Friday, July 23, 2010

मावसबोलीतल्या कविता

मेघनाने ’खो’ दिलाय हे वाचताक्षणीच मला हातात कोलीत मिळाल्यासारखा आनंद  झाला. ’कवितेचं भाषांतर करणार नाही’ असं हजारदा लिहायची शिक्षा मिळेल तेव्हाच माझी खाज संपेल असं वाटतं आहे.
तूर्तास, रायनर मारिया रिल्के(विकिपीडिया) च्या एका कवितेची भाषांतरं करण्याचे अनेक प्रयत्न केले, ते इथे लिहिते आहे. प्रत्येक वेळेला ही कविता मूळ भावाशी/शब्दांशी प्रामाणिक राहात मराठीत अनुवादित करणं माझ्याच्याने कसं निव्वळ अशक्य आहे हे कळालं. त्यामुळे  भाषांतरांमध्ये ’टाइमपास’ हे साध्य, आणि रिल्केची मूळची अतिशय  घाटदार, यमकबद्ध आणि काळीजभिडू कविता हे साधन बनले आहे, याबद्दल क्षमस्व.


मूळ जर्मन कविता: (स्रोत)

Der Dichter

Du entfernst dich von mir, du Stunde.
Wunden schlägt mir dein Flügelschlag.
Allein: was soll ich mit meinem Munde?
mit meiner Nacht? mit meinem Tag?

Ich habe keine Geliebte, kein Haus,
keine Stelle auf der ich lebe
Alle Dinge, an die ich mich gebe,
werden reich und geben mich aus.

***
शब्दश:  इंग्रजी भाषांतर:
The Poet

You get away from me, o hour!
Your fluttering wings impose wounds upon me.
Although: What will I do with my mouth?
With my night? With my day?

I have no love, no home,
No place to live upon
All things, which I gave to myself,
Get rich and give me away.

***
 (१)
  कवी

दूर करी तू तुजला माझ्यापासुनि वेळे,
घाव घालिती पंख तुझे फडफडते मजवर.
पण कसे करू मग वाचेचे मी नंतर चाळे?
काय करू रात्रींचे माझ्या? दिवसही कातर?

प्रेम नसे अन्‌ घरटे नाही कोठे टिकुनी
जिथे राहातो असा न माझा कोठे पत्ता
भंगुर वस्तू मिळवित गेलो माझ्याकरिता
मालदार त्या सर्व जाहल्या मलाच विकुनी.

***

(२)
कविवर्य (आर्यागीति छंद)

तासा निघून जावे, माझ्यापासुनि दूर तुवां लवलाही।
तुझिया पंखांनी ह्या जखमा झाल्या, अंगी पेटते लाही।
काय करावे तेव्हा, परि म्यां माझ्या प्रकांड तोंडाचे?
उरेल रात्र रिकामी, उरेल सारा दिवस पुन्हा तो डाचे।

प्रेम कुणाचे नाही, नाही घराचा उभा कुठे मजला।
शांत जगावे जेथे, अशी न जागा असे कुठे मजला।
पार्थिव वस्तू  जी जी, माझ्यासाठी मलाच मी केली।
ती ती मजला विकुनी, धनिकपणाची करीतसे केली*॥

* केली = क्रीडा, खेळ.

***

(३)
कवी!

तू दूर कर स्वत:ला माझ्यापासून, हे तास नावाच्या बंदिवान गृहस्था!
तुझ्या फडफडत्या पंखांच्या मार्‍याने पुरतं जखमी केलंय मला, रक्ताळून सोडलं आहे - पहा!
पण थांब : तू गेलास तर माझ्या या मेघनाद मुखातून शब्दांचे यज्ञयाग कसे बाहेर पडावेत?
माझ्याच अंगावर धावून येणार्‍या माझ्या रात्रींना मी कसं थोपवू?  आणि माझ्या दिवसांचं उजाड फटफटीत वस्त्र कुणाच्या अंगावर पांघरू?

