not equipped us to handle very improbable events; we don't live long enough. In the vastness of astronomical space and geological time, that which seems impossible in Middle World might turn out to be inevitable. One way to think about that is by counting planets. We don't know how many planets there are in the universe, but a good estimate is about ten to the 20, or 100 billion billion. And that gives us a nice way to express our estimate of life's improbability. Could make some sort of landmark points along a spectrum of improbability, which might look like the electromagnetic spectrum we just looked at.
मधल्या जगातल्या उत्क्रांतीने आपल्याला अत्यंत असंभाव्य घटना पचवणं शिकवलं नाहीये - आपण तितका जास्त काळ जगतच नाही. अंतराळाएवढी जागा आणि ग्रहांच्या जीवनचक्राएवढा काळ या अफाट जगामध्ये, मधल्या जगात अशक्य वाटणारी एखादी गोष्ट कदाचित अटळ ठरेल. या गोष्टीबद्दल विचार करायची एक पद्धत म्हणजे ग्रहांची मोजदाद करणं. विश्वात एकूण ग्रह किती हे आपल्याला नक्की माहिती नाही, पण अंदाजे दहा-वीस ते शंभर अब्ज अब्ज तरी असावेत. आणि ही संख्या जीवसृष्टीच्या असंभाव्यतेबद्दलचा आपला अंदाज मांडायला एक चांगला मार्ग ठरू शकते. आपण नुकत्याच पाहिलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमसारखा ’असंभाव्यतेचा स्पेक्ट्रम’ बनवून त्याच्यावर आपण काही महत्त्वाचे टप्पे दाखवू शकतो.

If life has arisen only once on any -- if -- if life could -- I mean, life could originate once per planet, could be extremely common, or it could originate once per star, or once per galaxy or maybe only once in the entire universe, in which case it would have to be here. And somewhere up there would be the chance that a frog would turn into a prince and similar magical things like that. If life has arisen on only one planet in the entire universe, that planet has to be our planet, because here we are talking about it.
जर कुठेही जीवसृष्टी फक्त एकदाच निर्माण झाली असती -- होऊ शकली असती -- म्हणजे मला असं म्हणायचंय की जर प्रत्येक ग्रहावर जीवसृष्टीचा एकदा उगम झाला असता तर ती अगदीच सर्रास, कॉमन ठरली असती. ती एका तार्‍यामागे एक या दराने, किंवा एका आकाशगंगेमागे एक किंवा अख्ख्या विश्वात एक अशीच उगम पावली असती - तर (या शेवटच्या शक्यतेनुसार) ती स्पेक्ट्रममध्ये इथे असायला हवी. आणि त्या तिथे वर कुठेतरी एखाद्या बेडकाचा राजपुत्र बनायची शक्यता असणार, किंवा तत्सम जादूई गोष्टी. जर अख्ख्या विश्वात जीवसृष्टी फक्त एकाच ग्रहावर निर्माण झाली असेल तर तो आपलाच ग्रह असला पाहिजे, कारण आपण आत्ता इथे त्याबद्दल बोलत उभे आहोत.

And that means that if we want to avail ourselves of it, we're allowed to postulate chemical events in the origin of life which have a probability as low as one in 100 billion billion. I don't think we shall have to avail ourselves of that, because I suspect that life is quite common in the universe. And when I say quite common, it could still be so rare that no one island of life ever encounters another, which is a sad thought.
आणि याचाच अर्थ, जर आपल्याला तशी समजूत करून घ्यायची असेल तर शंभर अब्ज अब्जांमध्ये एक इतकी संभाव्यता असलेल्या रासायनिक प्रक्रिया जीवसृष्टीच्या उगमाच्या वेळी घडल्या असा तर्क आपण मांडू शकतो. पण आपल्याला तशी समजूत करून घ्यावी लागेल असं मला वाटत नाही, कारण विश्वामध्ये सजीवसृष्टीचं अस्तित्त्व बर्‍यापैकी सर्रास असावं असा माझा अदमास आहे. आणि मी सर्रास असं म्हणतोय, तरीपण ते इतकं दुर्मिळ असू शकतं की जीवसृष्टीच्या कुठल्याही एका बेटाची दुसर्‍याशी कधीही गाठभेट होणार नाही. हा जरा उदास करणारा विचार आहे.

How shall we interpret "queerer than we can suppose?" Queerer than in principle can be supposed, or just queerer than we can suppose, given the limitations of our brain's evolutionary apprenticeship in Middle World? Could we, by training and practice, emancipate ourselves from Middle World and achieve some sort of intuitive, as well as mathematical, understanding of the very small and the very large? I genuinely don't know the answer.
आता "आपल्याला वाटू शकतं त्याहूनही विचित्र" याचा अर्थ आपण कसा लावायचा? म्हणजे तत्त्वत: , प्रत्यक्षात जे वाटू शकतं त्याहून विचित्र, की फक्त मधल्या जगात उत्क्रांत होताना आपल्या मेंदूवर पडलेल्या मर्यादांमुळे आपल्याला वाटू शकतं त्याहून विचित्र? आपण प्रशिक्षण आणि सरावाच्या जोरावर स्वत:ला मधल्या जगातून मुक्त करवून घेऊन अतिसूक्ष्म आणि अतिभव्य गोष्टींबद्दलचं एक आंतरिक आणि गणितीय ज्ञानही मिळवू शकतो का? मला खरोखरच याचं उत्तर माहिती नाही.

