Wednesday, March 11, 2009

पत्रावळ: ३

( "आपण का नाही असं सजवून धजवून जेवण मांडत रोज?" या प्रश्नावर "बाळा, वेळ असता तर चिंचेच्या पानाच्या पत्रावळी केल्या असत्या" हे उत्तर वाचलं. वाटलं, वेळ असता तर..मुभा असती तर..जाणीव असती तर..वाचायला कुणी असतं तर..किती जणींनी किती पत्रांतून मन मांडलं असतं आपलं. त्या न लिहिल्या गेलेल्या पत्रांच्या या पत्रावळी.)

तायडे,

तुझ्या शहरात चिक्कार माणसं. गडबड, बडबड, धावपळ. त्या गर्दीत ’आपण कित्ती छोटे’ हे दाखवायला डग्लस ऍडम्सची गरज नाही, किंवा ’ऍकला चोलो रे’ सांगायला रवीन्द्रनाथांचीही.

रात्री वर बघितलं तर इकडून तिकडे दिवे मिचकावीत जाणारी विमानं कित्तीतरी. इथे तिसरीच्या भूगोलात ’रात्री आभाळात एका जागी राहून लुकलुकणार्‍या चांदण्यांना तारे म्हणतात’ असं शिकवावं लागतं का गं?

मला आवडली इथली खारटतुरट हवा खूप. आणि ऐन गर्दीत झुकझुकगाडीत चेंगरून उभं राहणं, लळतलोंबत. तीन मिनिटं..चार मिनिटं..मी श्वास घ्यायच्या हवेचं रेशनिंग करत उभी.
मग गाडी झूंऽऽझप्पकन सुसाटते अचानक, आणि एक गार गार हवेची झुळूक माझ्या कानशिलावर. स्वर्गसुख.

मी ना, डिझाइनिंगवाल्या मुलांच्या प्रकल्पांचं प्रदर्शन पाहायला गेले होते. मीनू नावाच्या एका मुलीने हिजड्यांवरती एक फोटोंसकटचं पुस्तक तयार केलं होतं. त्याला ती ’फोटो एस्से ऑन हिजरा कम्यूनिटी’ म्हणत होती. मला बरंच कायकाय कळलं हिजडा समाजाबद्दल तिच्याशी बोलता बोलता. तसं खूप काय काय ऐकून-वाचून होते गं आधीपण..पण ते कल्पनाविस्तारात्मक. इथे प्रत्यक्ष त्यांच्या समाजात ऊठबस केलेलं कुणीतरी सांगत होतं आपले अनुभव. ती लक्ष्मी पण आली होती तिचं काम बघायला. सहा फूट उंच, पुरुषी चेहरा, रुंद खांदे आणि एकदम उंच टाचांचे सॅंडल्स पायात. गुलाबी तंग ड्रेस पण होता अगं. लोक चोरून, कुणी आ वासून बघत होते तिच्याकडे. (हिजड्यांना ’तो’ नाही, ’ती’ म्हणायचं - ते स्वत:ला स्त्रीच मानतात - हे मला मीनूच म्हणाली. आणि कुणीही नपुंसक व्यक्ती ’हिजडा’ म्हणवून घेऊ शकत नाही स्वत:ला - त्यासाठी त्यांच्या समाजात विधिवत स्वीकार व्हावा लागतो हे पण. आणि त्यांना खूप छळलं जातं..तरी आधारपण असतो एकमेकांचा, हे पण.)
ताई, ते सगळं पाहून-ऐकून काय नक्की वाटलं ते कळत नाही. काही काही मतं पटली पण नाहीत तिची. आणि थोडंसं ’उगाच प्रदर्शन’ असं होतंय का काय, हे वाटलं लक्ष्मीला पाहून.
(अगं, त्या मीनूचे कपडे पण काही साधेसुधे नव्हते. तिला पाहिलं असतं ना आपल्या शेजारच्या काकूंनी, तर ’नटवी मेली!’ असं पुटपुटल्या असत्या. लांब कट घेतलेला स्कर्ट, शोभत नाही इतके दाट काजळाचे फराटे डोळ्यात..तू कधीकधी "वॉना बी" म्हणतेस ना काहीजणांना बघून, तसं. पुलंच्या त्या ’सोशल वर्कची घाई असलेल्या ठम्माबाई’ होत्या ना, तसलं हे प्रकरण आहे की काय असं वाटलं पहिल्या नजरेत. पण प्रत्यक्ष तिच्याशी बोलल्यावर मात्र स्वत:ची लाज वाटली जरा. किती विचार केला होता तिनं या सगळ्यावर, तिची स्वत:ची भावनिक गुंतवणूक पण होती त्यात..आणि गट्स होते गं..धडाडीची मुलगी!)
आपल्यात बोलत नाहीत ना गं अशा विषयांवर चारचौघांत सरळ स्पष्ट. बोललंच तर थट्टेनं किंवा किळस येते असं किंवा उगाच फुक्कट सहानुभूती दाखवल्यासारखं. म्हणजे समोर आली एखादी व्यक्ती की तिचं हिजडेपण हीच तिची एकमेव ओळख असल्यासारखं. माणूसपण कुठे नसल्याचसारखं.

मी काल लोकलनं उशीरा परत येत होते. डब्यात फारशी गर्दी नव्हती. एक हिजडा आली डब्यामध्ये. टाळ्या वाजवत पैसे मागायला लागली. ताई, मला हळूहळू जाणवायला लागलंय की मला जर कुठली भावना कुणाच्याही चेहर्‍यावर बघवत नसेल तर ती म्हणजे लाचारी. तुला आठवतंय लहानपणी टीव्हीवर कसलीतरी जाहिरात लागायची, त्यात आत्माराम भेंडे एक दीनवाणे म्हातारे आजोबा बनलेले असायचे. त्यांचा तो चेहरा किंवा श्रीराम लागूंचा आपण ऐकलेला ’घर देता का घर’संवाद..मला ढवळून येतं पोटात त्यानं.
ही पिवळी साडी नेसलेली, काहीही न बोलता किती काही मागणारी व्यक्ती बघून तसंच झालं मला. पैसे नव्हतेच द्यायचे मला..बाबांचं तत्व..(मला त्याच्यावर सुद्धा नीट खोलात विचार करायचाय बरं का..) पण मला आतून
कसंसंच झालं..आणि मी अगतिकतेने हसून बघितलं तिच्याकडे. मला माहिती नाही माझ्या डोक्यात काय चाललंय ते तिला कळलं की नाही - पण तिने ना ताई, हलकेच थोपटलं माझ्या डोक्यावर..आणि निघून गेली!!!
मुक्या मारावर मोहरीचं पोटीस लावायची आज्जी, तेव्हा वाटायचं तसं गरम गरम वाटलं आतून.

काल 300 नावाचा पिक्चर पाहिला. आपले वेडात दौडलेले सात मराठे वीर, ब्रिटिशांचं लाइट ब्रिगेड, तसे स्पार्टाचे हे तीनशे वीर निधड्या छातीचे. तायू, मेलेल्या माणसांच्या मुडद्यांचे कोट करून लढली माणसं. त्यांच्याकडे बघत, स्वत:ची चीड उसळवत, त्यांचाच स्वत:च्या रक्षणासाठी वापर करत..थंड डोक्यानं लढली. तुझ्या शहरात कारण नसताना पडलेल्या मुडद्यांचं काय होतं गं ताई?

ताई तुझ्या शहरात..माणसांना किंमत येऊ दे.

5 Comments:

गायत्री,
काय बोलू तेच सुचत नाहीये गं! तरीही...तुझ्या पोस्ट वाचून मला माझं एक प्रतिबिंब पाहिल्याचे आभास होतात. साहित्य,लेखनशैली राहिली बाजूला मात्र विचारातून, ते मांडताना ज्या उपमा, रुपकं वापरतेस त्यातून तीच ती वळणं, त्यावर परत चालल्यासारखं वाटतं.
बरेच पोस्ट वाचल्यानंतर त्यातले मतंप्रवाह पटतात,अगदी आपणही हाच विचार करत होतो असंही वाटतं...पण तुझी अनुदिनी वाचताना काहीतरी वेगळं वाटतं...असो.
शब्दात पूर्ण सांगता येणार नाही.
छान, सुंदर लिहीतेस!

इतिBlogger सखी
Friday, March 13, 2009 12:33:00 PM  

एक गंभीर विषय अगदी सहजपणे हाताळलास, त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

पुढल्या पत्रावळीची वाट पाहतोय.

इतिBlogger प्रशांत
Saturday, March 14, 2009 3:40:00 AM  

अफलातून!

इतिAnonymous Anonymous
Sunday, March 15, 2009 10:47:00 PM  

पत्रावळीची कल्पना मनापासून आवडली.
किती महान लिहीतेस अगं तू, ताई!


पैसे नव्हतेच द्यायचे मला..बाबांचं तत्व..(मला त्याच्यावर सुद्धा नीट खोलात विचार करायचाय बरं का..)
गेले ५ वर्ष मी पण संभ्रमातच आहे :।

इतिBlogger Shashank Kanade
Monday, March 30, 2009 11:12:00 AM  

आपली अस्मिता टिकवताना किती धडपडतो आपण. त्याला धक्का लागू नये म्हणून अळवावरच्या थेंबाप्रमाणे जपत असतो. जातीभेद, वंशभेद यामुळे समाजातील अस्तित्वासाठी झगडणारे कितीतरी लोक आपल्याला माहिती आहे. त्यांच्या प्रयत्नांचे किती कौतुक वाटतं आपल्याला! पण नैसर्गिक अस्तित्वाबद्दलच साशंकता किती भयानक आहे. त्यात शिवाय समाजाकडून होणारी प्रतारणा. फारच भयंकर.
टाटा इन्स्टीट्यूट मधले दोन प्राध्यापक- जयशंकर आणि अंजली मोंटेरो यांचा एक माहितीपट आहे- Our Family. http://ourfamily2007.wordpress.com/
त्यात हा विषय फार वेगळ्या तर्‍हेने हाताळला आहे.

इतिBlogger prasad bokil
Tuesday, March 31, 2009 1:21:00 PM  

Post a Comment

<< Home