Sunday, May 24, 2009

ख्वाब था या खयाल था,...क्या था?

आज फारा दिवसांनी येणं केलंत कवी.
बरोबर आहे, मीच तुमची आठवण..म्हणजे अगदी खरीखुरी, कचकचीत आठवण आज काढली.
त्याचं काय आहे कवी, तुमची बहुतांश कविता कॉलेजातल्या एखाद्या माजोर्ड्या दोस्तासारखी 'लागते'. एकदा लागली की पिच्छा सोडत नाही मग. माझं डोकं एकाच वेळेला थरारतं, उठतं, पिकतं, स्तब्ध होतं वगैरे वगैरे. (५१२ मेगाबाइट्स वर विन्डोज व्हिस्टा चालवल्यासारखी गत.) आणि सध्या तरी एवढी रॅम तुमच्या कवितेपाठी घालवायची अगदीच गरज नाहीये मला!

पण हा कडकडीत उपासदेखील सहन होण्यातला नव्हता. त्यामुळे आजोळी गडग्यातून जाता जाता वाटेत जसं एखाद्या झाडावरून मस्त टप्पोरं भिरंड नाहीतर बिंबल तोडायचो आणि मग वाटभर तोंडात घोळवत, मिटक्या आणि शिरशिरी भोगत चालत रहायचो - तसाच आज तुमच्या कवितेचा एकच चरण भोगते आहे. 'सखीच्या मुलीला कसे काय द्यावे....'

तुम्हांला ठाऊकाय कवी? तुमची कविता म्हणजे निमित्त. बडबड करायची असते मलाच. उगाच कुठेतरी काहीतरी घडतं, कसलंसं पहाटस्वप्न पडतं. वेटोळं घातलेल्या नागयुगुलासारखा तुमचा एखादा शब्द, एखादी ओळ त्या घटनेसोबत रमलेली. बाकीची कविता काय आहे, संदर्भ काय असावा, कश्शाकश्शाचा विचार न करता मी बिनदिक्कतपणे ती ओळ भोज्जा म्हणून पकडून माझं पुराण सुरू करते.

सखीची मुलगी आज पहाटे आली. सगळं घर अवतारात. मी पण त्याच्याशी स्पर्धा करत असल्यासारखी अस्ताव्यस्त. ती आली तीच ताज्या दुधाच्या पत्ती चहासारखी घमघमत. हातानी पसारा आवरत वटवट सुरू.

"चल चल चल ..तय्यार हो पटकन्‌..लॅबर्नम फुललाय! काल पळायला गेले होते तर त्याच्यापाशी मला मोराचं पीस मिळालं एक..आद्या फाद्या लगेच ’माला पायजे’ म्हणत रडत बसला..म्हणलं देत नाय जा..मग म्हणे मावशीला सांगणार..म्हणलं तुझ्झ्याआध्धी उठून मीच सांगणार..पण ते र्‍हाऊंदेत..तू चल आधी बाहेर..चऽऽल ना गंऽऽऽऽऽऽऽ"


किती तपं लोटली? असेच शब्द.

"
चल ना गं आज माझ्यासोबत!

...


ए, माहितीये मला, तुझ्या खांद्यावर खूप मोठ्ठी स्वप्नं आहेत. पण तुला खरं सांगू, ओझं होतंय त्यांचं तुला.
बघ, फुगलं नाक लगेच - 'तू कोण मला सांगणारा?' म्हणत.
अगं मी काही कायमची खाली ठेवायला सांगत नाहीय ती. आजच्यापुरती..थोडाच वेळ फक्त!
येतेस माझ्याबरोबर थोडा वेळ?
अगदी आहेस अश्शीच चल -
आज माझी स्वप्नं आहेत बरोबर.
हां हां, असे डोळे विस्फारायची गरज नाही. आम्हांलाही पडतात म्हटलं स्वप्नं.
..
सांगू माझी स्वप्नं?
छोटीशीच आहेत गं.

