Friday, May 22, 2009

क़तरा क़तरा जगणे मरणे.

मला एकदा, एकदाच तुला भेटायचंय.

एकदा तरी भेटायचंय.

ही वखवख कुठून येते आहे याची मला पर्वा नाही, आणि उत्सुकताही नाही--सध्या.
उतरली वखवख की प्रश्न सुरू होतील, तेही तिच्याइतके जीवघेणे नसतील.
काही तातडीनं करायच्या कामांसाठी थांबून राहण्याइतके समंजस असतील ते प्रश्न.

त्यांचा आत्ता या "उत्कट भारावलेल्या इ. इ." थडथडमार्‍या स्थितीत विचार करण्याचं काय कारण?
आणि त्यांचा विचार येत असेल तर स्थिती थडथडमारी खरंच आहे का?

पण आहे.
विचार डोक्यात आल्यापासून ते इथे उतरवेपर्यंत मधल्या वेळात एक सफरचंद जसं खस्सकन ओढून हातात घेतलं तितक्या क्रूरपणे मी फळांना कधीही वागवत नाही.
डंख नाही मारला त्याला नेहमीसारखा इमणुला चिमणुला गोड्डगोड्डुला..राक्षसी लचका तोडला, अर्धं घशात घातलं एकदम.
आणि मग लिहिता येण्यासारखं सामान समोर आलं तेव्हा ते अर्धं सफरचंद तसंच बाजूलाही ठेवलं ..हे नेहमीचं नाही. खाणं अर्ध्यात सोडायचं नसतं मी.

आणि लिहिताना हातांच्या गतीत एक पाय तडातडा उडतो आहे हेही असंच आवेगाचं लक्षण.
डोक्यातला हा आरसा कधी फुटेल? स्वत:चं निरीक्षण करण्याची ही वेळ नाही, लाटेत बुडायची आहे हे न कळण्याइतपत बेअक्कल असू नये आरश्यांनी.

तुला एकदा भेटायचंय.
का ते माहीत नाही, भेटल्यावर कळेल.

जीवघेणं लिहिणारे अनेकजण वाचले मी, पण त्यातले काही केव्हाच उलथलेत आणि सध्याचे काही बरेच प्रसिद्ध म्हणून त्यांच्यामागे जाण्याचा अजिबात सोस नाही हे कुणीही न विचारता समर्थन माझं मलाच.

’तू कोण,कुठली’ चे काही तुकडे मला माहिती झालेत पण ते दुय्यम आहेत.
अशी कोसळत समोर आलीस तेव्हा आत उठलेली ही डोकं भांगलणारी तिडीक महत्त्वाची आहे.

किंवा जळजळ, मळमळ आणि बुळबुळीच्या मार्गानं जाणारं ते अन्न.
तू लिखाणात कधीही शिव्या दिलेल्या नाहीस तरी साला देवचोद विचार डोसकं फिरवतोच : तुझ्या लिखाणाचं तामसी अन्न खाऊन मला तांबारल्या डोळ्यांनी जगाच्या छाताडावर नंगानाच करावा असं का वाटलं?

कडकलक्ष्मीच्या तेल पाजलेल्या दोरखंडासारखं तुझं लिखाण मीच माझ्या हातानं मारतेय स्वत:च्या पहिल्यांदाच उघड्यावाघड्या केलेल्या पाठीवर.
हाड हाड..तो डमरू माझ्याच आत कुठेतरी वाजणारा कडाकडा..तू फक्त निमित्त.

पण नाही. निमित्त ’फक्त’ नसतं. च्यामायला आत्ताही सुपीक जमीन आणि बीज असल्या पकाऊ उपमा आठवाव्यात? Fuck-त.

तुला एकदा भेटायचंय.

रानमांजरानं पंजा मारून मारून सुंदर केलेला माझा चेहरा तुला दिसेल की नाही कोण जाणे.
पण तू एका क्षणाला माझा ड्रॅगन बनवलास एकापाठोपाठच्या सात टकीला शॉट्सविना..
त्या वेळी जळलेल्या त्या नरड्यातून आता एक शब्दतरी बाहेर पडेल का खराखुरा हेही सांगणं कठीण.
पण भेटशील तेव्हा रूमीच्या त्या रॉंगडूइंग आणि राइटडूइंगच्या शेतापार.
म्हणजे मग मला तुझी स्वत:च्या हातानं स्वत:चा गळा आवळणारी तडफड बघत बघत तडफडून मरता येईल.

***
.
.
.
ओळखदेख नसलेल्या..
नव्हे : ओळख असलेल्या, देख नसलेल्या दोन व्यक्तींनी
फालतू कॉफी शॉपमध्ये भेटून केलेल्या अत्यंत फालतू बडबडीनंतर
बोटं तांबारेपर्यंत कवळून तडाक्यात सोडून दिलेला हात.
त्या फालतू आपलेपणापेक्षा
त्या निर्‍या अधाशी क्षणासाठीच तुला भेटायचं होतं.


उपसंहार:

इन्टेन्सिटी कुणाच्या आयुष्याला पुरलीये? झेपते तितकी प्यावी.
पुढच्या इन्टेन्स तिडिकीच्या वेळी मी या खवचट मध्यमवर्गीय आरश्याचा खून करणार आहे.