मी कुणाच्याच मायेच्या मऊसूत वस्त्रात गुंडाळला गेलो नाही कधीच - अगदी नदीत वाहावला गेलो असतो तरीही तसाच ओंडक्यासारखा सापडलो असतो त्या सारथ्याला. अनिकेत मी! कां आपलंसं वाटेल कोणतं घर मला? आणि परसात चूळ भरण्यापुरती जागादेखील आपली म्हणणं नकोसं होतं माझ्यातल्या झंझावाती दरवेश्याला.
ह्या दीड वितीच्या पोटासाठी माणसांच्या बाजारातल्या कचकड्याच्या बाहुल्या जवळ बाळगाव्या लागतात म्हणून, आणि केवळ म्हणूनच (नाही, खोटं का बोलू? मलाही मोह होतो कधीतरी त्यांच्या सुंदर लोलकांचा!) - मी जवळ बाळगलेल्या या वस्तू - यांनीच आता मला तुकड्यातुकड्याने विकायला काढलं आहे. माझ्या अस्तित्त्वाचा एक एक क्षीण अंश कुरतडून गलेलठ्ठ उंदरांसारख्या या वस्तू आता माझ्या स्वप्नांवरही आपला मालकीहक्क गाजवणार आहेत. आता... आता दूर हो...फक्त.

***

(४)
कविता करतंय स्सालं...

जा की तासा, घड्ड्याळीच्या - लय भेजा गरम केलास.
फडाड फडाड पिसं हलवत माझाच सगळा गेम केलास.
आयला पन तू गेलास म्हंजे माझं थोबाड एकदम बंद!
रात्री सगळ्या फुक्काट टिनपाट दिवस पन होणार थंड!

माझी कोनपन आयटम नाय,डोक्यावरती छप्पर नाय
ढुंगणाखाली साला आपला हक्काचाबी फुटपाथ नाय
पैसा टाकून घेऊन आलो फोकलत फाफलत सगळा माल
त्याचीच च्यावच्याव लई आता , मी विकल्या मायचा लाल.

***
माझा खो राजला.

13 Comments:

नवकवी, कविवर्य, मुक्तकवी आणि कवडा डेंजर सगळे जमून आलेत! आणि ह्या सगळ्यात स्वत: तू पडद्यामागे राहिलीयेस - मानलं :)

मजला-मजला - :)
आणि प्रकांड तोंड - जबडोबा आठवला!

इतिBlogger Mandar Gadre
Friday, July 23, 2010 10:23:00 AM  

जर्मन भाषेचा गंधही नाही हे डिसक्लेमर. ते कितपत जुळलंय ह्याबद्दल काय बोलणार? ह्या इतकच्या तिकडच्या प्रतिक्रिया -

१. मूळ कवितेच्या मीटर वा नैसर्गिक ओघापेक्षा आपलं मीटर वा ओघ अधिक पसरट झालं की मला आपली भाषेवरची पकड खूप हलकी आहे असं वाटून रीतसर नैराश्य येतं, त्यामुळे पसरलं की फसतं असं मला (उगीच) वाटतं. २-४ बद्दल असं वाटलं तुला?

२. पंतकाव्याची भाषा वापरली की लोक ढुंकून बघत नाहीत. त्या भाषेला उपजत रूक्षपणा आहे की ती आता कालबाह्य झाल्या म्हणून? तरीही ती वापरताना तुला स्वत:ला ती आवडली का?

३. ते नक्की आर्या वृत्त आहे? मला दोन मात्रा जास्त झाल्यात असं वाटतंय. चू. भू. दे. घे.

४. मुक्तछंदात blank verse हा निव्वळ प्रयोग, जाणूनबुजून की नकळत? सहसा दिसत नाही फार. पण blank verse मुक्तछंदातसुद्धा यतिभंगाच्या तोडीच्या यातना देते असं नाही वाटत? विशेषत: अनुवाद म्हणून समजून घेताना माझी तरी खूप त्रेधा उडाली.

५. शेवटचा जो काही भन्नाट प्रकार आहे, तो कैच्या कै उत्कट नि ओघवता वाटला, नि मला तरी तो वाचला तेव्हा कुठे ती कविता आवाक्यात आली. त्यामुळे मला तरी शेवटचा प्रयत्न(च) आवडला!

बाकी एवढे उपद्व्याप...मानलं ब्वा!

इतिBlogger a Sane man
Friday, July 23, 2010 11:05:00 AM  

मलापण शेवटचाच प्रयत्न प्रचंड आवडला. आधीचे ठीकठाकच... शेवटून दुसरा काही शब्द उगाच खर्चणारा वाटला.
सेन मॅन म्हणतो आहे त्याप्रमाणे मला पंतकाव्य वाचायला नाही आवडत, म्हणूनही आधीचे अनुवाद आवडले नसतील कदाचित.
पण या खटाटोपाबद्दल खरंच मानलं तुला.

इतिBlogger Meghana Bhuskute
Friday, July 23, 2010 11:18:00 AM  

:) प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. निमिष, ’आर्ये’ची चूक पकडल्याबद्दल खास आभार. ’आर्या आर्यासि रुचें..’ ची चाल डोक्यात होती आणि त्याच चालीत या ओळी चपखल बसतात म्हणून मात्रा मोजल्या नाहीत, पण हा १२+२० मात्रांचा आर्यागीति छंद आहे. (संदर्भ: ’छंद-बद्ध काव्यरचनेबद्दल माहिती’; धनंजय नानिवडेकर)

बाकी कवितेचं भाषांतर करायचं नसतं हे लहानपणीच पाठ केल्यामुळे हा सगळाच उपद्व्याप ’नस्ती उठाठेव’ या सदरात मोडतो. रिल्केचा नैसर्गिक ओघ मी कसला वाहावणार? च्यायला ’आपला’ गुलज़ार मराठीत आणताना फें फें उडते, जर्मन तर राहू द्याच. या असल्या attitudeमुळे मला नैराश्य वगैरे अजिबात आलं नाही. जर्मन आणि मराठी या वाक्यरचनेच्या दृष्टीने अगदीच वेगळ्या भाषा आहेत, त्यामुळे रूळ बदलताना थोडा जास्त खडखडाट व्हायचाच.
१) मूळ कवितेच्या a-b-a-b, c-d-d-c rhyme scheme आणि meterशी आणि एखाद-दुसरा शब्द वगळता शब्दांशी प्रामाणिक राहून केलेला अनुवाद अगदीच ’सपक’ आहे, मला हा लिहिल्यानंतर दोनाहून अधिक वेळा वाचवला नाही.
२) पंतकाव्याची लय, आणि त्यातला शब्दखेळ दोन्ही मला बेहद्द आवडतात. लोकांचं काये? हा अनुवाद ’जमतंय की आपल्याला’ थाटाचा आहे - अगदीच पंतांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला नसला तरी टवाळ थट्टेचा वास आहे त्यात.
३)ही विशुद्ध चेष्टा आहे. Blank verse मुद्दामच. यातना maximize करायला.
४) मेघना, निमिष :येस्स! मलापण शेवटचा प्रकार सगळ्यात जास्त आवडला, तोच एकदा लिहायला सुरुवात केल्यावर दहा मिनिटांत पूर्ण झाला. मलाच गंमत वाटली, setting मूळ कवितेपेक्षा इतकं वेगळं असलं तरी सगळ्यात "successful" अनुवाद हाच कसा काय ठरला? पण हा टपोरी प्रकार चटकदार, साधा सोपा असला तरी मूळ कवितेशी प्रामाणिक नाहीच्चेय शेवटी. ’डर डिश्ख्टर’ वाचताना पहिल्या चार ओळींत एक भाव, पुढच्या दोनांत दुसरा, आणि शेवटच्या ओळींनी ’झिनझिनाट’ होतो - आणि हे सगळं फार सोप्प्या शब्दांत, श्टुंडे - मुंडे, श्लाग-टाग, हाउस- लेबे-गेबे-आउस असली यमकरचना सांभाळून.
The whole purpose of putting everything up there together was to enjoy this feeling of "नेति नेति".
Hmm. तुमची विश्लेषणं वाचून लक्षात येतंय की मी अभिप्रेत गांभीर्याचा गाशा गुंडाळून, show-offगिरीच्या हौसेपायी बरीच गडबड केली आहे. The main failure of the first three translations, if at all, is the failure to make the nonsense reach across. इंग्रजीतलं almost word-to-word translation कवितेच्या खाली दिलं तर बरं होईल का? I tried looking for an English translation online, but could not find it.

