Friday, September 11, 2009

Herringbone Stitch (2)

E-F.

टाळ्या--टाळ्या--टाळ्या.
उत्तर म्हणून पहिल्या तीन ओळी पाठवल्या असत्यास फक्त तरी चाललं असतं. :P

अरे ’दो जिस्म एक जान’ वगैरे भूलथापा ऐकून तशा ’भूमिके’त जाण्याचा प्रयत्न केला होता रे. पण जमंनाच अगदी. तुझं पत्र वाचून ते सगळे विचार किती उसने आहेत ते लक्षात आलं चटकन. थ्यांक्यूच.

आणि माझ्यावर गुंतागुंतीचा (शी! किती गुंतवळ आल्यासारखं वाटतं हा शब्द लिहिताना!) आरोप करणार्‍या घुबडा, तू स्वत: काही लिहितोस तेव्हा उपमा आणि प्रतिमा हायस्कुलातल्या पोरींसारख्या कलाकला केकाटत असतात इथे-तिथे, ते सोयीस्करपणे विसरलास की. दिवा आणि भिंगं! ’हुडूत’.
(सॉरी सॉरी..हे फक्त खुन्नस म्हणून. ती प्रतिमा बरी आहे चावायला.)

माझ्या ’वेगळे’पणाचा मुद्दा आणलास त्यावरून मला हादग्याचं गाणं आठवलं लहानपणीचं.
’कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली गं धावून, काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून..
आई मला चंद्र दे धरून, त्याचा चेंडू दे करून - अस्लं रे कस्लं मागणं तुझं जगाच्या वेगळं?’

लहानपणी हे गाता गाता मला यशोदेचा भारी राग यायचा.
एक तर बाळाचं मागणं ऐकायच्या आधीच ’मी देतेच आणून’ असं कबूल करायचं.
मग त्याची अचाट मागणी पुरी करायची आपल्यात पात्रता नाही (किंवा आरश्यात चंद्र दाखवायची कल्पकताही नाही), म्हणून त्याच्यावरच डाफरायचं, ’जगावेगळं’ मागतो म्हणून.
आता झालं ते झालं, पण एकदा समजलंय ना की आपलं पोरगं असं कायच्याकायच मागतं, तर परत परत त्याला तोच प्रश्न काय म्हणून विचारावा?
मग उद्या चांदण्यांच्या लाह्या आणि विंचवाची अंगठी मागणारच की तो. आणि मग परत त्याला ’जगाच्या वेगळं’ म्हणून बोल लावायचा.

जरा मोठी झाल्यावर मला यशोदेच्या त्या शेवटच्या प्रश्नातली अभिमानाची, कौतुकाची छटा जाणवली न्‌ मग कृष्णाचाच राग यायला लागला. म्हणजे आम्ही ज्या गोष्टींसाठी लोळण घातली असती (आई मला भूक लागली..मला जत्रेत पिपाणी हवी, मला पेंद्यानं मारलं..) त्या सगळ्या गोष्टी लांडी-लबाडी, चोरी-मारी-गोडीगुलाबीनं साधून घेऊन मोकळा होणार हा पठ्ठ्या..आणि आईपुढे लोळण घालताना मात्र ही असली जगाच्यावेगळी कारणं तय्यार ठेवणार. येणारच की मातोश्रींचा ऊर गर्वानं भरून!

तुझं काय मत?


--

G-H.

हं, आता कशी लायनीवर आलीस. आणि ते प्रतिमा वगैरे तुला कळेलशा भाषेत लिहावं म्हणून. :P

तुला भोंडल्याची गाणी-बिणी पाठ आहेत? मजा आहे. तुला गंमत वाटेल, पण मलाही आठवतात थोडी थोडी. तसं म्हणजे गाणी पाठ होण्याचं वय येता येताच ’मुलींत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा’ म्हणत आमची भोंडल्याच्या फेरीतून हकालपट्टी झाली होती. कसला उचकलो होतो मी! अर्थात नंतर वर्ष-दोन वर्षांत पाटावर हत्ती काढून त्याच्याभोवती गोल गोल फिरत कसलीतरी बावळट गाणी म्हणणं हा महाबावळटपणा आहे हे मत मीही मोठ्यानं दोस्तांच्यात फेकू लागलो होतो. पण तरी "वेऽऽड्याची बायको झोपली होती पलंगावर, तिकडून आला वेडा त्याने निर्खूऽऽन पाहिले, मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले" याला बीट नाही.

जगावेगळ्या कृष्णाच्या गाण्यात मला यशोदेचा राग येतो, पण तू म्हणत्येस त्यापेक्षा वेगळ्या कारणासाठी. कृष्णाने लोळण घालताना काय मागितलं त्याची एकमेव साक्षीदार ही यशोदाबाई. त्याने मागितलीही असेल तुझ्यासारखी पिपाणी- कुणाला ठाऊक? पण ’कस्सा माझा लेक जगाच्या वेगळा’ हे जगाला दाखवायचा सोस असलेल्या यशोदेनं आपल्या पदरच्या चार अचकट मागण्या ’कृष्णाच्या’ म्हणून खपवल्या नसतीलच असं नाही. आणि वरून तो मोठा होताना त्याच्या मनावर ठसवत राहिली असेल त्याचं वेगळेपण. मग बापड्याला कसोशीनं प्रयत्न करावेच लागले असतील ’लई भारी’ होण्यासाठी. बिच्चारा!
तरी नशीब, त्याच्यात देवाच्या पॉवर्स होत्या सगळ्या. ’अवतार’ वगैरे नसता, तर अनेक चाइल्डहूड प्रॉडिजीज्‌ सारखी वाटच लागली असती मोठेपणी त्याची!

पण ’वेगळा’ चे विलग आणि अलग हे दोन अर्थ नव्यानं जाणवले.
’विलग’ हा ’बिलग’ चा भाऊ वाटतो पण अर्थ दोन टोकांचे.
पाडतेस कविता?

Labels:

Thursday, September 10, 2009

Herringbone Stitch (1)

A-B.

नको काढू चित्र माझं.
काळ्या शाईत कुंचला बुडवून तू पहिला फराटा कागदावर ओढशील -
तिथेच माझ्यापासून वेगळा होशील.
*
नकोच करू कौतुक माझ्या शब्दांचं.
मी तर त्यांच्यापासून वेगळी झालीये कधीचीच.
तुझ्या ’वाहवा!’ सरशी त्यांचा दु:स्वासही करू लागेन कदाचित.
*

अस्वस्थ आहे. उत्तर दे.


--

C-D.

नकोच करू स्तुती माझ्या पावभाजीची.
एकदा माझी ’स्पेशालिटी’ झाली
की दर वेळी मलाच बनवावी लागेल ती.

- फक्त हेच तुला लिहून पाठवलं असतं उत्तर म्हणून, पण तुझ्या शेवटच्या चार शब्दांनी भानावर आलो.
तुझ्या कवितेला तुझी अनुदिनी मानणं कधीच सोडून दिलं होतं, तुझ्याच आग्रहावरून.
आजच्या या ओळींमधला अस्वस्थपणा तुझा स्वत:चा आहे? भीतीने तुला असं कवळून टाकावं आणि ते तू माझ्यापुढे कबूलही करावं...अजबच आहे.

’मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो’ - किरणला त्या गाण्याचा अर्थ समजावून देताना आवडायला लागलं होतं तुला ते. हरखून मला म्हणाली होतीस, "असं आसपासच्या सगळ्यांच्या मनातलं माझं चित्र मला दिसलं तर कित्ती मज्जा येईल!" मग आपण वाद घातला होता, व्यक्तींच्या मनाच्या नितळपणाबद्दल. मला अजूनही वाटतं, हा नितळपणा सापेक्ष असतो. बघणार्‍याच्या संवेदना किती तीक्ष्ण आहेत त्यानुसार बदलतो तो. एखाद्या वाक्याचा पोत, एखादा कटाक्ष, एक हुंकार किंवा श्वासाची लय तुला ते चित्र लख्खपणे दाखवू शकते. पण तू या ’फसव्या पुराव्यां’ना धुडकावूनच लावलं होतंस. तुला शब्दांचं सघन माध्यमच हवं होतं. ’म्हणजे गैरसमजाला जागा नको’ - सावध सज्जनगिरीने तू म्हणाली होतीस.
मग आज अशी दूर का पळते आहेस शब्दचित्रांपासून?

’वेगळं न करता येण्याजोगं मिसळलेपण’ - ते तर तुला-मला दोघांनाही कधीच मान्य नव्हतं. त्या मुद्यावरच तर आपली गट्टी जमलेली. अचानक गट बदलू नकोस हां बयो!

चित्रकारानं एखाद्या वस्तूचं चित्र काढताना तिच्याबद्दल आपुलकी बाळगली, तर तिचे दोष त्याच्याही नकळत झाकले जाणार किंवा त्यांचं उदात्तीकरण होणार. घाटदार घड्याला गेलेला उभा तडाही ’किती सुंदर!’ वाटणार. व्हॅन गॉगच्या ’सेल्फ पोर्ट्रेट्स’ना नावाजायचं का? त्याच्या चित्रांतला तो गॉग खरा-खुरा माणूस वाटतो. त्यानं ते चित्र काढताना स्वत:ला स्वत:पासूनच अलिप्त केलं असणार - निदान तसा प्रयत्न केला असणार हे स्पष्ट दिसतं. किंवा हे केवळ दोष झाकण्याबद्दलही नसेल. फक्त ’दिसतं त्याच्याशी प्रामाणिक’ राहण्याच्या प्रयत्नाबद्दल असेल.
हे सगळं तुला कळलेलं नाही असं नाही - उलट नीटच कळलं आहे, आणि कदाचित तेच तुझ्या अस्वस्थतेचं मूळ आहे. मी फक्त तुझ्या सात ओळींतून ते शोधायचा प्रयत्न करतो आहे.

आता असं समज की चित्रकार झालाय तुझ्यापासून वेगळा. पण कितपत वेगळा? किमान दोन गोष्टींवर अवलंबून आहे ते. तुझ्याकडे बघायला तो कोणतं भिंग वापरतोय आणि कोणत्या प्रकाशात तुला बघतोय. स्वच्छ सपाट काच? अंतर्वक्र? बहिर्वक्र? परत त्यांच्या वेगवेगळ्या फोकल लेंथ्स. तू बुटुकबैंगण दिसशील, उंचकाडी दिसशील, किंवा एकदम तुझ्या चेहर्‍यावरचा मऊसूतपणा जाऊन पेशींचं खडबडीत पटल दिसेल त्याला. पणतीच्या स्निग्ध प्रकाशात मवाळ दिसतील तुझ्या शरीराचे उंचवटे, आणि भगभगीत हॅलोजन दिव्याच्या प्रकाशात ताशीव कठपुतळी दिसू शकशील तू.
त्याला तू कशी दिसतेस हे जाणून घेताना गंमत नाही वाटणार तुला? आणि त्यानं काढलेलं तुझं चित्र बघून त्याच्या भिंगाची आणि दिव्याची जात आणि प्रत ठरवण्याचा हक्कही तुझ्याकडेच! मला तर बुवा मजा आली असती माझं चित्र पाहायला. आं आं..ती जात आणि प्रत तुझ्या स्वत:च्या भिंग-प्रकाशाच्या सापेक्षच असणार हे मान्य! पण लेकी, निरपेक्ष परिमाण अस्तित्वातच नसतं हे मान्य आहे नं?

बाप रे! या कुण्या चित्रकाराची सगळी भिंगं सदासर्वदा तुझ्याच भिंगांसारखी असावीत आणि दोघांनी मिळून एकच दिवा वापरावा असलं अकटश्च विकट काही वाटतंय का तुला? आणि तुझ्यापासून ’वेगळ्या’ झालेल्या तुझ्या शब्दांना त्यानं वाखाणलं तर दु:स्वास करशील त्यांचा? हा वस्त्रगाळ मूर्खपणा आहे.
बरं, असं म्हणावं की ’माझं चित्र काढू नको, मी लिहिलेल्याची स्तुती करू नको’ असं म्हणणारी ही पोर खरंच ’वेगळी’ आहे इतरांपेक्षा, तर तेही नाही. या गोष्टींचा उल्लेख केलास यातच तुझ्या लेखी त्यांना महत्त्व आहे हेही आलंच.

तू एवढी गुंतागुंतीची का आहेस? सरळ दणादणा लिहावं स्पष्ट काय वाटतं ते. उगाच काहीतरी तुकड्यातुकड्यांत प्रतिमा आणि उपमा वापरून ’मला ते कळतंय का’ याची परीक्षा घेत राहायचं. मला काय कळलं ते मी तुला सांगितलं की खास ठेवणीतलं हसायचं. "मला आवडलं तू काढलेलं माझं चित्र ...पण ती मी नव्हेच!" म्हणायचं. रागच येतो मला तुझा.

पूर्वी एक गोष्ट बरी होती: मी काढलेलं तुझं चित्र पाहायची तुला उत्सुकता तरी असायची. आणि तुझ्या सेल्फ-पोर्ट्रेटशी ते ताडून त्यातले फरकही सांगायचीस तू लहर असेल तर.
आता तू तुझं चित्र काढायलाच मनाई करते आहेस? कसली भीती वाटतेय एवढी? "समोरच्याला तू जशी दिसलीस तशी तू नाहीच आहेस" हा निष्कर्ष आहे वेडे, गृहीतक नव्हे. चित्रं काढू देत राहिलीस, ती पूर्वीसारखी उत्सुकतेनं पाहातही राहिलीस - तर सापडेल एखादं त्या क्षणी मिळतंजुळतं. तो चित्रकाराचा विजय असला तरी तुझा पराभव नसेल.

पटतं तर बोल ... नायतर जा उडत.

Labels: