Friday, March 02, 2007

हिवाळ्यातल्या एका रात्री जर एक प्रवासी... (इतालो कॅल्वीनो)

गेल्या जुलैमध्ये एका संकेतस्थळावर इतालो कॅल्वीनोबद्दल वाचल्यानंतर मी या लेखकाची पुस्तकं 'वाचलीच पाहिजेत'च्या यादीत टाकली होती. विशेषत: एका पुस्तकातलं पहिलं प्रकरण त्याच संकेतस्थळावर वाचून त्याच्याबद्दलची उत्कंठा भलतीच वाढली होती. ते पुस्तक म्हणजे 'If On A Winter's Night A Traveller'.
IITत परत आल्या आल्या वाचनालयाच्या कॅटॅलॉग मध्ये शोध घेतला - आणि चक्क या माणसाची सात-आठ पुस्तकं तिथे असल्याचं दिसलं. अर्थातच 'If On A..' पुस्तक issued होतं. 'हे नेहमीचंय. मी अंत:क्रमांकयोगावर जन्मलेली असणार' वगैरे पुटपुटून मी कॅल्वीनोचं Mr. Palomar उचललं. वाचताना 'मझा आला' , तरी इवलंसं ते पुस्तक वाचायला जऽरा जास्तच वेळ लागला अपेक्षेपेक्षा.
हे वाजवीहून जास्त हुशार लेखक असतात ना, ते पंचाईत करून ठेवतात माझी. ओळ अन्‌ ओळ लक्षपूर्वक वाचायला लागते! मग ते पुस्तक परत केल्यावर काही मी 'If On A..' चा पाठपुरावा केला नाही. पण काल fiction section मध्ये उगाच उचकापाचक करत असताना मला त्याची परत आठवण झाली, आणि ते फडताळात बसलेलं मिळालंदेखील. वाचायला सुरुवात केली, आणि लगेच मनातल्या मनात त्या ओळींचा मराठी अनुवाद सुरू झाला.
कवितांचे मराठीतून हिंदी/ इंग्रजीत भाषांतर करण्याचे एक-दोन प्रयत्न मी करून पाहिलेयत. इंग्रजी कवितेचं मराठीत भाषांतर मला मुळीच जमत नाही असं जाणवलं, त्यामुळे तसा प्रयत्न करून सोडून दिला. शिवाय 'भारतीय भाषांमधलं साहित्य जगभरात पोचलं पाहिजे' वगैरे वाचून वाचून (आणि अर्थात स्वत:लाही तसं वाटत असल्यामुळे) मराठी --> इंग्रजी असंच एखादं पुस्तक अनुवादित करायचा प्रकल्प येत्या उन्हाळी सुट्टीसाठी राखून ठेवला होता. पण आज हे पुस्तक वाचत असताना मला राहवेचना. द्वितीयपुरुषातलं निवेदन. मुद्यावर चटकन न येता, आहे त्या गोष्टीचा कीऽऽऽऽस काढत बसून अत्यंत चतुर पाल्हाळ लावणं. शब्दार्थचमत्कृतीचा विनोद. जंजाळात मध्येच इतक्या सहजपणे गंभीर होणं, की थबकून तीन-तीनदा ते वाक्य वाचायला लागावं. एखादं पुस्तक वाचताना मला फार म्हणजे फारच प्रिय असणाऱ्या या गोष्टी!
मग वाचता वाचताच मराठीत टंकायला सुरुवात केली. पहिलं प्रकरण पूर्ण झालं. पुस्तक पुढं कसं जातंय, त्याला 'कहाणी' आहे का, ती अनुवाद करण्याजोगी आहे का, हे मला माहिती नाही. पण कॅल्वीनोचा हा पहिला भाग स्वयंपूर्ण रीतीनं मनोरंजक आहे.