जाऊ असंच स्कूटीवर बसून.
त्या चौकात थांबू सिग्नलला.
तिथला गजरे विकणारा छोटू पुढे येईल दोघांना बघून.
तू कसनुशी तोंड फिरवशील..
तुला काहीतरी करायचंय ना या मुलांचं शोषण टाळायला..त्यांना त्यांचं बालपण परत मिळवून द्यायला..
विचार, अधिकाराच्या जागेसाठी अभ्यास आणि एका संस्थेत काम करतेच आहेस तू..
पण आत्ता, समोरच्या त्या छोटूकडे आणि त्या गजर्‍यांकडेही बघवत नाही तुला.
एक तर फुलं अशी वेलीवरून तोडलेली तुला आवडत नाहीत..गजरे तू माळत नाहीस.
आणि तू-मी एकत्र असताना असे गजरा घेण्यातले सामाजिक संदर्भ आणि अर्थ!
तू तर स्कूटीवरसुद्धा तुझा माझा ’तसा’ संबंध नाही हे दाखवायला सीटच्या जितक्या मागल्या भागात बसता येईल तितकी बसलेली.
(कचकन्‌ ब्रेक दाबून तू मला आदळू नयेस म्हणून मी स्पीडब्रेकरच्या पंधरा फूट आधीपासनंच स्पीड कमी करत येतो हे तुझ्या लक्षात आलंय?)
पण आज आपण थांबूचयात गाडी थोडी बाजूला घेऊन.
घाईत पुढे जाणार्‍यांना जाऊ देत पुढे.
मला ना, सकाळी सकाळी त्याच्याकडचे ते सगळेच्या सगळे गजरे विकत घ्यायचेत.
त्या मोगर्‍याच्या गजर्‍याहून जास्त टवटवीत त्याचं हसणं मला एकच क्षण पहायचंय.


मग शाळेत जाऊयात आपल्या?
किती वर्षांत भेटली नसशील सगळ्यांना..
आठवण काढतात गं तुझी कौतुकानं.
एकदा कसल्याशा चुकीची ’आता आपल्याला खूप मोठ्ठी शिक्षा मिळणार’ म्हणून धास्तावलेल्या तुला, किती हळुवारपणे चूक समजावून दिली होती आपल्या सासणेबाईंनी.
रोवलं गेलं असेल का गं तुझ्या आत्ताच्या समजूतदारपणाचं बी तिथे कुठे?
बाई आता मुख्याध्यापिका झाल्यात.
त्यांना दोन गजरे देऊयात. एक त्या आधी सरस्वतीच्या मूर्तीला घालतील बघ!
भेटू मग स्टाफरूममध्ये जाऊन बाकी सगळ्यांना.
’स्वकर्तृत्वावर मोठ्ठी होईन, मगच शाळेत भेटायला जाईन’ असं वेडगळ काही डोक्यात नाही धरलंयस ना?
अगं कितीही मोठी झालीस तरी त्यांच्यासाठी लहानच!
आता जाऊ तेव्हा बघ, नुसता नमस्कार करशील तेव्हा भरून येईल सगळ्यांना...
मोठ्ठी होशील तेव्हा जाशीलच गं सगळ्यांना ’त्यांच्या रोपट्याचा वृक्ष कसा झालाय’ इ. इ. दाखवायला
पण सध्या त्यांना ’ओळख ठेवल्येयस’ याचंच कौतुक असणारेय.
मला ते कौतुक बघायचंय.


बाई आपल्याला कदाचित सातवीच्या वर्गात घेऊन जातील..’माझे विद्यार्थी’ म्हणून कौतुकानं सांगायला..तुझ्या एकेका यशाबद्दल सांगतील तेव्हा विस्फारत जाणारे पोरापोरींचे डोळे..
मग एखादी धिटुकली तुला विचारेल, ’ताई..अभ्यास कसा करायचा?’
मग तू नेहमीसारखी आजीबाई मोडमधून सांगायला लागशील पुलंच्या ’अभ्यास: एक आनंद’ मधले विचार, मध्येच त्या पोरीशी ’कनेक्ट’ व्हायला कार्टून नेटवर्क आणि आयपीएल आणि नव्या (नुसतीच नावं ऐकलेल्या) सिनेमांबद्दल एखादं वाक्य टाकशील.
तू जे बोलत असशील ते तुला खरोखरच खरं वाटत असेल.
मला तशी आदर्श कळकळ पाहायचीय तुझ्या चेहर्‍यावरली.

फार वेळ नाही जायचा या सगळ्यात.
मग परत येताना..एकच स्वप्न उरतं माझं..
शाळेच्या पायर्‍या उतरताना मी सायमन-गार्फंकलचं ’लाइक अ ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर्स..’ गुणगुणत असेन..
तू म्हणशील - ’आता जाताना मी चालवते स्कूटी..तू हे गाणं पूर्ण गाशील?’
शेवटच्या कडव्यापर्यंत पोचेतो घर येईल..
Sail on, silvergirl ..sail on by..

बस. एवढंच.
चल, येतेस?

"




सखीच्या मुलीला कसे काय द्यावे?

सखीच्या मुलीला इतर काहीही द्यावे..

पण अधेड स्वप्नांच्या आठवणी कधीही देऊ नयेत.

Friday, May 22, 2009

क़तरा क़तरा जगणे मरणे.

मला एकदा, एकदाच तुला भेटायचंय.

एकदा तरी भेटायचंय.