इतिBlogger Gayatri
Friday, July 23, 2010 8:13:00 PM  

हा संदर्भग्रंथ कुठे नेटावर आहे का?

"मूळ कवितेच्या a-b-a-b, c-d-d-c rhyme scheme आणि meterशी आणि एखाद-दुसरा शब्द वगळता शब्दांशी प्रामाणिक राहून केलेला अनुवाद अगदीच ’सपक’ आहे"

हो, पण कधी जमून आला तर बहार येते! शांता शेळक्यांचा मेघदूताचा अनुवाद वाचताना अशी मजा येते.

"पंतकाव्याची लय, आणि त्यातला शब्दखेळ दोन्ही मला बेहद्द आवडतात."

येस्स! पण, लोक शार्दूलविक्रीडितामध्ये प्रेमकविता लिहिली तरी त्याच चालीत वाचून नाय आवडली म्हणतात त्याला काय करायचं? (आपलं आपण फक्त आपल्या लयीत वाचायचं हे तर झालंच! :-) )

"ही विशुद्ध चेष्टा आहे. Blank verse मुद्दामच. यातना maximize करायला."

इथे धाप लागली ते वाचताना! :X

" setting मूळ कवितेपेक्षा इतकं वेगळं असलं तरी सगळ्यात "successful" अनुवाद हाच कसा काय ठरला?"

बहुदा तो मूळ झिनझिनाट ह्या नव्या settingच्या associationsमुळे पोहचला, असं असेल का?

English अनुवाद दे म्हणणार होतो, पण एकंदरीत पब्लिकला युरोपिअन भाषा जोरात येतात असं दिस्तंय...त्यामुळे अज्ञान लपवायला माझी अळीमिळी! :-)

इतिBlogger a Sane man
Saturday, July 24, 2010 8:40:00 AM  

:) हां, ’जमून आलं की बहार’ हे खरंचेय - मेघदूताचा तो अनुवाद खरोखरच सुंदर आहे.(शांताबाईंनी पसरट मीटरच वापरलंय पण :P) अरे, अर्चनाचा हा लेख वाचलायेस का तू ? http://pandharyavarachekale.wordpress.com/2008/12/28/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/
त्यात प्रतिक्रियांमध्ये अनॉन/धनंजय नावाने नानिवडेकर काकांनी थोडी वृत्त-चर्चा केलीये. मी दिलेला संदर्भ कुठेच नेटवर प्रकाशित नाही; काकांनी एका ईमेल-ग्रूपवर , स्वत: अभ्यासलेल्या ग्रंथांच्या आधारे छंदबद्ध रचनांवरची ही माहिती दिली होती. तुझा email address दे, मी तुला ती ईमेल पाठवेन. (आणि काकांना विनंती करून बघेन ब्लॉगवर ते प्रकाशित करायची).

आणि लोकांचं इतकं काये रे? त्यांना नाय आवडली तर गेले उडत! आपल्याला खूप आवडलेली गोष्ट अजून कुणाला तितकीच आवडावी म्हणून अटीतटीचे प्रयत्न करायला किंवा माझी आवड मारून टाकायला मला त्या व्यक्तीबद्दल खोल जिव्हाळा (किंवा खोल न्यूनगंड which makes me pine for approval) असायला लागतो :D (किंवा मग लिखाणावर पोट चालवायचं असावं लागतं.) ’लोक’ या बिनचेहर्‍याच्या जमातीला घाबरून आपल्याला हवं ते लिहायचंच नाही असं केलं तर ब्लॉगच्या स्वयंप्रकाशन-सेवेचा फायदा काय?
अर्थात, कोणतीही टीका (critique या अर्थाने) आपल्या त्यानंतरच्या लिखाणाला आकार देतच असणारच कळत नकळत, त्यामुळे तुझं म्हणणं डोक्यात नोंदवून घेतलं आहेच.
@ तुला धाप लागली : mwa ha ha ha ha :D

इतिBlogger Gayatri
Saturday, July 24, 2010 9:08:00 AM  

Settigs-association theory विचारार्ह आहे :D
आणि इंग्रजी भाषांतर: (मला माहित्ये तू ’हेच त्यातल्या त्यात बरं आहे’ म्हणणार :D )

The Poet

You get away from me, o hour!
Your fluttering wings impose wounds upon me.
Although: What will I do with my mouth?
With my night? With my day?