मूळ इंग्रजीतला भाग इथे आहे.


http://books.guardian.co.uk/departments/generalfiction/story/0,,1221892,00.html


मूळ कादंबरी (इतालियन भाषा): If On A Winter's Night A Traveller
मूळ लेखक: Italo Calvino
इंग्रजी अनुवाद: William Weaver

***

[१]

प्रिय वाचका, तू इतालो कॅल्वीनोची नवीन कादंबरी - 'हिवाळ्यातल्या एका रात्री जर एक प्रवासी' वाचायला सुरुवात करणार आहेस. जरा स्वस्थ बस. सगळे ताणतणाव विसरून जा. एकाग्र हो. इतर कुठल्याही विचारांना मनात थारा देऊ नको. आसपासच्या जगाची जाणीव हळूहळू विरत जाऊदे. खोलीचा दरवाजा बंद केलास तर बरं; कारण बाजूच्या खोलीत नेहमीसारखाच टीव्ही ठणाणत असणार. लगोलग बाकीच्यांना सांगून टाक, "नाही नाही, मला मुळीच बघायचा नाहीये टीव्ही!" जरा आवाज चढवून बोल - नाहीतर त्यांना ऐकू येणार नाही - "मी पुस्तक वाचतो आहे! मला डिस्टर्ब केलेलं अजिबात चालणार नाही, सांगून ठेवतोय!"
तरीपण त्या बाहेरच्या गलबल्यात त्यांना तुझा आवाज ऐकू गेलेला नसणार बहुतेक. मग अजून मोठ्यानं बोल, अगदी कोकल हवं तर: " मी इतालो कॅल्वीनोची नवी कादंबरी वाचायला घेतलीय!" नाहीतर असं कर, काहीच बोलू नकोस; ते लोक तुला त्रास द्यायला येणार नाहीत अशी आशा मनात बाळगत गप्प राहा.

तुला अत्यंत आरामात बसता येईल असं बघ : नुसतंच बसून, हातपाय तण्णावून, अंगाचं मुटकुळं करून, नाहीतर सरळ आडवं होऊन. आडवं होऊन म्हणजे तुझ्या पाठीवर, कुशीवर, पोटावर - कसंही. एखाद्या गबदुल्या खुर्चीत, सोफ्यावर, आरामखुर्चीत, साध्या लाकडी खुर्चीत, एखाद्या गुबगुबीत उशीवजा स्टुलावर. तुझ्याकडे झोपाळ-खुर्ची असेल तर तिच्यात. बिछान्यावर बसून, नाहीतर सरळ बिछान्यात घुसून. वाटलं तर तू एखाद्या योगमुद्रेप्रमाणे डोकं खाली घालून तुझ्या हातांवरसुद्धा उभा राहू शकतोस. तुला पुस्तक उलटं धरून वाचावं लागेल एवढंच.

अर्थात्, तुला 'वाचनासाठीची सर्वोत्तम स्थिती' कधी शोधता येणारच नाही. पूर्वी म्हणे लोक उभं राहून वाचायचे, एखाद्या उंच घडवंचीवर पुस्तक ठेवून. त्यावेळच्या लोकांना अजिबात न हलता आपल्या पायांवर उभं राहायची सवय होती. घोडेस्वारी करून बिचारे दमायचे तेव्हा विश्रांतीसाठी तसेच उभे राहायचे. त्यांच्यातल्या कुणाला घोड्यावर बसल्या बसल्या 'अखंडीत वाचीत जावे' असा उपदेश पाळायचं काही सुचलं नाही म्हणा; तरीपण आत्ता घोड्यावरच्या खोगीरात बसून, पुस्तक त्या घोड्याच्या आयाळीवर टेकवून नाहीतर त्याच्या कानाला एखाद्या जाडजूड दोरीनं घट्ट बांधून वाचायची कल्पना झकास वाटतेय की नाही तुला? तुझे पाय रिकीबीत नीट बसलेले असले की मग तर तुला अगदी मजेत वाचता येईल. वाचनानंद उपभोगण्यासाठी 'पाय वर करून बसणं' ही सर्वात पहिली गरज आहे हे लक्षात ठेव.

आता वाट कशाची बघतोयस आणखीन? पाय ताणून आळस दे जरा. मग आपले पाय एखाद्या उशीवर - दोन उश्यासुद्धा चालतील, सोफ्याच्या किंवा खुर्चीच्या हातांवर, टीपॉयवर, टेबलावर, पियानोवर नाहीतर टेबलावरल्या पृथ्वीगोलावर ठेव खुशाल. पायातल्या चपला तेवढ्या काढ अगोदर. आता पाय वर ठेवावेसे वाटत असतील तर ठेव, नाहीतर परत घाल त्या चपला. अरे - असा एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात हे पुस्तक घेऊन काय उभा राहिलायस बावळटासारखा?

