Wednesday, February 04, 2009

आमच्या कंपूत पियानं सुरू केलेला प्रश्नोत्तरी खेळ चांगलाच फोफावला होता. गप्पा कुटायला सहाहीजणी एकत्र आलो की कुणीतरी "What if.." नाहीतर "Who do you think.." नं सुरू होणारा एखादा प्रश्न टाकायचं. प्रत्येकीला त्याचं खरंखुरं उत्तर देणं भागच. मग आपल्यापैकी कोण कोण ’जीवणा’त काय काय बनेल, कोण सगळ्यांत जास्त चक्रम आहे आणि का, अमुक एका शब्दाची व्याख्या कोण कशी करतं, रस्त्याने जाताना उगीचच कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहून तिच्या एक थोतरीत हाणावी असं कुणाच्या मनात येतं का (सर्वांचं उत्तर ’हो’) आणि तसं असेल तर अशा चेहर्‍यांची काही विवक्षित ठेवण सांगू शकाल का, इत्यादी. फेसबुकावर आणि ऑर्कटवर चालणार्‍या सार्वजनिक प्रश्नाप्रश्नीचं एक जास्त मजा आणणारं (क्वचित्‌ जास्त "सखोल" ) खाजगीतलं रूप.

त्यांतलाच एक प्रश्न म्हणजे कोणत्या जिवंत / मृत वलयांकित व्यक्तीमध्ये आणि तुमच्यात साम्य आहे असं तुम्हांला वाटतं - Whom do you identify with and why? माझं उत्तर होतं सॉमरसेट मॉम. ’ऑफ ह्यूमन बॉण्डेज’ मधले काही उतारे वाचता वाचता ’माझे विचार काय म्हणून माझ्या आधीच कागदावर उतरवलेस?’ असं जितक्या तीव्रतेनं वाटलं होतं तसं कधीच इतर कुणाबद्दल वाटलं नव्हतं. ऑर्वेल, पु.ल., विल ड्यूरां, चॉम्स्की, रिचर्ड डॉकिन्स हे आणि असे कित्येक विचारवंत कधी सामोरे भेटले असते तर चरणस्पर्शाशिवाय काही घडलं नसतं. सॉमरसेट मॉमशी मात्र हस्तांदोलन केल्याखेरीज, त्याच्या पाठीवर दोस्तीची थाप घातल्याखेरीज राहावलं नसतं.
आणि आता एका लेखकाचा केवळ एक लेख - त्यातूनही, त्यातला एकच लहानसा परिच्छेद वाचून ’हा भेटता तर याला गळामिठी घातली असती’ असं वाटतंय - तो म्हणजे जेम्स बॉल्डविन.

त्याचा तो लेख इथे अनुवादित केलाय : http://bolaacheekadhee.blogspot.com/2009/02/blog-post.html

पण हा अनुवाद निव्वळ एक ’खाज’ म्हणून केलेला आहे..तो केल्याशिवाय राहावतच नव्हतं म्हणून. बॉल्डविनच्या मूळ इंग्रजीतली गंमत अनुवादात मुळीच नाहीये. सुदैवाने तो मूळ इंग्रजी लेख आंतरजालावर उपलब्धही आहे - तेव्हा तो वाचाच!

बॉल्डविनचं नावही मला काही महिन्यांपूर्वी माहिती नव्हतं. (अर्थात अतिशय उत्तम लिहिणार्‍या इतर अनेक अमेरिकन लेखकांबद्दल तरी कुठे माहिती होती अमेरिकेत येण्यापूर्वी?) एका लेखात त्याचा उल्लेख वाचून उत्सुकता चाळवली आणि ’नोट्स ऑफ अ नेटिव सन’ आणलं वाचायला. ती पहिली आत्मचरित्रात्मक नोंद वाचून संपून गेले. अतिशय कठीण परिस्थितीत स्वत:ची विनोदबुद्धी शाबूत ठेवणारी माणसं कमी असली तरी दुर्मिळ नसतात. पण त्या परिस्थितीत पार्‍यात टाकलेल्या काचेसारखं अलिप्त राहायला कितींना जमत असेल? आसपास ’अरे’ ला ’का रे’ करण्यावरून रक्त उसळत असताना याच्यात कुठून आला हा विवेचक थंडपणा? एकेका शब्दातून कुशाग्र बुद्धी दिसते या माणसाची. वाक्यं गोटीबंद नेमकी. एक शब्द अधिक-उणा नाही. त्यातूनच तो मिस्कीलपणा दाखवणार, उपरोध दाखवणार, स्वत:चा आणि जगाचा मूर्खपणा तितक्याच अलिप्तपणे उघडावाघडा समोर ठेवणार. जरा हळूहळूच पुढे सरकत होती त्याच्या शब्दांतून गाडी. एरवी इतरांचे भुरूभुरू उडणारे शब्द गपागप मटकावून पुढे जायची माझी सवय - पण या गड्याचे शब्द फार सावकाश चावायला लागले. संशोधनात सारखं तुझ्या प्रकल्पाचं ’बिग पिक्चर’ लक्षात घे असं आसपासचे लोक सांगत असतात. बॉल्डविन काळ्या-गोर्‍यांमधल्या सगळ्या करामतीचं मोठ्ठं चित्रच दाखवत होता. सगळा हत्ती एकसाथ.
आणि त्याचं हे वाक्य म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनाचा गाभाच : I think all theories are suspect, that the finest principles may have to be modified, or may even be pulverized by the demands of life, and that one must find, therefore, one's own moral center and move through the world hoping that this center will guide one aright.

