Thursday, June 18, 2009

रंगुनी रंगांत सार्‍या...

तुझ्या कथा, तुझ्या कविता.
तू लिहितोस त्यातला शब्द-न्‌-शब्द, वाक्य-न्‌-वाक्य मला तुला अभिप्रेत असलेल्या अर्थासहच जाणवावं असा हट्टाग्रह का तुझा?
का समजावून देऊ पाहतोस प्रत्येक ओळ मला?
तुझं लिखाण वाचताना माझ्यापासचं अनुभूतींचं गठुळं मी का सारायचं बाजूला?
तू लिहिताना त्यात तुझं तुझेपण ओतलंस, मी वाचताना माझं मीपण ओतते.
त्या वाचनाचा पहिला अनुभव तरी माझा मला एकटीला घेऊ देत. उगाच प्रस्तावना देत बसू नकोस.
मला वाटलं तर घेईन तुला विचारून, का-कधी-कुठे सुचलं हे तुला.
काही काही शब्द मला ’कळणार’ नाहीत. अवघड वाटतील.
वाटू देत.
तू तरी कुठे ’कळला’ आहेस मला?
अरे ते सोड, मी तरी कुठे कळली आहे मला?
पण कळत नसलेली प्रत्येक गोष्ट आवडत नाही असं नाही काही.
उलट मला तर कळत नाहीत त्याच गोष्टी जास्त आवडतात कधी कधी!
म्हणजे झुंजता येतं रे त्यांच्याशी..मस्त कुस्ती खेळता येते..
अशी दाबायची एका वाक्याची मुंडी बगलेत..अस्सं लोळवायचं घोळवायचं त्याला तासभर डोक्यातल्या तांबडमातीत..दोघंही जॉकी बिल्डिंगीतल्या पैलवानांसारखे धूळमाखले होईतोवर. कधी कधी आपटी खावी लागते मलाच..पण जेव्हा त्या वाक्याला उताणं पाडायला जमतं तेव्हा काय लाख आनंद होतो!
मग मी विजयोन्मादात तुला सांगत येणार..हे बघ, हे चित्र दडलंय तुझ्या त्या वाक्यात!
आणि तू चक्क हिरमुसणार?
’मला हे असं नव्हतंच म्हणायचं’ म्हणणार?
अरे पावसाच्या पोरा, माझ्या गर्भात मी हौसेनं पेरून घेतलेल्या तुझ्या शुक्राणूचं जितंजागतं बाळ मी तुला कौतुकानं दाखवायला आणलंय आणि तू मात्र ’याच्याशी माझा संबंध नाही हां’ म्हणत त्याला झटकून टाकतो आहेस? मला माहिती आहे ते ’तुझं’ नाहीये..पण तुझ्यामुळे आहे हे सत्य नजरेआड करता नाही यायचं तुला. आणि समजा तिकडे काणाडोळाच केलास तू, तरी गोजिरवाणं ते बाळ, त्याचं आल्यागेल्यासारखं कौतुक तरी करशील!
तुझं म्हणणं तुझी कविता एकसंध शिल्पासारखी. ती तुझ्यासारखी जिला कळेल ती तुझी सिंडरेला.
पण मला माहितीये, कसे तुकडे तुकडे सांधून शिल्प बनवलंयस तू ते. मला एक्कच तुकडा हवाय त्यातला. म्हणजे तुझ्या त्या शंकराच्या पायाच्या अंगठ्याचं नख. किंवा त्या नटराजाचा मुकुटमणी. माझ्याकडे माझे स्वत:चे कित्ती कित्ती तुकडे आहेत..आणि माझ्या तुकड्यांना तुझ्यातला एकुलता तुकडा परिपूर्ती देणारेय.”घेऊ नको’ म्हणूच शकत नाहीस तू. एकदा तू तुझं शिल्प मला दाखवलंस की ते माझ्या डोळ्यांचं झालं. ग्रीकांची शिल्पं हुबेहूब नकलणार्‍या रोमनांचा वारसा मिरवते म्हटलं मी. तुझ्या नटराजाचा मणी भंगला तर भंगेल कधी. पण माझ्या परकर्‍या पोरीच्या कानात डूल म्हणून जाऊन बसलेला तो मणी काही तिथून हटायचा नाही.
___