डोळ्यांवर ताण येणार नाही अशा पद्धतीनं खोलीतला प्रकाश कमी-जास्त कर. हो, आत्ता्च्या आत्ताच, कारण एकदा का वाचण्यात गुंगून गेलास की तुझ्याच्यानं जागेवरून उठवलं जाणार नाही मग. पानावर सावली पडून ते करडं झालं नाहीये ना, त्याच्यावरली अक्षरं उंदरांच्या झुंडीगत काळपट ठिपक्यांसारखी दिसत नाहीयेत ना याची खात्री करून घे. पानावर खूप जास्त प्रकाश पडणार नाही याचीही काळजी घे बरं का. नाहीतर या भयाण पांढऱ्याफक्क कागदावरून तो भगभगीत प्रकाश सरळ तुझ्या डोळ्यांत शिरायचा - सगळ्या अक्षरांच्या सावल्या दुपारच्या टळटळत्या उन्हासारख्या खुनशीपणे गिळून टाकत. तुझ्या वाचनात जी जी म्हणून गोष्ट व्यत्यय आणेलसं दिसतंय, तिचा आत्ताच अंदाज बांध. सिगरेटी फुंकतोस का? एखादं पाकीट असू दे हाताशी - आणि ऍश-ट्रे पण. अजून काही राहिलंय का? नैसर्गिक विधी वगैरे? बरं बरं - राहिलं, तुझं तूच बघ बुवा काय ते.

तसं म्हटलं तर या विशिष्ट पुस्तकाकडून तुझ्या काही विशेष अपेक्षा आहेत असं नाही. तात्विकदृष्ट्या बोलायचं झालं तर तू आताशा कुणाकडूनच कशाचीच अपेक्षा न करणाऱ्या लोकांमध्ये मोडतोस. तुझ्याहून तरुण किंवा कमी तरुण असे कितीतरी लोक पुस्तकांमधून, लोकांकडून, प्रवासातून, घटनांमधून किंवा भविष्याकडून एखाद्या असामान्य अनुभवाची अपेक्षा बाळगून असतात. पण तू असा दूधखुळा नाहीस. तुला माहिती आहे, 'वाईटात वाईट गोष्ट टाळणं' एवढीच अपेक्षा माणसाला ठेवता येते फार फार तर. तुझं वैयक्तिक जीवन, आसपासच्या सर्वसामान्य घटना आणि अगदी आंतरराष्ट्रीय घडामो्डींमधूनही तू हाच निष्कर्ष काढला आहेस.
बरं, आता पुस्तकांबद्दल काय? अं, मला वाटतं जीवनाच्या इतर प्रत्येक क्षेत्रात तू हा अपेक्षेचा, उत्सुकतेचा नवथर आनंद इतक्या काटेकोरपणे टाळत आला आहेस, आणि त्यामुळेच पुस्तकांसारख्या बंदिस्त क्षेत्रात तो आनंद उपभोगण्याची परवानगी तू स्वत:ला नक्कीच देऊ शकतोस. अर्थात पुस्तकांच्या निवडीबाबत तुझं दैव बलवत्तर असेल किंवा नसेल - पण अपेक्षाभंग झाला तरी त्यात फार काळजी करण्यासारखं काही नाही.

तेव्हा जेहत्ते काळाचे ठायी तू वृत्तपत्रात वाचलंस, की गेली कित्येक वर्षं काहीच लिखाण प्रकाशित न केलेल्या इतालो कॅल्वीनोचं 'हिवाळ्यातल्या एका रात्री जर एक प्रवासी' नावाचं नवं पुस्तक बाजारात आलं आहे. तू दुकानात गेलास आणि ते विकत घेतलंस. शाब्बास!