ही वखवख कुठून येते आहे याची मला पर्वा नाही, आणि उत्सुकताही नाही--सध्या.
उतरली वखवख की प्रश्न सुरू होतील, तेही तिच्याइतके जीवघेणे नसतील.
काही तातडीनं करायच्या कामांसाठी थांबून राहण्याइतके समंजस असतील ते प्रश्न.

त्यांचा आत्ता या "उत्कट भारावलेल्या इ. इ." थडथडमार्‍या स्थितीत विचार करण्याचं काय कारण?
आणि त्यांचा विचार येत असेल तर स्थिती थडथडमारी खरंच आहे का?

पण आहे.
विचार डोक्यात आल्यापासून ते इथे उतरवेपर्यंत मधल्या वेळात एक सफरचंद जसं खस्सकन ओढून हातात घेतलं तितक्या क्रूरपणे मी फळांना कधीही वागवत नाही.
डंख नाही मारला त्याला नेहमीसारखा इमणुला चिमणुला गोड्डगोड्डुला..राक्षसी लचका तोडला, अर्धं घशात घातलं एकदम.
आणि मग लिहिता येण्यासारखं सामान समोर आलं तेव्हा ते अर्धं सफरचंद तसंच बाजूलाही ठेवलं ..हे नेहमीचं नाही. खाणं अर्ध्यात सोडायचं नसतं मी.

आणि लिहिताना हातांच्या गतीत एक पाय तडातडा उडतो आहे हेही असंच आवेगाचं लक्षण.
डोक्यातला हा आरसा कधी फुटेल? स्वत:चं निरीक्षण करण्याची ही वेळ नाही, लाटेत बुडायची आहे हे न कळण्याइतपत बेअक्कल असू नये आरश्यांनी.

तुला एकदा भेटायचंय.
का ते माहीत नाही, भेटल्यावर कळेल.

जीवघेणं लिहिणारे अनेकजण वाचले मी, पण त्यातले काही केव्हाच उलथलेत आणि सध्याचे काही बरेच प्रसिद्ध म्हणून त्यांच्यामागे जाण्याचा अजिबात सोस नाही हे कुणीही न विचारता समर्थन माझं मलाच.

’तू कोण,कुठली’ चे काही तुकडे मला माहिती झालेत पण ते दुय्यम आहेत.
अशी कोसळत समोर आलीस तेव्हा आत उठलेली ही डोकं भांगलणारी तिडीक महत्त्वाची आहे.

किंवा जळजळ, मळमळ आणि बुळबुळीच्या मार्गानं जाणारं ते अन्न.
तू लिखाणात कधीही शिव्या दिलेल्या नाहीस तरी साला देवचोद विचार डोसकं फिरवतोच : तुझ्या लिखाणाचं तामसी अन्न खाऊन मला तांबारल्या डोळ्यांनी जगाच्या छाताडावर नंगानाच करावा असं का वाटलं?

कडकलक्ष्मीच्या तेल पाजलेल्या दोरखंडासारखं तुझं लिखाण मीच माझ्या हातानं मारतेय स्वत:च्या पहिल्यांदाच उघड्यावाघड्या केलेल्या पाठीवर.
हाड हाड..तो डमरू माझ्याच आत कुठेतरी वाजणारा कडाकडा..तू फक्त निमित्त.

पण नाही. निमित्त ’फक्त’ नसतं. च्यामायला आत्ताही सुपीक जमीन आणि बीज असल्या पकाऊ उपमा आठवाव्यात? Fuck-त.

तुला एकदा भेटायचंय.

रानमांजरानं पंजा मारून मारून सुंदर केलेला माझा चेहरा तुला दिसेल की नाही कोण जाणे.
पण तू एका क्षणाला माझा ड्रॅगन बनवलास एकापाठोपाठच्या सात टकीला शॉट्सविना..
त्या वेळी जळलेल्या त्या नरड्यातून आता एक शब्दतरी बाहेर पडेल का खराखुरा हेही सांगणं कठीण.
पण भेटशील तेव्हा रूमीच्या त्या रॉंगडूइंग आणि राइटडूइंगच्या शेतापार.
म्हणजे मग मला तुझी स्वत:च्या हातानं स्वत:चा गळा आवळणारी तडफड बघत बघत तडफडून मरता येईल.

***
.
.
.
ओळखदेख नसलेल्या..
नव्हे : ओळख असलेल्या, देख नसलेल्या दोन व्यक्तींनी
फालतू कॉफी शॉपमध्ये भेटून केलेल्या अत्यंत फालतू बडबडीनंतर
बोटं तांबारेपर्यंत कवळून तडाक्यात सोडून दिलेला हात.
त्या फालतू आपलेपणापेक्षा
त्या निर्‍या अधाशी क्षणासाठीच तुला भेटायचं होतं.


उपसंहार:

इन्टेन्सिटी कुणाच्या आयुष्याला पुरलीये? झेपते तितकी प्यावी.
पुढच्या इन्टेन्स तिडिकीच्या वेळी मी या खवचट मध्यमवर्गीय आरश्याचा खून करणार आहे.

Tuesday, May 12, 2009

ऍलिस

ए थरथरगुंडी -

अशी काय शहारतेस मधूनच - हुडहुडी भरल्यासारखी?
तरी बरं - उबूगुबू गादीवर, मऊमऊ पंच्यात
छान गुरफटून झोपली आहेस!
आणि बाहेरचा ऊनऊन प्रकाश आहे अजून खोलीभर.
आणखीन्‌ आसपासच्या चेहर्‍यांवरून वाफाळणारी माया.

तुझ्या पाळण्याशेजारी
अजून बाहुलीच दिसणारी
चिमणखुरी तुझी आई.
कालपरवापर्यंत बागेत झुले झुलणारा
आणि हिरवळीवर कोलांट्या मारणारा
पोरगेला - नव्हे पोरच - बाबा तुझा.
आणि अनोळखी भाषेच्या तटाआडून
खाणाखुणा करून करून तुझ्या नवलाईचं गूज
आम्हांला सांगू पाहणारी तुझी गोलसर आजी.

रडतेस काय तोंड फाकून?
भातुकलीतल्या बोळक्यासारखी दिसतेस!
एवढुश्श्या गळ्यातून केवढा तो आवाज -
त्यात लगालगा हलणारी इटकीबिटकी जीभ..
घसा सुकून जाईल हां अशानं.
मग बसशील रडत.
पण कशी?

तुझा बाबा कासावीस.
बाकीचे सगळे त्याला हसतात.
तुझी आईसुद्धा!
’मूलच आहे ते, रडणारच.’
तो फुरंगटलेला.
’बाळांना बोलता येत नाही आपल्यासारखं.
रडून काहीतरी सांगायला बघत असतात ती.’
तो पुटपुटतो मग, बचावाच्या सुरात.
सगळे चूप.
नशिबानं तूही रडायची थांबतेस.

’तू घेणार तिला?’ बाहुली विचारते.
’कोण? मी?’
त-त-प-प.
मी दोनदा हात खसखसून धुतले.
दोनदा गरम हवेचा फवारा.
नखं कापल्येत? हु्श्श!
बांगड्या - नाहीत. बोचरं घड्याळ - नाही.
(मला बाळांना खेळवायची हौस होती
आणि मला त्यांची - किंवा त्यांच्यासाठी - जरासुद्धा भीती वाटत नसे
तो काळ कधी निघून गेला?)

अशी काय गं तू?
आईच्या हातातून खुश्शाल तिर्‍हाइताकडे आलीस ती?
मी फुशारते आणि घाबरते सुद्धा.
तू खरंच आता माझ्या हातांत!
तुझं बचकभर डोकं माझ्या तळहातात गुडूप.
मी आपसूक तुला आंदोळते आहे.
’आमी चिनी गो चिनी तोमारे..’ च्या तालात.
तू चिनीमिच्च डोळ्याची एक फट किलकिली करत कुठेतरीच पाहतेस.
’तिला तशीच सवय आहे..डोळा मारायची!’ आई पोक्तपणे खिदळते.
मग तू जांभई देतेस.
फटाफट तीनदा शिंकतेस.
भुवया ताणताणून टिल्ल्या आठ्या पाडतेस.
आ..णि..
ओठाच्या एका बाजूनं..
(र्‍हेट बटलरसारखं!)
चक्क चक्क हसतेस!!!
जन्माला आल्यानंतर
बरोब्बर चोवीस तासांनी,
पहिल्यांदा!

पुढची पंचेचाळीस मिनिटं तु्झा सहा पौंडी जीव झुलवताना
’डायपर जीनी - विमा- औषधं -लशी - मोठी जागा’
यांतल्या कशाकशाकडे माझं लक्ष जात नाही.
”एकट्या तुझ्या बाबाच्या तुटपुंज्या पगारात तुमचं तिघांचं कसं भागणार?’
असले फालतू भोचक प्रश्न मला पडत नाहीत.

आता मला लहान बाळांची भीती वाटेनाशी झाली आहे - परत.

***


चि. ऍलिस ली साठी,
जी दहा मे इ.स. दोन हजार नऊ रोजी संध्याकाळी सहा वाजता या जगात आली,
आणि जी एकदा ’रुणुझुणुं रुणुझुणुं रे भ्रमरा’ हे गाणं ऐकत झोपी गेली होती.