आदित्यराणूबाई, आज तुम्ही आमच्याच कवितेवरचं निरूपण दाखवायला आणलंत आम्हांला. खरं सांगावं तर अभिमान वाटला तुमचा. पण तुम्हांला जे काय दिसलं होतं ते फक्त तुमचं होतं - आमचे शब्द फक्त निमित्तमात्र. म्हणजे उंच डोंगरावर अगदी ओसंडायला आलेली एक तळी असावी आणि एका ढगानं उगाच मुतल्यासारखी एक धार तिच्यात सोडली की धबाधबा पाणी वाहातं व्हावं असा तो प्रकार. आता बघा, हे असं कधी निसर्गात होत नसतं. पण असं व्हावं असं आम्हांला बुवा वाटतं. त्यामागे आम्ही आंबोलीला गेलो होतो तेव्हाची एक आठवण आहे दडलेली.
विचारलंत, कोणती आठवण होती ते विचारलंत?
अहो, तुमची ही उत्सुकता आमच्याशी प्रत्यक्ष बोलताना जशी दिसते.. तशी ती जरा आमच्या कविता वाचताना दिसूद्यात कधी, एवढंच म्हणतो झालं.
तुम्ही आत्ममग्न, तुम्ही स्वयंपूर्ण, तुमच्या संततीला बापाची गरज फक्त बीजरूपानं - हे का आम्ही ओळखत नाही? पण तुम्हांला बीज म्हणून जे दिसतं आहे, ती आणखी कुणाची संतती आहे...तिचं ”त्याला हवं तसं’ कौतुक व्हावं अशी त्याची अपेक्षा आहे हो. अवाजवी असेल ही अपेक्षा, पण अमानवी नक्कीच नव्हे. आणि तुमच्यासारखे शहाणे दिसणारे लोक अशी उत्सुकतेशिवायची पुनर्निर्मिती करू जातात तेव्हा वाईट वाटतं इतकंच. मी अमूर्त शैलीत काढलेल्या रेड्याच्या चित्राचं तुम्ही ’किती गोंडस उंदीर’ म्हणून कौतुक करून वर त्याच्याशेजारी आपला गणपती आणून बसवणार आणि आम्ही त्या अख्ख्या सजावटीत धन्यता मानावी असं म्हणणार? नाही, विनोदी आहे ही उपमा. आम्ही धन्यताही मानूच. पण तुमच्या विश्वामित्री प्रतिसृष्टीला कधी कधी वल्गनेचा वास येतो. आमची मूळ सृष्टीच काय पण तिच्या इतर सार्‍याच प्रतिकृती तुम्हांला क:पदार्थ वाटायला लागतील अशी भीती वाटते.”तुम्हांला आतून जाणवलेले सर्व सर्व तुमच्यासाठी सत्य’, हे बरोबर. पण अधूनमधून इतरांना जाणवलेले त्यांच्यासाठीचे सत्य न्याहाळत चला. तुमची जाणीव अधिक खोल होईल. स्वत:च्याच विचारांचं डबकं नका बनवू. सर्व जलौघांना सामावणारा समुद्र बनू देत त्यांना.
___
होय आहेच माझी अपेक्षा - मी लिहिलेल्या ओळींचा मला अभिप्रेत असलेला अर्थच तुला समजावा अशी. आणि हीच माझ्या मनातल्या सिंड्रेलासाठीची कसोटी आहे हेही बरोबरच ओळखलंस तू. लाकूड तासून तासून एकही खिळा न वापरता नौका बनवावी तितक्या काळजीपूर्वक शब्द तासून बसवतो मी माझ्या निर्मितीमध्ये. काय बिशाद आहे की कुठे फट राहील नि पाणी आत शिरेल! एक शब्द इकडचा तिकडे झाला की भाव बदलला वाक्याचा. आणि तू म्हणतेस तुला सांगूच नको मी, तो भाव काय होता? मनात थेंबा-थेंबानं झिरपलेले विचार - काही तर कित्येक वर्षांपासून झिरपत आलेले - ते गोळा होऊन बनलेली ती ताडी. तुला तिची चव ’झेपली’ आहे की नाही ते कळायला नको मला? माझ्या भाषेचं प्रयोजन म्हणजे माझ्या मेंदूत उमटलेला भाव तुझ्यापर्यंत पोहोचवणं. त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता तू हपापल्यासारखं गटागटा सगळं वाचणार, त्यात चार-पाच शब्द पूर्णपणे चुकीचे वाचणार, दहाबारा शब्दांच्या जागा बदलणार, एखादी ओळ तुझ्या डोक्यातच नाही शिरणार - आणि मग त्या कच्च्या पायावर तू स्वत:च्या कल्पनेचे इमले उभे करत सुटणार. कुस्तीबिस्ती खेळलीस तरी तूच बांधलेल्या आखाड्यात. तुझ्या त्या प्रथमदर्शनी कल्पनेचा काहीच प्रभाव त्या कुस्तीत राहात नाही तुझ्यावर, असं छातीठोकपणे सांगत असशील तर मानतो.
आपला तो गाणारा मित्र एकदा म्हणाला नव्हता,’ गाण्यानंतर इतर सगळ्यांनी केलेलं कौतुक आवडत नाही असं नाही - पण ज्याला गाणं ’कळतं’ त्याची शाबासकी मिळाली की फार छान वाटतं.’ माझंही तसंच आहे काहीसं. मी शब्दांच्या माध्यमातून ’ये हृदयीचें ते हृदयीं’ घालू पाहातो आहे. ते मला हवं तसंच समोरच्याच्या हृदयात पोहोचलं तर जो आनंद होतो तो वर्णनातीत. त्यात माझ्या प्रकटीकरणाचा जसा सन्मान आहे तसाच त्या व्यक्तीच्या जाणतेपणाचाही. तू अशी जाणती वाटलीस म्हणून तुझ्याकडे आकृष्ट झालो. पण मग जाणवलं की एकमेकांना छेदून जाणार्‍या आपल्या अनुभवविश्वांच्या सामाईक तुकड्यातलं माझं लिहिणं तुला कळतं जसंच्या तसं. पण उरलेल्या त्या ”केवळ माझ्या’ विश्वाचं काय? ते तर तू पाहिलंही नाहीयेस. तुला ते मी न सांगता कळावं अशी अपेक्षा कशी ठेवावी मी? नाहीच कळायचं तुला मी सांगितल्याशिवाय ते. तुला पहिल्यांदा नहाण आलं तेव्हा तुला काय वाटलं होतं ते कुठे कळलं होतं मला तू सांगितल्याशिवाय?
हौसेनं गर्भात पेरून घ्यायला निर्मितीचं बीज म्हणजे हौसेनं नाक टोचून ल्यायचा खडा नव्हे. आयुष्यभराचं आईपण पेलण्याची तयारी आहे की नाही याचा विचार कर आणि मग बोल...नाहीतर मूल जन्माला घालून मोकळी होशील आणि त्याला काय म्हणायचं आहे ते कधीच लक्षात घेणार नाहीस.
___
त्याचं काही ऐकू नको आदीमाऊ तू. एकदा त्याच्या काळजाजवळच्या मतांच्या विरोधात काही बोललीस की बालेकिल्ले उभे करत बसतो शब्दांचे. तोच म्हणतो तशा विटा अशा तासून बसवत जातो की वार्‍याला आत शिरता येऊ नये. हे स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणारे लोक असेच! अरे साहित्यनिर्मिती करता आहात...प्रयोगांची निरीक्षणं नाही नोंदवत आहात काही. ”आपले शब्द वस्तु्निष्ठ पद्धतीने स्वीकारले जावेत, व्यक्तिनिष्ठ पद्धतीने नव्हे’ याची काळजी शोधनिबंध लिहिताना करावी(च). शोधनिबंध लिहिताना(च) करावी असं नाही. कायदे, नोटिसा, बातम्या - अनेक प्रकारचं लिखाण आहे जिथे अशी एकेका शब्दाला मोजा-मापायची गरज असते, अन्यथा अनर्थ उद्भवतो. पण महाशय ’साहित्यनिर्मिती’ करताहेत. भावनांच्या प्रकटीकरणाचा खेळ मांडताहेत. (आता चिडेल बघ या शब्दप्रयोगावर. त्याच्या लेखी लिहिणं हे केवढं सीरियस काम! जणूं खेळ मांडणं फार भुक्कड असतं. अरे लिहिताना याची काय तंद्री लागत असेल एवढी माझ्या चिऊची तंद्री लागते रोज घराबाहेरच्या बांधकामाच्या ढिगात दगडगोटे शोधून मांडऽऽऽऽऽऽत बसताना.) तर यानं एक गोष्ट लिहिली आणि ती वाचून तुला प्रतिक्रियेदाखल काही स्फुरलं तर यानं त्याला त्याच्या अपेक्षेनुसार प्रतिक्रिया मिळाली नाही म्हणून का धुसफुसावं? त्याच्याच शब्दांना तू नवा अर्थ दिलाहेस हे स्वीकारण्याइतकं त्यानं तरी मोकळं का न व्हावं?
____
सम्राट, आपल्यासमोर वाद चालला असेल तर कुण्या एकाची बाजू घेऊ नये. विशेषत: आपलाच पुरेसा विचार झाला नसेल त्या विषयावर तर. आणि आजचे प्रतिद्वंद्वी तुल्यबळ आहेत. एकमेकांशी युद्ध खेळतानाच एकमेकांना स्वत:चे डावपेच शिकवताहेत. बघ वाद संपे-संपेतो दोघंही अजून जास्त कळायला लागतील एकमेकांना. तटबंदी मजबूत असेल आपापली पण गवाक्षं नक्की उघडतील. आम्हीही थोडे विचलित झालो होतो सुरुवातीला, पोरीचा हेका बघून. पण आता वाटतं ’वादे वादे जायते तत्त्वबोध:’ मध्ये खरंच काही तथ्य असावं. आता कुणी तिच्यासमोर व्यक्त होत असेल तर ती थोडं अजून बारकाईने ऐकेल - ’आपण ऐकतो आहोत तेच त्याला म्हणायचं आहे का’ या विचाराला ’काय फरक पडतो?’ नं धुडकावून लावणार नाही कदाचित. आणि तो कदाचित ’आपली निर्मिती थोडी तटस्थपणे पाहायची असते’ या विचाराला थोडी जागा देईल मनात.
भावनांना शब्दरूप देणं म्हणजे कॅलिडोस्कोपमध्ये काचांचे तुकडे मांडणं. येणारा प्रत्येकजण स्वत:ला हवं तसं त्यांना फिरवणार, दर वेळी एक वेगळीच आकृती त्याला दिसणार - हे त्याला जाणवायला लागेल. ’आपली कला नितळ व्हावी’ असं कोणत्या कलाकाराला वाटत नाही? नवनिर्मिती हातून घडताना ती ज्या भावभावनांसकट निपजली, त्याच जर तिचा आस्वाद घेणार्‍या व्यक्तीच्या मनात उमटल्या तर तो निर्मात्याच्या अट्टाहासाचं सार्थक झाल्याचा क्षण हे का आम्हांला ठाऊक नाही? पण समजा तसं झालं नाही तरीही ती निर्मिती उणी ठरत नाही, उलट निर्मात्यानंही न कल्पिलेले भाव ती पाझरवू शकते - ती निर्मात्याहून स्वतंत्र होते - कदाचित त्याच्याहून मोठी! तो धास्तावल्यासारखा वाटतो तो याच कल्पनेनं की काय? पण मी सांगू, त्याच्या लिखाणाला आपले चेहरे चिकटवणार्‍या लोकांची धास्ती घेऊ नये त्यानं. आपले विचार त्याला करू देऊन, त्याच्या विचारांबाहेर जगच नाही असं त्याला वाटायला लावणार्‍या लोकांची धास्ती घ्यावी!!!
______
“It comes about that if anyone spends almost the whole day in reading, and by way of relaxation devotes the intervals to some thoughtless pastime, he gradually loses the capacity for thinking, just as the man who always rides forgets how to walk. This is the case with many learned persons; they have read themselves stupid.” : Schopenhauer

