Sunday, March 30, 2008

थंड ढगांची करडी राख आभाळबाबा अंगी फासून
बं बं बडबड करीत बसले एकलकोंडे दुपारपासून
अवतीभवती जमिनीवरती थिजले झुडपांचे सांगाडे
त्यात पलिकडे घुटमळणारे कुलुंगकुत्रे शेपुटवेडे
माती काळी: जणूं काजळी विझल्या चिलमीच्या तोंडावर
तिच्यात रुतलेली गवताची पाती पिवळटलेली जर्जर
पडेल वारा मध्येच उठतो, तिडिकीने येतो अंगावर
सोबत धुळकट भपकारा अन्‌ कानांमध्ये भयाण चरचर
कुणास ठाउक कुठे दडाल्या तुडतुडणार्‍या धीट खारुल्या
केविलवाणे चिमणपाखरू हाका देते भेदरलेल्या
असल्या दिवशी असे वाटते गुडुपगोधडी झोपुनि जावे
आजीने थरथर-हातांनी थोपटल्याचे स्वप्न पहावे!


***

छ्या! काय पण दिवस आहे. सूर्यदर्शन नाही सकाळपासून. ते सोडच - शिशिर गेला म्हणजे बर्फसुद्धा नाही. बर्फाच्या पांढर्‌या मायेची दुलई असली म्हणजे बोचर्‌या वार्‌याबिर्‌याचा टेंभा काही चालत नाही आपल्यापुढे. आता आठवडा झाला की, 'वसंत येणार, येणार' म्हणता म्हणता. एक तुरा दिसायचं नाव नाही झुडपांवर. ते एक पाचफुटी बावळट झाड तर नोव्हेंबरापासून पानांची वाळली लक्तरं अंगावर घेऊन बसलंय. अरे गेल्या दिवसांची एवढी माया कशाला बाबा? जाऊ दे वार्‌यावर उडून त्यांना. नवीन कोंभांना जागा नको द्यायला तुला?
ते काही नाही. असल्या दिवसाला तसल्याच हुडहुड्या कवितेनं उत्तर द्यायला पाहिजे. केव्हापासून बोरकरांची 'चित्रवीणा' आणि अनिलांची 'आभाळ निळे नि ढग पांढरे' डोक्यात रुंजी घालतायत. त्यांचा 'प्रभाव' पडल्याशिवाय कसा राहील?
ओ रे बोशोन्तो, एइ दिके आय! जरा इकडे ये ना बाबा..वाट पाहत्येय केव्हाची मी.. घर तुलनेने साफसूफ आहे पूर्वीपेक्षा, आणि जांभळ्या तुरेवाल्या फुलझाडांच्या बियांचं पाकीटपण तय्यार आहे!