मूलभूत विज्ञानात "finest principles being modified" ही सतत चालू असणारी गोष्ट आहे - आणि ती तशी नसेल तर गाडं खुंटलंच.

किती नाजूक समतोल आहे या वाक्यात : त्याच्याकडे एका नजरेनं पाहिलं तर "वारा येईल तिथे पाठ फिरवायच्या अप्पलपोट्या वृत्तीचं समर्थन" असं म्हणता येईल - आणि दुसर्‍या नजरेनं "बदलत्या परिस्थितीनुसार लवचिकपणे आणि योग्य तितकंच बदलून उत्क्रांत होणार्‍या, टिकून राहणार्‍या वृत्तीचं वर्णन" असंही म्हणता येईल. कसं पाहायचं, तेही स्वत:च्या "मॉरल सेंटर"च्या जागेवर अवलंबून.

आणि त्याचं "I do not like people who are earnest about anything" हे वाक्य पहिल्याप्रथम बॉम्बगोळ्यासारखं वाटलं. कळकळ, तळमळ, उत्कटतेची किंमत याच्या लेखी शून्य? पण मग परत आठवलं, कळकळ डोक्याला गोचिडीसारखी चिकटून बसणं किती सोपं असतं..आणि मग त्यातून सारासारविवेकबुद्धी किती चटकन नष्ट होते. शिवाय "कौन रोता है किसी और के खातिर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया" ची उदाहरणं दिसायला लागलीच होती प्रत्यक्ष मला आता -आताशा. जऽरा मुळांत जाऊन तपास केल्यावर त्या "अर्नेस्ट्नेस" चं कारण कळतं तेव्हा हरखलेला जीव परत गुमान जागेवर येतोच की नाही?

पण असं सगळ्याच गोष्टींच्या मुळात जाऊन, सगळं काही पाहून वर त्यावर हसूही शकत होता म्हणे बॉल्डविन..आणि म्हणूनच मला त्याला कवेत घ्यायचं आहे.

5 Comments:

अनुवाद छान आहेच आणि त्यावरचे तुझे विचारही. बाकी Finest principles being modified....यावर जे लिहीलयंस ना ते खरंय!
Good to see you back with nice post! :)

इतिBlogger सखी
Thursday, February 05, 2009 12:46:00 PM  

This comment has been removed by the author.

इतिBlogger Raj
Saturday, February 07, 2009 1:57:00 PM  

सॉमरसेट मॉमबद्दल असे वाचले आहे की त्याला माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची अद्भुत देणगी होती. खोलीत प्रवेश केल्यावर काही मिनिटातच त्याला तिथे असलेल्या लोकांचे एकमेकांशी नेमके कसे संबंध आहेत, त्यात कोण वरचढ आहे अशा गोष्टी कळत असत. आणि हे त्याच्या लिखाणातून दिसून येते. ऑफ ह्यूमन बाँडेजमध्ये पहिल्या काही पानातच लहान मुलाच्या अंतर्मनात चाललेले खेळ तो लिलया दाखवतो.

बॉल्डविनबद्दल पहिल्यांदा आत्ताच कळाले.

इणंतीला माण दिल्याबद्दल आभार. :-)

इतिBlogger Raj
Saturday, February 07, 2009 2:08:00 PM  

अधुन मधुन आपण ्ब्लॉग वरुन गायब कुठे होता /

इतिBlogger HAREKRISHNAJI
Sunday, February 08, 2009 10:45:00 AM  

Your observations about Baldwin's writing are on the spot! He is one one of the authors I have heard/read about, but never read any of his works. Thanks a million for the introduction :)

तुझा अनुवाद आणि मूळ लेख, दोन्ही आज वाचले. अनुवादात (नेहमीप्रमाणेच) मूळ लेखनाला न्याय दिला आहेस. Keep up the good work :)

इतिBlogger Priya
Tuesday, April 21, 2009 1:19:00 AM  

Post a Comment

<< Home