Thursday, August 17, 2006

दिसली नसतीस तर...

'एक आनंदयात्रा: कवितेची'. अलूरकरांनी प्रकाशित केलेला दोन ध्वनिफितींचा संच - पु.ल. आणि सुनीताबाईंनी बोरकरांच्या कविता सादर केल्यात त्यात. खूप दिवसांपूर्वी कुणालातरी ऐकायला दिला होता - आणि परत मिळण्याच्या आशेला तिलांजली दिली होती. पण आता अनपेक्षितपणे त्या दोन कॅसेट्स माघारी आल्यात. दोन दिवस पुन्हा बोरकरमय झाले.
शाळेत असताना इचलकरंजीचे महाजन गुरुजी कोल्हापुरात यायचे, तेव्हा वैदिक गणित शिकवायचे आम्हांला. वर्ग सुरू करण्यापूर्वी फळ्यावर अतिशय सुंदर, गोलसर अक्षरांत एखादं सुवचन लिहायचे. एकदा लिहिलं: 'देखणी ती पाउले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती' --- मी गारद. अफाट पसरलेल्या चमकत्या तपकिरी रेताडात डौलदार लयीत उमटत जाणारी पावलांची लाल शुभचिन्हं डोळ्यांसमोरून हलेनात. त्या वेळी हे सुवचन एका कवितेचं कडवं असावं हे ध्यानात आलं नाही. त्या कल्पनेशी मग मी महाजन गुरुजींचंच नातं जोडून टाकलं..शुद्ध मराठी बोलण्याचा आग्रह धरणारे, स्वदेशी वापरण्याच्या तत्त्वापासून कधीही न हटणारे ध्येयवादी गुरुजी!
नंतर कधीतरी ती संपूर्ण कविता 'छात्र प्रबोधन' मासिकाच्या मलपृष्ठावर वाचायला मिळाली. कवीचं नावही कळलं: बाळकृष्ण भगवंत बोरकर!
हा तर 'जीवन त्यांना कळले हो' वाला कवी.
त्याच सुमाराला, नववी - दहावीच्या पुस्तकाच्या शेवटी पद्यवाचन विभागात बोरकरांची 'सांध्यसुंदरी' वरची कविता होती.
'इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही, येई हसत मधुर मंद विश्वमंदिरी ही ।
उंबऱ्यात धुवुनी उन्हे धूळ-माणकांची, मूर्ति सजल पारिजातकांत पावलांची..' अशी काहीशी सुरुवात होती तिची.
ती वाचून आता बोरकर ' आपला कवी' वाटायला लागले. म्हणजे काही काही गोष्टींवर पहा, आपला हक्क आहे असं वाटतं..ती गोष्ट कधीही पाहिली, अनुभवली, की दर वेळी नव्यानं खूप खूप आनंद होतो, तिच्याबद्दल चांगलं बोललेलं- लिहिलेलं ऐकलं की उगीच अभिमान वाटतो आणि वाईट बोलताना ऐकलं की बोलणाराचे दात घशात घालायला हात शिवशिवू लागतात, 'बोरकर की बोअर कर?' असली 'गच्छ सूकर भद्रं ते' छाप कोटीदेखील सहन करता येत नाही, इतर कुणी त्या गोष्टीवर असाच जीव टाकतं हे कळल्यावर चांगलंही वाटतं आणि 'आपण एकमेव नाही आहोत' म्हणून वाईटही वाटतं...ती गोष्ट 'आपली' असते!
बोरकरांच्या कल्पना साध्याशा,सात्त्विक. मूर्तरूप घेतलं असतं तर 'वहिनीच्या बांगड्या' मधल्या सुलोचनाबाईंसारख्या दिसल्या असत्या. त्या कल्पनांना जे शब्दांचे अलंकार चढायचे ते मात्र कुठल्याशा दैवी खाणीतून आणलेल्या रत्नांचे. रविवर्म्याच्या चित्रांसारखी त्यांची कविता दिसायची मग - लयदार, झोकदार, पुन:पुन्हा पाहात राहावीशी..पृथ्वीवर असूनही स्वर्गाशी नातं सांगणाऱ्या राजकन्येसारखी.
कल्पना साध्या, पण सामान्य मुळीच नाहीत! 'इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा, योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा' असं म्हणणारा माणूस सामान्य थोडाच असणार? आणि त्याचं हेच असामान्यत्व पु.ल.-सुनीताबाईंनी आपल्या काव्यवाचन-गायनातून क्षणोक्षणी उलगडून दाखवलंय. त्यांतली मला खूप आवडणारी एक कविता म्हणजे 'दिसली नसतीस तर..'
'भावनेत भिजलेला आवाज' हे शब्द ऐकल्यावर मला एकच आवाज लख्ख आठवतो - सुनीताबाईंचा ही कविता वाचतानाचा.
त्या आवाजात ती कविता ऐकता ऐकता कल्पनेची चित्रफीत माझ्या डोळ्यांसमोरून सरकते:
कलती दुपार आहे. बंगल्याच्या सोप्यात आरामखुर्ची टाकून कवी उतरत्या उन्हाचे खेळ पाहात बसला आहे. सोबतीला तिची आठवण. त्याच्याही नकळत, मघाशी शब्दकोडं सोडवायला घेतलेलं पेन तो उचलतो. वर्तमानपत्राच्या पानभर जाहिरातीच्या मधल्या जागेत झरझर अक्षरं उमटायला लागतात:


