Friday, July 23, 2010

मावसबोलीतल्या कविता

मेघनाने ’खो’ दिलाय हे वाचताक्षणीच मला हातात कोलीत मिळाल्यासारखा आनंद  झाला. ’कवितेचं भाषांतर करणार नाही’ असं हजारदा लिहायची शिक्षा मिळेल तेव्हाच माझी खाज संपेल असं वाटतं आहे.
तूर्तास, रायनर मारिया रिल्के(विकिपीडिया) च्या एका कवितेची भाषांतरं करण्याचे अनेक प्रयत्न केले, ते इथे लिहिते आहे. प्रत्येक वेळेला ही कविता मूळ भावाशी/शब्दांशी प्रामाणिक राहात मराठीत अनुवादित करणं माझ्याच्याने कसं निव्वळ अशक्य आहे हे कळालं. त्यामुळे  भाषांतरांमध्ये ’टाइमपास’ हे साध्य, आणि रिल्केची मूळची अतिशय  घाटदार, यमकबद्ध आणि काळीजभिडू कविता हे साधन बनले आहे, याबद्दल क्षमस्व.


मूळ जर्मन कविता: (स्रोत)

Der Dichter

Du entfernst dich von mir, du Stunde.
Wunden schlägt mir dein Flügelschlag.
Allein: was soll ich mit meinem Munde?
mit meiner Nacht? mit meinem Tag?

Ich habe keine Geliebte, kein Haus,
keine Stelle auf der ich lebe
Alle Dinge, an die ich mich gebe,
werden reich und geben mich aus.

***
शब्दश:  इंग्रजी भाषांतर:
The Poet

You get away from me, o hour!
Your fluttering wings impose wounds upon me.
Although: What will I do with my mouth?
With my night? With my day?

I have no love, no home,
No place to live upon
All things, which I gave to myself,
Get rich and give me away.

***
 (१)
  कवी

दूर करी तू तुजला माझ्यापासुनि वेळे,
घाव घालिती पंख तुझे फडफडते मजवर.
पण कसे करू मग वाचेचे मी नंतर चाळे?
काय करू रात्रींचे माझ्या? दिवसही कातर?

प्रेम नसे अन्‌ घरटे नाही कोठे टिकुनी
जिथे राहातो असा न माझा कोठे पत्ता
भंगुर वस्तू मिळवित गेलो माझ्याकरिता
मालदार त्या सर्व जाहल्या मलाच विकुनी.

***

(२)
कविवर्य (आर्यागीति छंद)

तासा निघून जावे, माझ्यापासुनि दूर तुवां लवलाही।
तुझिया पंखांनी ह्या जखमा झाल्या, अंगी पेटते लाही।
काय करावे तेव्हा, परि म्यां माझ्या प्रकांड तोंडाचे?
उरेल रात्र रिकामी, उरेल सारा दिवस पुन्हा तो डाचे।

प्रेम कुणाचे नाही, नाही घराचा उभा कुठे मजला।
शांत जगावे जेथे, अशी न जागा असे कुठे मजला।
पार्थिव वस्तू  जी जी, माझ्यासाठी मलाच मी केली।
ती ती मजला विकुनी, धनिकपणाची करीतसे केली*॥

* केली = क्रीडा, खेळ.

***

(३)
कवी!

तू दूर कर स्वत:ला माझ्यापासून, हे तास नावाच्या बंदिवान गृहस्था!
तुझ्या फडफडत्या पंखांच्या मार्‍याने पुरतं जखमी केलंय मला, रक्ताळून सोडलं आहे - पहा!
पण थांब : तू गेलास तर माझ्या या मेघनाद मुखातून शब्दांचे यज्ञयाग कसे बाहेर पडावेत?
माझ्याच अंगावर धावून येणार्‍या माझ्या रात्रींना मी कसं थोपवू?  आणि माझ्या दिवसांचं उजाड फटफटीत वस्त्र कुणाच्या अंगावर पांघरू?

मी कुणाच्याच मायेच्या मऊसूत वस्त्रात गुंडाळला गेलो नाही कधीच - अगदी नदीत वाहावला गेलो असतो तरीही तसाच ओंडक्यासारखा सापडलो असतो त्या सारथ्याला. अनिकेत मी! कां आपलंसं वाटेल कोणतं घर मला? आणि परसात चूळ भरण्यापुरती जागादेखील आपली म्हणणं नकोसं होतं माझ्यातल्या झंझावाती दरवेश्याला.
ह्या दीड वितीच्या पोटासाठी माणसांच्या बाजारातल्या कचकड्याच्या बाहुल्या जवळ बाळगाव्या लागतात म्हणून, आणि केवळ म्हणूनच (नाही, खोटं का बोलू? मलाही मोह होतो कधीतरी त्यांच्या सुंदर लोलकांचा!) - मी जवळ बाळगलेल्या या वस्तू - यांनीच आता मला तुकड्यातुकड्याने विकायला काढलं आहे. माझ्या अस्तित्त्वाचा एक एक क्षीण अंश कुरतडून गलेलठ्ठ उंदरांसारख्या या वस्तू आता माझ्या स्वप्नांवरही आपला मालकीहक्क गाजवणार आहेत. आता... आता दूर हो...फक्त.

***

(४)
कविता करतंय स्सालं...

जा की तासा, घड्ड्याळीच्या - लय भेजा गरम केलास.
फडाड फडाड पिसं हलवत माझाच सगळा गेम केलास.
आयला पन तू गेलास म्हंजे माझं थोबाड एकदम बंद!
रात्री सगळ्या फुक्काट टिनपाट दिवस पन होणार थंड!

माझी कोनपन आयटम नाय,डोक्यावरती छप्पर नाय
ढुंगणाखाली साला आपला हक्काचाबी फुटपाथ नाय
पैसा टाकून घेऊन आलो फोकलत फाफलत सगळा माल
त्याचीच च्यावच्याव लई आता , मी विकल्या मायचा लाल.

***
माझा खो राजला.