दुकानाच्या दर्शनी भागातल्या काचेत तुला हवं ते मुखपृष्ठ, हव्या त्या शीर्षकासकट दिसलं. नजरेनंच त्याचा मागोवा घेत तू ' अद्याप न वाचलेल्या पुस्तकां'च्या प्रचंड भाऊगर्दीमधून मोठ्या शिकस्तीनं दुकानात घुसलास. ती सगळी पुस्तकं टेबला-कपाटांमधून कमालीच्या नापसंतीदर्शक नजरांनी तुला भेदरवायला बघताहेत. पण त्यामुळे आपण घाबरून जाता कामा नये, हे तुला पक्कं ठाऊक आहे, कारण याच पुस्तकांमध्ये 'वाचली नाहीत तरी चालतील अशी ', 'वाचनाखेरीज इतर कारणांकरिता छापलेली', 'लिहून होण्यापूर्वीच वाचलेली असल्यामुळे वाचण्यासाठी उघडून बघायचीही गरज नसलेली' अशा सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे ढीगच्या ढीग असणार आहेत. अशा रीतीने तू किल्ल्याबाहेरची बचावफळी भेदून आत घुसतोस न घुसतोस तोच तुझ्यावर 'दुर्दैवाने आपलं मोजकंच आयुष्य शिल्लक आहे, पण एकाहून अधिक जन्म मिळाले असते तर जी नक्की वाचली असती' अशा पुस्तकांचं पायदळ चाल करून येतं. तू अगदी चपळाईनं त्यांना हूल देऊन पुढे 'तुला वाचायची आहेत, पण जी वाचण्यापूर्वी इतर वेगळी पुस्तकं वाचणं गरजेचं आहे', 'जी आत्ता खूपच महाग आहेत आणि तुला ती सवलतीच्या दरात मिळेपर्यंत किंवा कागदी मुखपृष्ठातली आवृती निघेपर्यंत थांबणं भाग आहे', 'जी कुणाकडून तरी उसनी घेता येतील', 'जी सगळ्यांनीच वाचली आहेत त्यामुळे तूसुद्धा वाचल्यासारखीच आहेत' अशा पुस्तकांच्या रणसेनेत घुसतोस. त्यांचे हल्ले चुकवून तू किल्ल्याच्या मनोऱ्यापाशी येतोस. इथे सैनिकांच्या नव्या तुकड्या तयार असतात :
'तुला खूप दिवसांपासून वाचायची आहेत ती पुस्तकं',
'तू कित्येक वर्षं ज्यांच्या शोधात निष्फळ वणवण करत होतास ती पुस्तकं',
'तुझ्या अगदी आत्ताच्या कामासंदर्भातली पुस्तकं',
'समजा कधी गरज पडली तर हाताशी असावीत म्हणून आपल्याकडे बाळगावीशी वाटणारी पुस्तकं',
'या उन्हाळी सुट्टीत वाचण्यासाठी बाजूला काढून ठेवता येतील अशी पुस्तकं',
'आपल्या कपाटातल्या इतर पुस्तकांच्या जोडीला शोभून दिसतील अशी पुस्तकं',
'आपल्या मनात अचानक एक विचित्र, कसलाही खुलासा न देता येणारी उत्सुकता निर्माण करणारी पुस्तकं'.

आता तुला सैनिकांच्या या अगणित तुकडयांचं एक खूप मोठ्ठं, तरीही आटोक्यातलं, मोजता येईल इतपत भागांचं कोष्टक तयार करण्यात यश आलं आहे. पण हा सुटकेचा नि:श्वास क्षणभंगुर ठरवायला आणखी ताज्या दमाचे गडी पुढे येतात - 'खूप पूर्वी वाचलेली आणि आता परत वाचली पाहिजेत अशी पुस्तकं' आणि ' जी वाचली असल्याचा आपण नेहमीच आव आणत असतो पण आता जी खरोखरच वाचण्याची वेळ येऊन ठेपली आहे अशी पुस्तकं'.