"रतन आबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संध्येसारखी बहरलेली तू,
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस,
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा भुलावणा सप्तरंगी सोहाळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.
आपल्याच नादात तू पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जीवघेण्या लयीत तशी पडत राहिली नसती,
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून कातरवेळेची कातरता आज अशी झिणझिणत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने, जाई-जुईच्या सांद्र, मंद सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास,
तर उमलत्या फुलपाखरांची आणि मुक्या भाबड्या जनावरांची आर्जवी, हळुवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कधी कळलीच नसती.

तू कशामुळे माझी जिवलग झालीस, हे खरंच मला आता आठवत नाही.
पण मला तोडताना... समुद्रकाठच्या सुरूच्या बनात मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवं अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस,
तर माझ्या शृंगाराचा अशोक करुणेच्या आरक्त फुलांनी आज असा डवरलाच नसता.

तू तेव्हा आकाशाएवढी विशाल आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस,
तर स्वत:च्याच जीवनशोकांतिकेचा मनमुराद रस चाखून नि:संग अवधूतासारखा मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात असा हिंडत राहिलोच नसतो.

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस...नियती होतीस.
तसं जर नसतं, तर मी आज हा जो काही झालो आहे, तो झालोच नसतो."


ती अल्लड प्रेयसी दिसतेच आहे समोर - उंच, सावळी. काळ्याभोर केसांच्या दोन वेण्या घातलेल्या, एकीवर गडद किरमिजी आबोलीचा, मध्ये-मध्ये हिरवी पानं गुंफलेला गजरा. नाकात नाजूकशी चमकी, कानात डूल, भुवयांच्या बरोबर मधोमध तांबड्या गंधाचा एक ठिपका. निळा परकर-पोलका, आणि परकरावर जांभळी मोठ्ठी मोठ्ठी फुलं छापलेली, पिवळ्या परागांची, भरगच्च. पैंजण काही दिसत नाहीत त्या परकराच्या घेरामुळे, पण ते चांदीचे असणार, दुपदरी. त्यांना तीन-तीनच्या घोसात गुंजेएवढे घुंगरू लावलेले.
खूप कमी बोलते ती. तिची भाषा हसण्याची. कधी क्षणभर नाजूक हसणं - एखादा दबलेला हुंदका उलटा करावा तसं. कधी 'अस्सं काय?' म्हणावं तसं मिश्कील. कधी लहान मुलासारखं निरागस खळखळतं.
एकदाच - फक्त एकदाच तिच्या भाषेत शब्द सापडेनात तिला. म्हणून मग रात्रभर बोलत राहिली परक्या भाषेत. निघून गेली नंतर.
कवीला त्याचं कवित्व बहाल करून गेली पण.


बोरकरांच्या कविते, तू मला दिसली नसतीस तर...