पत्रावळ: २
( "आपण का नाही असं सजवून धजवून जेवण मांडत रोज?" या प्रश्नावर "बाळा, वेळ असता तर चिंचेच्या पानाच्या पत्रावळी केल्या असत्या" हे उत्तर वाचलं. वाटलं, वेळ असता तर..मुभा असती तर..जाणीव असती तर..वाचायला कुणी असतं तर..किती जणींनी किती पत्रांतून मन मांडलं असतं आपलं. त्या न लिहिल्या गेलेल्या पत्रांच्या या पत्रावळी.)
सहेला रे,
आज मुद्दाम तुला लिहितीये ते चानीबद्दल सांगण्यासाठी. रंजनानं रंगवलेली खानोलकरांची चानी नाही. प्रणूदादाला कुणीतरी दिलेलं ते खारीचं पिल्लू होतं ना, त्याला ’चानी’ म्हणून हाक मारायचा तो..तसली एक मिळालीय मला चानी.
आम्ही भेटल्याच्या दुसर्या दिवशी तिनं मला सांगितलं : 'माझ्या चिपमंकसारख्या क्यूट चेहर्यामुळे लोकांना वाटतं मी निरागस आहे. तसं काही नाहीये हां अज्जिबात.'
झकास!
मी मनातल्या मनात स्वत:लाच टाळी दिली. 'राजा माणूस' असायला हरकत नाहीये या मुलीला.
अंदाज चुकला नाही.
तर चिपमंकपेक्षा खार जवळची आपल्याला, आणि 'चिप्पू' आणि 'मंकू' नावं आधीच इतर लोकांना बहाल करून झाल्यामुळे चानीचं माझ्या डोक्यातलं नाव चानी.
शब्दांवर तिचं भारी प्रेम. मराठीतल्या 'च़' आणि 'ज़' या वर्णाक्षरांची तिला फार गंमत वाटते. (लेखी मराठीत 'चहा' तला आणि 'चल'मधला च वेगळा नाही दाखवता येत - म्हणून ऊर्दूतल्यासारखा नुक्ता दिलाय. कसा हनुवटीवरल्या तिळासारखा साजरा दिसतोय किनै?) गेला आठवडाभर तिच्या डोक्यात मराठी शिकायचं खूळ बसलंय. आणि ’च़'कार शब्द शोधून तिला वाक्यं बनवून देता देता माझी चिक्कार करमणूक होते आहे. चानी पहिलं वाक्य शिकली ते : "चु़ळबूळ करू नको!" आणि मग "मी वाचू़न वाचू़न च़कणी झालेय', ’च़ट्च़ट पाय उच़ल’, 'भजी चु़रचु़रीत आणि च़मच़मीत आहेत' 'पोट सुटलंय एवढं तरी च़रतोय बघ मेला कसा' 'आच़रट कार्टी!' अशी चढती भाजणी सुरू आहे. पोरीला कुणी मराठी नवरा मिळाला तर हाल आहेत बिचार्याचे.
त्या ’फन फेअर’ मध्ये खूप खूप रंगीबेरंगी फुगे भरलेली काचेची खोली असते, आणि मग लहान लहान मुलं तिच्यात शिरून ते फुगे मनसोक्त उडवत, तुडवत नाचत असतात तशा शब्द आणि कल्पना उधळत खेळत बसतो आम्ही.
तुझं-माझंच घे आता. ’सरकती जाये है, रुख से नक़ाब..आहिस्ता, आहिस्ता’ थाट आपला. कसं सांगायचं तिला समजावून? तिनं तर तुला पाहिलं पण नाहीये रे. आणि दाखवायला तुझा एकपण चांगला फोटो नाही माझ्याकडे. आहेत त्यांच्यात वेडाबावळाच दिसतो आहेस. :P
पेरविणीवरच्या तटतटून भरलेल्या मधाच्या पोळ्यातून कष्टानं ठिबकणार्या मधागत तुझं बोलणं तरी कसं ऐकवू तिला?
मग म्हटलं, तीन गोष्टी सुचतायत. एक परिसरजन्य.
संपृक्त गंधकाम्ल (कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड) हातावर पडतं त्याचक्षणी सप्तपाताळ एक होईल एवढा आक्रोश करावासा वाटतो. पण हायड्रोफ्लुओरिक ऍसिड हातावर पडलं तर लगेच काही कळतच नाही म्हणे. वरच्या त्वचेला जराही धक्का न लावता ते रंध्रांतून आत झिरपत जातं. हाडं खिळखिळी करतं. मग तसंच हळूहळू रक्तात मिसळतं..तेव्हा एकदम हृदयच बंद ताडकन! तसं आपलं नातं?
(ए, गंधक म्हणजे सल्फर, स्फुरद म्हणजे फॉस्फरस, तसं फ्लुओरीनला काय म्हणतात तुला माहित्ये का रे? मी व्युत्पत्ती बघितली तर कळलं की ’फ्लुओर’ हे ’प्रवाही’ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून आलं. काच वितळवणारा ’प्रवाहक’ फ्लुओराईड आयन. विचार तुझ्या त्या भाषाशास्त्रज्ञ मित्राला. नाहीतर मराठी विज्ञान शब्दकोशात बघून सांग मला.)
दुसरं उदाहरण कवितेतलं. शार्दूलविक्रीडितातली एक कविता वाचताना सांगत होते चानीला, ही वृत्ताची भानगड काय आहे ते. मग जाणवलं, तू-मी म्हणजे मंदाक्रांता वृत्तासारखे चाललोत. आमच्या हेर्लेकर सरांनी सांगितलेल्या ओळी :
मंदाक्रांता म्हणती तिजला वृत्त ते मंद चाले
ज्याच्या पादी मभनतत हे आणि गा दोन आले
(असं संऽऽऽथ सुरात गाताना पुढे श्लोक पुरा करायला मला
’नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव
राहो चित्ती प्रिय मम परी मातृभूमी सदैव’
हेच आठवतं नेहमी!)
आणि शेवटचं उदाहरण तिला, मला (तुला पण) प्रिय असणार:
उन्हाळ्यात दलदलीत डुंबत बसलेली म्हैस जितक्या अलबत्या गलबत्या गतीनं तिथून बाहेर निघेल ना, तितक्या मंदपणे आपण चाललोय ;)
जाऊ देत. आता मला शिव्या घालायच्याच असतील तर च़ आणि ज़ त्यांत असतील असं बघ.
येते रे!
--आर्या.