13 Comments:

Hey
As usual, hats off. :)
खरंच, मी खूपवेळा "मला" कळलेली कविता बाईंना सांगायचेच नाही.I was always scared of the possibility that I may not say the same thing as the poet would if he/she was explaining it. :)
I went through that struggle myself as a writer too. I used to make sure I used enough words that no one dares to think of it as anything else. I must say that it was the most uncreative time of my writing.
It is very important even for the reader to "let go". If both the reader and the poet are willing to let go, then as you say, the comprehension comes as a "babushka" and you get poems within poems in a single poem.
It is quite fascinating.
Sorry about the English. :(
I lose the freedom of thought when I write devnagri and then the text becomes restricted only to words I can write without typos. :)
Good one again.
Keep writing.

इतिBlogger Saee
Thursday, June 18, 2009 4:07:00 PM  

भन्नाट! दोन्ही बाजूंच्या बर्‍याचशा गोष्टीशी शब्दशः व अर्थशः identify केलं स्वतःला. जियो!

फक्त सर्वांत शेवटचा तुकडा (सम्राट,...) अनावश्यक वाटला. कशाला एवढं स्पष्टीकरण? त्यांचं त्यांना उमजलं होतंच की. पण त्यातलं शेवटचं वाक्य "आपले विचार त्याला करू देऊन, त्याच्या विचारांबाहेर जगच नाही असं त्याला वाटायला लावणार्‍या लोकांची धास्ती घ्यावी!!!" हे भारी आहे!

इतिBlogger a Sane man
Thursday, June 18, 2009 7:46:00 PM  

तुझं हे पोस्ट वाचताना नाट्यप्रवेश वाचत असल्याचा एकसारखा भास होतो. आणि तसं होवो हे "शंकराच्या पायाच्या अंगठ्याचं नख" मी मागतो.

इतिBlogger प्रशांत
Thursday, June 18, 2009 11:30:00 PM  

पोस्ट दोनदा वाचले. अजून काही वेळा वाचणार हे नक्की.

या पोस्टचे वर्णन "एक संपृक्त अनुभव" असे करता येईल. या लिखाणाकरता निवडलेला फॉर्म अतिशय आवडला.

निर्मिती - कलेच्या संदर्भातली निर्मिती , एखाद्या कलावस्तूचे अर्थनिर्णयन यांबद्दलची विचारमालिका , अनुभव घेण्याच्या , त्यातून घडणार्‍या ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेकडे वेगवेगळ्या कोनातून पहाण्याची प्रक्रिया कळत न कळत आपल्या सर्वांमधेच घडते - घडत असते. जो तो आपापल्या पदरात पडलेल्या विचार आणि संवेदनांच्या शक्तीतून या सगळ्या अवकाशात झेप जाईल तितपत विहार करतो.

ब्लॉगलेखिकेचे हे संचित केव्हढे आहे याचा प्रत्यय या पोस्टातून येतो असे वाटले. ढोबळ शब्दात सांगायचे तर चार (की पाच ?) बुलंद बुरुजांवर बसलेल्या असल्यासारख्या point of views किंवा positions चा हा संवाद आहे. "संवादपद्धतीतून तत्वबोध" हे तंत्र खूप जुने आहे. मात्र , हे फ्रेमवर्क तेव्हाच वापरायला लागते - किंबहुना वापरणे अपरिहार्य होते - जेव्हा ज्याचा विचार करायचा तो विषय बहुपेडी , आशयसंपृक्त, मूलभूत संकल्पनांचा धांडोळा घेणारा असेल. प्रस्तुत लिखाणामधे , उपरोक्त अवकाशात विहार चालला आहे पण जे उड्डाण घेतले आहे ते ललितशैलीच्या अंगणातून.

माझे हे जुजबी interpretation दोन वाचनातले आहे. पोस्ट परत परत वाचण्याजोगे. मनःपूर्वक अभिनंदन.

इतिBlogger MuktaSunit
Friday, June 19, 2009 12:02:00 AM  

सुरेख! हा सनातन वाद आहे आणि भाषेच्या आणि व्यक्तीच्या अपुरेपणामुळे (अपुरेपणा थोडा कठोर शब्द आहे - तरी...) पुढे चालूच राहील असाच. निमिष म्हणतो त्याप्रमाणे शेवटचा भाग नसता तर थोडं 'गोडी अपूर्णतेची' छाप वाटलं असतं, पण "तटबंदी मजबूत असेल आपापली पण गवाक्षं नक्की उघडतील." हे वाक्य खासच. अर्थातच सर्क्युलर लॉजिकप्रमाणे याबाबतही तुझी आणि प्रतिसाद देणार्‍यांची मतभिन्नता असणारच :). शेवटचं 'they have read themselves stupid' पूर्णपणे पटलं नाही तरी कुठेतरी खरं असावं असं वाटून गेलं.