एका आडव्यातिडव्या बोळातून सूंबाल्या करत तू त्यांना आपल्या अंगावरून झटकून टाकतोस आणि थेट 'ज्या नवीन पुस्तकांचा लेखक किंवा विषय तुझ्या नजरेत भरलाय' अशा पुस्तकांच्या बालेकिल्ल्यात उडी घेतोस. या बळकट बचावफळीतसुद्धा तू थोडी भगदाडं पाडू शकतोस : एक म्हणजे त्यांना 'ज्या नवीन पुस्तकांचा लेखक किंवा विषय अजिबात नवीन नाही (तुझ्यासाठी किंवा एकूणातच) आणि ' ज्या नवीन पुस्तकांचा लेखक आणि विषय यांची अजिबात गंधवार्ता नाही (किमान तुला तरी)' अशा प्रकारांत विभागायचं, नाहीतर दुसरं म्हणजे त्यांच्या आकर्षणाची व्याख्या तुझ्या नव्या आणि जुन्याबद्दलच्या ओढीच्या किंवा गरजेच्या आधाराने करायची. (म्हणजे नव्या गोष्टींत तू जे जुनं शोधतोस आणि जुन्यात जे नवं शोधतोस त्यांच्या गरजेच्या आधारावर)

या सगळ्याचा सोप्या भाषेत अर्थ एवढाच, की दुकानातल्या सगळ्या पुस्तकांच्या नावांवरून एक ओझरती नजर फिरवून तू 'हिवाळ्यातल्या एका रात्री जर एक प्रवासी' च्या छापखान्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या चळतीकडे वळला आहेस, त्यातलं एक पुस्तक हस्तगत केलं आहेस आणि गल्ल्यावरच्या माणसाकडे त्याच्यावरचा आपला मालकीहक्क सिद्ध करायला नेलं आहेस.

आता तू आपल्या आसपासच्या पुस्तकांकडे अजून एक भांबावलेली नजर टाकतोस (खरं म्हणजे ती पुस्तकंच पांजरपोळातले कुत्रे त्यांच्या पिंजऱ्यातला एखादा दोस्त त्याला सोडवायला आलेल्या मालकाच्या हातातल्या साखळीला बांधून घेऊन निघून जाताना त्याच्याकडे जशी पाहतील, तशी भांबावून तुझ्याकडे बघत असतात) आणि बाहेर निघून जातोस.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकामधून आपल्याला एक खास आनंद मिळतो. आपण आपल्यासोबत केवळ ते पुस्तकच नव्हे तर त्याची नवलाईदेखील घेऊन जात असतो - कारखान्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या कुठल्याही वस्तूत असते, तसली नवलाई. पण नव्या पुस्तकाची ही नव्हाळी वाचनालयातली थंड, जडशीळ हवा खाऊन त्याचं आवरण पिवळटायला लागेपर्यंत, त्याच्या वरच्या कडा धुरकटायला लागेपर्यंत आणि त्याची बांधणी उसवून कुत्र्याच्या कानांसारखी लोंबायला लागेपर्यंतच टिकणारी. खरं तर आपल्याला नेहमीच 'एक खरंखुरं नवेपण सामोरं याव'ं अशी आशा असते. असं नवेपण, जे एकदा नवं असल्यावर कायमच नवं राहील. नव्याने प्रकाशित झालेलं पुस्तक वाचताक्षणीच हे नवेपण आपल्या कबज्यात आलं पाहिजे- त्याच्या पाठलागाशिवायच. हीच का ती वेळ? कोण जाणे! या पुस्तकाची सुरुवात कशी होतेय बघूया तर खरं.

(असं म्हणत) कदाचित तू दुकानातच हे पुस्तक चाळायला सुरुवात केली असशील. की ते सेलोफेनच्या कोशात गुंडाळलेलं असल्यामुळे तुला नाही करता आलं तसं ? आता तू बसमध्ये चढला आहेस. गर्दीत एका हातानं वरच्या दांडीला पकडून उभं राहून, दुसऱ्या मोकळ्या हातानं तू ते पुडकं उघडायचा प्रयत्न चालवला आहेस. केळं सोलू पाहणाऱ्या आणि त्याच वेळी फांदीला लोंबकळू जाणाऱ्या माकडासारख्या तुझ्या हालचाली चालल्याहेत जवळजवळ. ती बघ, लागलीच तुझ्या कोपराची ढुशी तुझ्या शेजाऱ्याला. अरेच्च्या! निदान माफी तरी माग लेका.

किंवा कदाचित त्या दुकानदारानं पुस्तकावर वेष्टण न चढवता ते पिशवीत घालून तुला दिलं असेल. आता काम जरा सोपं झालं. तू तुझी कार चालवता चालवता सिग्नलपाशी थांबतोस. पुस्तक पिशवीतून बाहेर काढतोस. वरचं पारदर्शक आवरण टरकावून काढून पहिल्या ओळी वाचायला सुरुवात करतोस. हॉर्नच्या कर्णकटू आवाजाचं वादळ तुझ्यावर येऊन आदळतं - दिवा कधीचाच हिरवा झालाय आणि तू रहदारी अडवून उभा आहेस!

तू तुझ्या कामाच्या टेबलासमोर बसला आहेस. आपल्या कागदपत्रांमध्ये जणूकाही सहजच ठेवावं अशा शिताफीनं तू हे पुस्तक सरकवलं आहेस. एका विवक्षित क्षणी एक फाईल बाजूला सारल्यावर ते तुझ्या डोळ्यांसमोर येतं. तू ते नकळत उघडतोस. कोपरं टेबलावर ठेवतोस. हाताचे पंजे अर्धवट मिटले आहेत - त्यांच्यामध्ये तुझं डोकं विसावतं. बघणाऱ्याला वाटेल की तू अत्यंत एकाग्रतेने तुझी कागदपत्रं वाचण्यात गढून गेला आहेस- पण खरं तर तू कादंबरीची पहिली पानं चाळण्यात गुंग झाला आहेस. हळूहळू तू खुर्चीत मागे रेलून बसतोस. पुस्तक तुझ्या नाकासमोर धरतोस. खुर्ची दोन पायांवर मागे कलंडली जाते. टेबलाचा बाजूचा खण उघडून तू आपले पाय त्याच्यावर ठेवतोस - पण वाचनाच्या वेळेस पायांची जागा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची, त्यामुळे तू तुझे पाय उचलून टेबलावर मुक्तीची वाट पाहात पडलेल्या फायलींवर पसरून देतोस.

पण हा अनादर होतोय असं नाही वाटत तुला? तुझ्या कामाबद्दलच्या अनादराचं नाही म्हणत मी - (अंहं, इथे कुणीही तुझ्या व्यावसायिक कौशल्यावर ताशेरे ओढायला बसलेलं नाही : मी असं गृहीतच धरून चाललोय की तुझी कामं हा सगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत भाग असलेल्या निर्मितीशून्य कार्यव्यवस्थेचा एक सर्वसामान्य हिस्सा आहे.) पण या पुस्तकाबद्दलच्या अनादराचं म्हणतोय.

आणि तू - इच्छेनं किंवा अनिच्छेनं - ज्यांच्यासाठी काम करणं म्हणजे खरोखरीचं 'काम करणं' असतं अशांमधला एक असशील, आणि विचारपूर्वक किंवा अजिबात विचार न करता स्वत:साठी आणि इतरांसाठी उपयोगी ठरेल किंवा किमान निरुपयोगी ठरणार नाही असं काहीतरी करत असशील तर अजूनच वाईट. कारण तसं असेल तर तू तुझ्याबरोबर कामाच्या ठिकाणी आणलेलं हे पुस्तक तुला क्षणिक मोहांना भरीला घालणाऱ्या गंड्यादोऱ्यासारखं, ताईतासारखं आहे. हा मोह तुला दर वेळेला काही सेकंद का होईना, पण तुझ्या मुख्य लक्ष्यापासून विचलीत करेल - मग ते इलेक्ट्रॉनिक कार्डांवरचे क्रमांक असोत, स्वयंपाकघरातल्या शेगडीचा बर्नर असो, बुलडोझर चालवणारं चाक असो किंवा शस्त्रक्रियेच्या टेबलावर आतडं बाहेर काढून पडलेला रुग्ण असो.

थोडक्यात, आपल्या उत्सुकतेवर नियंत्रण ठेवून, घरी गेल्यावरच हे पुस्तक उघडणं जास्त चांगलं.
हां, अस्सं.
आता तू तुझ्या खोलीत आहेस. शांत. तू पुस्तकाचं पहिलं पान उघडतोस. नाही नाही - शेवटचं पान उघडतोस. पुस्तक किती मोठं आहे कळायला नको? नशीब, जास्त जाडजूड नाहीये. 'आजकाल लिहिलेल्या लंब्याचवड्या कादंबऱ्या' हा बहुतेक एक विरोधाभासच म्हणावा लागेल : आज काळाचं परिमाण शतश: विदीर्ण झालेलं आहे. आपापल्या कक्षांमधून जात जात लगेच अंतर्धान पावणाऱ्या काळाच्या छोट्या-छोट्या तुकड्यांहून जास्त काळ आपण प्रेम किंवा विचार करू शकत नाही. काळाचं सातत्य आपल्याला पुन:प्रत्ययाला केव्हा येतं माहिती आहे? जेव्हा काळ असा थांबल्यासारखा किंवा स्फोट पावल्यासारखाही वाटत नसे, त्या काळच्या कादंबऱ्या वाचताना. हा काळसुद्धा शंभर वर्षांहून अधिक काळ थांबला नाही.

तू हातातल्या हातात हे पुस्तक उलटंपालटं करून पाहतोस, मलपृष्ठावरच्या वाक्यांवरून नजर भिरभिरवतोस - त्यांच्यात उगीच आपली कुठेही लागू होतीलशी, थातुरमातुर काहीतरी सांगणारी वाक्यं असतात. उत्तम! हे पुस्तक सरळसोटपणे जे काही सांगतं, त्याच्या वरताण आवाज चढवून दुसरंच काहीतरी सांगणारा, कितीही एवढुस्सा असला तरी आपल्यालाच शोधून काढावा लागेल असा कुठलाही खोल संदेश यात नाही.

अर्थातच, हे पुस्तकाभोवती घिरट्या घालणं, हे असं त्याच्या आत न शिरता आसपास घोटाळणं हासुद्धा नवीन पुस्तकातून मिळणाऱ्या आनंदाचा एक भाग आहे. पण सगळ्या प्राथमिक आनंदांप्रमाणेच ही क्रियादेखील तुला पुढे अत्यानंदाच्या कळसाध्यायापर्यंत (म्हणजे पुस्तक वाचण्यापर्यंत) पोचण्यासाठीची कळ म्हणून उपयोगात आणायची असेल, तर तिचीही एक ठराविक कालमर्यादा आहे हे लक्षात घ्यायला हवं.

तर अशा रीतीने तू पहिल्या पानाच्या पहिल्या ओळींवर स्वारी करण्यासाठी तयार झाला आहेस. तू लेखकाचा अचूक ओळखता येण्याजोगा सूर ओळखण्याची तयारी करतोस. छे! तुला अजिबातच ओळखता येत नाही तो. पण विचार केल्यावर तुझ्या लक्षात येतं, या लेखकाची अशी विशिष्ट शैली आहे असं म्हटलंयच कुणी कुठं ?
उलट हा तर एका पुस्तकापासून पुढच्याकडे जाताना आमूलाग्र बदललेला आढळतो. आणि या बदलांमुळेच आपण त्याला 'तो' म्हणून ओळखतो. पण आपल्याला जेवढं स्मरतंय, त्यावरून इथल्या या लिखाणाचा त्याने इतर जे काही लिहिलंय त्याच्याशी काडीमात्र संबंध लावता येत नाहीये.

तुझी निराशा झालीय का? इकडे बघ तरी - अरे, कदाचित अगदी सुरुवातीला तुला थोडंसं गोंधळल्यासारखं वाटलं असेल. म्हणजे एखाद्या माणसाचं नाव ऐकून आपण त्याला कल्पनेत एखादा चेहरा बहाल केला, आणि तो प्रत्यक्षात समोर आल्यानंतर कल्पनेतला चेहरा त्याच्या खऱ्या चेहऱ्याशी ताडून पाहिल्यावर तो मुळीच जुळला नाही, तर जसं वाटेल तसं. पण मग तू पुढे जाशील, आणि तुझ्या लक्षात येईल की असं असूनही हे पुस्तक वाचनीय आहे. तू लेखकाकडून ज्या काही अपेक्षा ठेवल्या असशील, त्यांच्या बंधनांत न राहता या पुस्तकाने तुझी उत्सुकता चाळवली आहे. अगदीच खरं सांगायचं तर नीट विचार केल्यावर तुला कळतं की तुला हे असंच आवडतंय - एखाद्या गोष्टीला असं आमनेसामने भिडणं, ती नक्की काय आहे याचा अंदाज न येताच!

Labels: