(चि./ ती./ प्रिय) कै. पिया!
पिया पुन्हा एकदा मेली आहे.
मेली म्हणजे तिच्या कुडीतून प्राण गेले नाहीत.
(नाहीतर ’पुन्हा एकदा’ कशाला म्हटलं असतं? नऊ आयुष्यं असायला ती काय इंग्रजी मांजर आहे?)
मेली म्हणजे मला मेली. ती माझ्या ’हाय-हॅल्लो’मित्रवर्तुळातून नाहीशी झाली.
पिया कधीही तडकाफडकी मरत नाही. खूप महिन्यांनी कधीतरी लक्षात येतं की ती मेल्याला बरेच महिने झाले.
अशा वेळी मीहून कधी तिला पुन्हा संजीवनी द्यायला जात नाही.
यथावकाश तिला पुनर्जन्म मिळेल आणि ती स्वत:हून मला भेटेल.
आधीपेक्षा वेगळीच, आणि तरीही तेवढीच विलक्षण.
पण यावेळी ती मेल्याला वर्ष होत आलंय. म्हटलं एक शाब्दिक श्राद्ध घालूया. स्वत:च्या समाधानासाठी.
***
पिया,
’भगवद्गीता इज अ मल्टी-लेव्हल्ड टेक्स्ट.’ अर्चनाबाईंनी कितीदा तरी सांगितलं असेल.
मला सारखं वाटायचं, ते वाक्य तुझ्या बाबतीत तितकंच खरं आहे माझ्यासाठी.
शिक्केच मारायचे तर माझी मैत्रीण झालीस. माझं मूल झालीस, माझी आजी झालीस आणि माझी वैरीणही झालीस.
एकाच व्यक्तीबद्दल कधी अतोनात प्रेम, कधी अतोनात मत्सर, कधी अतोनात तिरस्कार वाटावा आणि यातली एकही भावना चिरस्थायी नसावी हे पुस्तकांतून घडतं. तू मला प्रत्यक्षात अनुभवायला दिलंस.
तू मला किती वेळा काहीबाही समजावून सांगितलंस.
तुझ्या कल्पनाविश्वात फिरायला घेऊन गेलीस.
कधी एखाद्या भागाची मनमुराद सैर घडवलीस आणि कधी नुसतंच भांडाराचं दार किलकिलं करून आतल्या रत्नसाठ्याची एक झलक दाखवलीस.
त्या त्या वेळी माझ्या प्रतिक्रियेतून मला तुझं म्हणणं कितपत कळलंय हे जोखलंही असेल तुझ्या कुशाग्र बु्द्धीनं.
कधी कधी वाटायचं, इतकी स्वत:त दंगलेली तू...का गं मला तुझ्या इतके आतले भाग दाखवतेस?
मग एकदा मला ’नार्सिसस’ची गोष्ट कळली. ते रूपक नवसाहित्यात खूप आवडीचं ठरलंय कित्येकांच्या.
म्हणजे आजकालचे लोक जास्त नार्सिसिस्ट झालेत असं नाही, तर आजकाल त्यांना त्या रूपकातलं सौंदर्य जाणवायला लागलंय असं म्हणूयात का?
मलासु्द्धा सगळ्या जगाचं प्रेम ठोकरलेल्या, मग पाण्यात स्वत:चं प्रतिबिंब बघून वेड्या झालेल्या, आणि त्याच्याकडे बघत झुरून मेलेल्या नार्सिससाबद्दल इतकी आपुलकी वाटली झटकन!
पण तू नार्सिसस असतीस ना, तर तू ’प्रेमपूर्ती होत नाही’ म्हणून झुरून गेली नसतीस.
स्वत:च्या प्रतिबिंबालाही स्वत:वर तितकं अधिराज्य गाजवू न देणारी, नार्सिससाहूनही अधिक
नार्सिसिस्टिक असली असतीस तू.
नार्सिसस खरं तर का मेला, सांगू?
तो मेला कारण त्या प्रतिबिंबाचं सौंदर्य त्याला कुणाला दाखवायला मिळालं नाही म्हणून.
सगळ्यांना झिडकारून टाकून त्यानं एकही ’श्रोता’ जवळ बाळगला नाही म्हणून.
त्यानं अनुभवलेली प्रेमाची ती अतिसुंदर भावना त्याला कुणालाच वर्णन करून सांगता आली नाही म्हणून.
खूप दिवस झाले पियू, आता फोन करावास.