इतिBlogger Nandan
Friday, June 19, 2009 12:23:00 AM  

प्रतिसादांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
सई, लिहिताना आणि वाचताना आपल्या पीयचडीसारखं ’कर्मण्येवाधिकारस्ते..’ पाळायचं असंच ना? ;)
प्रशांत, यातलं ’नाटक’ तुझ्यापर्यंत पोचलं म्हणून खूप आनंद झाला.
मुक्तसुनित, शिवाजीराव सावंतांच्या कादंबर्‍यांच्या धाटणीचा हा फॉर्म वापरण्याचं कारण खूप छान समजावलंत तुम्ही! माझ्याच डोक्यात ’भूमिकां’चा एवढा गोंधळ उडत होता की प्रत्येकीचा एक एक खंदा पुरस्कर्ता ठेवल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. काहीही लिहिल्यानंतर स्वत:च्या लिखाणाची छाननी करण्याचं मला व्यसन आहे, त्यातून या चौघांची रूपं डोक्यात आली ती अशी:
ती: हिरवी-कच्ची, पोक्त-सच्ची, बहराच्या बाहूंची इ.इ.
आबा: gray area : हे दुरून गंमत पाहणारे स्वयंघोषित सूत्रधार. नाट्यमयतेचा यांना सोस. त्यामुळे बोलताना कधी शिवराळ, कधी रायवळ, कधी रामशास्त्री प्रभुणे, कधी अर्जुन.
तो: red. least scattered color in solar spectrum. ठाम मतांचा आणि आत्मविश्वासू.
मित्र: निळा कैवारी. या वादात तिची कड घेणारा.
या चारांव्यतिरिक्त अजून कितीतरी भूमिका आहेत, आणि काहीही लिहिता-वाचताना मी त्यांत आलटून पालटून भटकत असते. पण हा लेख लिहिताना आहे याहून अधिक शब्दबंबाळ होऊ नये म्हणून एवढ्यावरच थांबावं लागलं.

निमिष, शेवटचा परिच्छेद over-explanation आहे हे तू जाणवून दिल्यानंतर, तो परिच्छेद लिहिणारी मी म्हणजे लेखातला तांबडा ’तो’ होते हे शब्दांत लक्षात आलं. :)
पण नंदन म्हणतो त्याप्रमाणे विषय न संपणारा आहे. त्यामुळे आबांनी मांडलेला सारांश हाही त्यांच्या वादाचा शेवट नव्हेच. उदा. ’तो’ च्या स्वगतातल्या शेवटच्या तीन वाक्यांत त्याने स्वत:च निर्मितीचं निर्मात्याच्या निरपेक्ष असलेलं अस्तित्व मान्य केलं आहे. ’ती’ वादात हा मुद्दा पुढे वाढवू शकते. मित्र ’गाणं कळणार्‍यालाच त्याची सर्वोत्तम अनुभूती मिळते असं नाही’असा सिद्धांत मांडू शकतो. (भक्तिमार्ग विरुद्ध ज्ञानमार्ग?) आबा या सगळ्याचं परत निरीक्षण करत ’तुम्ही सगळेच कसे माझ्यासारखे आत्मसंतुष्ट आहात आणि आता विचार पुरे करा आणि आपापल्या कामाला लागा : कर्ममार्गच खरा हे मला कळलेलं सूत्र’ असं ’इसके उप्पर मेरा एक’ ठेवून देऊ शकतात.

नंदन, अपुरेपणा हा सर्वथैव योग्य शब्द आहे. कधी भाषेचा तर कधी तिचा वापर करू पाहणार्‍या माझ्या शक्तीचा तोकडेपणा. एका चित्राची मदत घेऊन सांगते: मला मांडायचं होतं ते हे : http://www.minimathprojects.com/images/logoblacklight.jpg ती आणि तो चे असंख्य मतांच्या ताण्याबाण्यांनी भरलेले विचारप्रवाह असे दोन वेगवेगळ्या string art - Bezier Curves सारखे एकमेकांना भिडलेत. ताण घालवण्याचा मित्राचा मार्ग म्हणजे तिला मागे खेचणं, दोघांना वेगवेगळं जाऊ देणं. आबांचा मार्ग म्हणजे त्यांना तसंच एकमेकांना भिडू देणं, एकमेकांना चिरू देणं - त्यातनं जेव्हा त्रिमित तार्‍यासारखी आकृती तयार होईल तेव्हाही ताण नष्ट होईलच. आबा त्रयस्थासारखे या सर्वाच्या वर राहून हे पाहू शकतात.

'Reading themselves stupid' हे मी स्वत: अनुभवलं असल्यामुळे शॉपेनॉरचं ते वाक्य मला खोलवर पटलं आहे. पुस्तकांचा open to finish वचावचा फडशा पाडायची सवय असलेल्या काळात कधी कधी ’आता कुणाचंही काहीही वाचू नये’ असं वाटण्याइतपत इतरांच्या विचाराचं अजीर्ण होत असे. त्याचवेळी हेही वाटे की आपली विचारशक्ती या लेखकांच्या एकलक्षांशही नाही. तेव्हा लक्षात आलं की वाचलेल्या वाक्यावर विचार घडला नाही तर वाचणं फुकट. काही प्रकारच्या पुस्तकांच्या बाबतीत वाचन <--> विचार/प्रश्न/ लेखकाशी डोक्यातच वाद ही प्रक्रिया अतिशय आपसूक आणि वेगात घडे. उदा. ललितलेखन / लघुनिबंध. दुसर्‍या टोकाच्या, शब्द/वाक्यरचनाच जड असणार्‍या ’विचारपरिप्लुत’ पुस्तकांच्या बाबतीतही सरळ स्पष्ट दिसायचं की इथे सावकाश विचार करून वाचायला हवं. पण समजेलशा भाषेत ’जड’ विचार मांडले गेले की ते लेखन नुसतंच ’बाबा वाक्यं प्रमाणम्‌’ अशा पद्धतीनं वाचलं जायचं. (ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम, फाइनमन लेक्चर्स, सेल्फिश जीन) आणि मग मी अर्ध्या हळकुंडानं पिवळी होऊन जायचे. हे वाचून स्वत:ला अजून मूर्ख बनवणंच झालं.

इतिBlogger Gayatri
Friday, June 19, 2009 3:05:00 AM  

>>> दुसर्‍या टोकाच्या, शब्द/वाक्यरचनाच जड असणार्‍या ’विचारपरिप्लुत’ पुस्तकांच्या बाबतीतही सरळ स्पष्ट दिसायचं की इथे सावकाश विचार करून वाचायला हवं.

-- पुलंचा 'विचारपरिलुप्त'चा विनोद आठवला :). बाकी विवेचन पटलं अगदी.

इतिBlogger Nandan
Friday, June 19, 2009 5:23:00 AM  

या चारांव्यतिरिक्त अजून कितीतरी भूमिका आहेत, आणि काहीही लिहिता-वाचताना मी त्यांत आलटून पालटून भटकत असते. पण हा लेख लिहिताना आहे याहून अधिक शब्दबंबाळ होऊ नये म्हणून एवढ्यावरच थांबावं लागलं.


This can be a great sequel. There are so many threads thought-fragments lingering in our mind. The playing up of them against each other has happened brilliantly here. Why leave out the ones that have not found a place in the present episode ? पुढील भागात येऊ द्यात.

इतिBlogger MuktaSunit
Friday, June 19, 2009 6:57:00 AM  

लेख तर केवळ अप्रतिम !

मला आवडलेले काही उतारे :-

तू तरी कुठे ’कळला’ आहेस मला?
अरे ते सोड, मी तरी कुठे कळली आहे मला?

उलट मला तर कळत नाहीत त्याच गोष्टी जास्त आवडतात कधी कधी!

एकदा तू तुझं शिल्प मला दाखवलंस की ते माझ्या डोळ्यांचं झालं.

तुम्हांला आतून जाणवलेले सर्व सर्व तुमच्यासाठी सत्य’, हे बरोबर. पण अधूनमधून इतरांना जाणवलेले त्यांच्यासाठीचे सत्य न्याहाळत चला. तुमची जाणीव अधिक खोल होईल. स्वत:च्याच विचारांचं डबकं नका बनवू. सर्व जलौघांना सामावणारा समुद्र बनू देत त्यांना.

माझ्या भाषेचं प्रयोजन म्हणजे माझ्या मेंदूत उमटलेला भाव तुझ्यापर्यंत पोहोचवणं.

ते मला हवं तसंच समोरच्याच्या हृदयात पोहोचलं तर जो आनंद होतो तो वर्णनातीत. त्यात माझ्या प्रकटीकरणाचा जसा सन्मान आहे तसाच त्या व्यक्तीच्या जाणतेपणाचाही.

त्याच्याच शब्दांना तू नवा अर्थ दिलाहेस हे स्वीकारण्याइतकं त्यानं तरी मोकळं का न व्हावं?

बघ वाद संपे-संपेतो दोघंही अजून जास्त कळायला लागतील एकमेकांना. तटबंदी मजबूत असेल आपापली पण गवाक्षं नक्की उघडतील.

नवनिर्मिती हातून घडताना ती ज्या भावभावनांसकट निपजली, त्याच जर तिचा आस्वाद घेणार्‍या व्यक्तीच्या मनात उमटल्या तर तो निर्मात्याच्या अट्टाहासाचं सार्थक झाल्याचा क्षण हे का आम्हांला ठाऊक नाही?

त्याच्या लिखाणाला आपले चेहरे चिकटवणार्‍या लोकांची धास्ती घेऊ नये त्यानं. आपले विचार त्याला करू देऊन, त्याच्या विचारांबाहेर जगच नाही असं त्याला वाटायला लावणार्‍या लोकांची धास्ती घ्यावी!!!

इतिAnonymous Satyajit
Wednesday, June 24, 2009 9:25:00 AM  

Wonderful! Post as well as comments :)

इतिBlogger Anand Sarolkar
Wednesday, June 24, 2009 5:27:00 PM  

वाचून बरेच दिवस झाले खरं तर पण समाधान होईपर्यंत वाचायला पुरेसा वेळ मिळत
नव्हता. खूप आवडला. असे वेगवेगळे मतप्रवाह कसे एका पुढे एक मांडले आहेस. पण
ते करताना शब्द अगदी नजाकतीने विणल्यासारखे वाटतात. अनेकदा वाचलं

आता तुला नक्की काय म्हणायचं आहे ते कळण्य़ासाठी परत परत वाचलं असं नव्हे तर
परत परत नव्याने कळण्यासाठी पारायणे! कारण तुला काय म्हणायचं आहे या पेक्षा
मला काय कळलय हेच तर याचं सार आहे, नाही का?
इथे मला तीव्रतेने फ्रेंच साहित्य समिक्षक रोलां बार्थ (Roland Barthe) ची
आठवण काढावीशी वाटली. त्याचा एक प्रसिद्ध निबंध आहे- "स्वामित्वाचा लोप"
(Death of Author-खर तर याचं भाषांतर निर्माणकर्त्याचा मृत्यू असं होईल पण
मला तरी ते असं जरा अहिंसक करावंस वाटतय) साहित्य समिक्षेमधला अनेकार्थवाद हा
त्याने खर्‍या अर्थाने पुढे आणला.

त्याच्या मते-
The essential meaning of a work depends on the impressions of the reader,
rather than the "passions" or "tastes" of the writer; a text's unity lies
not in its origins," or its creator, but in its destination, or its
audience.

नवसमिक्षेमधे या विचारांवर खूपच ऊहापोह झालेला आहे. आंतरजालावर यावर माहीती
मिळेलच. गूगल झिंदाबाद!!!

आणि खरच आपण जे लिहीलय ते अगदी तसच्यातसं दुसर्‍याला कळावं ही अपेक्षा धरणं
म्हणजे माझ्या मुलाने इंजीनिअरच व्हावं असं म्हणण्या इतकं बापुडवाणं आहे.

इतिBlogger prasad bokil
Thursday, June 25, 2009 3:07:00 PM  

poorna nahi vachla mi, pan khoopach chaan lihites.

khoop mahinyanni mayboli ni man baroon kadhla.

इतिBlogger Psmith
Saturday, December 19, 2009 11:40:00 PM  

वाह क्या बात है!

इतिBlogger Sharad
Friday, December 17, 2010 9:17:00 AM  

Post a Comment

<< Home