10 Comments:

Gaya!
Mala farsa kalala nahi g. :(
but the writing is awesome!

इतिBlogger Saee
Friday, May 22, 2009 9:26:00 AM  

Malahi farse kalalele nahiye :(

Fact lekhachya shirshakavarun aani mazya alpamati pramane mala evadhach kalale aahe ki tuzi konatya tari eka goshtivarun ghusmat hote aahe... aani ti atyant sudar ritine tu vyakta keli aahes!

इतिAnonymous Satyajit
Friday, May 22, 2009 2:20:00 PM  

:)
ठके, तुला आधी लिहिलेलं उत्तरच थोड्या फेरफारासकट:

कुठलाही physically intense क्षण अनुभवला की तो शब्दांत पकडायचा खेळ चालू आहे हल्ली स्वत:शीच. आज कुणीतरी लिहिलेलं काही वाचून डोकं हललं. ड्रॅगन आतड्यातून आग ओकतो तसे जळजळीत चवताळलेले भाव आपल्या पोटातून उठून वर येतायत की काय असं वाटायला लागलेलं. मी चक्क थरथरत होते, आणि खूप जोरजोरात श्वासोच्छ्वास सुरू होता. भराभरा हा लेख टायपल्यानंतर जरा शांत झाले. आणि to keep a record of the moment, I put it up on the blog. Of course I am curious about whether the intensity is 'reaching across' or is my usual verbosity killing off all the feeling - but there's definitely no reason why this purgative piece should be 'understandable'.

सत्त्या,
शीर्षकातला क़तरा म्हणजे ’इजाज़त’मधल्या त्या गाण्यातला ’थेंब’. थेंबाथेंबात मिळणारं आयुष्य थेंबाथेंबात जगायचं आणि थेंबातच उधळायचं. और "बूँद से गई सो हौद से नहीं आती!" ;)
म्हणजे उत्कटतेचे क्षण अगदी अल्पजीवी असतात आणि अशा एका क्षणापासून दुसर्‍या क्षणापर्यंत कंठलेलं हौदभर जगणं कधीकधी फारसं आवडत नाही. अर्थात सध्या करत असलेलं नेहमीचं कामही खूप आवडीचं असल्यामुळे हे असले विचार सुद्धा थेंबासारखेच अल्पजीवी. त्यामुळे घुसमट नाही, काळजी नसावी!

इतिBlogger Gayatri
Friday, May 22, 2009 4:19:00 PM  

Hmmmm

आज कुणीतरी लिहिलेलं काही वाचून डोकं हललं.>>> ase kaay vaachles tu gayatri? kelel ka? mala he post ka kon jaane phaarc aawdly :)

इतिBlogger Dk
Friday, May 22, 2009 5:32:00 PM  

खुप छान ! ही एक अशी मैत्री....जी शब्दांमूळॆच होते खरी..पण ती व्यक्त करायला शब्द नसले तरी कळतं.
मला आवडेल तुझ्याशी गप्पा मारायला.

इतिBlogger asmi
Sunday, May 24, 2009 12:41:00 PM  

Ok!
Mala tu pratikriyanmadhe dilelya vivechanavarun & purna lekh punha(2 - 3 da)vachalyavar kalala.... :)

इतिAnonymous Satyajit
Sunday, May 24, 2009 1:53:00 PM  

खूप आवडला पोस्ट.

ब्लॉग हे मिडिअमच असं आहे की ते फक्त गोष्ट सांगण्यासाठी नसतंच मुळी. लिहाणाऱ्याला जाणणं हे लिहिलेलं जाणण्याइतकंच एंटरटेनिंग असू शकतंच की. पोस्ट नक्कीच कळला नाही, पण इंटेन्सिटी कळली. तुझ्या आधीच्या उत्तरावरून तेच अभिप्रेत होतं हे दिसतंय.

एक ब्लॉगर म्हणून हे इंटेन्सिटी ऍक्रॉस पोहोचवणे प्रकरण किती कठीण आहे हे मी अनुभवलं आहे आणि सतत त्यात अपयशीही ठरलो आहे. त्यामुळे तुझा हा पोस्ट अजूनंच आवडला.

इतिBlogger कोहम
Sunday, May 24, 2009 4:30:00 PM  

कमेन्ट सोड,काय वाचलंस ते सांग आधी..
तसंही तुझ्या लेखनाला दाद देण्याआधी तू म्हटलंयस तसं मला आधी काही माझे मध्यमवर्गीय आणि gender based आरसे फोडावे लागतील..आणि तरीही नंतर उरलेच तर काही तुकडे ओळखीपुरते ठेवावे लागतील.
उत्तम!!!

इतिBlogger सखी
Monday, May 25, 2009 12:25:00 PM  

bhari lihilay ekdam!
btw, tumhala 'suman' ya link warun gheta yeil:-

http://rs483.rapidshare.com/files/222298712/Suman_-_Jaya_Bhaduri_-_Rare_Unreleased.rar

इतिBlogger Sthiti Chitra
Thursday, June 04, 2009 4:48:00 PM  

पुलंचं एक वाक्य : जगात वेदना जेवढं सुंदर बोलते तितका सुख नाही बोलत. सुख माणसाला मुकं करतं.

इतिBlogger Jack the Ripper
Wednesday, December 09, 2009 3:53:00 AM  

Post a Comment

<< Home