I have no love, no home,
No place to live upon
All things, which I gave to myself,
Get rich and give me away.

इतिBlogger Gayatri
Saturday, July 24, 2010 9:28:00 AM  

देवी नमस्कार!!! म्हणजे मोठाच नमस्कार. आपण जे काय केलय, त्याची आपल्याला कल्पना नसेल पण ते अफाट आहे. ही जरा गंमतच आहे. बहुतेक सगळे खो तुफान भारी झालेत.
रिल्के मला सॉलीड आवडतो- म्हणजे इंग्रजीतून.
मला पहीला प्रयोग ठीक वाटला- म्हणजे ऑलमोस्ट अनुवाद
दुसरा भाग मला कुमारभारतीतल्या शिक्षा वाटणाऱ्या कवितांसारखा वाटला. खरं म्हणजे हा पंतांवर अन्याय आहे. त्यावेळी जी पद्धत होती, त्यात त्यांनी लिहीलं इतकच. हा फार वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे बाकी ऍज अ प्रयोग, पुर्ण मार्क (निमिषसारखं व्याकरण नाही जमणार सांगायला. तो लय भारीए त्यात)
तिसरा भाग (डोंबल माझं. भाग कसले म्हणतोय मी? प्रयोग वाच सर्वत्र)मला सॉलीड आवडला. कायच्याकाय संदर्भ लागताहेत अन ती एक मजाच आहे. ही एकदम उत्क्रांती आहे. हे शेवटचं वाक्य मी लिहील न खोडलं. वाटलं शेवटच्या प्रयोगासाथी वापरावं पण नाही. इथेच उत्क्रांती आहे खरी. कवीतेलं बीज उरलं पण आहे आणि तिला बळ देण्याकरता नवे/ स्थानिक संदर्भ पण मिळाले आहेत
चवथा प्रकार(!)- हे उत्क्रांतीनंतरचं भुत आहे. एका मिक्सरमधून मर्ढेकर, चित्रे, पाध्ये अस्ले गिरमिटले की जे काही होईल ती ही कविता.

इतिBlogger Samved
Sunday, July 25, 2010 10:50:00 AM  

मी मोठ्ठा ’आ’ वासलाय. आर्या, छंद वगैरे माझ्या डोक्यावरून जातात.
मूळ कविता छानच. प्रश्नच नाही.
पण तिसरा अनुवाद जास्त आवडला.

इतिBlogger Shraddha Bhowad
Monday, July 26, 2010 12:20:00 AM  

१. मला तर बुवा पहिलाच अनुवाद एकदम आवडला. मी काही "मुळाचा स्वाद" (मूळ कवितेचा फ़्लेवर), त्यातील यमकभाव इ. जुळले तर आपला अनुवाद चांगला असं मानीत नाही. माझ्याकडे कसलेही १,२,३... असे मला अनुवाद का आवडतो याचे निकष नाहीत. कदाचित आवडीला मुळातच काही व्याकरण नसते. म्हणजे मला दुधी भोपळ्याची भाजी किंवा खीर का आवडते याचे जसे उत्तर नसते, तसेच मला एखादा अनुवाद का आवडतो याचे उत्तर नसते. हे मी Translation Studies मधील बरेच विवेचक तत्त्वज्ञानपर लेख वाचून म्हणतोय. त्यातील एकही सिद्धान्त मला समाधानकारक वाटलेला नाही. किंवा सिद्धान्तनाच्या परिघातील बहुधा ती गोष्टच नाही. असो. माझं-माझंच फार झालं. तर तुझा पहिला अनुवाद मला आवडला.
२. "केली" हा शब्द तू कुठून शोधून काढलास? का शाळेत असतानाच्या एखाद्या पंतकाव्यातला/कवितेतला असा अवघड शब्द लक्षात राहिला? जर असं असेल तर माझ्याही कडे असे शब्द आहेत: अथिलेपण = मोठेपण, दिठी = दृष्टी, इ. या "केली"बद्दल माझा कयास असा: मूळ खेळी < (ख चा क आणि ळ चा ल होऊन) केली. ख चा क कन्नड(द्रविड)प्रभावे होऊ शकतो आणि कोकणात तर सर्रास लोक ळ चा ल करतात. तर दक्षिण कोकण मध्ये हे घडले असावे!

इतिBlogger चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar
Monday, July 26, 2010 11:40:00 AM  

संवेद, श्रद्धा, चिन्मय : खूप बरं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया वाचून. सुचलेलं सगळं पोस्टमध्ये लिहून टाकल्याबद्दल छान वाटतंय, कारण त्याच्यावरची मतमतांतरं वाचून त्या निमित्तानं खूप गोष्टींवर विचार करायची संधी मिळतेय. अपेक्षेपेक्षा खूप जास्त बहुविध प्रतिसाद मिळाल्यामुळे फार मजा आली, आणि प्रयोग करत राहायला पाहिजेत असं मत ठाम झालं. संवेद, हा खो सुरू केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार! तुला आणि श्रद्धाला तिसरा अनुवाद आवडला त्याबद्दल पण मजा वाटली. तुला ’कायच्याकाय’ संदर्भांत नदीत सोडलेल्या कर्णाचा , मेल्यावर अंगावर घातल्या जाणार्‍या फटफटीत वस्त्राचा संदर्भ लागला असेल तर मला ’कॉम्रेड’की वाटणार एकदम! पण हा अनुवाद लिहिताना मुद्दाम उगाचच ’मेघनाद’, ’झंझावाती’ वगैरे शब्द घुसडून उगाच उसासणार्‍या लोकांची चेष्टा करायचा मूड आला आणि मग संदर्भ, सुसंगती सगळं सोडून देऊन त्या उसन्या flow मध्ये लिहीत गेले.

चिन्मय, तू त्या बापड्या पहिल्या अनुवादाला जवळ केलंस म्हणून त्याच्या वतीने मी खूश उगाच.

’केली’ हा शब्द तर बालकवींच्या ’फुलराणी’तला लक्षात राहिलेला.
"तो व्योमीच्या प्रेमदेवता - वार्‍यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली."

खेळी--> केली ही व्युत्पत्ती रंजक आहे,आणि बालकवी- दक्षिण कोकण हेही जुळत असावे. माझ्याकडे कृ. पां. कुलकर्णींचा मराठी व्युत्पत्ति कोश आहे (१९९३), त्यात ’केली’ हा शब्द नाही. ’केलें’ हा शब्द विशेषण म्हणून दिलाय (केलें काम = केलेले काम असा वापर. मूळ संस्कृत कृ -> प्राकृत का, कड, कद, अपभ्रष्ट कअल, यादवकालीन मराठी केलें) त्यात पुढे टीप आहे की ज्ञानेश्वरीमध्ये ’केलें’ हा शब्द नपुंसकलिंगी नाम म्हणून वापरला गेला आहे. ’केलें = कृत्य, कर्म’ अशा अर्थी. मग ’केलीं = कृत्ये / क्रीडा ’ असाही एक अर्थ निघू शकतो.

इतिBlogger Gayatri
Monday, July 26, 2010 12:21:00 PM  

गायत्री
तू खरोखरीच ग्रेट आहेस. मला जर्मन अजिबात समजत नाही.इंग्रजी काव्यावरुन तुझे अनुवाद वाचले.सगळेच सुंदर आहेत.(अनुवादित वाङ्मय वाचणॆ म्हणजे प्रेयसीच्या गालाला मोजा घालून स्पर्श करण्यासारखे असते इति- पु.ल.) मात्र तुझ्या प्रत्येक अनुवादामुळॆ प्रत्यक्ष काव्याचा आस्वाद नक्कीच मिळालेला आहे.

इतिBlogger Shubhangee
Monday, July 26, 2010 4:31:00 PM  

जर्मन भाषेचा काही संबंध आला नाही पण इंग्रजी अनुवादाने जे मिळालं, ते खूप सुंदर आहे.
आणि शेवटचा अनुवाद लई झ्याक!

इतिBlogger Unknown
Saturday, February 02, 2013 12:24:00 PM  

Post a Comment

<< Home