I wonder whether we might help ourselves to understand, say, quantum theory, if we brought up children to play computer games, beginning in early childhood, which had a sort of make believe world of balls going through two slits on a screen, a world in which the strange goings on of quantum mechanics were enlarged by the computer's make believe, so that they became familiar on the Middle-World scale of the stream. And, similarly, a relativistic computer game in which objects on the screen manifest the Lorenz Contraction, and so on, to try to get ourselves into the way of thinking -- get children into the way of thinking about it.
मी कधीकधी विचार करतो की आपण आपल्याला पुंजसिद्धांत कळवून घ्यायला अशी मदत करू शकतो का : म्हणजे समजा आपण आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून असे कॉम्प्यूटर गेम्स खेळायला दिले ज्यात लुटूपुटूचं जग असेल. या जगात एका पडद्यातल्या दोन खाचांमधून जाणारे चेंडू असतील, पुंजभौतिकीत घडणार्‍या चित्रविचित्र गोष्टी संगणकाद्वारे अजूनच मोठ्ठ्या करून दाखवल्या जातील, आणि मुलांना त्याच्या मधल्या जगातल्या परिमाणांची सवय होईल. तसाच एखादा सापेक्षतावादी कॉम्प्युटर गेम तयार करायचा, ज्यात पडद्यावरच्या वस्तूंचं लॉरेन्झ कॉन्ट्रॅक्शन होईल - वगैरे वगैरे- आणि अशा पद्धतीनं आपण आपल्याला, आपल्या मुलांना तसा विचार करायची सवय लावायचा प्रयत्न करू शकतो.

I want to end by applying the idea of Middle World to our perceptions of each other. Most scientists today subscribe to a mechanistic view of the mind: we're the way we are because our brains are wired up as they are; our hormones are the way they are. We'd be different, our characters would be different, if our neuro-anatomy and our physiological chemistry were different. But we scientists are inconsistent. If we were consistent, our response to a misbehaving person, like a child murderer, should be something like, this unit has a faulty component; it needs repairing. That's not what we say.
मधल्या जगाची संकल्पनेचा वापर आपल्या एकमेकांबद्दलच्या जाणिवेकरता करून मी हे भाषण संपवणार आहे. सध्या बहुसंख्य शास्त्रज्ञ मन यांत्रिक आहे या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतात: आपण जसे आहोत तसे आहोत, कारण आपले मेंदू जसे घडले गेले आहेत तसे आहेत, आपली संप्रेरकं जशी आहेत तशी आहेत. जर आपल्या मेंदूची संरचना आणि आपल्या शरीराचं रसायनशास्त्र वेगळं असलं असतं तर आपणही वेगळे असलो असतो, आपली वैचारिक घडण वेगळी असली असती. पण आम्ही शास्त्रज्ञ लोक विसंगतही असतो. जर आमचे विचार सुसंगत असते, तर एखाद्या वाईट वागलेल्या, उदा. लहान मुलाचा खून केलेल्या व्यक्तीवरची आमची प्रतिक्रिया अशी असली असती: या यंत्राचा एक भाग बिघडला आहे; त्याला दुरुस्तीची गरज आहे. पण आम्ही असं नाही म्हणत!

What we say -- and I include the most austerely mechanistic among us, which is probably me -- what we say is, "Vile monster, prison is too good for you." Or worse, we seek revenge, in all probability thereby triggering the next phase in an escalating cycle of counter-revenge, which we see, of course, all over the world today. In short, when we're thinking like academics, we regard people as elaborate and complicated machines, like computers or cars, but when we revert to being human we behave more like Basil Fawlty, who, we remember, thrashed his car to teach it a lesson when it wouldn't start on gourmet night. (Laughter)
आम्ही असं म्हणतो -- आणि या ’आम्ही’ मध्ये आमच्यातला अगदी सगळ्यात कर्मठ यांत्रिकतावादीही आहे - म्हणजे बहुतेक मीच -- तर आम्ही म्हणतो ते असं : "अधम राक्षसा, तुझ्यासारख्याला तुरुंगात घालणं म्हणजे तर तुझ्यावर दयाच दाखवल्यासारखं आहे." किंवा त्याहूनही वाईट म्हणजे आपण सूड घेऊ पाहतो, आणि त्यातून प्रति-सूडाच्या एका वाढत्या चक्राला सुरुवात होण्याची दाट शक्यता असते. हे असं सूडचक्र तर आपण अर्थातच आज जगात सगळीकडे बघतो आहोत. थोडक्यात, जेव्हा आपण तर्काधिष्ठित विचार करत असतो, तेव्हा आपण लोकांकडे ती संगणकासारखी किंवा मोटार कारसारखी खूप विस्तृत आणि गुंतागुंतीची यंत्रं आहेत अशा रीतीनं बघतो, पण जेव्हा आपण परत माणसासारखा विचार करायला लागतो तेव्हा आपण जरा बॅसिल फ़ोल्टीसारखं वागायला लागतो. आपल्याला आठवत असेल, की (बीबीसीच्या ’फ़ोल्टी टॉवर्स’ या मालिकेतला) फ़ोल्टी एकदा एका खास मेजवानीच्या रात्री त्याची गाडी सुरू होत नाही म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी चांगलं चोपून काढतो. (हशा)

The reason we personify things like cars and computers is that just as monkeys live in an arboreal world and moles live in an underground world and water striders live in a surface tension-dominated flatland, we live in a social world. We swim through a sea of people -- a social version of Middle World. We are evolved to second-guess the behavior of others by becoming brilliant, intuitive psychologists. Treating people as machines may be scientifically and philosophically accurate, but it's a cumbersome waste of time if you want to guess what this person is going to do next.
आपण गाड्या आणि संगणक यांच्यासारख्या गोष्टींना मनुष्यरूप देऊ पाहतो याचं कारण म्हणजे माकडं जशी झाडांच्या जगात राहतात, घुशी जशा जमिनीखालच्या जगात राहतात आणि पाणकिडे जसे पृष्ठताणाचं अधिराज्य असलेल्या सपाट जगात राहतात तसे आपण एका सामाजिक जगात राहतो. आपण माणसांच्या समुद्रातून पोहत जात असतो -- हे मधल्या जगाचं सामाजिक रूप आहे. आपण इतरांच्या वर्तणुकीचा अंदाज बांधणारे अतिशय तल्लख, अंत:प्रेरित मानसशास्त्रज्ञ बनून उत्क्रांत झालो आहोत. माणसांना यंत्राप्रमाणे वागवणं हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि तात्त्विकरित्या अचूक असेल, पण जर तुम्हांला तो माणूस याच्यानंतर काय करणार आहे हे ओळखायचं असेल तर तसं करणं ही वेळेची फुकटंफाकट नासाडी ठरेल.

The economically useful way to model a person is to treat him as a purposeful, goal-seeking agent with pleasures and pains, desires and intentions, guilt, blame-worthiness. Personification and the imputing of intentional purpose is such a brilliantly successful way to model humans, it's hardly surprising the same modeling software often seizes control when we're trying to think about entities for which it's not appropriate, like Basil Fawlty with his car or like millions of deluded people with the universe as a whole. (Laughter)
एखाद्या व्यक्तीचा आराखडा बनवायचा सर्वात कमी खर्चिक मार्ग म्हणजे त्या व्यक्तीला एक सहेतुक, काहीतरी मिळवायच्या उद्देशानं काम करणारी, आनंद आणि दु:ख , इच्छा-आकांक्षा आणि उद्दिष्टं असणारी, अपराधीपणाची भावना बाळगणारी, ठपका ठेवण्यालायक असलेली व्यक्ती असल्यासारखं वागवणं. मानवीकरण आणि सहेतुक उद्दिष्टाचं आरोपण हा माणसांचा आराखडा बनवायचा इतका पराकोटीचा यशस्वी मार्ग आहे, की तसा आराखडा बनवणार्‍या सॉफ्टवेअरने ते ज्या गोष्टींकरता योग्य नाही त्या गोष्टींबद्दल आपण विचार करत असतानाही त्यांच्यावर हुकूमत गाजवणं हे नवलाचं नाही. उदाहरणार्थ, बॅसिल फ़ोल्टी आणि त्याची गाडी. किंवा अख्ख्या जगातले लाखो भाबडे, फसवले गेलेले लोक. (हशा)

If the universe is queerer than we can suppose, is it just because we've been naturally selected to suppose only what we needed to suppose in order to survive in the Pleistocene of Africa? Or are our brains so versatile and expandable that we can train ourselves to break out of the box of our evolution? Or, finally, are there some things in the universe so queer that no philosophy of beings, however godlike, could dream them? Thank you very much.
जर हे विश्व आपल्याला वाटू शकतं त्याहूनही विचित्र असेल तर ते केवळ एवढ्याचसाठी का, की आपण प्लायस्टोसीन युगात आफ़्रिकेत असताना तिथे टिकून राहण्यासाठी ज्या गोष्टींची कल्पना करण्याची आपल्याला गरज होती, केवळ त्याच गोष्टी कल्पिण्याकरता आपली नैसर्गिक निवड झाली आहे? की आपले मेंदू इतके अष्टपैलू आणि विस्तार करण्याजोगे आहेत की आपण आपल्याच उत्क्रांतीच्या खोक्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या मेंदूला प्रशिक्षण देऊ शकतो? किंवा, सरतेशेवटी, विश्वात इतक्या विचित्र अशा काही गोष्टी आहेत का की कुठल्याही जीवमात्रांचं (मग ते कितीही देवासारखे असूदेत) कोणतंही तत्त्वज्ञान, त्या गोष्टींची कल्पनाच करू शकणार नाही? धन्यवाद!